महाराष्ट्र टाइम्स २ नोव्हे.२०१३ चा अग्रलेख
देव्हाऱ्यातिल वीज-निरांजन, अखंड तेवत ठेवी बंधू;
संगणकाच्या पडद्यामागे, मंत्रमुग्ध पण त्याचा मेंदू.
श्रीकृष्ण राऊत यांची ही कविता किती समर्पक शब्दात आजच्या काळाचे चित्र उभे करते. काळ कधी कुणाला धरून ठेवता येत नाही. गेला काळ कितीही रम्य वाटला, तरीही तो गेलेलाच असतो आणि काळ कितीही बदलला, तरी काही गोष्टी काळही बदलू शकत नाही. काळाच्या ओघात देव्हाऱ्यांमधून विजेची निरांजने पेटू लागली. परंतु प्रकाशाचा उगम बदलला, तरी प्रकाश मात्र तोच आहे आणि देव्हाऱ्यात भल्या पहाटे मंद सोनेरी प्रकाश पाहून मनात उमटणारे भक्तितरंगही तेच आहेत. पहाटेचा गारवा निसर्गाने पर्यावरणबदलाच्या कुपीतून बाहेरच पडू दिला नाही, तरीही सणांची ऊब हवीहवीशी वाटतेच. पदार्थांच्या चवी बदलल्या, संगीताचा ठेका वेगवान झाला, तरीही दिवाळीच्या पहाटे आपल्या किंवा कुणाच्यातरी घरातून 'देव माझा विठू सावळा'ची रेशमी लकेर कानी पडते आणि उटणं लागलेल्या अंगावर शहारा येतोच. मराठी माणूस महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जगात कुठे कुठे पसरला, तरीही त्याचे मराठीपण अनेक बाबतीत कायम राहते. साहित्य, संगीत, नाटक, सिनेमा, परिसंवाद, चर्चा, दिवाळी अंक यात रमणे त्याच्या 'डीएनए'मध्येच आहे. यंदा जाहिराती नाहीत, अंकांना उठाव नाही, लेखकांकडून मजकूर मिळत नाही, अशा तक्रारी दिवाळी अंकांचे संपादक दरवर्षी करतात आणि त्यानंतरही दरवर्षी दिवाळी अंक मोठ्या संख्येने निघतातच. अंकांच्या किमती वाढल्या म्हणून वाचकही कुरकुरतात; परंतु तरीही एखादा तरी दिवाळी अंक आपल्या घरात आलाच पाहिजे, असे व्रत असणाऱ्या मराठी माणसांची संख्या मोठी आहे. दरवर्षी काही अंक गळतात आणि त्याच्या दुप्पट नवे अंक सुरू होतात. पंचविशी, पन्नाशी आणि पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या दिवाळी अंकांची संख्या लक्षणीय आहे. यावर्षी दिवाळी अंकाच्या अनुक्रमणिकाच पाहिल्या, तरी त्यातील चौफेर विविधता लक्षात येते. दिवाळी अंकांची सजावट, त्यांच्या छपाईचा दर्जा, कागदांचा दर्जा यात कितीतरी सुधारणा झालेली आहे. दिवाळी अंकांमधून काही नवे लेखक-कवी मराठी भाषेला मिळावेत, दिवाळी अंकांमधील लेखांची चर्चा व्हावी, त्यावर वाद झडावेत तरच या अंकांना अर्थ आहे, अशी अटीतटीची भूमिका कोणी घेऊ शकतो. हा ज्याच्या त्याच्या प्रवृत्ती-प्रकृतीचा भाग झाला. परंतु माणसाला गुंतवून ठेवू शकेल अशी साधने गेल्या अडीच दशकांत खूप वाढली आहेत. मनोरंजनापासून ते माहितीपर्यंत सर्व काही आता अनेक स्त्रोतांकडून धो धो वाहात येत असते. अशा वेळी सगळ्याच गोष्टी आहेत त्याच स्वरूपात राहणे अशक्य आहे. त्यामुळे दिवाळी अंक निघतात आणि खपतात, याचेही काही मोल आहेच. सगळे काही संपते आहे, असा सूर लावणे फार सोपे आहे. आश्वासक सूर लावायचा, तर भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांचा अर्थ लावण्याची आधी तयारी आणि मग कुवत हवी. जे साहित्याचे, दिवाळी अंकांचे तेच इतर सांस्कृतिक परंपरांचे. 'दिवाळी पहाट' ही गेल्या काही वर्षात मुंबई-पुण्यात रूजलेली संकल्पना आहे. तिने आता चांगलेच बाळसे धरले आहे. परंतु टीव्हीवरील सांगीतिक कार्यक्रमांमधून १०-१२ वर्षांची मुले ज्या तयारीने शास्त्रीय संगीत गाताना दिसतात, ते पाहिले तर संगीताची परंपरा लोप पावत असल्याची ओरडही खोटी वाटते. गुरूच्या घरी राहून घरकाम करणारे आणि पाणी भरणारे शिष्य दिसले तरच गाणे टिकेल, असा तिरपागडा दृष्टिकोन अनेकदा आपल्या आकलनाला मर्यादा आणतो. बदलत्या जगात, बदलत्या काळात कलेची आराधना आणि रसिकत्व यांतही बदल होणारच, हे गृहीत धरूनच याकडे पाहिले पाहिजे. बडे गुलाम अलीखाँ यांची किंवा गंगूबाई हनगलांची एखादी दुर्मिळ बंदिश यूट्यूबवर कोणीतरी अपलोड करतो आणि हजारो लोक ती ऐकू शकतात, हा चमत्कार ही वर्तमानाची देणगी आहे. लता मंगेशकर यांच्या शास्त्रीय संगीत गायनाची एक क्लीप अशीच या नव्या माध्यमामुळे लाखोंच्या कानांवर पडू शकली. दिवाळी हा सण म्हणजे काही केवळ रोशणाई आणि फराळाचे जिन्नस नव्हे. दिवाळीच्या सुमारास नवीन नाटकांची, मैफिलींची रेलचेल असते. गेल्याच आठवड्यात ठाणे येथे बेगम परवीन सुल्ताना आणि आजच्या काळातली एक तरुण प्रतिभावंत गायिका कौशिकी चक्रवर्ती यांचे गाणे झाले. ते ऐकायला मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग उपस्थित होता. यावेळी परवीन सुल्ताना यांनी महाराष्ट्राविषयी आणि मराठी श्रोत्यांविषयी व्यक्त केलेली भावना फारच मार्मिक होती. 'मी जगभरात कार्यक्रम करते आणि श्रोत्यांचे प्रेमही सगळीकडे मिळते. परंतु जी आणि जशी दाद मला महाराष्ट्रात मिळते, त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही. खरे सांगायचे, तर जगात आणि देशात कुठेही गाताना मला इथले श्रोतेही सोबत घेऊन जाता आले तर काय मजा येईल!' असे त्या म्हणाल्या. आणि हेच मराठी संस्कृतीचे स्पिरिट आहे. पेटविलेला दिवा असो वा विजेचे निरांजन; ते तेवत ठेवणे महत्त्वाचे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा