माझी गझल : तीन गोष्टी

पहिली गोष्ट-

मराठीत ग़ज़ल असे लिहिणे आता-आतापर्यंत रूढ नव्हते.कविवर्य सुरेश भट गेल्यानंतर काही लोकांनी आपण काहीतरी नवीनच Contribution द्यायला पाहिजे या भ्रमाने ‘गझल’ ला ‘ग़ज़ल’केले.भट साहेबांनी आयुष्यभर ‘गझल’ हेच शब्दरूप स्वीकारल्याचे भरपूर छापील पुरावे आहेत.तसेच मराठी विश्वकोषाचे मुख्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही ‘गझल’हेच शब्दरूप मराठी विश्वकोषात सर्वत्र स्वीकारले आहे.आणि तेच बरोबर आहे असे मला वाटते. कारण मराठी वर्णमालेमधे ‘ग+ ह’ आणि ज+ह असा ‘हकार’युक्त घशातून निघणारा उच्चार दर्शविणारा ग़ आणि ‘ज़’ वर्ण नाही.अक्षरांखाली नुक्ता देऊन उच्चार दर्शविण्याची मराठीची परंपराच नाही.
दुसरी गोष्ट-
‘शब्दांवर हुकुमत असली आणि लय अंगवळणी पडली तर कविता लिहिणे फारसे कठीण नसते’हे मर्ढेकरी सूत्र मला गझलच्या बाबतीत तर अधिक गांभीर्याने  घेतले पाहिजे असे वाटते.लिहिता येते म्हणून लिहित राहणे मला उचित वाटत नाही.मी गझल लिहायला सुरुवात केली तेव्हा माझ्या समोर दोन रोल मॉडेल होते.एक:सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’. दुसरे : दुष्यंतकुमारांचा ‘साये मे धूप’.यातले दुष्यंतकुमार मला अजूनही अधिक भावतात.केवळ बावन्न गझलांच्या निर्मितीने त्यांचे स्थान हिन्दी गझलांच्या विश्वात अव्वल आहे.एकीकडे गझलांची संख्या जशी जास्त नाही तशीच प्रत्येक गझलांच्या शेरांची संख्याही पाच- सहाच्या वर नाही.काही मोजक्या गझला सात शेरच्या आहेत.शिवाय कुठल्याही गायकाने गायिल्यामुळे त्यांच्या गझला प्रसिद्ध पावल्या नाहीत.‘मै जिसे ओढता बिछाता हूँ।’ ही एकमेव गझल  मीनू पुरुषोत्तम यांच्या स्वरात ऐकल्याचे मला आठवते.दुष्यंतकुमारांच्या प्रखर सामाजिक जाणिवेच्या अभिव्यक्तीला नादमधुर शब्दकळा आणि गायनसुलभ आशय मानवणारे नव्हते. तरीही  त्यांची रसिकप्रियता गेल्या पस्तीस वर्षात  कमी न होता उलट नव्या पिढीसोबत वाढलेली दिसते.याचे गुणगमक मराठी गझलेला गवसले पाहिजे असे मला वाटते.
तिसरी गोष्ट-
मराठीतल्या अनेक थोरा-मोठ्यांनी माझ्या गझलेला  वाखाणले नसते तर कदाचित गेल्या पस्तीस वर्षात उण्या-पुर्‍या शंभरेक गझला लिहिण्याचे धाडसच मी करू शकलो नसतो.असे मला नम्रपणे नोंदवावेसे वाटते.त्यातले काही मासले साभार आपणापुढे  ठेवतो-
पु.ल. देशपांडे-
‘तुम्हाला गझलरचनेची नस सापडली आहे.’
वि.वा.शिरवाडकर
‘गझल प्रकारावर आपले चांगले प्रभुत्व आहे.’
ना.घ.देशपांडे-
‘रविकिरण मंडळ व त्यांच्यापैकी माधव ज्यूलियन यांनी मराठीत गझल बरेच रचले. त्यानंतर आता श्रीयुत सुरेश भट यांनी मराठीत गझल ब-याच प्रमाणात केले. आता हा श्रीयुत राऊत यांचा गझलांचा संग्रह मराठीत आला.या कवीची मनोभूमिका शोकात्मक आहे. जगाने या कवीवर अन्याय केला आहे अशी त्याची तक्रार आहे. या भावनेने हा संग्रह भरलेला आहे. `Our sweetest songs are those that tell of saddest thought'या शेलेच्या वचनाची आठवण हा संग्रह वाचताना येते.
______________________________________
मंगेश पाडगावकर-

‘विसंगती हेरण्याची आणि चांगल्या अर्थाने वक्तृत्वपूर्ण उठाव देण्याची उत्तम शक्ती तुमच्या शैलीत आहे. तसेच, क्षुद्र स्वार्थाच्या, हपापाच्या पलीकडच्या उदात्त जगण्याचे खोल आकर्षण तुम्हाला आहे. ही सर्व तुमच्या या गझलांतील जमेची बाजू आहे. परंतु इथे एका गोष्टीकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. अशा त-हेच्या गझला वाचताना नंतर नंतर एकसुरीपणा जाणवतो. जीवन-दर्शनात तोचतोपण आल्यामुळे, शैलीतील वक्तृत्वाचे घटक काहीशा भडकपणे स्वत:कडे लक्ष खेचून घेण्याचा प्रयत्न करु लागतात! उपरोधामागची सात्त्विक प्रेरणा फिकी होऊन, त्यात एक प्रकारचा नाटकी आवेश शिरू लागतो; आणि हळूहळू यशस्वी लकबींची हुशारीने केलेली पेरणी असे स्वरूप लेखनाला येण्याची शक्यता निर्माण होते. तुमचे असे झालेले नाही.
______________________________________
गझलगंधर्व सुधाकर कदम-
 ‘उत्कर्षाचा मार्ग नेहमीच खडतर, अवघड असतो़. हा मार्ग पार करायचा असेल तर अंगावरील रुढींचे सारे पाश आणि दुबळ्या विचारांचे दोरखंड तोडूनच वाटचाल करावी लागते़. ही बाब शिक्षण घेत असतांनाच श्रीकृष्णाच्या लक्षात आली़. त्यानुसार त्याने स्वतःला घडविले़. ह्या गोष्टीचा त्याला योग्य अभिमान असला तरी दुराभिमान नाही. समाजात ज्या नीती - कल्पना, परंपरा चालत आल्या त्या सदैव कल्याणकारीच असतात असे नाही हे त्याने बरोबर हेरले होते. त्याचे प्रतिबिंब गझलांमधूनही ठळकपणे दिसून येते. बालपणापासून ग्रामीण भागातील शेतकरी-कामकरी वर्गात वाढल्यामुळे त्याला या वर्गाची विचारसरणी प्रामाणिक आणि जवळची वाटल्यामुळे त्याचाही प्रभाव श्रीकृष्णाच्या गझलांवर पडलेला दिसतो़.’
_____________________________________
डॉ.अविनाश सांगोलेकर-
‘श्रीकृष्ण राऊत ह्यांची गझल ही तंत्रशुद्ध आणि अस्सल मराठमोळ्या मराठी गझलेचा जिताजागता नमुना आहे़ विदर्भाने मराठी गझलसृष्टीला अमृतराय, उ. ऱा़. गिरी, सुरेश भट ह्यांच्यासारखे ज्येष्ठ व श्रेष्ठ गझलकार दिले; डॉ़ राम पंडितांसारखे तळमळीचे गझल अभ्यासक दिले़ श्रीकृष्ण राऊत हे ह्याच विदर्भातील आहेत आणि ते विदर्भाची ही उज्वल परंपरा पुढे नेतील, इतकेच नव्हे तर ही परंपरा अजून अधिक उज्वल करतील़ असा भरंवसा त्यांच्या गझलेतून मिळत राहतो़ त्यांच्या गझलेचे स्वागत सुरेश भट, वि़.वा़.शिरवाडकर, पु़.ल़.देशपांडे, ना़.घ़.देशपांडे, मंगेश पाडगावकर अशा अनेक दर्दी ज्येष्ठांनी केलेले आहे़
______________________________________
डॉ.मधुकर वाकोडे-
‘संतांचे अभंग असोत किंवा पंडितांचे श्लोक असोत. कविची कविता असो किंवा शायरची गझल असो... कालातीत असण्याचा एक मोठा मापदंड म्हणजे ह्या रचनांना लाभलेले सुभाषितांचे सामर्थ्य! श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेतील कितीतरी शेर, कितीतरी चरण सुभाषितांच्या पातळीवर वावरतात.’
______________________________________
डॉ.किशोर सानप-
‘कवी श्रीकृष्ण राऊतही तुकोबांच्याच कविकुलातले कवी आहेत. तुकोबांच्या शब्दांना आजच्या काळात धार देण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी, तुकारामांच्याच वारसदारांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. तुकारामा ह्या गझलेत तुकोबा कुलीन उत्तरदायित्व कवीनं जोखलं आहे. ही गझल त्याची साक्ष आहे.’
______________________________________
वसंत केशव पाटील-
‘राऊतांच्या गझलेचा प्रदेश आणि भावार्थाची भूमी केवढी प्रमाथी तसेच प्रभावी आहे, हे वेगळे सांगावे लागत नाही. शेवटी, एक गोष्ट आवर्जून नोंदवावीशी वाटते. ती म्हणजे राऊतांच्या गझलांमध्ये ठायीठायी अन्याय-अत्याचाराविषयीचा जो आकांत आला आहे, त्याबद्दल. ही काही कवीची स्वतःची एकट्याची व्यक्तिगत कैफियत आहे असे न समजता, तो व्यापक जनसमूहाचा पुकार आहे, हे ध्यानात घेतले की कवीच्या अनुभूतीचा आसमंत किती अपार आहे. हेच मनावर ठसते. हा गझलयात्री आजही नवनव्या गोष्टींना स्वागतशीलपणे भिडतो आहे, हे प्रसादचिन्ह मला फार मोलाचे वाटते.’
____________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा