तुको बादशहा - सांस्कृतिक वारसा जपणार्‍या कविता___डॉ.अशोक रा. इंगळे


संत तुकोबा हा बहुजन साहित्यसंस्कृतीमधला आद्य काव्यपुरुष होय. गत साडेतीनशे वर्षापासून या आद्य काव्यपुरुषाने समाज, साहित्य व संस्कृतीवर गडद प्रकाश टाकला आहे. या प्रकाशाने महाराष्ट्रातील मराठी साहित्य व संस्कृती खर्‍या अर्थाने समृद्ध झाली आहे. म्हणूनच संत तुकोबांवर अद्यापही विविधांगाने जीव ओवाळून टाकावा अशाप्रकारे वाङ्‌मयीन लेखन घडून येत आहे. त्यातून संत तुकोबा उलगडत गेले असले तरी पूर्णतः कुणाचेच समाधान होत नाही. या परिणामातूनच तुकोबांवर पुनःपुन्हा लेखन घडून येताना जाणवते. श्रीकृष्ण राऊत यांनीही काव्याभिव्यक्तीतून तुकोबाचे व्यक्तित्व उत्कटतेनं साकार केले आहे. 'तुको बादशहा' या काव्यसंग्रहामधून त्याची साक्ष आपल्याला पटल्याशिवाय राहत नाही.

तुकोबानंतर अभंग लिहायची परंपरा संपली नाही, पण सशक्त अभंगांची दुर्मिळता राहिली. जगण्यातली भाषा, जगण्यातले विषय आणि आयुष्यालाअसलेली नैसर्गिक लय यांचं संम्मीलन होऊन ताकदवान अभंग उभा राहतो. तो जगण्याचे तेवढेच ताकदवान धडे देतो. (तळपृष्ठ अभिप्राय) कवी श्रीकृष्ण राऊतांचा 'तुको बादशहा' हा काव्यसंग्रही वास्तव धडे देतो. शिवाय तुकोबांच्या जीवनाला सर्वांगांना समजून घेण्याचा दुहेरी नादमय आनंदही देतो;असे प्रस्तुत काव्यसंग्रह वाचल्यानंतर खात्रीने सांगता येते. तुकोबानंतर सशक्त अभंगाची दुर्मिळता संपुष्टात येत असताना अस्सल तुकोबाच्या कुळाचा वारसा सांगणारा समृद्ध अभंग राऊतांनी लिहून मराठीतील अभंग परंपरा पुनश्च दृढ केली. एवढे मात्र निश्चितच म्हणता येईल.

प्रस्तुत काव्यसंग्रहात कवी श्रीकृष्ण राऊत यांनी 100 अभंगरचनामधून काव्याकृती आविष्कारीत करुन तुकोबा सोबत उत्कट काव्यासंवाद साधला आहे. 'तुका बादशहा' या संग्रहातील श्रीकृष्ण राऊतांच्या अनेक कविता ह्या तुकोबांना उद्देशून आपला जीवनाविषयीचा आशय प्रकट करणार्‍या रचना ठरल्या आहेत. आणि काही अभंगरचना ह्या सदानंद मोरे म्हणतात त्याप्रमाणेतुकारामी बाण्याच्या आहेत. हे खरे असले तरी; कवी राऊतांचे काव्याभंग तुकोबांची जीवनदृष्टी, सामाजिक दृष्टी नि भाषादृष्टी प्रतीत करणारे आहेत. विशेषतः त्यातून तुकोबांची सामाजिक दृष्टी व जीवनव्यवहार हा प्रकर्षाने प्रकट होतो.

संत तुकोबांच्या कवितेची गणना समीक्षक प्राचीन कवितेमध्ये करीत असले; तरी तुकोबांची कविता आजही 'कॉमन मॅनला' मॅग्नेटसारखी खेचून घेते. त्याचे महत्त्वाचे कारण तुकोबांच्या कवितेत प्रसृत झालेली जीवनमूल्ये व काव्यमूल्ये होत. ही जीवनमूल्ये व काव्यमूल्ये समतामूलक दृष्टीने ओतप्रोत भरलेली आहेत. तुकोबांची काव्यमूल्ये ही सर्वसामान्य माणसाचा माथा उन्नत करणारी आहेत. समाजातील सर्वहारा शोषित, वंचित, पीडित माणसांची भक्कम बाजू घेणारी तुकोबांची कविता सर्वहारा माणसाचे उन्नयन व्हावे; यासाठी धडपडते. कदाचित या सर्व कारणांमुळेच श्रीकृष्णराऊतांना कवी तुकोबा आपल्या काव्यकूळ परंपरेचा वाटतो. त्यामुळेच कवी राऊत स्वतःला तुकोबांच्या  काव्य परंपरेतील कवी म्हणून गौरवांकित करतात.

तुकोबांच्या कवितेचे बोट धरुन चालणारा हा कवी म्हणूनच संत तुकोबांवर भरभरुन लिहितो. तुकोबाचा जीवनाशय आपल्या कवितेतून उत्कटतेनं साकार करतो. तुकोबाला काव्याभिव्यक्तीतून उभे करताना पुन्हा श्रीकृष्ण राऊत तुकोबांनी निर्माण केलेल्या अभंगरचना या फॉर्मचाच आधार घेतात. आणि त्यातून तुकोबांच्या जीवनाची अस्सलता प्रकट करतात हे मला फार वैशिष्ट्यपूर्ण वाटते. कवी श्रीकृष्ण राऊतांचे नाते साक्षात वारकरी धर्म व काव्यपरंपरेत कळस ठरलेल्या कवी तुकोबांशी असल्याचे कवी स्वतः नमूद करताना लिहितात -

मुखातून माझ्या / बोले तुकाराम

तोच आत्माराम / अभंगाचा ........ (तुको बादशहा, पृ.20)

शिवाय राऊतांच्या काव्यलेखणीलाऊर्जा नि प्रेरणाबळ देण्याचे सामर्थ्यही तुकोबांच्या काव्यउर्जेमध्ये आहे. कवीने तुकोबाला 'बादशहा' हे अन्वर्थक संबोधन योजून या महाकवीचा यथोचित सन्मानच केलेला आहे. यापूर्वी तुकोबांचा असा सन्मान कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे व विद्गोही कवी नामदेव ढसाळांनी केला हे कवितेच्या जाणकारांना ज्ञात असेलच ! 'बादशहा' म्हणजे कवितेच्या क्षेत्रातील 'सर्वोच्च अधिकारी पुरुष' होय. मराठी काव्याच्या परंपरेत तुकोबांची कविता 'बादशहाची अर्थात राजाची' भूमिका पार पाडणारीच आहे; असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कवी श्रीकृष्ण राऊत आपल्या पहिल्या अभंगरचनेत तुकोबाचा असा सन्मान करतात -

तुको बादशहा / देई शब्ददान

करी धनवान / लेखणीला ........ (तुको बादशहा, पृ.19)

मराठी काव्यपरंपरेत भाषेची मोडतोड करणारा, शब्द वाकवून अर्थाला प्रसृत करणारा महाकवी म्हणजे संत तुकोबा होत.तुकोबांच्या कवितेची काव्यभाषा श्लील-अश्लीलतेच्या पलीकडे जावून माणसाच्या मूलभूत वेदनेचा विचार प्रकट करते. भाषेच्या माध्यमातून माणसाला न्याय मिळावा यासाठी ती सतत झगडते. माणसाच्या सन्मानासाठी झगडणारी ही कविता म्हणून भाषेची परंपरागत कवाडं मोडून नवी सृजन भाषा साकारते; आणि माणसाला 'मानवी मूल्ये' प्राप्त व्हावीत यासाठी भाषेचा सृजन वापर करताना दिसते. कवी लिहितात -

श्लील-अश्लीलाचा / करी तू निवाडा

भाषेच्या कवाडा / उघडोनी...... (तुको बादशहा, पृ.19)

कवी श्रीकृष्ण राऊतांनी तुकोबांसाठी आणखी एक नवे संबोधन योजून तुकोबांच्या काव्याकडे पाहण्याची आपली दृष्टीच सर्वार्थाने बदलून टाकली आहे.

कवितेचा देव / तूच एक तुक्या

बाकी सार्‍या नख्ख्या / कापसात..... (तुको बादशहा, पृ.21)

प्रस्तुत कवितेतील 'देव' या संबोधनाचे नाते 'देव' या संकल्पनेशी नाही;तर देव म्हणजे सर्वोत्तम आदर्श. पाली भाषेत 'देव' या शब्दाचा अर्थ उत्तमातला उत्तम सर्वोत्तम माणूस होतो. इथेही श्रीकृष्ण राऊतांना तोच अर्थ अभिप्रेत असावा. त्याअर्थाने तुकोबा मराठी काव्यपरंपरेत कवितेच्या केंद्गस्थानी 'सर्वोत्तम' आदर्श आहेत. हे कुणीही नाकारणार नाही एवढी जीवनानुभवातून स्फूरलेली अस्सल कविता तुकोबांनी निर्माण केलेली आहे. म्हणून कवी राऊतांना संत तुकोबा 'कवितेचा देव' वाटणे स्वाभाविक ठरते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी भाषेत 'संत तुकाराम' सोडले तर बाकी वाचण्यासारखे फार थोडे वाङ्‌मय असल्याचे म्हटले आहे. ते तुकोबांच्या काव्य व भाषा सामर्थ्यामुळे होय. कवी श्रीकृष्ण राऊतांना म्हणूनच तुकोबा आपल्या सदैव अवतीभोवती वावरत असल्याचा प्रत्यय येतो.

तुकाराम श्वास / तुकाराम ध्यास

सदा आसपास / तुकाराम ....... (तुको बादशहा, पृ.22)

आपल्याअवतीभोवती वावरणारा तुकोबा कवीला जीवलग प्राणसखा मित्र वाटतो. म्हणूनच कवी आपल्या कवी मित्राजवळ दिलखुलास व्यक्त होताना लिहितो -

असे जीवलग / माझा प्राणसखा

मैतर तो तुका / एकमेव ....... (तुको बादशहा, पृ.24)

प्रस्तुत अभंग रचनेतील 'एकमेव' हा शब्द काव्यप्रेरणा सूचित करणारा आहे. समतामूलक जीवनमूल्ये कवितेतून अधोरखित करणारे तुकोबा म्हणूनच कवीला आपले प्रेरणास्त्रोत वाटतात. याचा प्रत्यय पुढील अभंगरचनेतूनही येतो.

तुझी नाममुद्गा / ठेव तिच्यावर

तेव्हा ताळ्यावर / येईल ती  ........  (तुको बादशहा, पृ.25)

स्वतःला ब्रह्मज्ञानी व शास्त्राभ्यासात पंडित समजणार्‍या लोकांचे पितळ उघडे पाडणारी अभंगरचनाही प्रस्तुत काव्यसंग्रहात प्रत्ययाला येते.

ब्रह्मानंदी टाळी / लावी ज्ञानदेव

काय आम्हा भेव / काळाचे ते ? ......... (तुको बादशहा, पृ.26)

तुकोबांची भक्ती करण्यासाठीकुठल्याही ब्रह्मज्ञानाची गरज नाही. कुठल्याही ज्ञानाशिवाय भक्ती करण्याचा मूलमंत्र पांडूरंगाने दिल्यामुळे चोखोबा, गोरोबासारखे अनेक संत विठ्ठलाची निस्सिम भक्ती करु लागले. त्यामुळे काळाची भीती आम्हा उरली नाही असे ठामपणे तुकोबा सांगतात व परंपरेलाही छेद देतात.

कवी श्रीकृष्ण राऊतांनी प्रस्तुत काव्यसंग्रहातून साकारलेले तुकोबा केवळ पारंपरिक पद्धतीचे नाहीत; तर विज्ञाननिष्ठ व धर्माची चिकित्सा करणारे तुकोबाही त्यांच्या जीवनमूल्यांसह आविष्कृत केलेले आहेत. म्हणून व्यवस्थेला प्रश्न विचारणारी तुकोबाची विद्गोही मुद्गाही राऊत तेवढ्याच उत्कटतेनं रेखांकित करतांना अशी अभंगरचना साकारतात -

तुझ्या विमानात / नाही काय जागा ?

सांग पांडूरंगा / जिजाईला

भंडारा डोंगरी / पोचवी शिदोरी

पतीसेवा करी / नित्यनेमे ....... (तुको बादशहा, पृ.28)

तुकोबा देहूजवळच्या भंडारा वभागनाथ डोंगरावरील बौद्ध लेण्यात जाऊन नित्यनेमाने ध्यान करीत असत, हे चोखंदळ वाचकांना माहीत आहे. तुकोबा जिथे ध्यान करीत तिथे त्यांच्या पत्नी जिजाबाई त्यांचे जेवण घेऊन जात असत. पतीसेवा करीत असत. अशी निष्ठेने पतीसेवा करणार्‍या जिजाईला विमानात जागा का नसावी ? असा प्रश्न उपस्थित करणारे कवी विद्गोहीच ठरतात. तुकोबांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाची चाड होती. सर्वांसोबत समता व बंधुभावनेने वागले पाहिजे असा केवळ उपदेश तुकोबांनी केला नाही तर प्रत्यक्ष तशी कृतीही केली.

रोहिदासे मज / पाजिले उदक

समतेची भूक / भागवली

कबिराने असा / पांघरला शेला

बाटवले मला / धर्मातीत. ........ (तुको बादशहा, पृ. 30)

प्रस्तुत अभंगरचनेतून संत तुकोबाचा सामाजिक समतेचा मूल्यविचार व्यक्त होतो; त्यातून त्यांची समाजउन्नयनाची भूमिका प्रकट होताना दिसते. तुकोबाकेवळ धर्मसुधारक नव्हते; तर समाज सुधारकांचा पक्ष तुकोबांनी स्वीकारलेला होता याची साक्ष अनेक अभंगरचनांमधून आपणास प्रत्ययास येते.

प्रस्तुत अभंगरचनेची भाषा ही साक्षात तुकोबांच्या काव्यपरंपरेला शोभेल अशीच योजली आहे. तुकोबांचे व्यक्तित्व आणि कवित्त्व रेखाटत असताना कवी राऊतांच्या काव्यभाषेत अनेक अस्सल दुर्मिळ ग्रामीण बोलीतील शब्द योजलेले असल्यामुळे तुकोबाचा काव्यविचार थेट अभंगरचनांमधून काळजाला भिडतो. उदा. नख्ख्या, झिकझिक, गाठीलागी, झंझट, रडकुंडी, घरावर गोटे, धुंडी, लोंदे, बिगीबिगी, भिरुड, कऊले, कुसळ, झिरपो, वेणीफणी, झुरू, लटपटी, हाडूक, उकीर, केबल, स्क्रिन, हॉकीस्टीक, स्ट्राइकर, कॅरम, ब्लॅकमेल यासारखे अनेक मराठी-इंग्रजी शब्द बोलीभाषेतून थेट तुकोबाच्या संवादासाठी उपयोजिल्यामुळे कवी राऊतांच्या अभंगरचनांना वेगळाच बाज निर्माण झालेला आहे.तर व्यथांची झुबरं, श्वासांचे इंधन, दुःखाचे चुंबन या सारख्या प्रतिमा लक्षणीय म्हणतात येतील. शब्दांचे अक्षरकुंड राऊतांच्या प्रज्ञाप्रतिभेत सामावलेले असल्याने ते शक्य झाले आहे. त्यादृष्टीने कवी राऊत शब्दप्रभू ठरतात.

कवी श्रीकृष्ण राऊतांच्या कवित्त्वाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे तंत्रदृष्टीने अवघड असलेला गझल' हा काव्यप्रकार अत्यंत समर्थपणे त्यांनी हाताळला आहे. किंबहुना सुरेश भटानंतरची नवे वळण देणारी पण तितकीच तंत्रशुद्ध अस्सल मराठी गझल राऊतांनी मराठी कवितेला देऊन; गझल हा काव्यप्रकारच खर्‍या अर्थाने समृद्ध केला आहे. गझलेनंतर त्यांनी अत्यंत कुशलतेने मुक्तछंदातील अप्रतिम काव्य लिहून महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे केंद्गीत केलेले आहे. आणि त्यानंतर मुक्तक व आता 'तुको बादशहा' या काव्यसंग्रहातून तुकोबांच्या वळणाचा सशक्त अभंग लिहून तुकोबानंतरची अभंगपरंपरा अधिक दृढकेली आहे. या काव्यरचनेत चार ओळीचा, दोन ओळींचा अभंग प्रत्ययाला येतो. त्यातून आकाराला आलेले तुकोबाचे काव्याभिव्यक्तीत्त्व मनोज्ञ ठरते.

'तुको बादशहा' हा अक्षरमानव प्रकाशन पुणे द्वारा जुलै 2015 मध्ये प्रसिद्ध झालेला श्रीकृष्ण राऊत यांचा चवथा कवितासंग्रह होय. यापूर्वी गुलाल आणि इतर गझला (दु.आ.2003), 'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्‍या तान्ह्या मुला (2001), 'चार ओळी तुझ्यासाठी (2003)' हे काव्यसंग्रह वाङ्‌मयीनदृष्ट्या महाराष्ट्रात दखलपात्र ठरले आहेत. श्रीकृष्ण राऊत यांचा मूळ पिंड गझल लेखनाचा असला; तरी त्यांनी मुक्तछंदातील काव्याविष्कारासोबत 'अभंग' फॉर्ममधूनही उत्कटतेनं 'तुको बादशहा' चे काव्य लेखन केलेले आहे.

एकूणच 'तुको बादशहा' हा कवितासंग्रह संत तुकारामाच्या व्यक्तिमत्त्व आणि काव्याला यथोचित दृष्टीने आविष्कृत करण्यात बर्‍याच प्रमाणात यशस्वी ठरला आहे. तुकोबाची आणखीही तटस्थ मांडणी अभंगरचनेतून करता आली असती; परंतु राऊतांनी समतोल दृष्टी साधत तुकोबाची व्यक्तिरेखा रेखाटली आहे. ही व्यक्तिरेखा आविष्कृत करीत असताना राऊतांनी तुकोभक्ताप्रमाणे न साकारता. एका अनुयायाला रुचेल अशापद्धतीने रेखांकित केली आहे. हे राऊतांचे वेगळेपण इथे लक्षात घेण्याजोगे आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ.सदानंद मोरे यांची प्रस्तावना आणि विख्यात चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे मुखपृष्ठ व रेखाचित्रे संग्रहाचे मूल्य वृद्धिंगत करणारी आहेत.प्रत्येकाने वाचावा असा हा तुकोबाच्या विचारांचा मौलिक ठेवा असून; राऊतांचे  अनुभव, आशय व भावविश्व यांची नाळ संतपरंपरेशी अधिक घट्ट करणारी ठरते. त्यादृष्टीने प्रस्तुत संग्रहाला सांस्कृतिक व वैचारिक मूल्य प्राप्त झाले आहे. थोडक्यात 'तुको बादशहा' हा कवितासंग्रह म्हणजे एक वाङ्‌मयीन सांस्कृतिक ठेवाच होय.
_________________________________________________________
डॉ.अशोक रा. इंगळे
सहयोगी प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख,
डॉ.एच.एन.सिन्हा महाविद्यालय,
पातूर,जि.अकोला. मो.: 9421747417
( 'सर्वधारा' जा.फे.मा. २o१७ /दशवर्षपूर्ती विशेषांक/नव्वदोत्तर मराठी कविता )
_________________________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा