सुरेश भट आणि मराठी गझल हे असे समीकरण आहे की मराठी गझलचा विचार करताना सुरेश भटांना केन्द्रस्थानी मानून तो विचार करावा लागतो. म्हणूनच ‘विदर्भाची मराठी गझल’ या विषयाची मांडणी करताना देखील पुढील टप्पे महत्त्वाचे ठरतात - १.विदर्भाने दिलेली मराठीतील पहिली ज्ञात गझल २.सुरेश भटांच्या पूर्वीची विदर्भाची मराठी गझल.३.सुरेश भटांची मराठी गझल ४.सुरेश भटानंतरची विदर्भाची मराठी गझल ५.विदर्भाचा आद्य मराठी गझलगायक
१.विदर्भाने दिलेली मराठीतील पहिली ज्ञात गझल
‘जग व्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ ही अमृतराय ह्या कवीची रचना मराठीतली पहिली ज्ञात गझल मानली जाते. माधव जूलियन, ना. ग. जोशी, प्रा. रमेश अ. तेंडुलकर ह्या अभ्यासकांनी अमृतरायांच्या व ह्या रचनेचा उल्लेख मराठीतली पहिली ज्ञात गझल म्हणून केलेला आहे.
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असलेले साखरखेर्डे ह्या गावी १७ मार्च, १६९८ ला अमृतराय ह्यांचा जन्म झाला.इ. स. १७२९ मध्ये तीर्थयात्रेनिमित्त अमृतरायांनी उत्तर हिन्दुस्थानातील अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ह्याच प्रवासात भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी सूफी साधुसंतांच्या ‘गझल’ रचनेने त्यांच्या कवीमनाला प्रभावित केले असावे व त्यातूनच ‘जग व्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ ही रचना अमृतरायांच्या लेखणीतून उतरली असावी, म्हणून ह्या रचनेचा कालखंड इ. स. १७२९ मानला जातो. मराठीतील ही पहिली ज्ञात गझल विदर्भाने महाराष्ट्राला दिली. मतल्यात एकच ओळ असल्यामुळे ही रचना अपूर्ण गझल किंवा गझलसादृश्य रचना ठरते.
अशाच प्रकारची एक रचना . ‘धाव पाव गा पंढरीराया निरसी हे समूळ पाया’ ही दयालनाथ महाराज (१७८८-१८३६) यांची आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१८७१-१९३४) यांच्या ‘संगीत वीरतनय’ ह्या नाटकातील ‘जाहले आभार भारी आपुले’ या पदाची रचना‘गझल’ म्हणता येईल अशी आहे.
२.सुरेश भटांच्यापूर्वीची विदर्भाची मराठी गझल.
कवी अनिल (१९०१-१९८२) यांना मुक्तछंद-दशपदीचे प्रवर्तक मानले जाते. त्यांच्या १९७६ साली प्रसिद्घ झालेल्या ‘दशपदी’ ह्या संग्रहातील ‘वाटेवर काटे वेचीत चाललो’ ‘चटक चांदण्या रात्री येत राहतात पुन्हा’ ‘ते सुजाणपण सारे साठवून असते मी’ ह्या रचनांचा उल्लेख अभ्यासक गझल म्हणून करतात. मात्र ह्या आणि आणखी दोन अशा एकूण पाच दशपदींचा उल्लेख कवी अनिल स्वत: मात्र ‘गझलेच्या ढंगातील दशपदी’ असा करतात.
भ. श्री. पंडित (१९०६-१९७८) यांच्या ‘पिचलेला पावा’(१९३३), ‘उन्मेष आणि उद्रेक’ (१९५०) ‘सुवास आणि रस’ (१९५३) या तीन संग्रहातील २२६कवितांपैकी तेरा कवितांचा उल्लेख स्वत: कवीने ‘गझल’ म्हणून केल्याचे आढळते. परंतु त्यातील केवळ ६ कवितांनाच ‘गझल’ म्हणता येईल. या सहा रचनांमध्ये ‘वादिच्या सांगून झाल्या जो तक्रारी पुर्या’ आणि ‘उठून एकदा तरी गडे ! जरा पहा बरे’ या रचनांचा उल्लेख करता येईल.
ना. घ. देशपांडे (१९०९-२०००) यांच्या ‘शीळ’ (१९५४) ‘अभिसार’ (१९६३), ‘खूणगाठी’ (१९८५) ‘गुंफण’ ‘कंचनीचा महाल’अशा पाच कवितासंग्रहात तेरा कविता गझल रचनेच्या प्रयत्नातून लिहिलेल्या आहेत. त्यातील चार कवितांना गझल म्हणता येईल. त्यापैकी ‘अंतराच्या गूढ गर्भी एकदा जे दाटले गं’ ‘फूल गेले राहिला हा वास आता’ ‘प्रणयाचे मधुगाणे धरणीने म्हटले रे’ ह्या रचनांचा उल्लेख करता येईल.
राजा बढे (१९१२-१९७७) यांच्या ‘मखमल’(१९७६)ह्या संग्रहात काही रचना गझलांशी साधर्म्य असणार्या आहेत. त्यातील ‘गडे पहिलेच पाउल हे नव्या मुलुखात आले मी’ ‘घातली पायी मिठी तोडून जा’ अशा रचनांचा उल्लेख आपल्याला गझल म्हणून करता येईल.
३. सुरेश भटांची मराठी गझल
१५ एप्रिल १९३२ ला अमरावती येथे सुरेश भटांचा जन्म झाला. १९५५-५६ मध्ये साधारणत: वयाच्या तेविसाव्या-चोविसाव्या वर्षी त्यांनी कळत-नकळत लिहिलेल्या कवितेचा फॉर्म गझलचा आहे हे त्यांच्या लक्षात आले. परंतु ह्या फॉर्मची खासियत समजून उमजून गझलेच्या जाणिवेच्या पातळीवर गझल लिहिण्याची सुरुवात साधारणत: १९६३-६४ पासून केल्याचे त्यांनी डॉ. अक्षयकुमार काळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
सुरेश भटांच्या मराठी गझलांचा प्रवास आजही कालानुक्रमे न्याहाळायचा झाल्यास आपल्याला त्यांच्या ‘रूपगंधा’(१९६१) या पहिल्या संग्रहापासून सुरूवात करावी लागेल. ‘रूपगंधा’ या त्यांच्या पहिल्या संग्रहात एकूण ७२ कविता आहेत. त्यापैकी फक्त सात रचनाच गझल प्रकारात आहेत. ‘रंग माझा वेगळा’ हा गझल संग्रह १९७४ साली प्रसिद्ध झाला. ह्या संग्रहात एकूण ९२ कविता आहेत. त्यापैकी ३२ कविता ह्या गझल प्रकारातील आहेत.
‘रंग माझा वेगळा’ हे भटांच्या काव्यप्रवासाचे एक महत्त्वाचे वळण आहे. ज्या वळणावर त्यांचे गीत लेखन मागे सुटले आहे. आणि ‘मुसलसल गझल’ देखील मागे पडली आहे.निव्वळ गझलांचे असलेले भटांचे दोन संग्रह म्हणजे ‘एल्गार’(१९८३) आणि ‘झंझावात’(१९९४).‘एल्गार‘मधे ११९ कविता आहेत. त्यापैकी ९६ गझल प्रकारातल्या आहेत. तर झंझावातामध्ये एकूण ८९ कविता आहेत आणि त्यापैकी ७२ गझला आहेत.संख्यात्मक वाढीच्या दृष्टीने ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ हे त्यांच्या गझल प्रकारातले महत्त्वाचे पडाव आहेत.
‘सप्तरंग’(२००२) ह्या त्यांच्या संग्रहात एकूण ७९ कविता आहेत. त्यापैकी ५१ गझला आहेत.‘रसवंतीचा मुजरा’(२००७) ह्या अखेरच्या संग्रहात एकूण ८३ कविता आहेत.त्यापैकी केवळ ४ गझला आहेत. सुरेश भटांच्या नावावर असलेल्या ह्या सहा संग्रहात समाविष्ट एकूण ५११ कवितांपैकी २५७ गझला आहेत.
‘सप्तरंग’ ह्या संग्रहात समाविष्ट ‘ह्म्द’(पृ.३९) ‘न आत शरीफ’(पृ.४०) आणि ‘पाच वर्षांनी!’(पृ.६६)आणि ‘खुलासा’(पृ.७६)दोन हझला अशा चार रचनांचा आकृतिबंध गझलांचाच आहे.‘न आत शरीफ’ ही रचना ‘झंझावात’ ह्या संग्रहातही पृ.५० वर समाविष्ट आहे.
वरील आकडेवारीत मुसलसल गझलांचाही समावेश आहे.ज्यांना ‘रंग माझा वेगळा’नंतरच्या कालखंडात सुरेश भट गझलांच्या फॉर्म मधल्या कविता म्हणत असत.भटांच्या सहा संग्रहातल्या मुसलसल आणि गैर मुलससल अशा दोन्ही प्रकारच्या गझलांची एकूण संख्या २५७ इतकी आहे. त्यासाठी त्यांनी पन्नास वर्षे सातत्याने गझला लिहिल्या आहेत.
१९७४ मध्ये ‘रंग माझा वेगळा’ प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत तीन दशकं त्यांच्या गझलांनी मराठी कवितेवर चेटूक केले आहे.भटांच्या गझलांचा हा ताळेबंद मांडताना त्यांनीच केलेल्या कवितेच्या यशाची एक व्याख्या सहजपणे आठवली. ‘झंझावात’च्या प्रस्तावनेत ते लिहितात - ‘जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर रसिकांच्या कायम स्मरणात राहते, जिचा नेहमीच्या जनजीवनात प्रत्यय येतो, ती यशस्वी कविता!’आपल्या गझलांचे समर्थन करण्यासाठी भट आज हयात नाहीत.१४ मार्च २००३ ला त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला.पण काळाच्या कठोर समीक्षेला पुरून रसिकांच्या स्मरणात पिढ्यानुपिढ्या उरेल एवढे गुण त्यांच्या गझलात नक्कीच आहेत म्हणूनच तर त्यांच्या ह्या ओळी अधिक अर्थपूर्ण वाटतात-
‘जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!’
४. सुरेश भटानंतरची विदर्भाची मराठी गझल
उ. रा. गिरी (१० ऑक्टोबर १९२९- ५ सप्टेंबर, १९८६ ) यांचे ‘मी एकटा निघालो’ (१९८३) ‘चंद्रायणी’ (१९८४) असे दोन संग्रह प्रसिद्घ आहेत. पैकी ‘मी एकटा निघालो’ या संग्रहात प्रत्येक कवितेखाली तिचा लेखनकाल नोंदविलेला आहे.१९६४ ते १९८१ अशा कालखंडातील ह्या कविता आहेत. तर ‘चंद्रायणी’ मधील कविता १९५२ ते १९८१ या कालखंडातील असल्याचा उल्लेख स्वत: कवीने केला आहे. ‘चंद्रायणी’ मध्ये सहा कविता गझल सादृश्य रचना आहेत पण त्यांना गझल म्हणता येणार नाही.
‘मी एकटा निघालो’ या संग्रहातील एकूण २८ रचनात गझलचा आकृतिबंध सांभाळण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. पण त्यातील केवळ पंधरा रचनात तो यशस्वी झालेला दिसतो. १९६५ मध्ये रचलेली ‘कर सैल तू गळ्यातील’ ही त्यांची गझल कालानुक्रमे पहिली गझल ठरते. त्यानंतरच्या काळात एक्कट दुक्कट गझला लिहिणार्या गिरींनी १९७३ मध्ये चार आणि १९८० मध्ये चार गझला तंत्रशुद्घ लिहिलेल्या आहेत. १९८० मध्ये रचलेल्या दहा रचनांपैकी चारच रचना गझल म्हणून यशस्वी झालेल्या आढळतात. १९६५ ते १९८१ या सोळा वर्षांच्या कालखंडात गिरींची गझलजाणीव तंत्रशुद्घतेच्या पातळीवर चाचपडत राहिल्याचे दिसते.बजरंग सरोदे (१६ मार्च १९३५ - १७ जानेवारी २००३) या कवीच्या ‘भेटला जो, जो मला तो ओळखीचा वाटला’ ‘येई समीप माझ्या तुज एकदा म्हणालो’ ह्या रचना गझल काव्यप्रकारात मोडणार्या आहेत.
नव्या पिढीने गझल समजून घ्यावी, तंत्रशुद्घ गझल लिहावी म्हणून सुरेश भटांनी अनेक नवोदितांशी पत्रव्यवहार केला. विविध नियतकालिकातून नवोदितांच्या गझलांची सदरे चालविली. नव्या गझलकारांच्या गझलात ‘इस्लाह’ दिला.यातून घडलेल्या नव्या मराठी गझलकारांची नावे सुरेश भटांनी डॉ. अक्षयकुमार काळे ह्यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगीतली आहेत. त्यात विदर्भातील अरूण सांगोळे, बंडु चक्रधर, प्रल्हाद सोनवणे, दीपमाला कुबडे, अनिल पाटील ही काही नावे आहेत.
१९९६ ते २०११ या कालखंडात संख्येच्या दृष्टीने सर्वाधिक गझल लिहिणारे अनिल पाटील ह्यांचे ‘यातिक’ ‘गाफील’ ‘मातेरं’ ‘चंद्र नभी गझलेचा’ असे चार गझलसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.१९९५ ते २००८ या कालावधीत दीपमाला कुबडे यांचे ‘स्वप्नगंधा’, ‘सांजसावल्या’ हे कवितासंग्रह प्रसिद्घ झाले. त्यात काही प्रमाणात गझल होत्या. त्या आणि इतर नव्या गझलांचा मिळून ‘दीपमाला गझलेची’ हा त्यांचा गझल संग्रह प्रकाशित झाला.अरुण सांगोळे याचे अनुक्रमे ‘एका गोरज घडीला’(२००३) आणि ‘सारा दिवस फुलात’ (२००९)असे दोन संग्रह प्रकाशित झालेत. ह्या दोन्ही संग्रहात गझलांची संख्या अधिक असली तरी त्यात कविता आणि गीतांचा समावेशही केलेला आहे.हृदय चक्रधर यांचा ‘ग्रीष्म छाया’ हा संपूर्ण गझलांचा संग्रह २०१० मध्ये प्रकाशित झाला.
वरील सर्व गझलकारांची फळी सुरेश भटांनी घडवलेली असल्याने स्वाभाविकपणे सुरेश भटांच्या शब्दकळेचा, आशय मांडणीचा, प्रतिभाविश्वाचा प्रभाव कमी-अधिक प्रमाणात ह्या गझलकारांच्या गझलांवर प्रारंभी जाणवणे आणि नंतर कालांतराने कमी-कमी होत जाणे अपरिहार्य होते.
याच गझलदिंडीतले आणखी काही वारकरी : गौरवकुमार आठवले (सवाल- २०००, मांडतो फिर्याद मी -२०११) गिरीश खारकर (माझ्यातला मी -२००१, गझलेत श्वास माझा-२०१०) लक्ष्मण जेवणे (ग्रीष्म पालवी-२००४), आशा पांडे (अंतरीचे सूर - २००६) विष्णू सोळंके (आक्रोश आसवांचा -२००९) कविता डवरे (अशाच फुलण्यासाठी - २००९) नीलकांत ढोले (वेदनांची वेधशाळा-२०१०) क्रांति साडेकर (असेही तसेही-२०११) रमेश सरकटे (गर्जना-२०११) हे सर्व संपूर्ण गझलांचे संग्रह असून ह्या गझलकारांकडून रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
सुखदेव ढाणके (व्यथा फुली-१९८३), बबन सराडकर (पापण पालवी-२००९, सांगाती -२००९, हंबर -२०१०) ललित सोनोने (चांदणवेल-१९९१), ओमप्रकाश ढोरे (ओठास रंग आला-२०००, हल्ली-२०११) दिलीपकुमार जिदे (जखमांची निळाई-२०००) संजय इंगळे तिगावकर (अंगारबीज आणि दोलनवेला-२००५) अनंत भीमनवार (रानबोली-२००८) विनय मिरासे (देहफूल-२०१०) महादेव बगाडे (गीत-गझल, २०००) श्रीकांत कोरान्ने (मारव्याची फुले-२००२) कलीम खान (कलीमची कविता-२००२)शरद पिदडी(डोळे-२००२) संजय खांडेकर(शून्यातून शून्याकडे- २००१)गंगाधर मुटे (रानमेवा-२०१०)
ह्या कविता संग्रहांमधून काही रचना गझल सदृश्य असलेल्या,काही तंत्रशुद्घतेचा अभाव असलेल्या तर काही परिपूर्ण गझला असलेल्या आढळतात. यातील काही कवींचे कविता –गझल लेखन थांबलेले तर काही नव्या उमेदीने तंत्रशुद्घ गझल लिहू लागलेले आहेत.
सिद्घार्थ भगत यांच्या ‘युद्घ यात्रा’ (२००६) ‘अस्वस्थ मनाच्या नोंदी’ (२००७) आणि यापुढे माझी लढाई’(२००९) या तीन गझलसंग्रहाचा विचार स्वतंत्रपणे करावा लागेल. आंबेडकरवादी विचारसरणीतून आलेली प्रखर विद्रोही जाणीव त्यांच्या गझलेतून अभिव्यक्त होताना दिसते. गौरवकुमार आठवले हे याबाबतीत सिद्घार्थ भगतांचे सहप्रवासी गझलकार आहे.
गझल अभ्यासक असलेल्या शिवाजी जवरे, डॉ. राम पंडीत आणि श्रीकृष्ण राऊत ह्या तीन गझलकारांच्या गझलांचा विचार अभिव्यक्तीच्या अंगाने स्वतंत्रपणे करावा लागतो. शिवाजी जवरे यांची ‘नाद निनाद’ (१९९९) आवेग (२००४) गझलचर्चा (२००४) अशी तीन पुस्तके प्रकाशित आहेत. पहिल्या दोन कविता संग्रहात निम्म्या गझला आहेत. शिवाजी जवरे व्यंगचित्रकार आहेत. व्यंगचित्रातली तिरकस शैली त्यांच्या सामाजिक जाणीवांच्या गझलांमधून आणि हझलांमधून आविष्कृत झालेली आहे. ‘गझलचर्चा’ ह्या पुस्तकात गझलतंत्रासंबंधी अनेक महत्वपूर्ण मुद्यांची चर्चा सोप्या भाषेत केलेली आहे. नव्याने गझल शिकणार्यांना ही ‘गझल चर्चा’ उपयुक्त आहे.
मूळचे अमरावतीचे असलेले डॉ. राम पंडित हिंदी-उर्दू-मराठी गझलांचे अभ्यासक, संपादक म्हणून ख्यातनाम आहेत. मराठी गझलांच्या अनेक प्रातिनिधिक संग्रहांचे, विशेषांकांचे संपादन त्यांनी केले आहे. त्यांनी संपादित केलेला ‘अन उदेला एक तारा वेगळा’ (२०१०) हा सुरेश भट गौरव ग्रंथ त्यांच्या चोखंदळ संपादनाचा उत्तम नमुना आहे.
‘ग़ज़लिका’ (२००४) ह्या त्यांच्या संग्रहात काही रुबाया, द्बिपद्यांसह गझलांचा समावेश आहे. फैज़ अहमद फैज़ ,नासिर काज़मी,मजरूह सुलतानपुरी, सआदत हसन मंटो इ. शायर-लेखकांवरील समर्पणात्मक गझला हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या गझलात आलेल्या ‘मेघ-चित्र’, ‘विचार-कारवॉ’, ‘तर्क-चर्चा’, ‘भावना-प्रवाह’, ‘रान-तन’, ‘जीवन-जुगार’ अशा जोडशब्दांचा वृत्तानुरोधी आशयाच्यादृष्टीने त्यांनी केलेला उपयोग नव्या जुन्या गझलकारांना अनुकरणीय ठरावा.
सुरेश भटानंतरच्या पिढीतील महत्त्वाचे गझलकार म्हणून श्रीकृष्ण राऊत यांचे नाव अग्रक्रमाने येते. मागील पस्तीस वर्षापासून श्रीकृष्ण राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.१९८९ ला ‘गुलाल’ हा श्रीकृष्ण राऊत ह्यांचा पन्नास गझलांचा संग्रह प्रकाशित झाला. सुरेश भटानंतरच्या पिढीमध्ये केवळ गझलांचा पहिला संग्रह म्हणून या संग्रहाचा उल्लेख करावा लागेल. २००३ ला नव्या गझलांसह ‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध झाला.पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर,डॉ.मधुकर वाकोडे,डॉ.अविनाश सांगोलेकर,डॉ.किशोर सानप अशा दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.मुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल त्यांना जीवन-गौरव पुरस्कार ना.सुशीलकुमारजी शिंदे ह्यांचे हस्ते ९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे संपन्न झालेल्या गझलोत्सवात प्रदान करण्यात आला.
दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत.‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता?’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे.‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर सोळा हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत.त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,गझलगंधर्व सुधाकर कदम विशेषांकाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून त्याची बत्तीस हजाराहून अधिक पृष्ठे पृष्ठे संपूर्ण विश्वातून वाचल्या गेलीत.
५.विदर्भाचे आद्य मराठी गझलगायक गझलगंधर्व सुधाकर कदम
विदर्भपुत्र सुरेश भटांच्या रूपाने जशी अस्सल मराठी गझल महाराष्ट्राला मिळाली आणि मराठी कवितेचा समृद्घ प्रवाह अधिक श्रीमंत झाला, तसाच मराठी गझल गायकीचा उगम विदर्भात होणे अपरिहार्य होते.आद्य मराठी गझलगायक होण्याचा मान यवतमाळ येथे दि. १३ नोव्हें. १९४९ रोजी जन्मलेल्या गझलगंधर्व सुधाकर कदम यांचेकडे जातो. ‘गझल गंधर्व कदम’ ह्या अग्रलेखात जेष्ठ संपादक अनंतराव दीक्षित ह्यांनी केलेली नोंद ह्या संदर्भात महत्त्वाची आहे. ते लिहितात, ‘गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे. अशी गावी मराठी गझल या स्वरूपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत. गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्त्व असते. सांगितिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे. त्यामागे त्यांचे चिंतन आहे.’ त्यांनी बांधलेल्या गझलांच्या चालीवर फिदा होऊन ‘महाराष्ट्राचे मेहंदी हसन’ म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले आहे. सुरेश भटांचा मुक्काम आर्णीत बरेचदा सुधाकर कदम यांचेकडे असायचा. आर्णीत सुधाकर कदम ह्यांचेकडे मुक्कामी असताना सुरेश भटांनी दि. ९-९-१९८१ ला ‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची’ आणि दि. १२-९-१९८१ ला ‘हा चंद्र ही रात फिरायासाठी’ तसेच ‘उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद’ ही नात लिहिल्याची नोंद आहे.
सुधाकर कदमांच्या गझलगायकीचा आदर्श महाराष्ट्रापुढे ठेवण्यासाठी ‘अशी गावी मराठी गझल’ हे मैफलीचे शीर्षक जसे सुरेश भटांनी दिले तसेच अनेक मैफलींचे निवेदन सुरेश भटांनी स्वत: केले आहे.तीन तासांची ही मैफिल केवळ मराठी गझलांची असायची. आजकालच्या मैफिलींसारखी उर्दू-हिन्दी गझलांची व्यावसायिक पेरणी तिच्यात नसायची. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प. मध्ये झालेल्या ‘अशी गावी मराठी गझल’ ह्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि त्यांच्या आवाजातील गझल गायनाची बहुतांश ध्वनिमुद्रणे आणि निवडक व्हिडिओ रसिक अभ्यासकांसाठी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ह्या निमंत्रण पत्रिकेत सुधाकर कदमांचा उल्लेख गझल ‘गझलनवाज’ म्हणून करण्यात आलेला आहे. १९८३ साली ‘भरारी’ शीर्षकाची त्यांची ध्वनिफीत प्रसिद्घ झाली. ज्यात सुरेश भट, उ. रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, अनिल कांबळे, सतिश डुंबरे ह्यांच्या गझला आहेत.
सुरेश भट आणि सुधाकर कदम ह्यांनी एकत्र वणी-नागपूर-मानवत-देगलूर-औरंगाबाद-इचलकरंजी-कोल्हापुर-पुणे असा महाराष्ट्रभर दौरा केला होता. कोल्हापुरच्या त्यांच्या एका मैफलीचे निवेदन डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केले होते.आर्णी या आडवळणाच्या गावी संगीत शिक्षकाची नोकरी करीत असलेल्या सुधाकर कदमांना दूरदर्शन आणि मुंबई -पुण्याची इतर प्रसिद्धी माध्यमे ह्यांचा लाभ होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या मराठी गझलगायकीचे योगदान १९८१ नंतर जन्माला आलेल्या आजच्या तरुण पिढीला ठाऊक नसावे ह्यात काहीच आश्चर्य नाही. पाठीच्या दुखण्यामुळे १९९७ नंतर त्यांच्या जाहीर मैफली कायमच्या थांबल्या.
सुधाकर कदमांच्या ह्या योगदानाची यथोचित दखल घेऊन दि. १५ मार्च, २००९ रोजी गझल अभ्यासक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी,प्रख्यात सिनेदिग्दर्शक राजदत्त आणि पुणे विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरु नरेन्द्र जाधव ह्यांच्या उपस्थितीत त्यांना आद्य मराठी गझलगायक म्हणून ‘गझलगंधर्व’ ह्या उपाधीने सन्मानित करण्यात आले.मराठी गझल-गायकीच्या रूपाने गझलगंधर्व सुधाकर कदमांनी लावलेल्या ह्या ‘इवल्याशा रोपाचा’ वेलू नंतर विदर्भातल्याच गझलनवाज भीमराव पांचाळे ह्यांनी ‘गगनावेरी’ नेल्याचा अलिकडचा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे.ह्या दोन गझलनवाजांच्या नंतरच्या पिढीमध्ये विदर्भाचे डॉ. राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार ही तरूण मंडळी मराठी गझल गायकीच्या क्षेत्रामध्ये नव्या दमाने पुढे येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शुभेच्छांची फुले घेऊन महाराष्ट्र उभा आहे.
‘गझल’ ह्या शब्दाचे रूप ‘ग़ज़ल’करणारा मराठी बाणा
२००१ ते २०१०या दशकात प्रस्तुत लेखकाने घेतलेली एक नोंद अतिशय महत्वाची ठरावी. ह्या दशकात ‘गझल’ह्या शब्दाचे रूप ‘ग़ज़ल’ असे रूढ करण्याचा प्रयत्न काही गझलप्रेमींनी केला. तो बर्याचशा प्रमाणात यशस्वी झालेलाही दिसतो आहे. अक्षरांखाली नुक्ता देण्याची पद्घत मराठी वर्णमालेमध्ये नसताना हे कां चालले आहे? कविवर्य सुरेशभटांनी स्वत: आयुष्यभर ‘गझल’हेच शब्दरूप स्वीकारलेले दिसते. मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक असलेले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी जे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते; त्यांनीही मराठी विश्वकोशात ‘गझल’ हेच शब्दरूप स्वीकारल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर ‘गझल’ ह्या शब्दाचे हिन्दीकरण कशासाठी? प्रतिमासृष्टीच्या अंगाने मराठी गझल अस्सल मराठमोळी राहिली पाहिजे असा अट्टाहास धरणार्या सुरेश भटांना मराठी गझलचे ‘जनक’ म्हणण्याऐवजी ‘खलिफा’ म्हणणारा आणि ‘गझल’चे शब्दरूप ‘ग़ज़ल’ करणारा हा कोणता मराठी बाणा आहे?
-डॉ.श्रीकृष्ण राऊत,
शंकरनगर,जठारपेठ,
अकोला-४४४०५
भ्रमणध्वनी : ८६६८६८५२८८
('लोकराज्य' डिसेंबर २०११)
___________________________________________________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा