मेळघाटच्या कविता : डाॅ मधुकर वाकोडे

'मेळघाटच्या कविता' हा श्रीकृष्ण राऊतांचा काव्यसंग्रह वाचतांना शीर्षकापासूनच वेगळ्या वळणांची पाऊलवाट असल्याची जाणीव होते. थोटक्या वडापिंपळाच्या मोटक्या सावलीनं आदिम जमातीच्या जीवन राहाटीचं विश्व जसं व्यापलं तसं त्या जीवनाच्या आत्मिक ओलाव्यानं श्रीकृष्ण राऊतांचं संवेदनशील मन मोहबनासारखं मोहरलं आहे. भुजंग मेश्राम, वाहरू सोनावणे, विनायक तुमराम, उषा आत्राम, कुसुम आलाम, कृष्णकुमार चांदेकर, सुनील कुमरे, वामन शेळमाके, माधव सरकुंडे ईत्यादिकांनी आपल्या जीवनानुभवांना अभिव्यक्त करून आदिवासी कवितेची पायवाट प्रशस्त केली. साठ नंतरच्या मराठी कवितेत दलित, ग्रामीण, आदिवासी आणि ख्रिस्ती-मुस्लिम साहित्यिकांनी कसदार लेखन करून मराठी कवितेचा प्रवाह अतिशय समृद्घ केला. दलित आदिवासी किंवा ग्रामीण काव्य लेखन करणारा साहित्यिक हा त्या त्या जाती-जमातीत जन्माला आलेला असावा असा काही नियम नाही... संकेत नाही. मात्र त्याच्या जीवन जाणिवा प्रामाणिक असाव्यात एवढी अपेक्षा असते. फुले-आंबेडकरी तत्वज्ञानाशी बांधिलकी आणि विचारांशी समरस असणारी व्यक्ती दलित साहित्यात जशी स्वत:ची ओळख निर्माण करू शकते तशीच मूळ रहिवाश्यांच्या जीवन संस्कृतीच्या आत्मिक प्रेमातून नि त्यांच्या वैचारिक संघर्षात त्यांचे शोषण करणार्‍या व्यवस्थेविरुद्घ उभे राहून त्यांना आपल्या लेखणीने बळ पुरविणारी गैरआदिवासी व्यक्ती देखील आदिवासी काव्य प्रवाहात सहभागी होऊ शकते. श्रीकृष्ण राऊत जन्माने आदिवासी नाहीत पण मेळघाटातील आदिवासींच्या जीवन-संस्कृतीचा शोध घेता घेता त्यांना त्या आदिम जीवन-संस्कृतीने एवढे वेधले का त्यांचे अपंग तनमन जणू बाधले आणि नव्या उभारीने, नव्या ताकदीने प्रस्तर फोडून अभंग... दंग झाले.
अगणित घाटांचा मेळ असलेला तो मेळघाट. अक्राळविक्राळ अशा डोंगरदर्‍यांचा परिसर मेळघाट. बाह्यत: निसर्गरम्य पण याच परिसरात प्रकृतीच्या मांडीवर आर्यपूर्व काळापासून जगत आलेला कोरकू विविध समस्यांनी जर्जर झाला आहे. कधी विकासाच्या पाळूवर प्रशासकीय नियमांची पाळू फिरून त्याचे पीठ करते तर कधी गैरआदिवासींच्या शोषणाच्या खलबत्त्यात त्यांचा चेंदामेंदा होतो. जंगलचा राजा म्हणून जो कालपर्यंत कसाबसा सुखासमाधानात जगत होता, कधी मोगलांशी तर कधी ब्रिटिशांशी लढत आपली राजवट जपत होता तो आदिवासी स्वातंत्र्योत्तर काळात अनेक पातळ्यांवर नागवल्या गेला. या आदिवासींच्या दैन्य दारिद्र्याचे भांडवल न करता त्यांच्या स्थितीचे, जीवन जाणिवांचे दर्शन राऊतांची कविता घडविते हे महत्त्वाचे.
या संग्रहातील अनेक कविता कोरकू जनजीवनाचे... लोकमानसाचे निखळ दर्शन घडवितात. या भावाविष्कारात अनेक पीळ आहेत. त्यातील काही पीळ वस्तुस्थितीदर्शक आहेत तर काही परिवर्तनाच्या आर्‍यांना गती देणारे, त्यांना सजग करणार्‍या आंतरिक उर्मीचे निदर्शक आहेत.
व्याघ्र प्रकल्प असोत का धरण प्रकल्प असोत... राष्ट्रीय विकासाच्या नावाखाली सर्व प्रथम विस्थापित होतो तो या भूमीचा मूळ रहिवासी. तो ना ग्रामीण... तो ना शहरी म्हणून त्याची झळ इतरांना पोहचत नाही. वृत्तपत्रातून त्यांच्या पुनर्वसनाचे पडसाद उमटतात पण खरे पुनर्वसन होते ते नोकरशाहीचे. लोकशाहीचा कपाळी बुक्का लागलेला आदिवासी मात्र सतत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असतो आणि संवेदनशील मन या प्रखर वास्तवामुळे अस्वस्थ होऊन आकांत करते. कुण्या एका पुराणकाळी कुण्या एका आईने आपल्या बाळाला पीठ कालवून दूध म्हणून पाजले आणि पिढ्यानपिढ्या आमचे अंत:करण द्रवले. पण आज मेळघाटातील कितीतरी झोपड्यात उपाशी आतड्यातून-

सरले कोदो, मोहाचं कूटं sss
रोटीला झालं, महाग पीठ s
हातातोंडाची पडेना गाठ ss
जो s जो ss रे s बाळा s जोss

आपल्या पोटच्या कातड्यासाठी मायची मया अशी पान्हाळून येतांना दिसते. कुपोषणग्रस्त बाळास जोजविताना उपोषणग्रस्त बाईचा हा उमाळा श्रीकृष्ण राऊतांना हेलावून सोडतो. बाह्यत: पाळण्याचं पालूपद गावरान असलं तरी त्याचं अस्तर डोंगरी जाणिवांनी मुखरित झालं. शहरीपेक्षा किंवा नागरीपेक्षा, नांगरी आणि डोंगरी जाणिवांचं नातं असतं. कोदो, कुटकी, भादली सारख्या तृणान्नाची बेगमी सरल्यावर पहाडातील वणव्याबरोबरच गवती झोपड्यातील पोटातही वणवा भडकत असतो. पेटता डोंगर लोकांना दिसतो पण जळणारे पोट मात्र राऊतांना अस्वस्थ करतांना दिसते. पोटातील भूक मुक्या मुक्या गिळणार्‍या आदिवासींची व्यथा ही अगस्तीच्या कथेपेक्षा फार वास्तव आहे. ह्या उपाशी पोटांना भाकर देण्यासाठी सरकारनं रोजगार हमी योजना सुरू केली. कोर्‍या कागदावर अंगठे उठविणार्‍या नोकरशाहीचा हा खरा हंगाम असतो.

रोजगार हमी
कशाची कमी?
अर्ध्यात तुमी
अर्ध्यात आम्ही!

दिवसभर उपाशी असलेला आदिवासी समष्टीत आपली भूक विसरतो. मूळातच नृत्यप्रधान जीवनशैली त्याच्या  नसानसातून ओहळासारखी खळाळत असते. ढोलाच्या तालावर, पाव्याच्या सूरावर तो स्वत:ला उधळतो आणि त्या धुंदीत तो रात्रही कापूरासारखी जाळून स्वत:चा आनंद जपतो.

तुझा वाजे पावा,
माझा घुमे ढोल;
फेर धरा गोल
रातभर नाचा !

असते पोटात फक्त थोडीफार शिडू. पण तेवढी झिंग पुरे. रानभर पसरलेली धून, घुंगरांच्या नादात पायानं घेतलेल्या फिरक्या. आनंद विभोर झालेल्या घामानं चिंबलेल्या पोळ्या आणि एवढ्या उभारीवर पुन्हा बाजारात निघालेल्या डोक्यावरील जड मोळ्या... हा जीवन संघर्ष या संग्रहातील कितीतरी कवितांमधून वेगवेगळ्या वळणांनी अखेर सुमेळ साधतांना दिसतो.
गौरी चेतते, लामझ्याना, शेण अक्कण, महुच्या झाडा, टिंभरूचा पत्ता, मुसळी, फाईल बाईल, डोंगर देवाचं उघडं धन, हांड्यावर हांडा चढे, रातभर नाचा, सिपना वो माय, काजळाची धाक, टेंभरं पाडत, मांगला चंदा सारख्या कवितांनी आदिम जीवनाची गोंदण नक्षी आपल्या गालावर गोंदली आहे. सिपना नदी ही मेळघाटची लोकमाता... माय. सिपना मायच्या काठावर सागबन आणि साग म्हणजे सोनं. झाड झाडोर्‍यात दैवतांचे दर्शन घेणारा आदिवासी हा खरा निसर्गपूजक असल्यानं ह्या सोन्याला जपतो आणि सिपनाला पोटासाठी चांदीच्या मासोळ्या मागतो. श्रीकृष्ण राऊत त्या आदिम मनाचा आविष्कार मस्त हळूवार व्यक्त करताना म्हणतात-

सिपना वो माय,
तुझ्या लेकी साध्या भोळ्या
हाण्डोर भरून
देई चांदीच्या मासोळ्या!

आमच्या पोटाबरोबर तुला दुसर्‍याच्या पोटाचीही चिंता असेलच, पण-

सिपना वो माय
पाणी वाघाला दे पिऊ;
गरवार गाय
त्याला दिसू नको देऊ!

अशी आर्त विनवणी लेकीच्या मायाळूपणानं करतांना दिसतात. 
मेळघाटातील कोरकू जमात ही आर्यपूर्व काळातील प्राक्‌प्राचीन जीवन संदर्भ असेली जमात. शिसमच्या लाकडासारखा काळाभोर कोरकू माणूस नाचून नाचून रात जागवणारा नि होळीपुणेव पासून सांज भागविणारा असल्याने त्याची रया गेल्याचे श्रीकृष्ण राऊतांना जाणवते. तो कसा? - तर;

हातपाय काड्या
पोट संबूडेरा;
सटवीचा फेरा

चिपडात डोळे
पसापसा खोल
मान खाई झोल

बरगड्या छाती
पाठ-पोट-एक
असा ! आणि असा फटू काढ ! असाच तो त्यांच्या शब्दात आहे. तो असा असला तरी...

पोटात शिडू,
ओठात गाणं;
ढोलाच्या संगं
नाचते रान!

कारण डोंगर देवाचं उघडं धन ! निसर्गनिष्ठ जीवन जगता जगता तो ह्या विराट निसर्गाचाच एक घटक झाल्याने रानातील कंदफळे झाडपाल्यावरही तो गुजरान करतो आणि...

घरी रडे
दारी रडे
आभाळाचा डोळा;
वासाळ्याचे
कोंब केले
भाजीसाठी गोळा !

असा आला दिवस ढकलतो. श्रीकृष्ण राऊतांनी त्याचा यथातथ्य फटू आपल्या समर्थ शब्दांनी काढल्याचे ह्या संग्रहातील कविता वाचतांना जागोजागी जाणवते. डोंगर हाच देव, झाडं हीच दैवतं अन् अवती भोवतीचा निसर्ग हाच त्यांचा जीवनधर्म असल्याने त्याचे मोहक शब्दचित्र भूल पाडते.

डोंगर देवाचं उघडं धन;
नाल्याच्या काठानं मोहाचं बन

मोहाच्या फुलाची रानात दाटी;
वेचता वेचता भरली पाटी

मोहाच्या फुलांची वेचली रास
पाटीला लागला मोहाचा वास!

आदिवासींच्या जीवनात कल्पतरू ठरलेल्या मोहाचा मोह राऊतांना पडला नसता तरच नवल वाटले असते. मोहाने वेडावलेल्या ह्या कविता कधी निळसर गोंदण नक्षी अंगावर गोंदवतात तर कधी सिपनाच्या काठानं सागबनातून  झिम्मा खेळतांना निसर्गाचं लेणं केसात माळतात. कधी तेथल्या दैन्य दारिद्र्यानं होरपळतात, तर कधी रानकेळी सारख्या आनंद विभोर होऊन गिरक्या घेतांना दिसतात. निसर्गाची लय पकडून विलय पावणे ही प्रकृतीची आराधना... ती करतांना श्रीकृष्ण राऊतांची प्रतिभा लवलवतांना दिसते.

घुंगराच्या नादी
पाय घेती झोका
कमरेत झुका

हे लयदार झुकणे नि छिटूकल्यांच्या तालावर रातभर नाचणेच त्यांना जगण्याचे बळ देते.
ओघवती शब्दकळा नि आदिशैलीतील रानवा... गोडवा या कवितांना लाभल्याने त्यांच्या कवितांना चंदनउटीचा सुवास जाणवतो.

वेळूच्या मनात
वासरी बोलते
नवतीचं पान
वार्‍यावर हालते.

कराडीच्या आडी
नाल्यातली रेऊ;
रानच्या फुलाला
शेणबाज मऊ!

अशी ही चित्रशैली आदिवासींच्या जीवनशैलीशी मेळ साधून मेळघाटी बनते. खरा सुसंस्कृत असलेला आदिवासी 'मरमर कष्टकरी नवतीला उष्टं करी' गवती झोपडीत विसावतो. 'भाड्याचे घर अन् खाली कर' या जाणिवेनं धास्तावलेले आपण जांगडी. आदिवासींना मात्र प्रत्यक्षात-

वाघासाठी हवे घर
गाव तुझे खाली कर!

अशा सुलतानी आशा सुटताच विस्थापित होतांना अस्मानी परवडल्यासारखे वाटत असणार हे राऊतांची संवेदनशीलता जोखतांना जाणवते.

जीभ चाटते लपलप पाणी जळात छाया थरथरती
डोहामधल्या सात आसरा आडबनाला मंतरती !

या प्रमाणे त्यांची कविता कुस फेरतांना... ! अल्हद जागी होतांना चैतन्य उधळते.
मोहाचा वास, बोडका पहाड, सातबैनाची चोच, बांगडीबंद रात, घुंगरू बाजार अशा कितीतरी रान प्रतिमांनी ही कविता सजली. तशीच रानकेळी, मुंडा ठाणं, डोमकावळ्या सारख्या  डोंगरी प्रतीकांनी आशयाला सेंद्रिय रसायन पुरविण्यास धजली आहे. ह्या कविता नुस्त्या शोषितांचे रडगाणे नाहीत तर जीवनगाणे आहेत.
____________________________________________
जेष्ठ शु. 15 / वटपौर्णिमा शके 1927 मधुकर वाकोडे
(पर्यावरण व्रतारंभ)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा