साहित्य व्रती श्रीकृष्ण राऊत : अमोल शिरसाट

स्व सूर्यकांतादेवी पोटे चॅरीटेबल ट्रस्ट, अमरावती तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्यव्रती पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण राऊत यांना नुकताच प्राप्त झाला आहे. खरं म्हणजे राऊतांना मिळालेला हा पहिला पुरस्कार नाही. 1978 पासून गझल कविता लेखन करणाऱ्या राऊतांना त्यांच्या साहित्य प्रवासात अनेक सन्मान पुरस्कार मिळाले आहेत. ही अकोलेकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण वैदर्भीयांसाठी अभिमानाची बाब आहे. मागील 42 वर्षांच्या साहित्य प्रवासात त्यांनी साहित्य क्षेत्रात विशेष करून मराठी गझलेत ध्रुवता-यासारखे अढळपद निर्माण केले आहे. १९८९ मध्ये प्रकाशित झालेला 'गुलाल' हा त्यांचा पहिला गझल संग्रह म्हणजे मराठी गझलेतील मैलाचा दगड आहे. 2003 साली गुलालची दुसरी आवृत्ती नवीन गझलांसह 'गुलाल आणि इतर गझला' या नावाने प्रकाशित झाली. आता याच संग्रहाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. मौलिक मराठी गझल लेखनासाठी बांधण जनप्रतिष्ठान मुंबईचा जीवन गौरव पुरस्कार, यु आर एल फाउंडेशनचा गझल गौरव पुरस्कार यासह अनेक पुरस्कार त्यांना गझल लेखनासाठी प्राप्त झाले आहे. श्रीकृष्ण राऊत यांच्या 'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला' असे प्रदीर्घ नाव धारण केलेल्या गाजलेल्या कवितासंग्रहाला वि.सा.संघाचा शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृति पुरस्कार, म.सा.प‌.चा कवी यशवंत पुरस्कार, भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, संजीवनी खोजे स्मृति पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार,  तुका म्हणे पुरस्कार इत्यादी प्राप्त झाले आहेत‌. 2018 साली या संग्रहाची दुसरी आवृत्ती देखील प्रकाशित झाली आहे. या बरोबरच 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते' हा त्यांचा दुसरा मराठी गझल संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे‌. 'तुको बादशहा' या अभंग संग्रहाला वर्ध्याच्या दाते संस्थेचा संत भगवान बाबा काव्य पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. त्यांच्या कवितांचा समावेश अमरावती व नागपूर विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये देखील झाला आहे. राघू मैना (1982) तू तिथे असावे (2018) या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. सोबतच आशा भोसले, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर, भीमराव पांचाळे इत्यादी नामवंत गायकांनी त्यांच्या कविता गझला गायल्या आहेत. डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावरील चित्रपटा करिता राऊतांनी पटकथा-संवाद गीतलेखन सुद्धा केले आहे.

       श्रीकृष्ण राऊत यांनी जीवनातील अनेक संघर्षांना तोंड दिले परंतु ते केवळ आपल्या वेदना कुरवाळत बसले नाहीत. जनसामान्यांच्या वेदना मांडत अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याचे काम त्यांनी साहित्याच्या माध्यमातून आजपर्यंत केले आहे. त्यांच्या कविता गझलेतल्या अनेक ओळी सुभाषितांसारख्या वापरल्या जाव्यात अशा आहेत. सहजता आणि प्रवाहीपणा हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. लिहिणाऱ्याने कविता लिहिल्यानंतर ती वाचणाऱ्याच्या- ऐकणाऱ्याच्या काळजापर्यंत थेट पोचणे आवश्यक असते. वाचणाऱ्याला ती आपलीशी वाटून जणूकाही कवीने आपलीच सुखदुःखे मांडली आहेत असे जेव्हा वाटते तेव्हा ती कविता केवळ कवीची राहत नाही तर जनसामान्यांची होऊन जाते. हे प्रामुख्याने राऊतांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल. श्रीकृष्ण राऊत यांना 'साहित्यव्रती' पुरस्कार प्राप्त होणे ही केवळ त्यांच्यासाठी गौरवाची बाब नसून संपूर्ण वैदर्भीयांसाठी गौरवाची बाब आहे. जनसामान्यांच्या वेदना मांडणारी त्यांची लेखणी सदैव तळपत राहो व त्यांना उदंड आयुष्य लाभो.

 त्यांच्याच शब्दात -

कारुण्य माणसाला संतत्व दान देते
आपापल्या परिनी हृदयात वाढवावे

अमोल बी शिरसाट
वाशिम रोड, अकोला.
९०४९०११२३४
अमोल शिरसाट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा