'मेळघाटच्या कविता' हा डाॅ.श्रीकृष्ण राऊत ह्यांचा कवितासंग्रह.ह्या कवितासंग्रहाच्या शीर्षकावरूनच ह्या कविता मेळघाटातील दुर्गम, दुर्लक्षित भागाचे चित्रण अधोरेखित करणाऱ्या तसेच ह्या भागात वास्तव्य करणाऱ्या कोरकू आदिवासींच्या जीवनावर,तेथील पारंपरिक लोकसंस्कृतीवर ,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोरकूंच्या वाट्यास येणाऱ्या समस्यांवर असाव्यात ह्याचा अंदाज येतो .मात्र त्यासोबतच,एका ख्यातकीर्त गझलकाराला, नामवंत गीतकाराला, काव्याचे विविध प्रकार लीलया हाताळणाऱ्या प्रतिभावंताला मेळघाटातील कविता का लिहाव्या वाटल्या असतील?हा प्रश्न पडतो.तसेच स्वतः आदिवासी नसतांना आदिवासींच्या भावभावनांशी तादात्म पावण्याची कसोटी डॉ.श्रीकृष्ण राऊतांसारख्या कलासक्त व्यक्तीने कशी पेलली असेल ही पण उत्सुकता होतीच आणि ह्या उत्सुकतेपोटीच ज्ञानगंगा अभयारण्यातून जातांना 'मेळघाटातील कविता' हा संग्रह अधाशासारखा वाचून काढला. खरंच आपली जेष्ठ मंडळी म्हणजे अनुभवांची समृद्ध रानं असतात आणि मला आवडते त्यांच्या भावविश्वात मनसोक्त भटकायला.खूप काही शिकायला मिळतं.मेळघाटातील कविता वाचतांना आपण एका वेगळ्या भावविश्वात प्रवेश करतो.सोबतच ह्या कवितांवरील भाष्य वाचून संपूर्ण रसग्रहणाचा आनंद रसिकांना लाभतो.
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात मेळघाट,चिखलदरा,धारणी ह्या भागात कोरकू ही आदिवासी जमात वास्तव्य करून आहे.त्यांच्या भाषेला विशिष्ट अशी लिपी नाही. निसर्गाशी एकरूप होत,निसर्गाचे नियम पाळत ते समाधानाने जगतात.ह्या कोरकू आदिवासींच्या पाड्यावर राहून त्यांच्या पारंपरिक मौखिक गीतांचा अभ्यास करून आदिवासींच्या जीवनसंघर्षावर डॉ.श्रीकृष्ण राऊत ह्यांनी कविता लिहिल्या आहेत. एका संवेदनशील मनाने कोरकूंच्या जगातील कोणते वास्तव आपल्या शब्दांत उतरवले आहे आणि ते उतरवतांना त्यांच्या कल्पना शक्तीने व प्रतिभेने काय करामत साधली आहे हे बघणे खरोखर आनंददायी आहे.
'जंगलच्या पाखराचं उदासलं मन' अशा आपल्या काव्यमय मनोगतात आदिवासी स्रियांनी वापरलेली 'डुंडा ओळा पिपल साई'म्हणजेच फांद्या छाटलेली, थोटी वडापिंपळाची झाडे. ही सुंदर प्रतिमा ऐकून कवी स्तिमित होतो, अंतर्मुख होतो आणि खरोखरच ह्या लोकांचे जीवन हे असेच झाले आहे ह्याची जाणीव होऊन अस्वस्थ मनाने कोरकूंच्या विविध समस्यांना काव्यरूप देतो.
ह्या काव्यसंग्रहात निसर्गाशी संवाद साधणारी कोरकू स्री येते तसेच निर्मल मनाचा,सागासारखा सरळ असणारा पण विषम व्यवस्थेत खाक होणारा,
संकटसमयी निसर्गाचा धावा बोलणारा भाबडा आदिवासी समुह येतो आणि त्यांच्या भोवतालचे निसर्ग चित्रण व नियती पण येते.
पाऊस म्हणजे जीवन.म्हणूनच त्याला दात्याचं रूप देऊन आदिवासी बांधव त्याची करुणा भाकतांना म्हणतात की,
"वरुणा!वरुणा!!
तुझ्या डोळ्यांतून
झरू दे करुणा!
किती सुंदर कल्पना आणि लय आहे ह्या कवितेची! स्वतः पुरतेच नाही गाईला चारा,मुंगीला साखर मिळू दे आणि 'मुळांचा आनंद शेंड्यात नाचू दे ! ' अशी समस्त चराचराच्या सुखाची मंगलकामना ह्या कवितेतून व्यक्त झाली आहे.आणखी एक अशीच भावना व्यक्त करणारी कविता आहे,'अरे पावसाच्या देवा'
"अरे पावसाच्या देवा,
असा रुसू नको बापा,
धरतीच्या पोटातून
पहा निघतात वाफा!
अरे पावसाच्या देवा
नको पोटावर मारू
लेकराला-वासराला
सांग आता काय चारू? '
फक्त लेकराची नाही तर गाईच्या वासराची पण चिंता इथे दिसते.
नदीला माय संबोधून तिच्याकडे सुद्धा हे भोळे भाबडे जीव मागणं मागतात,
'सिपना वो माय,
तुझ्या लेकी साध्या भोळ्या,
हाण्डोर भरून
देई चांदीच्या मासोळ्या. '
इथेही विशेषतः अशी आहे की हे लोक निसर्गाकडे केवळ स्वतः पुरतं कधीच मागत नाही तर सगळ्यांना सगळं मिळावं ही त्यांची भावना असते.स्री मनाचा अत्यंत हळवा आणि संवेदनशील कोपरा पुढील कडव्यातून कवीने कसा उघड केला आहे बघा,
'सिपना ओ माय,
पाणी वाघाला दे पिऊ,
गरवार गाय
त्याला दिसू नको देऊ '
वाघाला पाणी तर मिळावे पण गरवार गाय त्याला दिसू नये ही केवढी उदात्त ,स्त्रीसुलभ भावना इथे व्यक्त झाली आहे.
'सिपना वो माय'ह्या कवितेतील हे शेवटचे कडवे वाचून आपसूकच मुखातून वा!निघाल्याशिवाय राहत नाही.
निसर्गाशी संवाद साधताना ह्या स्त्रिया झाडाझुडूपांशी सुद्धा संवाद साधतात,मग ते महूचे झाड असो की बोराटीचे झुडूप.आपल्या एकुलत्या एक लुगड्याचा पदर बोराटीच्या काट्यांत अडकून फाटला म्हणून ही स्री त्या बोराटीच्या काट्याला दुषणं देतांना म्हणते,
'बोरं वेचायला आली,
आली सभागत,
केळपानावानी झाली
पदराची गत.
गाठी बांधू बांधू झालं,
मासोळीचं जाळं
त्यात तूही दुसमाना
केलं तोंड काळं. '
ठिकठिकाणी गाठी बांधलेल्या पदराला मासोळीचं जाळं आणि फाटलेल्या पदराला केळपानाची अत्यंत अचूक उपमा इथे वापरली आली.
आदिवासींना कित्येकदा जंगली श्वापदांच्या हल्ल्यांना बळी पडावे लागते.त्याचे वर्णन ह्या कवितेत येणे अत्यंत स्वाभाविक आहे.'काजळाची झाक'हे समर्पक शीर्षक असणाऱ्या कवितेत ते कसं आलंय बघा,
'काजळाची हाक
पडसावल्यांत,
झुंजुमुंजु रात.
फुलं वेचण्याचा
मोह नादाला,
जीव धुंदावला.
अंधाराला जणू
फुटे हातपाय
अस्वल वो माय! '
मोह फुले वेचायला गेलेल्या स्त्रीला अचानक काळाकभिन्न अस्वल दिसतो तेव्हा ते जणू काही अंधारालाच हातपाय फुटल्यासारखे तिला वाटते आणि हिवाळ्याच्या दिवसांत ही दरदरून घाम फुटून नुसत्या रानभर बोंबा ठोकण्याशिवाय पर्याय नसतो.कारण त्यावेळी हाती टेंभाही नसतो किंवा आग पेटवण्यासाठी चकमक ही नसते.असा अनेकदा अस्वलाशी सामना करावा लागतो आणि मग तो प्रसंग त्यांच्या काव्यातून ही उमटतो.
'डोंगरं देवाचं उघडं धन
नदीच्या काठानं मोहाचं बन.
मोहाच्या फुलांचा पडला सडा
फुलांच्या मिसानं अस्वल खडा. '
जंगली श्वापदे असो की माणसातील पशू असो आदिवासी स्त्रियांना त्यांचे भक्ष्य बनावे लागते.
त्यामुळे सतत धास्तावलेली कष्टकरी स्री कवितेतून दिसते.
'चुंबळीत विळा
झप्प झप्प पुढे
वारं मागं पडे
वैशाखाचं ऊन
डोईवर मोळी
भिजते काचोळी. '
आदिवासींच्या विकासासाठी केलेल्या विविध योजना सुद्धा त्यांचे शोषणच करतात.मग ते रोजगार हमी योजना असो की अंगणवाडी. आश्रमशाळेतूनही मुलींवर अत्याचारच होतात,
'शिपायांच्या घरी
देतो तुला जागा
रात्रभर हाडं
तिथं टाक फुला '
शिक्षणासारख्या क्षेत्रातही सतत होणारे शोषणच त्यांच्या वाट्याला येते.छोट्या छोट्या गरजांसाठी मुलींना विषयवासनेची शिकार व्हावे लागते हे अत्यंत विदारक कटू सत्य 'पाढे वाच पाढे' ह्या कवितेतून उघड झाले आहे. जंगली प्राण्यांची शिकार करणे गुन्हा असला तरी शहरी पाहुणे कोरकूंना शिकार करण्यास भाग पाडतात हे सत्यही 'मोठ्याच्या घरी' ह्या कवितेतून पुढे येते.
'मोठ्याच्या घरी
पाहुणे आले,
दौडले रानी
बंदुक-भाले.
विदेशी झिंग
गप्पांना ऊत
गुदस्ता होतं
हरीण मस्त.'
आदिवासींचे शोषण असे निरनिराळ्या पातळ्यांवर आणि अनेकविध तऱ्हेने होत असते.अनेकदा जंगलाला आग लावली जाते.आणि त्यात अधिकारी, व्यापारी, राजकीय नेतेमंडळींची आपापली पोळी भाजून घेतात.आदिवासी मात्र आपल्या डोळ्यासमोर आपले जळणारे जंगल बघत राहतो.सागासारखं सरळ साधं मन असलेल्या आदिवासींंना आपल्याच जंगलात उपरं व्हावं लागतं,वनउपज वापरण्याची ही मनाई करून कोंडवाडा त्यांच्या नशिबी येतो.मेळघाटात व्याघ्र प्रकल्प जाहीर झाला मात्र त्यासाठी मेळघाटातील कोरकूंवर निर्वासित होण्याची पाळी आली.त्यांचे हाल झाले.ते ' वाघांसाठी घर हवे' ह्या कवितेतून उपहासात्मक शैलीने कवीने मांडले आहे.
'वाघांसाठी हवे घर
गाव तुझे खाली कर.
पोट बांध पाठीवर
शहराची वाट धर'
जंगली प्राण्यांची सोय करायची,मात्र माणसासारखे माणुस असणाऱ्या कोरकूंना मात्र बेघर करायचं ह्या सरकारी धोरणाने कवीच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
सतत कष्ट करणारे हे हात पाणवठ्यावर सुखादु:खाच्या गोष्टी बोलतात.किंवा मग रात्रभर नाचून ताण सैल करतात.अतिवृष्टीत रानकंद लाऊ लाऊ खाणारे,उन्हात शिजत,पाण्यात भिजत, अंगावर दु:ख काढणारे,जादूटोणा,
भानामती,भुताखेतांवर विश्वास असणारे ,नवस सायास करणारे आदिवासी ह्या कविता संग्रहात आपल्याला दिसतात.आजचा दिवस आजच खाऊन पिऊन,नाचून गाऊन साजरा करण्याची त्यांची वृत्ती वाटते.
'मांगला चंदा
जमल्या नोटा
खरेदी केला
बकरा मोठा.
देवीची पूजा
भूमिका करी
कापली मान
भिजली सुरी.
लाल रगत
ओंजळी धरा
कालादेवाला
अर्पण करा.
अशा काही प्रथांचीही ओळख ह्या संग्रहातून होते.मग ते लेकरांच्या पोटाला डाग देणे असो किंवा त्यांची विवाहपद्धती असो. देजसाठी-हुंड्यापोटी वधूच्या घरी राबणारा घर जावई - लामझ्यान्याही आपल्याला इथे भेटतो,
'लामझ्यानाsss
लामझ्याना
देजसाठी साल भरी लामझ्याना.
लांडोरीच्या घरी नांदे
मोर पायी दोरी बांधे
घरी नांदे,दोरी बांधे लामझ्याना.
सालाबादाप्रमाणे येणाऱ्या चैत्रपुनवेला गोडधोड खाऊन ,रात्रभर नाचत गात जीवन आनंदी करणारा आदिवासी आपल्याला दिसतो. तसेच ह्या प्रसंगी अर्ध्यावर जीवनसाथी सोडून गेल्यामुळे दुःख पिणारी,शिडूच्या -मोहाच्या दारूच्या नशेत स्वतः ला बुडवून टाकणारी आदिवासी स्री सुद्धा आपल्याला भेटते.
'जोड फोडला,
संग तोडला,
भर जत्रीमंधी देवा,
हात सोडला.
उर पिटते,
दाह साहते
डोळ्यांतून सिपनाचं
पाणी वाहते. '
कोरकू स्त्रियांच्या संवेदनशील मनाचे चित्रण ह्या कवितांतून साकार झाले आहे.
नैसर्गिक प्रणयभावना सहजपणे घेणारे आदिवासी आणि त्यांचा शृंगार अत्यंत तरलपणे,सुचकपणे अनेक कवितांमधून पुढे येतो आणि वाचकांना काव्यानंद देऊन जातो.
'बान्यानं चाखावं
सातपुडी मध
डोळ्यांनी तशीच
डोळ्यांची पारध
वृक्षाच्या खोप्यात
फडफडे पक्षी
खड्यांनी गोंदली
पाठीवर नक्षी. '
किंवा मग
'चित्याची झडप
मोरपीस वाटे
हरणीच्या अंगी
सायळीचे काळे. '
प्रणयक्रीडेत पाठीवर रूतलेल्या खड्यांना गोंदणाची नक्षी आणि अंगावरील रोमांचांना सायळीचे काटे म्हणणे म्हणजे केवळ अप्रतिम प्रतिमायोजन आहे.
'बांगडी बंद,
मुकाट रात,
कुजबुज अंधारात '
अशा सूचक,संयत,मोजक्या शब्दात रंगलेल्या उत्कट शृंगारिक कविताही ह्या कवितासंग्रहाची जमेची बाजू आहेत.
कवितेची भाषा अत्यंत लयबद्ध ,बोलीभाषेच्या जवळची असल्याने अन्याय, अत्याचार,शोषणाचे चित्रणही आक्रस्ताळे आणि रटाळ होत नाही हे विशेष.बहुतांशी स्रीमनाचे हुंकार असल्याने आपसुकच गेयता आणि कमालीची संवेदनशीलता घेऊन ही कविता अवतरली आहे.डाॅ.मधुकर वाकोडे ह्यांची समर्पक प्रस्तावना ह्या संग्रहाला लाभली आहे. तसेच डॉ.किशोर सानप ह्यांनी ह्या कवितांवर दीर्घ, अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे.ते म्हणतात, 'मेळघाटच्या कविता' ह्या संग्रहातील कविता आजच्या समकालीन मराठी काव्यक्षेत्रात प्रतिभेच्या तिसऱ्या डोळ्याचे सृजनसामर्थ्य आहे.नवे कोरे अनुभवविश्व आणि नाविन्यसिद्ध प्रतिमा सृष्टीच्या अभिव्यक्ती मुळे ह्या कविता मराठी काव्यलिखाणाला पुन्हा मराठी कवितेच्या वैभवाकडे खेचणाऱ्या सिद्ध होतील . आजच्या समकालीन कवितेला लोकाश्रय नाही.ह्या कवितांमुळे मराठी समकालीन कवितांना लोकाश्रय मिळेल .'
रसिक वाचकही हा संग्रह वाचतांना त्यांच्या मताशी सहमत होतो व तशीच अपेक्षा करतो.
'मेळघाटच्या कविता ' ह्या संग्रहाचे जयंत गायकवाड यांनी काढलेले अत्यंत सूचक असे मुखपृष्ठ आणि श्रीधर अंभोरे ह्यांनी रेखाटलेली सुरेख रेखाचित्रे
संग्रहाच्या सौंदर्य खुलवतात.
संग्रहाच्या शेवटी शब्दार्थ सूची जोडल्यामुळे बोलीभाषेतील शब्दांचा उलगडा सहजपणे होतो.
ज्यांच्या मानवी संवेदना अजून जागृत आहे आणि ज्यांना एक उपेक्षित जग जाणून घ्यायचे आहे, आदिवासी स्री संवेदना समजून घ्यायच्या आहेत त्यांनी,कोरकूंच्या भाषेतील शब्दज्ञान वाढवायचे आहे,छंदोबद्ध कवितेचा अभ्यास करायचा आहे किंवा छंदोबद्ध कविता वाचायला आवडतात त्यांनी तसेच भाषाशैली व सौंदर्यशास्राचा अभ्यास करायचा आहे त्यांनी व एक आशयघन, सुंदर कवितानुभव घ्यायचा आहे त्यांनी अवश्य हा कवितासंग्रह अवश्य वाचायला हवा.
■ डॉ.विजयालक्ष्मी वानखेडे, बुलडाणा
भ्रमणध्वनी : ९९२२५२१९३८
.
■ मेळघाटच्या कविता
■ संवेदना प्रकाशन, पुणे
■ मूल्य रू.१५०
...............................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा