महानोरांच्या कवितेतील लोकतत्त्वे

२००३ साली श्रीकांत देशमुख यांनी 'महानोरांची कविता ' हे पुस्तक संपादित केले. त्यात माझा एक लेख होता,'महानोरांच्या कवितेतील लोकतत्त्वे ' हा लेख कविवर्य ना.धों.महानोरदादांनी वाचला. त्यांना तो इतका आवडला की त्यांनी माझा लॅन्डलाइन नं.मिळवला. मला फोन केला.म्हणाले, माझी मुलगी अकोल्यात राहते. तिच्याकडे आलो की तुमच्याकडे अवश्य येईन.
आणि कविवर्यांनी दिलेला शब्द पाळला. दादा अकोल्याला आले. फोन करून माझ्या घराचा पत्ता घेतला.घरी आले.आमच्या घरी सर्वांना झालेला आनंद शब्दात सांगण कठीण. श्रोत्यात बसून दादांचं काव्य सादरीकरण अनेक वेळा अनुभवलं होतं. अस्सल मराठमोळी शब्दकळा, शेतीमातीतून आलेल्या रसरशीत प्रतिमांनी अक्षरशः 'येडे झालो आम्ही ' अशी गत व्हायची. 'जैत रे जैत ' ची गाणी तर घरी सर्वांना पाठ झाली होती.एवढा मोठा कवी स्वतःहून आपल्या घरी येतो म्हणतो.
त्यांच्याशी संवाद कसा होईल ? मोकळा बोलेन की नाही ? त्यांच्या उपस्थितीचं दडपण येईल का ? अशी मनाची घालमेल चालली होती. यातलं काहीच झालं नाही.
दादा हसत मुखानं घरात आले. मनमोकळ्या गप्पा केल्या. बायको -पोरांशी मायेने बोलले.आईजवळ बसले. तिच्याशी वर्षानुवर्षे ओळख असल्यासारखा दोघांचा संवाद झाला. निघताना आईच्या पाया पडले. आम्ही सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले. प्रेमाने आशीर्वाद दिला. माझ्या लेखाचे मनापासून कौतुक केले. निखळ अनौपचारिकतेने म्हणाले, तुमचा लेख मला फार आवडला. तुमचा अभ्यास आगळा-वेगळा आहे. मांडणी निराळी आहे. लिहीत रहा. पुन्हा भेटू.
आता दादांची भेट त्यांच्या कवितेतूनच. दादांची एकमेव भेट घडवणारा तोच हा लेख -
.

महानोरांच्या कवितेतील लोकतत्त्वे

- श्रीकृष्ण राऊत
.

'काळी चिमणी
निळी चिमणी
बसली बाभुळ बनात
हजाराच्या पाटल्या
आमच्या भुलाबाईच्या हातात'

 हे भुलाबाईचं गाणं ऐकतांना त्यातली निळी चिमणी' मनात कायमची आपलं मेणाचं घर' बांधून राहिली.आपली 'निळी' चिवचिव कानामनात पेरत राहिली.आणि महानोरांच्या कविता वाचताना ती आधकच नादावत राहिली़
 महानोरांची कविता म्हणजे जांभळं' लुगडं चापून चोपून घट्ट नेसलेली मूर्तिमंत निळावंतीची लावणीच आहे असं वाटतं.  निळ्या रंगाच्या अंगसंगानं ती निळावंती झाली; तर रतीभावाच्या लावण्याची तिने पदोपदी लावणी केली.  ती अशी गुणवंती आहे की तिला आपल्या गुणानं पशु-पक्ष्यांची किलबिल बोली कळते.चोचीतल्या गाण्याची गुणगुण ऐकू येते . रानावनातली-हिरव्या पानातली चावळ-चावळ समजते अन्‌  केळीनं सीताफळीच्या कानात हळूच सांगितलं तरी तेही तिला उमजते. 
अशी ही मुल्खाची गुणाची आहे़  लोकगीतातल्या झोक्यावर ती झुलते आणि त्या लयीनं लयवेडी होते. हिरव्या-निळ्या-जांभळ्या-सावळ्या-पिवळ्या रंगानं बावरते आणि ती रंगदिवाणी होते.  बोलीतल्या गावरान गोडव्यानं तिला अस्सं अस्सं पिसं लावलं आहे की ती बोलपिसी होते.
अशी ही लयवेडी रंग दिवाणी बोलपिसी मर्‍हाटमोळं अजिंठ्याचं शिल्प घाटदार लेणं म्हणजे महानोरांची सुनील कविता. 
अख्ख्या मराठी कवितेत नसेल एवढी निळाई या कवितेत ठासूनठुसून भरली नाही तर ओसंडून वाहते आहे.  वाचता वाचता आपल्या बुबुळाचा रंग कधी मोरपंखी झाला हेही आपल्याला कळू देणार नाही. अशी तिची साळसूद चतुराई-इतकी की उभ्या कडब्यातून निघून जाईल तरी अंगाला पान नाही.  या कवीला निळ्या रंगानं कायमचं झपाटलं आहे़  अगदी 'रानातल्या कविता' पासून निळ्या रंगानं हे झाड जे धरलं ते 'पानझड' झाली तरी सोडलेलं नाही.
ही कविता-रती आहेच तशी सन्नाट. आधीच तर सकवार फार चिटपाखराच्याही नजरेत भरेल अशी. त्यात जांभळ्या लुगड्यात अशी दिसते  मोहाच्या झाडालाही मोह व्हावा.
हिचं नदीच्या काठानं जांभळ्या लुगड्याचं एकाकी भटकणं नितळ अंगाचं पाण्याच्या काठाशी विवस्र होणं. पाण्यात एकाएक बुडून जाणं मराठी मनावर चेटुक करणारं आहे़.  आपल्या रंग-रेषा-शिल्पानं भारून टाकणारं आहे़.
हे शक्तिसौष्ठवअनघड रुपाचं आहे़. बोलीतला अस्सल बोल देऊन बोलायचं तर तिच रूप ठुंबुसवुंबुस आहे़  तिच्या मातावळीचं पोतं लोकधाटीचं आहे़.
आणि म्हणूनच ती मला मूर्तिमंत निळावंतीची लावणी वाटते.१ 

'निळीये सागरी निळे निळेपणे सुंदरी ।
रातलीसे हरि विरहिणी ॥' २

या ज्ञानेश्वरांच्या विरहिणीला निळ्याचं लागलेलं वेड आणि मधुकर केच्यांच्या-

'टिकली एवढे फूल जवसाचे 
निळ्या अगासाचे निळे पिलू ' ३
ह्या  निळ्या पिलाची कोवळी लकाकी आणि करंदीकरांच्या 'त्रिवेणी' तील -
 
'आणि शरीरानेच दिली पटवून 
शरीराची अपूर्णता, जेव्हा उडाले
सूर मारणारे निळे पाखरु
निळ्या आकाशात अनंताच्या वाटेने
फिक्या फिक्या संध्या प्रकाशात' ४

ह्या निळ्या पाखराचा निळ्या आकाशातला अनंताच्या वाटेने मारलेला सूर आणि बालकवीचा बेटाबेटातून वाहणारा निळासावळा झरा आणि रवींद्रनाथांच्या-

'अरे वह कौन है जिसने नव-घनो के नील-वसन को
अपने वक्ष मे खींच लिया है  । '
(नव-वर्षा) ५

आणि

'तब मेघोंकी सुनील छाया
उसके सुनील नयनोमे पड जाती है । 
(मेघदूत) ६

या कवीतातील सुनीलता एकत्र केल्यावर जो नितळ निळा रंग तयार होईल तो महानोरांच्या शब्दाशब्दांना लखडला आहे़.
'ह्या नभाने ह्या भुईला दिलेले हे दान' आहे़.  निळ्या रंगाचं. नभाचा रंग निळा.  भुईचा हिरवा.  निळ्या-हिरव्या रंगाचं हे रातलेपण आहे़.  सर्जनाचा अविरत ध्यास लागलेली ती रतिक्रीडा आहे़ हिरवा शालू नेसलेली वसुंधरा आणि निलांबर परिधान केलेले अनंत यांच्यातले हे शिवतत्त्व म्हणूनच सुंदर आहे़.  आणि सत्य ते तर आहेच आहे.
रोमँटिक आणि वास्तवात द्वैत कल्पणार्‍यांना या सत्याचे दर्शन होईल तो मराठी कवितेचा सोनियाचा दिनु.

'चिंब झाली पावसाने दूर राने
गर्दशी ओली निळाई डोंगराने
मुक्त बेहोषीत आम्ही गीत गातो
वादळाचा देह आता झिंगल्याने '(रा. क./५४)
परमभोगाच्या या झिंगलेपणात मुक्त बेहोषीचं वादळ असलं तरी त्याचं देहभान सुटत नाही.  आणि इथेच ही कविता लौकिकाची पातळी सोडत नाही. आपल्या धर्माशी-लोकतत्त्वाशी तिचं एकनिष्ठ राहणं हेच खरं तर लोकमानसाला अधिक भावणारं आहे़
झिंग आणणारी ही निळाई अलौकिकाच्या पातळीवरचं विदेही रुखंसुखं फिकंपण घेऊन येणारी नाही.  ती चांगली गर्दशी आहे आणि ओलीही.  आणि म्हणूनच रसरशीत चैतन्याचं लोकतत्त्व तिच्यात अंगोपांगी बहरतांना दिसतं.
'आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातून बोलविले
भरात येऊन नग्न शरीरी उघड्यावरतील भोग दिले' (रा. क. पृ.१५)
अशी ती आपल्या सजणाला दूर नभातून बोलवत असली तरी तिनं त्याला दिलेला भोग आहे नग्न शरीरी आणि तोही उघड्यावरती.   पाप-पुण्याचं थोतांड पार झुगारून देणारी आणि रत होताना सगळी आवरणं भिरकावून देणारी ही रती रीतीभातीची पर्वा करणारी नसली तरी ती इथल्या शेतीमातीची हाडामांसाची वाटते. ती साधी सुधी नाही़  तिचे डोळे निळे आहेत. आणि तिच्या गालावरचे निळे गोंदणे तिच्या पदराभोवती घुटमळते आहे़
'निळे गोंदणे'
भूतबाधा होऊ नये म्हणून अंगावर ठिकठिकाणी गोंदून घेणं ग्रामीण लोकसंस्कृतीत आलं ते निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिकतेने राहणार्‍या आदिवासींकडून.
न गोंदताच मेलेल्या बाईला देव विचारतो म्हणे -
'कावं चोदून आली 
पन गोंदून नायी आली!' असा लोकसंकेत आहे.
अनेक चित्रं जशी गोंदली जातात त्या सोबतच नागराज आणि मोरही गोंदल्या जातो.  'जा माझ्या माहेरा' या डॉ.सरोजिनी बाबर संपादित लोकगीत संग्रहात शेवटी काही गोंदणाची चित्रं दिली आहेत. त्यात नागराज आणि मोरही आहे़.आणि लोकधारणेत हे दोन्ही प्रतीकं कामतत्त्वाची आहेत.  त्यातला मोर म्हणजे तर निळ्या डोळ्यांचा. लावण्यमय पिसाऱ्याचं गोर्‍या अंगावर गोंदणं हिरवं उमटतं आणि सावळ्या अंगावर निळं.  भुई-नभाचा हिरवा-निळा रंग पुन्हा एकदा नव्याच सर्जनशीलतेनं आपल्या डोळ्यांना खुणावतो.
लोकसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ.मधुकर वाकोडे आपल्या 'लोकप्रतिभा आणि लोकतत्त्वे' या पुस्तकात निळ्या रंगाच्या कामसूचकतेवर प्रकाश टाकतांना लिहितात-
'निळा रंग-कामतत्त्वाचे प्रतीक हालाच्या 'गाथा सप्तशती'तील ४-९५ ही गाथा- 
नील कंचुकीने झाकून उरलेले आर्येचे स्तनपृष्ठ जसे पाण्याने भरलेले मेघ असतात.
त्यातून चंद्रबिंब बाहेर पडावे तसे दिसतात.' ७
चोळीचा निळा रंग आणि जलधर मेघ याची योजना कवीला का करावीशी वाटली? याचे कारण परंपरागत रूढ समजूत  परंपरेत लोकप्रतिभेने निळ्या रंगास कामसूचक रंग म्हणून प्रतिष्ठित केले आहे.कामाचे सामर्थ्य वर्षणात-प्रजा संवर्धनात आहे़. मेघ, मोर आणि पुरुष यांच्यातील साम्य शैलीचे बंध सूचित करतात. '
पुढे आणखी गाथा ७-२०, ४६, ५-१२, ६-२०, उद्धृत करुन त्यांच्यातला पृथ्वीच्या वक्षावरील नीलमणी, नीलकमलांचा सुगंध, निळ्या भ्रमराचा धसमुसळेपणा, रतिक्रीडेत दूर करावे लागणारे निळे वस्त्र यांचा हवाला देत ते पुढे लिहितात-
'निळ्या रंगाची प्रतिमा जसी कामतत्त्वाची आरास मांडते तशीची ती रतिक्रीडेचे दर्शनही घडविते. हा शैलीचा बंध (motif) कामाचे प्रतीक म्हणूनही प्रतिष्ठित झालेला दिसतो.
आर्यपूर्व परंपरेत वृषभ, मोर, मेघ, नाग इत्यादी कामतत्त्वाशी निगडीत आहेत. लोकगीतातून येणारी प्रतीके ही जीवाश्म
( fossil) असल्याने प्राचीन परंपरांचा गाभा स्पष्ट करतात '
महानोरांच्या कवितेतही निळ्या रंगाने एवढी गर्दी केली आहे की, तो निळा उत्सव रंगबहार वाटतो.

■ निळा - उत्सव ■

निळे डोळे,निळ्या अश्राप डोळयांना (रा.क. / पृ.१४) निळ्या तिच्या डोळ्यात (रा. क./ पृ.१५) निळ्या डोळ्यांचा ( अजिंठा /पृ़. २०) निळ्या भिरभिर डोळ्यांची ( अजिंठा/पृ़. ३७) निळे डोळे, टपोर निळे डोळे ( अजिंठा / पृ़. ४०) निळ्या तळ्यात डोळ्याच्या ( अजिंठा / पृ़.५५) निळ्या डोळ्यात ( अजिंठा/पृ़. ६१) टपोर निळ्या डोळ्यांचा (अजिंठा/पृ़.७६) निळ्या डोळ्यात (अजिंठा/पृ़.९१) निळ्या डोळ्यांच्या काठाशी (पा. क. / पृ.३१) नितळ निळ्या डोळ्यांची (पानझड / पृ.२२) निळे भोर डोळे (पानझड/ पृ.२५) निळ्या डोळ्यांवरी (पानझड/ पृ.३१) चिमण्यांचे निळे डोळे (पानझड/ पृ.४९)
निळी गोंदणी ,गालावरचे निळे गोंदणे (रा.क./ पृ.१५) निळी आकाश गोंदणे (वही/ पृ.२९) गालावर गोंदण इवलेसे (पानझड/ पृ.२२) रंगांचा स्पष्ट उल्लेख नसला तरी आपला निळेपणा सांगणारी गोंदणे- 
मोराचं गोंदण (पानझड/ पृ.२४)  चांदण गोंदणी (पानझड/ पृ.२३) देठोदेठी गोंदण (पानझड/ पृ.३८)
निळे अंग-रेषा
अंग झाले निळे भोर (रा. क. / पृ.१३) देहाच्या निळ्या रेषा (रा. क./ पृ.१८) नग्नकांतीला निळ्या रेषा जळतांना (पानझड / पृ.४४) कातीव निळाई (रा. क./ पृ.२३)
निळे पक्षी, डोळ्यातले निळे पक्षी (पा. क. / पृ.२३) डोळ्यामधली निळी पाखरे (पा.क. / पृ.२६) पक्षी लाख निळे लखाक (वही/ पृ.४१)  निळा रावा (पा. क. / पृ.३८) पंछी निळे जांभळे (पानझड/ पृ.५५) निळे पक्षी- (पानझड/ पृ.५५/६५) निळया भोर पक्षांचा थवा (प्रा.द./ पृ.५९) मोरणी निळ्या जांभळ्या रंगाची ( अजिंठा/ पृ.२२)
निळे डोंगर ,गर्दशी ओली निळाई डोंगराने (रा.क./५४) डोंगर झाक निळी लखाक (वही/ पृ.४१) काळ्या निळ्या डोंगराने (प्रा.द./ पृ.११)  
निळे आकाश/मेघ/नभ,
नभात झिम्मड निळी जांभळी (रा. क./ पृ.२७)  निळे अस्मान (रा. क./ पृ.३०) निळ्या सावळ्या मेघांचे (वही/ पृ.१७)  जांभळ्या निळीत मेघ (वही/ पृ.३१) निळे निळे आकाश (वही/ पृ.५३/५९) निळाईत आभाळाच्या ( अजिंठा/ पृ.२१) निळ्या नभाळ्यातले (पा. क./ पृ.३९-३, प्रा.द. / पृ.८७) निळ्या नभाचा (पानझड/ पृ.४०) निळ्या आकाशी (पानझड/ पृ.५४) काळ्या निळ्या ढगांचा (प्रा.द./ पृ.२४)
निळे रान/ऊन/झाडे,निळे जांभळेसे रान (रा.क./ पृ.३१) निळे ऊन (पा. क./ पृ.३८) निळी जांभळी शेते (पानझड/ पृ.४०) निळी ᆬ कुसुंबी झाडे ( अजिंठा/३७) पाने निळी कुसुंबी (पा. क./ पृ.३५)
निळा समुद्र/निळे पाणी/निळा पावसाळा,निळा समुद्र (वही/ पृ.५९) निळे पाणी (पानझड/ पृ.५१) निळा पावसाळा (पानझड/ पृ.५४) निळ्या पाण्याच्या तावदानात ( अजिंठा/ पृ.७५) मोरणी निळ्या जांभळ्या रंगाची ( अजिंठा/ पृ.२२) निळे स्वप्न/कवडसे/गीत/शाई/शिरताज
निळया स्वप्नात (वही/ पृ.११) निळ्या स्वप्नांच्या चांदण्या (वही/ पृ.३४) निळे कवडसे (पा. क. / पृ.११) (पानझड/ पृ.१८) निळी शाई (प्रा.द./ पृ.१७) निळा शिरताज (प्रा.द./ पृ.२३)

'निळया रंगाचे,राजस वृत्तीचे संसूचन कामरंगाचे प्रतीक म्हणून किंवा रतिरंगाची प्रतिमा म्हणून लोकमानसात चांगले घर करून राहिले आहे़  '
'कृष्ण' हा लोकसखा असलेला लोकदेव आहे़ आणि त्याचे एक नाव आहे़ 'नीलकृष्ण'.८
ह्या कृष्णाची रासलीला  प्रसिद्धच आहे़ या चराचर सृष्टीला त्याचे जबर आकर्षण आहे.  या आ-कर्षणातूनच त्याचे नाव पडले कृष्ण. जो आकृष्ट करतो तो कृष्ण.
राम हा दुसरा लोकप्रिय देव.  तोही कृष्णा प्रमाणेच रंगाने सावळा. हे सावळेपण म्हणजे निळ्या रंगाचीच छटा आहे़ म्हणून तर गीतरामायणात ग.दि. माडगूळकर लिहितात-
'अनंत माझ्या समोर आले, लेवुनिया नीलिमा
धन्य मी शबरी श्रीरामा ! '९
किंवा
'सांवळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो
अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळांना येतो. '१०
संतांनी प्रतिष्ठित केलेल्या लोकभाषेशी महानोरांचे सोयर आहे़  'राखोंडी' 'भिंगुळवाणे' वेसवा' अशा शब्दातून ते ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाईच्या दिंडीत सामील झालेच आहेत. 'पानझड'च्या अखेरीस तर विठ्ठलाने त्यांना अभंगाचा लोकछंदही लावला आहे़.
'पंढरीचा पांडुरंग खरं म्हणजे पांडु-रंगाचा-पांढरा. तो विठ्ठल होऊन येतो तो काळा आणि ज्ञानेश्वर त्याला म्हणतात - 'पंढरपुरीचा निळा' 
 
लोकमानसाची ही चित्रकारी पाहिली की आपण रंगबावरे होऊन जातो. निळ्या रंगाच्या स्पष्ट उल्लेखाविना महानोरांच्या कवितेत आलेले मोर, मेघ, आभाळ, घन आणि इंद्र ही देखील तशी रतिरंगाचीच प्रतीके आहेत.
 'प्रार्थना दयाघना' आणि पानझड' मधील काही कवितेतून महानोरांना कारुण्याचा लळा लागलेला दिसत असला तरी महानोरांच्या कवितेचा स्थायी भाव आहे रती आणि या अर्थानं त्यांची कविता ही 'कविता-रती' आहे़
मोरांचा पिसारा,त्याच्यावरचे टपोर भोकरे डोळे निळ्या रंगाचे आणि महानोरांवर तर निळ्या रंगाने करणी केलेली. म्हणून महानोरांच्या कवितेत वारंवार आभाळ भरून येतं.  निळे जांभळे मेघ पाहिले की निळा पिसारा उभारून मोर आपल्याला थुईथुई नाचतांना दिसतात. माती भिजून न्हातांना उभं विश्व दरवळू लागतं. कारण तिला ज्येष्ठ भेटायला येतो तो मेघुटांच्या पालखीतून आणि मग-
'मोरपिसी नाचतांना
पावसाळा झाला निळा
निळ्या आकाशी रंगाची
पिकांवर सोनकळा' (पानझड/५४)
दिसू लागते.
महानोरांच्या कवितेतलं मोराचं हे कथ्थक आपल्याला अनेकदा भूल पाडतं.

■ मोर ■

मोरणीची लकेर ( अजिंठा/ पृ.५५) मोरबन (वही/ पृ.१०) डोंगरातले पिसाट उन्मन उधळलेले मोर (वही/ पृ.२५) मोरपंखी लळा (वही/ पृ.२६) डोळ्यातली मोरणी (वही/ पृ.३०) डोळ्यातले मोरबन (वही / पृ.४०) मनाचा मोर (वही/ पृ.४६) मोर पिसारा (वही/ पृ.४७) मोरपंखी सावल्या (रा.क./ पृ.४७) मोरणी सारखी थर्थरी (पा. क./ पृ.१४) मनमोर उमलणं (पा. क./ पृ.१६) आषाढाचा मोर पिसारा (पा. क./ पृ.२०) मेघांसाठी खेड्याचं मोरापरीस थिरकणं (पा. क./ पृ.३३) मोरणीचा नाच (पा. क./ पृ.३७) मोराची थुईथुई (पानझड/ पृ.३१) मोरपंख (पानझड/ पृ.३८) मोरपिसी नाचताना (पानझड / पृ.५४) मोरणीची गाज (पानझड/ पृ.६४) मनमोर (प्रार्थना दयाघना / पृ.१९)

■ इंद्र ■

निळ्या आकाशात इंद्राचा स्वर्ग आहे़ आणि इंद्राची कामासक्ती तर प्रसिद्धच आहे़ .त्याला मिळालेल्या शापाने त्याच्या अंगावर सहस्र भग पडली.  म्हणून तो भगेंद्र झाला. सहस्र भगासारखे महानोरांच्या कवितेत इंद्राचे लक्ष मिनार' (रा. क./२३) येतात.  जेव्हा डोळ्यात सोळा शृंगार घेवून येणारी एकटी, उभार उघडी, पळसपापडी भिल्लाची पोर तिच्याच नादात असते. अवती भवती मख्मली हिर्वळ असते.  ज्वानीच्या मोहराचा दरवळ दाटून येतो आणि मग-
'डोंगर झाडीत
झुकले अंबर
इंद्राचे लक्ष मिनार' (रा. क./ पृ.२३)
'मिनार' मधलं सेंद्रियत्वही लोकविलक्षण आहे़
'नीलकमला' सारखा 'इंद्रनील' ही आपल्या कामसूचकतेने लोकमानसात प्रतिष्ठित असल्याचे सुद्धा डॉ. मधुकर वाकोडेंनी आपल्या लेखात मांडले आहेच.
 'निळा' या शब्दाचा एक अर्थ आहे हिरवे गवत.  हिरव्या गवतातही निळी झाक असते. आणि हा अर्थ लागला की मग ज्ञानेश्वराच्या अभंगात गाई निळ्याच्या मागे का जातात याची वाट आपल्याला सापडते-
'निळिये निकरे कामधेनु मोहरे ।
निळेपणे सरे निळे नभीं॥११

■ नाग प्रतिमा ■

महानोरांच्या कवितेल्या नाग प्रतिमेनंही चांगलाच दंश केला आहे़  म्हणूनच-
'देहाला डसले जहर
तयाची लहर
पेटते ओठी (वही/ पृ.५१)
डसणे आणि वेटाळणे या क्रियापदांची महानोरांच्या कवितेतील, ( अजिंठा/ पृ.१६) (वही/ पृ.१८,३४, पानझड/ पृ.४५,५५) हजेरी आपल्याला शब्द-प्रतिमेच्या माध्यमाने त्यातील नागापर्यंत पोहचवते. नागमोडी वाटा-वळण ही बरेचदा येतं (पा. क. / पृ.१९, पानझड/ पृ.४५,४७,५१) कधी विजेच्या विळख्यांनी वेटाळत येणारा पाऊस-सर्पाहून गहिरा असतो (पा. क./ पृ.१३) तर कधी गोर्‍या देहावरती कांती नागिणीची कात असते (वही/ पृ.५७) आणि कधी कधी
'माळ्याच्या मळ्यात नाग हिंडे सावलीनं
नाजुक मैना वो ऽ पाणी पिते डवण्यानं (पानझड/ पृ.३९)
असा पळसखेडच्या गाण्यातून (पृ़.२५) आलेला नाग महानोरांच्या कवितेतून सळसळतांना दिसतो.

लोकगीतातून आलेली नागाची ही प्रतिमा कुणाची तरी वासना असल्याचं महानोरांनी ह्या 'गाण्यासंबंधी थोडेसे ' सांगतांना दिलंच आहे.१२ त्याबद्दल वेगळं सांगण्याची काही गरज नाही. 'गांधारी'तली जयवंता नाग-नागीणीचे मैथून पाहून पळत येते आणि भागवतला घट्ट मिठी मारते १३ 
आणि हे मैथुन मग महानोरांच्या कवितेत प्रकटते -
'नागीण मैथुनात मग्न
नग्न नागाच्या विळख्यात
स्वस्थ
सळसळते
अंगांग सगळे
आसमंत विसरून
सुस्त
जडावलेल्या डोळ्यांच्या प्राणात (वही/ पृ.६)

■ अबलख ■

 'अजिंठ्या' तले पारूचे डोळे निळे, तिचा मनपसंत गिलसाब निळ्या डोळ्यांचा,  त्यांच्या भोवतालचे पहाड डोळ्यांना डसणारे आणि
त्याच्या राजवर्खी ᆬ कुंचल्यातल्या
नाजुक बोटांना
डोळ्यांना
डोळ्यातल्या नितळ समुद्राला
चेतवून नेणारी एक अबलख पारू' ( अजिंठा /पृ़. १९)
 पारूचे 'अबलख' हे विशेषण तिच्या स्रीत्वाची जात 'अश्विनी' असल्याचे ध्वनीत करते. तिच्या अंगापिंडाचे तपशील न देता 'अबलख' या एकाच विशेषणात जणुकाही महानोरांनी ते एकवटून टाकले आहेत.
महानोरांच्या अगोदर मर्ढेकरांनी 'पिस्टन' ला लावलेल्या 'अबलख' ह्या विशेषणाचा संदर्भ ध्यानात आला की, 'चिलखती ' छाताडाचा गिलसाब आणि 'अबलख' पारू यांच्या पूर्णरुपी प्रणयाचा अश्वगंध अजिंठाभर दरवळतो. घोड्याला आणि अर्जुनाला पूर्ण पुरुष घोषित करणारे जनमानस ह्या ठिकाणी आपल्याला एका वेगळ्याच 'अबलख' रूपात भेटते.

■ ज्वार ■

ज्वार उभार, गर्भार
हिर्व्या पदराला जर,
निर्‍या चाळतांना वारा
घुसमटे अंगभर (रा. क. / पृ.४४)

यातली ज्वार महानोरांपुढे स्रीचं रूप घेऊन उभी राहते.  दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून कधी त्यांना भूल पडते.  (रा. क. / पृ.१५) भर ज्वानीतली ज्वार कधी त्यांच्याशी अंग मोडीत मोडीत बोलते (रा. क./ पृ.१६) तिच्या अंगाला निथळत्या हुरड्याचा बहर आहे. (रा. क./ पृ.४९) कधी त्यांना ज्वारीत मोडलेल्या जुन्या पायवाटा दिसतात  (वही/ पृ.१३)  तर कधी ती त्यांना म्हणते तुम्ही मला जोंधळ्या रानात गाठली.  (वही/ पृ.५५) कधी त्यांना वाटतं तुरीच्या ओळी ओटी पोटी गर्भार आहेत. आणि त्या ज्वारीच्या ताटव्याशी गुजगोष्टी करीत आहेत.  (पानझड/ पृ.५२) कधी त्यांना नदीच्या काठी जोंधळ्या रानात धुडगूस घालणार्‍या पाखरांचा थवा दिसतो.  (रा. क./ पृ.११) तर कधी त्यांच्या शब्दांच्या मिठीत भरातली ज्वार थरकते.  (रा. क./ पृ.४)
महानोरांचे मन हे कुणब्याचे मन आहे त्यामुळे त्यांना ज्वारीची ही रूपं वेगवेगळ्या अंगानं आपलं दर्शन देतात.  
 'हिरवं बाटूक' ही तरूण पोरीसाठी असलेली उपमा; 'उसवलं तर शिवता येतं पण निसवल्याला काय करावं?' अशी म्हण  आणि एखादा पुरुष नपुंसक असेल तर 'त्याच्या दवडीत भाकरी नाहीत' हा वाक्प्रचार शारीरिक भूक प्रतिमांकित करीत लोकभाषेत रुढ आहेत.  म्हणून महानोरांच्या कुणबी मनाला ज्वार आणि तिचं गर्भारपण स्त्रीच्या रूपानं दिसतं. ते लोकप्रतिभेच्या मुशीतूनच.

■ पाखरू ■

निळ्या रंगाच्या खालोखाल महानोरांना आकर्षण आहे ते 'पाखरू' या प्रतिमेचं.  पाखरू हा देखील लोकमानसातला एक शैलीबंध आहे.  अलीकडच्या काळातीलᆬ 'कुण्या गावाचं आलं पाखरू' या खेबुडकरांच्या लावणीचं समुहमनाला भावणं हे त्या पाखराचा लोकमानसातील 'खोपा' दाखविणारं आहे.  महानोरांनाही आपल्या लावणीत ह्या पाखराला छानपैकी 'फंदात' पाडलं आहे़
'किती जिवाला राखायच राखलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरु टाकलं' (वही/ पृ.५४)
खरंतर 'जिवाला राखण' हीच लोकभाषेतली सुंदर प्रतिमा आहे.  जिवाला राखण्यासाठी करावयाचं पथ्यपाणी-वर्जावर्ज, चालतं-नाही चालत, बनतं-नाही बनत, आवड-नावड असं सारं त्या 'जिवाला राखण्यात' समाविष्ट आहे.  या राखण्याच्या उपरही 'रायाने पाखराला जाळ्यात' टाकणं ही अस्सल लोकशैली आहे़.
अगोदरच्या शाहिरांच्या लावण्यातही हे 'पाखरू' येतं. प्रभाकरांच्या लावणीत-

'चांदणे काय सुंदर पडले
त्यात तुम्हासारिखे पाखरू अवचित सापडले' १४

किंवा

होनाजीच्या लावणीत-

'नको रे लटकी चर्चा करू
तू पाखरू सुखाचे 
माझि लाखाची आबरु' १५

'पाखरू' ही प्रतिमा जनमनाचा धांडोळा घेतानाच शाहिरांना सापडली आहे आणि तिचं 'भिरभिरणं' आजही कालातीत आहे़  'पक्षी' तर अनेक वेळा महानोरांच्या कवितेत येतात.  अगदी लक्ष लक्ष थव्यांनी येतात पण 'पक्षी' पेक्षा 'पाखरू' हे महानोरांच्या लोकभाषेशी अधिक सलगी दाखविणारं अस्सल संबोधन आहे. आणि ते आपल्या गिर्रेबाजपणा घेऊन महानोरांच्या कवितेत शब्दांच्या फांदीवर- डहाळीवर बसण्यापेक्षा डांगीवर डौलात बसतं. आणि आपलं लक्ष वारंवार वेधून घेतं.
कधी ते तिच्या निळ्याभोर अश्राप डोळ्यांना वेढतं' (रा. क./ पृ.१४) कधी ते राजबन्शी पंखाचे असतं आणि तिच्या अंगाशी लगट करुन जातं. (रा. क./ पृ.११) ह्या पाखरांच्या पंखाचे 'राजबन्शी' हे सुंदर विशेषणही लोकगीतानेच महानोरांना बहाल केलं आहे-

'राजबन्शी पाखरू चोचीत दुखलं
मोती पवळ्याचा चारा खाणं विसरलं (प. गा./ पृ.२७)
आणि ह्याच ओळीतला 'मोती पवळ्याचा चारा' आपला रतीभाव घेऊन महानोरांच्या 'वही 'त अधिक उत्कट होत जातो-

'याला काय लेऊ लेणं
मोती पवळ्याचं रान
राती चांदण्या रानात शिणगाऽर 
सारी दौलत जरीच्या पदरात' (वही / पृ.५७)
'मोती पवळ्याचा चारा' खाणारं हे 'पाखरू' ढळल्या शब्दांना लगाम नसल्याने शेंदरी उन्हात रुसले राजस पाखरू (रा. क./ पृ.३३) असे थेट कुठेतरी लोकगीतातल्या पाखरासारखंच चोचीत दुखलं असं वाटतं.  असंच एक 'राजस पाखरू' 
ओली पहाटं फुलात न्हातांना आणि केशर साकळतांना गंधवतीच्या मनात भिरभिरते.(रा. क./ पृ.१५) कधी ती आभाळाकडे पाहता पाहता एका गरोदर 'पक्षिणीची' कथा सांगते (वही/ पृ.३२) 
तर कधी ते पाणमळ्यात अपले घुंगरू वाजवीत आपल्या राजस देहावर आभाळ पांघरते (रा. क./ पृ.४६) आणि कधी त्याला धीट होऊन आवाहन करते ते थेट लावणीच्या ढंगात-

'डोळे थकून थकून गेले
पाखरासारखा येऊन जा;
रान भलतंच भरात, 
जरा पिकात धुडगूस घालून जा' (रा. क./ पृ.४३)

भरात असलेल्या रानात जरा धुडगूस घालण्यासाठी तिचे त्याला पाखरासारखे बोलावणे  ह्यातली नैसर्गिकता पाहिली की ही छोटीशी कविता एक स्वयंपूर्ण लावणीच वाटायला लागते.

■ हिरवी गर्दी ■
 
'विस्तीर्ण नदीचा काठ' मधे 'गर्दीत हरवली वाट' आहे आणि या गर्दीला विशेषण नसले तरी ती गर्दी 'हिरवी' आहे हे आपल्याला ᆬ 'फुलांची नक्षी', सांगू शकते. ते पाणी' आणि झाडी' यांच्या साक्षीने कारण झाडे झाली हिरवीशी (रा. क./ पृ.१७) मध्ये पाय बहकतात ते दाट 'हिरव्या गर्दीत '  ही दाट हिरवी गर्दी 'औदुंबर ' मधली. हा बालकवीच्या रंगप्रतिमेचा संस्कार. पण ह्या गर्दीचे नाते कुठे तरी लोकगीतातल्या -

'विठ्ठला शेजारी रुक्मिणी बसेना
अबीर गुलालाची गरदी सोसेना' (प. गा./ पृ.२३)

अशा रंगीत गर्दीशी असल्याने ही 'हिरवी गर्दी' लोकप्रतिमेतून आली आहे.  आणि त्यामुळेच ती महानोरांना वारंवार भावते आणि त्यांच्या कवितेतील आविष्कारात कधीच न उडणारा रंग भरते.
महानोरांच्या कवितेतील निळा रंग, मेघ, मोर, इंद्र आणि नाग, अश्व ही रतिभावाची प्रतीके त्यांना लोकगीतातल्या लोकसंस्कृतीने बहाल केली आहेत.  ज्वार, आणि पाखरू ह्या प्रतिमा त्यांच्या कुणबी मनाने त्यांना दिल्या आहेत.  आणि ही सर्व लोकशिदोरी घेऊन त्यांच्या भाषेतले कंगोरेदार बोल आणि वही, लावणी, अभंग व लोकगीताच्या अंगाने जाणारे अनेक रूपबंध
ही सर्व लोकतत्त्वाची धाटणी आहे़  आणि ह्याच 'लोकधाटी 'ने महानोरांच्या कवितेला जशी 'शक्ति ' दिली तसंच अनघड ' सौष्ठव ' ही.

संदर्भ :

१. मारुती चित्तमपल्ली 'पक्षी जाय दिगंतरा' पृ़.२९,साहित्य प्रसार केंद्र, नागपूर १९९३
२. ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग क्र.३३ सं. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले,डॉ. द. ता. भोसले ,प्रतिमा प्रकाशन पुणे १९९६
३.मधुकर केचे दिंडी गेली पुढे पृ़. १८,कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे १९५९
४़ विंदा करंदीकर संहिता/पृ़. ९८,कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे १९८७
५. रवींद्रनाथ की कविताएं अनु़ हजारीप्रसाद द्विवेदी, रामधारीसिंह दिनकर', हंसकुमार तिवारी, भवानीप्रसाद मिश्र पृ़.१८७,   साहित्य अकादमी दिल्ली १९९२
६.कित्ता पृ़. ३७
७. डॉ.मधुकर वाकोडे 'लोकप्रतिभा आणि लोकतत्त्वे ' पृ़. ११२ लोकवाङ्मय गृह मुंबई १९९४
८.रा. चिं.ढेरे 'लोकदैवतांचे विश्व' पृ़ .१६५,पद्मगंधा पुणे १९९६
९. ग.दि.माडगूळकर 'गीत रामायण ' पृ़. १११, शासकीय प्रत १९५७
१०. कित्ता /पृ़.३०
११. ज्ञानेश्वरीचे निवडक शंभर अभंग क्र. ३३ उ. नि.
१२.ना़ धो. महानोर 'पळसखेडची गाणी' पृ़. ९ पॉप्युलर प्रकाशन १९८२
१३.ना. धों.महानोर 'गांधारी' पृ़.३४/ पॉप्युलर प्रकाशन १९८२
१४. 'मर्‍हाटी लावणी ' सं. म.वा. धोंड पृ़. १८६,मौज प्रकाशन मुंबई १९८८
१५.कित्ता पृ़. १७० 
आणि ना. धों.महानोरांचे कवितासंग्रह -
रानातल्या कविता १९६८ वही १९७१, 
पावसाळी कविता १९८२ अजिंठा१९८४
प्रार्थना दयाघना १९९० पानझड १९९७ 
सर्व पॉप्युलर प्रकाशन मुंबई.
संक्षेप : 
रा. क. = रानातल्या कविता, 
पा.क. = पावसाळी कविता
प्रा.द. = प्रार्थना दयाघना 
प.गा = पळसखेडची गाणी

('महानोरांची कविता ' संपादक : श्रीकांत देशमुख,२००३ह्या ग्रंथातून साभार )
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा