मागे एकदा कॉलेजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोणारला जाणं झालं. तिथं ज. ह. खरातांची भेट झाली. त्यांचं चित्रकाव्य वाचण्या-पाहण्याचा योग आला. नंतर मलकापूरच्या विदर्भ साहित्य संमेलनात त्यांच्या चित्र-काव्याचं प्रदर्शन होतं. तिथं रसिकांनी आवर्जून झुंबड केली. मान्यवरांनी भरभरुन दाद दिली. खरातांचं हे चित्र-काव्य म्हणजे एक अनोखा प्रयोग आहे. चार ओळींच्या ओवीला कधी आडवा, कधी उभा, कधी तिरपा असा छेद देणारी पाचवी ओळ त्यांच्या चित्र-काव्यात अवतरते. आशयाला नीरगाठ बांधते. कवीचं सांगणं उत्कटपणे जिथं थांबतं तिथे शब्दांनीही थांबलं पाहिजे तरच ती काव्यकला. अन्यथा कवितेचे कलेवर.
कधी कवीचं सांगणं दोन ओळीत संपतं. कधी त्याला तिसर्या ओळीची गरज भासते. कधी चौथ्या ओळीची निकड आणि कधी पाचव्या ओळीची अपरिहार्यता. काव्याचे काहीही गणित नाही. या अर्थानं ते अगणित आहे. चार ओळींच्या कवितांची परंपरा थेट दुसर्या-तिसर्या शतकातील प्राकृतातल्या गाथा सप्तशती पर्यंत पोचणारी आहे आणि ह्या गाथा ज्या कवींना स्फुरल्या ते सर्व लोककवी होते.
कविता ही बहुरुपिणी आहे. ती कवीला कोण्या रुपात भेट देईल काही सांगता येत नाही. कधी ती भेटते कबीराला दोन ओळीत. तेव्हा तिला म्हणतात दोहा. कधी ती भेटते गुलजारला तीन ओळीत, तेव्हा तिला म्हणतात त्रिवेणी. कधी ती भेटते बहिणाबाईला चार ओळीत तेव्हा तिला म्हणतात ओवी.
आणि आता ती भेटली ज. ह. खरातांना पाच ओळीत. तिला म्हणायचं घ्पाचपावलीङ, समर्थ रामदासांनी शास्त्रधाटी आणि लोकधाटी अशा दोन काव्यधारा मांडल्या. दोहा, त्रिवेणी, ओवी, पाचपावली ही सर्व खरंतर लोकधाटीतून उत्क्रांत झालेली कवितेची रुपं. लोकगीतांचं धष्टपुष्टतेचं सौष्ठव, जोरकसपणा, सरळसोट थेट अभिव्यक्तीत ह्या सर्व लोकधाटीच्या गुणांनी समृद्घ असलेल्या एतद्देशीय काव्य परंपरंने हे सर्व काव्यप्रकार पोसलेले आहेत.
प्रत्येक कवीचं आपलं वाचन असते. कवितेविषयीची आपली समज असते. आपण ज्या प्रकारची कविता लिहितो त्या प्रकारातल्या काव्य परंपरेची त्याची स्वत:ची जाण असते. आपल्या कवितेचा तोच पहिला वाचक आणि घडता-घडता तो लिहीत असतो. कवितेतून व्यक्त होण्याच्या आपल्या सर्व शक्यतांचा तो विविध अंगाने शोध घेत राहतो. आतल्या खदखदणार्या रसायनाला नवनव्या रचनाबंधांच्या मुसीत ओतण्याचा प्रयत्न करीत राहतो. ह्यातून त्याचं काव्यभान उत्तरोत्तर परिपक्व होत राहते. जाणीव-नेणीवेच्या पातळीवर चालणारी ही एक निरंतर क्रिया असते. ह्यातून कवितेची संहिता आकृती धारण करते आणि तिचा रूपबंध सिद्घ होते. संहितेच्या वाचनानंतर जाणकार रसिकांच्या मनात उमटणारी प्रतिक्रिया त्या संहितेचं यशापयश पारखत असते. संहितेची भट्टी कधी जमते. कधी हुकते.
लेखनगर्भ जाणीवपूर्वकता आणि संहितेच्या सिद्घतेनंतरची परिष्करणशीलता ह्या दोन्ही साधनांची व्यर्थता लक्षात आल्यानंतर ती उरते ती काव्यकलेची साधना.
३जानेवारी २०१० ला बुलडाणा जिल्ह्यातल्या सुलतानपूर येथे बुलडाणा जिल्हा साहित्य संघाचे दहावे जिल्हा साहित्य संमेलन झाले. ज. ह. उपाख्य भाऊसाहेब खरात ह्या संमेलनाचे अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात खरातांनी कवितेविषयी आपली भूमिका मांडली कविता ह्या वाङमय प्रकाराविषयी त्यांची सजगता त्यातून दिसून येते. ते म्हणतात-
‘कवितेची संहिता अल्पाक्षरी असते. ती नेहमीच तपशील टाळून संपृक्त रूपात व्यक्त होत असते. तिची निर्मितीची प्रक्रिया नेमकी कशी घडते व ते कवीला देखील स्पष्ट करता येणार नाही. कविता समजण्यासाठी कवितेची अंतर्गत लय पकडावी लागते. शब्दांचे विविधांगी अर्थ शोध् ाावे लागतात. वरवरच्या अर्थापेक्षा गूढ अर्थ शोधण्यातच सात्विक आनंद मिळतो. बहुअर्थी कविता हे चांगल्या कवितेचे लक्षण आहे. कविता किती मोठी आहे त्यापेक्षा तिची अर्थगर्भता आणि आविष्कारशैलीच तिचे मूल्य ठरवित असते.
सर्वसामान्य माणसामध्ये कवितेची आवड निर्माण व्हावी म्हणून पाचपावली हा रचनाबंध मी चित्रांच्या साह्याने मांडला आहे. त्यांचे सुखदु:ख, वेदना कवितेत आल्यास त्यांना कविता आपलीसी वाटेल.
‘पाचपावली’ हा प्रयोग नाही. तो उत्स्फुर्तपणे पुढे आलेला काव्यप्रकार आहे. पाच ओळीची संहिता असताना मी घ्पाचोळीङ ऐवजी पाचपावली म्हणणे अधिक पसंत करतो. कारण या रचनाबंधात दुसर्या, चौथ्या आणि पाचव्या ओळीत यमक आलेले आहे. त्यामुळे वारकरी ज्याप्रमाणे पावली खेळतात त्याप्रमाणे या ओळीमध्ये मागेपुढे खेळता येते. पाचपावलीला तंतूवाद्याची साथ मिळाल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतो.’
कविता ही शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारी ललित कला आहे. तिच्या संहितेत तिची परिपूर्णता आहे. चित्र आणि संगीत ह्या मूर्त आणि अमूर्त ललित कलांचे साहाय्य कवितेच्या आस्वादाची तात्कालिक परिणामकारकता प्रभावी करीत असले तरी ते कवितेचे सादरीकरण असते.
सुगरणीच्या हाताचा गुण, आणि तिने ओतलेले मन पदार्थाला चव आणतात.चांदीच्या ताटाची नक्षी आणि पदार्थाची सजावट हा शेवटी डोळ्यांचा रस आहे, रसनेचा नव्हे; हे लक्षात घेतले पाहिजे. उत्तम कवितेचा प्रसार करण्यासाठी इतर ललित कलांनी साथसंगत करण्याची परंपरा प्रत्येक संस्कृतीत असते. तशी ती आपल्याकडेही आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे हा ‘पाचपावली’ हा प्रस्तुत संग्रह.
छंद, वृत्तातील आवर्तनाने कवितेत उच्चारणसुलभ लय आणि ताल निर्माण होतो. त्यावर स्पंदीत होऊन कवितेची आशयगर्भता वाचणार्या-ऐकणार्याच्या मनात उतरत जाते. शब्दांशी एकजीव झालेले असे संगीत छंदमुक्त काव्याचा प्रकार वगळता थोड्या अधिक फरकाने प्रत्येक कवितेत असते म्हणून तर ज.ह. खरातांची कविता अंगाई गाते-
‘माय पाजता पाजता
मला गायची अंगाई;
मायबोलीची रक्तात
तेव्हा उतरली शाई;
गाते कविता अंगाई’
अंगाई गात गात कविता अशी सचित्र होते!
प्रस्तावनेच्या निमित्ताने प्रस्तावनेच्या लेखकाने कवितेविषयी आपले चिंतन मांडण्याचा अनाग्रही प्रयत्न करावा. रसिक वाचकांना कवीचा अल्पसा परिचय करुन द्यावा; एव्हढीच प्रस्तावनाकाराची मध्यस्थ म्हणून भूमिका, बाकीचा सामना थेट कवी आणि रसिक यांच्यामध्ये; सरळ सरळ! वाचक हेच खरे कवितेचे रत्नपारखी. त्यांना त्यांचे मूल्यांकन करु द्यावे. आपण बाजूला व्हावे. जाता जाता रसग्रहण करणार्या ग्राहकांच्या तळहातावर मासला म्हणून उदाहरणार्थ -
पोळा आला की एक दिवस पूजा, पाठीवर झूल. नैवेद्यात पुरणाची पोळी. हे म्हणजे आपल्या पंचवार्षिक निवडणुकांसारखं ‘उपरसे टामटुम अंदरकी राम जाने’ अशी गत.
खरातांच्या घ्पाचपावलीङ तली नंदीची पूजा, म्हटलं तर बैलांचा घ्सलङ मांडते आणि म्हटलं तर बैलासारखे ढोर कष्ट करणार्या शेतकर्यांच्या दु:खाला वाचा फोडते.
‘वर आंब्याचं तोरण
खाली पुरणाची पोळी
मध्ये झुली खाली सल
आरी कोंबून टोचली
-पूजा नंदीची चालली’
बदललेलं पर्यावरण. पावसाचा खेळखंडोबा. कर्जापायी शेतकर्यांच्या आत्महत्या. आणि यावर पांढरपेशांनी सुचविलेले तकलादू उपाय या भीषण वास्तवाला खरातांनी पाच ओळीत उत्कटपणे व्यक्त केलं.
‘जनते तिची तानते, वांझोटी म्हणे देनं येना’ या लोकभाषेतील वाक्प्रचारांचा उपयोग कवितेला कशी धार लावतो हे पाहण्यासारखे आहे.
‘कसे बदलले ऋतू
बीज मातीला धरेना
कधी ओला कधी सुका
मेला काकरात दाणा
-वांझ म्हणे देना येना’
जगा च्या पाठीवर लोकशाही प्रधान असलेला आपला खंडप्राय देश. ह्या लोकशाहीच्या राजपटावर काय खरं? काय खोटं? कोण बेइमान? कोण निष्ठावान? हे सामान्य माणसाला काही कळेनासं झालं. ह्या अनाकलनीय अवस्थेला खरातांनी पाखरांच्या भाषेत मांडलं
‘गीता सांगती कावळे
बगळ्यांचे समीक्षण
कुजबुज पाखरांची
कोण खरे निष्ठावान
- लोकशाही पारायण’
वाचल्यानंतर मनात रेंगाळत राहतील अशा कितीतरी ओळी खरातांच्या घ्पाचपावलीङ त आपल्याला भेटतात. सूचकता हा अभिजात कवितेचा गुण. शृंगाराला व्यक्त करतांना तर तो अधिक खुलून येतो, त्या अंगानं जाणारी ही एक अप्रतिम ‘पाचपावली’
‘तुह्या नाकाची नथनी
जणू चकोर चांदवा
तुह्या ओठाशी लागून
जणू चाखतो गोडवा
- थोडा मागतो जोगवा’
अशा ‘गोडव्या’ चा ‘जोगवा’ मागणार्या कवीला तो ‘थोडासा’ मिळाला तरी तो कवी धन्य होतो. अशी धन्यता कविवर्य ज. ह. खरातांना निश्चितच लाभली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा