माझे थोरले मित्र अरुणदादा शेळके

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकदा म्हणाले होते, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद हे सी. एम. च्या खुर्ची पेक्षाही मोठे आहे. अध्यक्ष साहेबांनी ठरवलं तर ते चार गरजू लोकांना नोकर्‍या देऊ शकतात. सी. एम. ची इच्छा असूनही तसे करता येत नाही.
अशी थोरवी लाभलेल्या खुर्चीवर विराजमान असलेले अध्यक्ष महाराज ऍड. अरुणभाऊ शेळके. 30 ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस. 
कितवा वाढदिवस? खरं तर हा प्रश्न फारच फालतू आहे. काळाच्या पटलावर प्रत्येक माणसाच्या वाट्याला जी काही पाच पन्नास वर्षे येत असतील; त्यातली अर्ध्यापेक्षा जास्त औपचारिक शिक्षण घेण्यात खर्ची पडतात. काही जगण्याची साधनं जुळवण्यात जातात. पाच-दहा वर्षाचा कालखंड असा असतो की आपल्याला आपल्या मनासारखं जगता येतं. आपल्या बियाण्यालायक जमीन लाभते. हवामान पोषक असतं. पीक तरारून येतं. खंडीनं रास मोजावी लागते.
ऍड. अरुणभाऊ शेळके यांच्या आयुष्यातला हा कालखंड असाच आहे. रामतीरथ सारख्या छोट्याशा गावातून आलेला एक माणूस साधा शिक्षक होतो. पुढे कायद्याचं शिक्षण घेतो, वकिलीचा व्यवसाय करतो. आणि एक दिवस महाराष्ट्रातल्या फार मोठ्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान होतो.
कोर्टाच्या परिसरातील बार रुममध्ये त्यांचे जुनिअर त्यांना घ्दादाङ म्हणतात. आपण आपल्या थोरल्या भावाला दादा म्हणतो. दादा वडिलांच्या ठिकाणी असतो. लहान भावावर पोटच्या पोरासारखं प्रेम करतो. पहिला घास घेताना लहाना जेवला की, नाही ते विचारतो. च्मला नको, लहान्यासाठी ठेवछ म्हणून आईला सांगतो. अशा वडीलकीने शेळके साहेब संस्थेतल्या कर्मचार्‍यांवर प्रेम करतात. त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करतात. त्यासाठी फार मोठे मन लागते. देवाने ते शेळके साहेबांना दिले आहे.
ज्या खुर्चीत भाऊसाहेब बसले त्या खुर्चीत आपण बसताना ह्या काट्याच्या मुकुटाची जबाबदारी काय ह्याची उत्तम जाण आमच्या दादासाहेबांना आहे. चिखलीपासून नागपूरपर्यंतच्या विदर्भातल्या खेड्यापाड्यातलं शेतकर्‍याचं पोरगं शिकलं पाहिजे. एकाचवेळी त्यानं ट्रॅक्टरनं जमीन नांगरली पाहिजे आणि कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे धडे घेतले पाहिजेत असे त्यांना मनोमन वाटते. हजारो वर्षे नांगर चालवणार्‍या कुणब्यांच्या हातात शिवाजी महाराजांनी तलवार दिली आणि पराक्रम केला. त्याच हातात भाऊसाहेबांनी लेखणी दिली आणि इतिहास घडवला. त्याच हातानं आता इंटरनेटच्या माऊसवरही आपल्या बोटांची पकड मजबूत केली पाहिजे अशी दादांची समयोचित धारणा आहे. पद्मश्री विजय भटकरांच्या सहकार्याने ‘एज्युकेशन टू होम’ ही संकल्पना श्री शिवाजी शिक्षण संस्थेत कशी रुजवता येईल या गोष्टीचा ध्यास शेळके साहेबांना लागलेला असतो. डॉ. पंजाबराव देशमुखांची लोक विद्यापीठाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय-काय करता येईल याचा ते अभ्यास करत असतात.
‘ए माईंड विदाऊट फिअर’ या रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतल्या भयमुक्त मनासारखं माझ्या कर्मचार्‍याला जगता-वागता आलं पाहिजे; हीच आपल्या खुर्चीची खरी शान आहे आणि आपल्या अध्यक्षपदाचा तोच खरा सन्मान आहे. ह्या गोष्टीवर दादांची कमालीची निष्ठा आहे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे आपल्या जीवनाचं सूत्र झालं पाहिजे असं त्यांना प्रकर्षानं वाटतं, तेव्हा त्यांच्या हृदयात खोल खोल कुठेतरी भाऊसाहेबांचाच पुनर्जन्म होतोय असं मला सारखं प्रतीत होत राहतं.
एकोणवीसशे बत्तीसमध्ये स्थापन झालेल्या शिक्षण संस्थेला एकविसाव्या शतकात नेतांना काही परंपरांची मोडतोड करावी लागणार आहे. काही पायंडे नव्यानं पाडावे लागणार आहे त. काळ बदलला. जीवन मूल्ये बदलली. आता घ्बहुजनङ या शब्दाच्या व्याख्येलाही बदलावे लागणार आहे. या सर्व बदलांची नोंद घेत सम्यक वाटचाल करावी लागणार आहे. दादा ह्या सर्व गोष्टी चांगल्या जाणून आहेत. छाती फुटेस्तोवर आदिभौतिक सुखाच्या मागे धावण्याच्या स्पर्धेत तथाकथित सुशिक्षित, नवश्रीमंत झालेला माणूस सुख-शांती-समाधानाची भीक मागताना पाहिला की दादा अस्वस्थ होतात. घ्हेच काय फळ मम तपाला?ङ हेच काय शिक्षणाचं फलीत? असे प्रश्न स्वत:लाच विचारतात. आणि उत्तरं शोधण्याकरिता पुन्हा एकदा नव्या  संघर्षात  स्वत:ला झोकून देतात. विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्याचा मंत्र अशाच विचार मंथनातून अमृतासारखा वर येतो. 
श्री शिवाजी शिक्षण संस्था हा भला मोठा परिवार आहे. ह्या कुटुंबाचे दादा प्रमुख आहेत. घर सहा माणसांचे असो की सहा हजार कर्मचार्‍यांचे, कर्ता माणूस सगळयांचे समाधान एकाच वेळी करू शकत नाही. कुटुंबाचं चांगलं करण्यासाठी बरेचदा कर्त्या माणसाला वाईटपणा घ्यावा लागतो. सत्यावर निष्ठा असणार्‍या आणि मांगल्याची चाड असणार्‍या कोणत्याही माणसाला असा वाईटपणा चुकत नाही. मग ते शिवाजी राजे असोत की संत तुकाराम, सॉक्रेटिस असो की ओशो, भाऊसाहेब असो की गाडगे महाराज. अखेरच्या काळात गाडगे महाराज आपल्या अनुयायांना कळवळून सांगायचे च्बापहो, या संस्थांची संस्थानं होऊ देऊ नकाछ गाडगे महाराज अमरावतीचे, भाऊसाहेब अमरावतीचे आणि दादा आपणही त्याच अमरावतीचे आहात. आपलंही मन याहून वेगळं काय बोलत असेल?
पायाचं दुखणं हा खरं तर आपल्या दोघांमधला नाजुक घ्दर्द का रिश्ताङ. या अर्थानं आपण एकमेकांचे नातेवाईक. माझ्यापेक्षा अधिक उन्हाळे-पावसाळे आपण पाहिलेत. जगाचा बरा-वाईट अनुभव माझ्यापेक्षा तुमच्या गाठीला अधिक. लढाया हातापायानं नव्हे तर शाबुत डोक्यानं जिंकाव्या लागतात हे मी तुम्हाला वेगळं सांगितलंच पाहिजे, असं नाही.
एका जाहीर सभेत तुम्ही मला ‘मित्र’ म्हणून संबोधलं आणि मी धन्य झालो. खरेतर हा तुमच्या मनाचा केवढा मोठेपणा! आपल्या संस्थेतल्या एका कर्मचार्‍याला तुम्ही केवढ्या उंचीवर नेऊन बसवलंत. माझं नाव घ्श्रीकृष्णङ असलं तरी प्रतिष्ठेच्या दर्जानं मी सुदामा आहे; याची मला स्पष्ट जाणीव आहे. मैत्रभावाच्या मर्यादा मला चांगल्या कळतात. शिक्षण पंढरीच्या ह्या मंदिरात माझी घ्पायरीङ नामदेवाची आहे.
‘निर्बल के बल राम’ असलेल्या आपणाला बहुजनांचं सर्वांगानं भलं करण्यासाठी उदंड उर्जा लाभावी एवढीच ईश्र्वरचरणी प्रार्थना. आपल्या वाढदिवशी माझ्या ह्या शुभेच्छा म्हणजे खरं तर सर्वार्थानं ‘सुदाम्याचे पोहे’ आहेत. ते आपण गोड करुन घ्यावेत ही नम्र विनंती. 



1 टिप्पणी: