हॅलो,मी तुझ्या श्रद्धेला भेटले गं बाई!..

आज साधारणत: वीस वर्षानंतर सिंधुताईंची भेट झाली. १९८३ मधे अकोल्यात त्या मला पहिल्यांदा भेटल्या.त्यांचं कवितांचं पाठांतर,सादरीकरणाची शैली सगळं काही अफलातून.संशोधनासाठी फिरताना एकदा मी त्यांच्या चिखलदर्‍यातल्या अनाथाश्रमातही त्यांना भेटलो होतो.नंतर ८८-८९ मधे त्यांची एकदा भेट झाली होती.नंतर भेट नाही तर ती आताच.अकोल्यात कॉलेजच्या कार्यक्रमानिमित्तानं त्या आल्या होत्या.माझ्यासाठी मुद्दाम वेळ काढला.माझ्या घराचा पत्ता शोधला.घरी आल्या.नेहमीप्रमाणे दिलखुलास बोलल्या.माझ्या बायको-पोरांत रमल्या.माझ्या बायकोच्या आग्रहाखातर ‘गेला फुटून ऐना स्वप्नात जीवनाचा’ ही माझी कविता त्यांच्या मर्मस्पर्शी शैलीत ऐकवली.मधल्या काळात खरं तर त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सेलिब्रेटी झाल्या.‘मी सिंधुताई सपकाळ’हा त्यांच्या आत्मकथेवरील सिनेमा गाजला.लौकिकार्थाने त्या मोठ्या झाल्या.पण ह्या सर्व मानसन्मानाचा किंचितही परिणाम त्यांच्या वागण्या-बोलण्यावर मला जाणवला नाही.ममता-त्यांची मुलगी सध्या मराठी गझल लिहायला लागली.माझ्या घरून तिला फोन केला,“हॅलो,मी तुझ्या श्रद्धेला भेटले गं बाई!..."
आज हजारो अनाथ मुला-मुलींची ‘माई’झालेल्या सिंधुताई मात्र आहेत तशाच आहेत.साध्यासुध्या.थोर मनाच्या.सिम्पली ग्रेट!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा