कोडियाचे गोरेपण।
तसे अहंकारी ज्ञान।।
अहंकार हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे आणि त्यातही ज्ञानाचा अहंकार म्हणजे तर अगदी जानी दुश्मन आणि त्यातल्या त्यात तो अध्यात्मज्ञानाचा अहंकार असेल मग तर पहायलाच नको. आधीच माकड त्यात ते दारु प्यालेले आणि त्यातही त्याला विंचू चावला तर ज्या माकडचेष्टा चालतील तशा माकडचेष्टा म्हणजेच अध्यात्मज्ञानाचा अहंकार. त्यातले काही नमुने
अहो राव तुम्ही कुणाला सांगताय? ज्ञानेश्वरीची चांगली पन्नास पारायणे केली आहेत म्हटलं मी.
अरे माक्या पुढे कशाला बाता मारतोस तुकाराम तर अगदी कोळून प्यालो आहे मी. माझ्या घरचा ग्रंथसंग्रह तुम्ही बघितला का? अहो पोटाला चिमटा काढून प्रसंगी बायकोचे मंगळसूत्र मोडून एक एक ग्रंथ विकत घेतला आहे म्हटलं पठ्ठय़ानं आणि ते ग्रंथ म्हणजे काही शोभेच्या वस्तू म्हणून घेतल्या नाही. सगळ्य़ा ग्रंथांचं सूक्ष्म वाचन केलं आहे मी. रात्री झोपेतून उठविलं तरी सांगू शकेल कोण्या ग्रंथाच्या कोण्या पानावर काय आहे ते.
गीता तर अगदी मुखोद्गत आहे म्हटलं महाराजा''
आता तुम्हीच सांगा अशा ज्ञानी माणसांना—विद्वानांना म्हणावं तरी काय ? अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्ञानेश्वरीत, गीतेत, तुकारामाच्या अभंगात तरी काय दुसरं सांगितलं आहे. आपल्याला कोणी नमस्कार नाही केला तरी आपला अहंकार दुखावतो आणि आपण एखाद्याला रामराम केला आणि त्याने तो नाही घेतला तरीही आपला अहंकार दुखोवतो. माक्याकडे कोणी लक्ष देत नाही हेच त्या मागचं मूळ कारण असतं. एवढा मोठा ज्ञानी मी, एवढा मोठा विद्वान, एवढा मोठा हरिभक्त परायण आणि तो अमुकजी मला नमस्कार करीत नाही म्हणजे काय? झालं दुखावला अहंकार. अहंकाराची अनेक सूक्ष्म रूपे असतात. माझा मुलगा आणि आर्टला शिकतो. ओऽह नो— तो तर चांगला इंजिनिअरींगला शिकायला पाहिजे म्हणजे आपल्या मुलाच्या शिकण्यातूनही आपला अहंकारच सुखावत असतो. तुमच्या अहंकाराशी बिचार्या त्या मुलांना काय देणं-घेणं. त्यांची आवड वेगळी. त्यांची क्षमता वेगळी. त्यांना जे जमतं ते त्यांना करू द्यावं. त्यांच्या आयुष्याचा बळी आपल्या अहंकारापुढे कशाला द्यायचा? पण प्रतिष्ठेचा प्रश्न येतो ना! मान—मरातब, प्रतिष्ठा, पदं ही सगळी अहंकाराचीच पिलावळ होय.
कुणाला धनवंत असण्याचा अहंकार तर कुणाला गुणवंत असण्याचा अहंकार तर तिसर्या कुणाला यशवंत होण्याचा अहंकार तर चौथ्या कुणाला बुद्धिवंत—ज्ञानवंत असण्याचा अहंकार. ज्ञानाचा अहंकार हा सर्वात मोठा अहंकार आहे. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज आपल्या कवित्वाचे श्रेय देखील स्वत:कडे न घेता देवाला अर्पण करतात आणि त्या अहंकाराचे मूळच नष्ट करतात तर आम्ही ज्ञानेश्वरीचे वाचक. तुकारामांच्या अभंगाचे पाईक मात्र या उसन्या ज्ञानाचा अहंकार मिरवितो आणि एवढी सगळी पारायणं करूनही कोरडेच्या कोरडेच राहतो. या—ना—त्या निमित्ताने स्वत:च्या अहंकाराला खतपाणी घालतो. मान—सन्मानाची अनेक कारणे शोधून काढतो. ओल्या जखमेला धक्का लागल्यावर जशी वेदना होते तसे अहंकार दुखावल्याने आम्ही व्यथीत होतो. तुकाराम महाराजांनी ज्ञानाच्या अहंकाराला छान उपमा दिली आहे. तुकाराम महाराज म्हणतात,
कोडियाचे गोरेपण।
तैसे अहंकारी ज्ञान।।
कोड फुटलेला माणूस गोरा दिसतो तसाच ज्ञानाचा अहंकार असतो. त्या गोरेपणातून सौंदर्य तर जाणवत नाहीच उलट त्याची किळस येते, असे गोरेपण काय कामाचे? असे ज्ञान काय कामाचे?
( दै.लोकमत ,अकोला दि ६ नोव्हे.२०११ च्या ‘दिंडी’स्तंभात प्रकाशित)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा