'मेळघाटच्या कविता' या श्रीकृष्ण राऊत यांच्या कवितासंग्रहातील कविता कोरकू आदिवासींच्या लोकसांस्कृतिक-सामाजिक जाणिवा प्रकट करणाऱ्या आहेत. निसर्गशरणता, परंपरापूजकता, दैन्य, करुणा, स्वच्छंदीपण, दुःखस्वीकृती ही या लोकजीवनाची वैशिष्ट्ये आहेत. पंचमहाभूतांना आपलेसे करणे, भौतिक व्यवहारवादी जगाचा सामना करणे, कष्ट करीत राहणे, दुःख-यातनांना लोकतत्त्वीय अधिष्ठान देणे अशा कृती-उक्तींचे लयदार अनुसरण मेळघाटातील आदिवासी करीत असतात. त्यांच्या सुखदुःखांना करुणा, प्रेम प्रकटीकरणाला लोकतत्त्वीय नजरेने श्रीकृष्ण राऊत पाहतात. आदिवासी लोकसंस्कृती-लोकजीवन- लोकव्यवहार लोकगीतांच्या लयी-चालींतून येथे कवितारूप धारण करतात.
प्रार्थना, आराधनागीत, पाळणा आवाहनगीत, नृत्यगीत, सण-उत्सवगीत, महात्म्यकथागीत, स्तवन, करुणागीत, ओवी, स्त्रीगीत, विधिगीत हे लोकगीतांचे आकृतिबंध येथे उपयोजिले आहेत. आदिवासी जीवनाशय पाहायचा, दाखवायचा आणि प्रतीतगम्य करायचा तर त्यासाठी लोकगीताचा आकृतिबंध स्वीकारायचा असे कवीचे धोरण आहे. कोरकूगीतांचे-लोकगीतांचे रूपबंध उपयोजनाची प्रयत्नशीलताही येथे दिसते. कोरकू बोलीतले काही शब्दही या गीतांमध्ये आलेले आहेत (उदा. जांगडी, गरदा, हांडोर, मुंडा, बकडिया, मुंडी, तगिली, सोरई, भूमका, सिडोली, टारयकू, लामझ्याना इ.) ग्रामीण बोली, प्रमाणबोली आणि क्वचित कोरकू बोली यांची संमिश्र बोली या कवितांना प्रादेशिकता- लोकसांस्कृतिकता बहाल करतात.
सातपुडा पर्वताच्या अखेरीस मेळघाट हा परिसर आहे. पाऊस, डोंगर, सिपना नदी, सागबन, मोहबन, जंगल, बिबट्या, हरिणी, मोर, रानकंद, सिपनाबन, चित्ता, जनावरे, अस्वल, रानपाखरू, वासनचा वेल, रातकिडा, बासाड्याचे कोंब, वाघुळ, ससा, *वाघ*, नाला, कराडी, सायळ, बाना, कालकाफटा, नाग, टेंभर, कामुन्या, चारोळी, सहेद, मध, घार, शिसम, बोराटी, जामुनीची पानं, सागाचा पानोळा, रानकेळ, वावटळ, मेंढरं, लांडगे इ. शब्द-संकल्पना, वस्तू, प्राणी-पक्षी, निसर्गरूपे प्रादेशिक-मेळघाटी संदर्भ पुरवतात. सागाचे जंगल, मोहाची झाडे, सिपना नदी, डोंगरदेव, पाऊस, वाघ हरीण-चित्ता-अस्वल ही निसर्गरूपे कोरकू आदिवासींच्या अस्तित्वाचा अधिवास आहे. निसर्गरूपे आणि निसर्गघटिते यांना आदिवासींच्या भावजीवनात महत्त्वाचे स्थान असल्याने प्रतिमा-प्रतिके- रूपके-उपमानेही या निसर्गसान्निध्याने वेढलेली आहेत.
'जल, जंगल, जमीन यावर आदिम हक्क आदिवासींचा असल्याचे मानले जाते. आदिवासीचे दैनंदिन सण याच गोष्टींवर घडत बिघडत असतात. अधिवासच हा निसर्ग आहे, किंबहुना आपण निसर्गाचाच अंश आहोत, प्राणी- पशुपक्षी-डोंगर, नदी, झाडे ही आपलीच रूपे आहेत, अशी त्यांची धारणाही असते.
पावसाला एकूणच जीवनात महत्त्व आहे. दऱ्या डोंगर-जंगल यांत वावरणाच्या आदिवासांना म्हणूनच वरुणाची प्रार्थना करावी लागते किंवा पावसाला आवाहन करावे लागते, हे लक्षात घेऊन मेळघाटच्या कवितांचा प्रारंभ वरुणाच्या प्रार्थनेने झाला आहे आणि अखेरीस अरे 'पावसाच्या देवा' अशी आळवणी आली आहे. वरुणाची प्रार्थना करताना मानव-मानवतेवर भौतिकसृष्टी- झाडे-झुडपे असे सारेच तुझी अपत्ये आहेत, अशी आठवण करून दिली आहे. 'तुझ्या डोळ्यांतून झरू दे करुणा' ही ती प्रार्थना आहे, 'मिठाच्या कुणाला/ झोबू दे भाकर/मुगीच्या सणाला / सांडू दे साखर मानव वा इतर सर्वच सजीवांना कारुण्यधारा दे असे हे सांगणे आहे. अगदीच बिकट क्षणी पावसाच्या देवाला आवाहन - अभिमंत्रण आले आहे. ते असे, 'अरे पावसाच्या देवा दे रे आम्हा जीवदान, / तुझ्या मायच्या दुधाची / तुला घालतो मी आण' मात्र जेव्हा पावसाची संततधार लागते, झड लागते तेव्हा मात्र हाल होतात. झोपडी बुडते, नाल्यात पाय ओढले जातात. पोटात अन्न नसल्याने कळा येऊ लागतात. ओठात/धसे उपाशी दात/ लोंढा डोळ्याला' किंवा 'वाटते पोटाला /पडल भोक; /रानच्या केळीला/हेरते भूक'. सतत होणारा पाऊस कामधाम बंद पाडतो, रोजगार थांबतो, अन्नही संपलेले असते. पावसाने करूणा करावी ती अशी ! पाऊसदेव महत्त्वाचा पण त्याने सर्वांचे भरणपोषण करावे, ही धारणा येथे प्रकटते.
सातपुडा हा मेळघाटाचा देव. डोंगर हा संरक्षक पिता, जलप्रवाहांचा निर्माता, जंगलांचा पोषक म्हणून आदिवासी जीवन डोंगराच्या आश्रयाने अस्तित्वात येते. सर्वच आदिवासींच्या जीवनात 'डोंगरदेव'च झाल्याचे दिसते. 'डोंगऱ्यादेव' हा आदिवासींचा सण-उत्सव-विधिधर्मही असतो. मेळघाटात 'डोंगरदेवाचं उघडं धन' आहे. ते नदी, नदीकाठचं मोहाचं बन, फुलांच्या ओढीने येणारे अस्वल, मोहफुलांचे धन, मद्यनिर्मितीचे मुख्य घटकद्रव्य मोहफुले, फुलांची रास असे सारे उघडे धन आपले आहे, आपल्यासाठी खुले आहे, ही जाणीव 'डोंगरदेवाचं' या कवितेत आहे. डोंगर-नदी-नाले यांच्या काठावर मोहाचे बन आहे. प्राणी-आपण आदिवासी-पक्षी-माती यांच्यासाठी आहे, पण- डोंगरदेवाचं उघडं धन/रस्त्याच्या काठानं मोहाचं बन/मोहाच्या / फुलांचा चाकानं चुरा/मोटर हागतो जांगडी बुरा/ मोहाच्या फुलांची उघडी रास/वाऱ्याला लागला मोहाचा वास' (पृ.१९)
नदी, डोंगर यावरच्या मोहाच्या धनाचे पावित्र्य-आनंद-सुखधुंदी रस्त्याच्या काडीमात्र गाडीच्या चाकाखाली चिरडली जातात. मोटार हाणणारा 'जांगडी' काही चांगला नाही. रस्ते-महामार्ग-धनदांडगे हे डोंगरावरचं उघडं धन नष्ट करताहेत. जांगडी म्हणजे महानगरी-व्यवहारस्वार्थी लोक 'बुरे' आहेत, असा आदिवासींचा अनुभव आहे. शहरीकरणाचे दुष्परिणाम आदिवासींच्या लक्षात आलेले आहेत. धनिक-मालकवर्गीय लोक- महानगरी लोक हे शोषक आहेत, त्यांच्याबद्दलचे आदिवासींचे मत बरे नाही. 'व्याघ्र प्रकल्प संरक्षित प्राणी-वन' यांमुळे त्यांना विस्थापितही व्हावे लागले-वाघासाठी हवे घर/ गाव तुझे खाली कर. / पोट बांध पाठीवर, / शहराची वाट घर,/ चिल्यापिल्यासाठी खोपा / झाडाखाली कर बापा./मालकाला एक साथ / तिचे तुझे वीक हात. १९७३-७४ च्या दरम्यान व्याघ्र प्रकल्प म्हणून मेळघाट संरक्षित करण्यात आला. 'डोंगर-जंगल- निवास जंगल आदान-वावर' सारेच संपले. त्यामुळे गाव- घर परिसर- डोंगर नदी हे सारेच सोडून शहराकडे जावे लागले. तेथे नवरा-बायकोने हात विकणे म्हणजे कष्टकरी होऊन राहणे भाग पडले. आदिवासींना 'डोंगरचा राजा' असेही संबोधले जाते, रानात- डोंगरात जीवनसंघर्ष करणारा तेथून विस्थापित होत मजूर वर्गात दाखल झाल्याची ही खंत आहे. श्रीमंती घरांबद्दल, श्रीमंताबद्दलही आदिवासींना सुप्त राग आहे. हे श्रीमंत आपले, जंगलांच्या, प्राणीपशुपक्ष्यांच्या नाशास कारणीभूत आहेत. श्रीमंतांना दया करुणा भूतदया काही नाही. त्यांच्या चैनीसाठी निसर्गाला बळी दिले जाते आहे. 'मोठ्याच्या घरी' या कवितेत एक घटना सांगितली आहे. मोठ्याच्या घरी पाहुणे येतात, पाहुणचारासाठी 'हरिण- मोर' यांचे मांस शिजवले जाते, आधी त्यांची शिकार केली जाते. 'विदेशी झिंग/गप्पांना ऊत, / गुदस्ता होतं / हरीण मस्त' 'चावती दात/कावळा घास,/मसाल्यातले / मोराचे मांस'. मोठ्यांच्या घरच्या पाहुण्यांची साग्रसंगीत सरबराई होते. पोरे मोरपिसे घेऊन नाचतात. खूष झालेला पाहुणा सातमजली हसतो. या कवितेची अखेरही अत्यंत परिणामकारक प्रचिती देणारी आहे, श्रीमंतांच्या संवेदनशून्यता-करुणाहिनते वर आघात केलेला आहे. तो असा - 'पाहुणे गेले.. ..../गरदा उडे,/ रानपाखरू / खोप्यात रडे' (पृ.२०) धूळ उडवत मजेत पाहुणे गेले मात्र रानातले पक्षी-प्राणी मात्र रडत राहतात. 'रानपाखरु' मध्ये प्राणी- पक्ष्यांप्रमाणेच आदिवासी कोरकू यांचाही समावेश आहे !
डोंगर, मोहबन, प्राणीपशुपक्षी झाडे यांच्याप्रमाणेच 'नदी' हे आदिवासिंचे मातृदैवत आहे. 'सिपना वो माय' या कवितेत सिपना नदीच्या स्तवनस्वरूपात ओव्या गायिल्या आहेत. हे स्त्रीगीत आहे. त्यात मागणे आहे आणि स्वतःला समजावणेही आहे. सिपना नदी ही स्त्रियांच्या दृष्टीने आदिमाय आहे. 'चांदीच्या मासोळ्या' 'सोन्याचे खेकडे' ती देते. ही माय म्हणजे भर उन्हाळ्यात जीवाचा विसावा ठरते - न्हाता येते - आत्मरूपाचा साक्षात्कार घडवते. 'सिपना वो माय, / लेक डुंबली न्हाण्याला;/लुगडं वाळते - फुटे पदर पाण्याला ' पाण्याला पदर फुटणे ही कल्पकनिर्मिती होय. नदीही जीवनदात्री तशी लेकही नवसंजीवनासाठी देहमनाने तयार होत असल्याची ही खूण आहे. सिपना नदीच्या स्तवनओव्यांच्या अखेरीस करूण-उदात्त भावना प्रकटली आहे- 'सिपना वो माय, /पाणी वाघाला दे पिऊ;/ गरवार गाय/ त्याला दिसू नको देऊ' (पृ.२८)
सिपनाकाठच्या बनातून काम आवरून परत येतानाचा वेग-परिसरदृश्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. अंधार दाट झालेला, वेगाने कृती करीत घराचे वेध लागलेले असे स्त्रीचे कष्टप्रद भावविश्व' सिपना बनाम' या कवितेतून प्रतीत होते. दुडकी चाल, भारद्वाज पक्ष्याचे घरट्याकडे परतणे आणि 'फुलल्या सांसात फुस्कारे नाग, / फुस्कारे नाग:/नजर चौफेर फेकण भाग, / फेकणं भाग... (पृ. ३५) अशी भयाची जाणीव येथे आहे. दिवसभर कष्ट करून थकलेपणा आलेला, उपाशीपोटी काम करावे लागलेले, उजेडावाचून काही अडत नाही पण फुस्कारणारे नाग, रातकिड्यांचे गाणे आणि पोटात भूक -दूरच्या दिव्याचे रंगीत थेंब / रंगीत थेंब - / तोंडाला भाकर अजून लांब, / अजून लांब' (पृ.३५) कष्ट, घराची ओढ, आणि परिसरातले भय' 'सिपना बनात' चित्रित झालेले आहे.
आदिवासी समाजाचं सुखदुःख, अभाव, संघर्ष, निसर्गसान्निध्य आणि लोकसांस्कृतिक कृतीनाही काव्याशयात मोठे स्थान मिळालेले आहे. पावसाचा मारा होतो तेव्हा कोंब रानकंद गोळा करून जगावे लागते. भूक-दारिद्रय आणि अभाव मिळून हा समाज झटत-झगडत कसा तग धरून राहिला आहे हे दर्शविणाऱ्या अनेक कविता येथे आहेत. लाथा-बुक्क्यांचा संसार, जादूटोणा करणी, तीन दगडांची चूल, *देजसाठी* साल भरणारा लामझ्याना ( प्रथा), अंगावर दुःख काढून पंचमहाभूतांच्या आश्रयाने राखोळा संसार, जीवनसंघर्ष, सागासारखे सिधे दुःख, बिबट्याच्या जबड्यात हरणीचे थान, मीठ न्या हो- बाजार व्यवहार, पूजा-उत्सव, विवाहप्रसंग, उन्हाळी चटके, 'पोटात शिडू ओठात गाणं, 'ढोलाच्या संग नाचतं रान', सूर्याला ग्रहण, रानमेवा नव्हे भूक भागवणारे अन्न हे सारे संदर्भ आदिवासींच्या लोकसांस्कृतिक अस्तित्वाचे सूचक आहेत. मेळघाट छायाचित्रणाचे स्थळ आहे का? 'बाहेरून' पाहणारे काय पाहतात, कशाचा फोटो काढतात? मेळघाटाच्या कोणत्या सौंदर्याचे चित्र काढले जाते? या प्रश्नांच्या संदर्भात 'असा फटू काढ' ही खोचक मर्मभेदक कविता अवतरते. भूकबळी, कुपोषण, जंगल सफारी, मोहाची दारू, मागासलेपण, रोमँटिक प्रथा-परंपरा इ. संबंधीचे बाह्य आकलन असते. फोटो कशाचा काढावा ? तर - 'हातपाय काड्या,/पोट संबूडेरा;/ सटवीचा फेरा-/असा फटू काढ./ चिपडात डोळे / पसापसा खोल;/ मान खाई झोल-/असा फटू काढ. / बरगड्या छाती / पाठ- पोट - एक; / वाळली खारीक - / असा फटू काढ/ शेवाळले दात, / तोंडावर माश्या / नाही त्याची आशा - / असा फटू काढ' (पृ. ४१ या फोटोने काहीएक प्रमाणात मेळघाटच्या मरू घातलेल्या आजारी वास्तवाचे भावदर्शन - अभावदर्शन घडू शकेल, असा कवीचा विश्वास आहे.
पाळणा - अंगाईगीत म्हणणारी स्त्री म्हणते 'पोटात तुझ्या घालू मी काय ऽ जो जो रे ऽ बाळा ऽऽ जो ऽ' महिन्यापासून चूल - कोठी - खाना सारे बंद आहेत. उपाशी बाप रानात जातो, पोटाला घट्ट पदर बांधून मायही कष्टत आहे - 'सरले कोदो, मोहाचं कूट / रोटीला झालं महाग मीठ / हातातोंडाची पडेना गाठ S/ जो जो रे ऽ बाळा SS जो S' 'पोटात लागे वणवा पेटू ऽ / लागलं तोंड धुक्याला गिटू S / बेसूद नको डोळे तू मिटू S / जो जो रे S बाळा SS जो S' (पृ.१८) अन्नाशिवाय होणारी बाळाची तडफड बेशुद्धीत/ मृत्यूत रूपांतरित होऊ नये, एवढीच या स्त्रीची अपेक्षा आहे. असा हा सारा भुकेचा आगडोंब मृत्यूसूचक गीतातून मांडला गेला आहे. एरव्हीच्या अंगाईगीतापेक्षा ही अंगाई वेगळी आणि भावप्रक्षोभक आहे. उगवती पिढी रांगेल तरी काय? हा प्रश्नच आहे. माता-बाल
संगोपन अशी काहीएक योजना आहे. अंगणवाडीचे एक भुकेजले पड़के भावचित्र आहे 'चवळी पोखर S हरभरा टोकर S खाऊन देकर S येईना येईना कुपोषणाला प्रतिबंध म्हणून अंगणवाडी आहे पण साऱ्या कृती उक्ती निःसत्त्व आहेत- 'दूध पावडर/ कालवा वज्जेरS / बाळंस लेकरं । धरीना / धरीना 'जिंदगी डोंगर / कमाई उंदीर / पोटातील गार S / बुजना बुजना' (पृ.५८)
'अंगणवाडी' असो वा 'रोजगार हमी' / या योजनांची आदिवासींच्या स्थितीत आश्वासकता- आधार निर्माण करू शकत नाही. कमाई नाही आणि म्हणून भूक भागल असे अन्नही मिळत नाही. 'कुपनाचे गहू / निज्जर बहु; / भुकीला भिऊ / खकाना खाऊ (१.५९) कष्टाचा डोंगर पोखरून उंदराएवढी कमाई नाही किंवा रोजगार हमीतून मिळणारे रेशनचे धान्य हे अन्नच नसते ! या लोकांना धूळच खात खितपत मरावे (आणि जगावे !) लागते. हा सामाजिक आशय कवी प्रभावीपणे मांडतो आहे.
स्त्रीजीवनात सुख-आनंद यापेक्षा कष्टात होरपळणे, भुकेसाठी तरतूद करणे, परंपरागत रितीभातींचा अवलंब करणे, कुटुंबाचे भरणपोषण करणे या कृतींना भरलेले आहे. 'गौरी चेतते' या कवितेतील स्त्री होळीच्या सणाच्या उत्सवात सहभागीही होऊ शकत नाही. पतीनिधनाची आठवण जीव जाळते, 'भर जत्रीमंधी देवा, हात सोडला', ऊर पिटते, दाह साहते. गावशिवेवर मुंडाचे ठाणे आहे, त्यावर शिडू ओतते ! पूर्वजांच्या स्मारकाची पूजा करते. यात अर्ध्यातच सहचर सोडून गेलेला, वैधव्याचे दुःख ती सोसत राहते. मोहाच्या फुलांची वेचणी करताना रात्रीची एकटी असल्याने अस्वलाचे भय मनात दाटून येते. 'हिवाळी झाकट/घाम दरदर/धडधडे ऊर' अशी स्थिती होते. भाऊ, बाप, लेक, धनी यांची आठवण येते. 'चकमक नाही,/ नाही हाती टेंभा /रानभर बोंबा...' (पृ. ३३) मोहफुलांच्या वेचणीचे, मोहफुलांच्या धुंदीचे, अस्वलांचे संदर्भ इतरही कवितांमध्ये येतात. स्त्रीजीवनातील दैन्य- दुःख याबरोबरच भावहळवेपण-सौंदर्यवादी क्षण, प्रियकराची ओढ अशी रोमँटिक भाववृत्तीही दिसते. या कवितांमध्ये सूचक 'शृंगार-स्वप्नवृत्ती-प्रेम- हुरहूर- प्रियकराची ओड' बऱ्याच प्रमाणात येते. निसर्गघटक-प्रतिमा-संकेत याद्वारे रोमँटिक भाववृत्ती प्रकट झाली आहे. अशा काही ओळी पाहा- 'चित्याची झडप / मोरपीस वाटे/ हरिणीच्या अंगी/ सायळीचे काटे' (मीलनोत्सुकता) किंवा 'कूस फेरते रात सावली पांघरलेली चंद्रकला/ लांब पसरल्या पडछायांनी काळोखाचा फुले मळा/ ढवळी पिवळी फुले सांडती, मोहतरूंचा बार झडे,/ हुंगत-झिंगत जाई वारा, त्या गंधाने धुंद चढे' (पृ.३४) (शृंगार- प्रतिमा) किंवा 'वसाच्या खोप्यात। फडफडे पक्षी....। खड्यांनी गोंदली.। पाठीवर नक्षी' (पृ.३७)/ (वक्ष -गोंदण-नक्षी-पक्षी-हे संकेत शृंगार बहाराचे आहेत) किंवा 'हिरवी असून जामुनीची पानं । मांडवाचं मन जळे। वैशाख लेऊन' (पृ.४८) (विवाहविधीची ओढ - चिंतन) किंवा 'पाखरासारखं। चांदणं उडालं। गाण्यात बुडालं' (पृ.५५)/ 'जिभेचा चटका उजवते होळी । नवाईची पोळी (पृ.५५)
होळीच्या प्रसंगातही दुःखविलयासाठी गाणं-नाचणं साधावे लागते. दुःखाचे- कष्टाचे सूर गाण्यात छंदोबद्ध करीत त्या लय-तालांमध्ये दुःख हलके करण्याचा हा प्रकार आहे. फुटे झाडोऱ्याला डोळा-/ आंधळली लाज: । तटतट सुटे गुंडी | सैलावले काज (पृ.५६) झाडांनीही आसक्त व्हावे असे हे स्त्रीरूप आहे. आपल्या नवतीकडे देह- उत्फुल्लतेकडे झाडे पाहत आहेत, ही जाणीवच आत्मसौंदर्याचे प्रेम प्रकट करणारी आहे. आदिवासी स्त्रियांच्या जीवनातही सौंदर्यभावना असतात, त्यांच्यातही आदिम स्त्रीत्व- मातृत्व साठवलेले, निसर्गतः प्रवाहित झालेले असते, या धारणेतून रोमँटिक प्रवृत्तीचा शिरकाव या कवितांमध्ये झालेला आहे. पण आदिवासी स्त्रीजीवनाकडे फक्त दुःख-कष्ट- यातना अभाव एवढ्यापुरतेच हा कवी पाहत नाही. 'रामपारी विरघळे साखर ओठात, । सांजवेळी हिंदकळ। दुःख पापणीत या शृगार+दुःख भावनांची परिणती अंतिमतः वात्सल्यात परिवतर्तित होते - 'चढणीला पाठ भिजे / ओसंडतो ऊर, / झोपडीत तान्हा बाई। रडतो व दूर (पृ. २३) डोक्यावर हंड्यांवर हंडे घेऊन पाणी भरणारे हे स्त्रीरूप आहे. 'कष्ट शृंगार > वात्सल्य असा हा चिंतन-कथनक्रम आहे. निखळ रोमँटिक वृत्तीने 'शृंगार-विरह- कामभाव असे या कवितामध्ये घडत नाही. दुःख अभाव धडपड यांना जोडूनच जीवनोत्सुकता प्रकट करणारी ही स्त्रीरूपे होत. येथील वनवासी मुलगी शिक्षण घेऊ शकत नाही, अनंत अडचणीचे पाढे आहेत! 'कोण खाते बाई / रोज खिरापत / वाघुळात ससा / तशी तुझी गत !' (पृ. २६) असे स्त्रियांसंबंधीचे कवीचे आकलन आहे. जाळ्यात अडकवून ठेवण्याच्या सशाची शिकार आणि व्यवस्थानिर्मित अभावात - सांस्कृतिक बंधनात अडकून पडलेले स्त्रीरूप समकक्ष बनते.
या संग्रहातील कवितांचे सगळ्यात महत्त्वाचे सत्व लोकलयीमध्ये, नादाच्या विविध शक्यतांचा शोध घेण्याच्या लोकतत्त्वांमध्ये सामावलेले आहे. या कवितांनी समकालीन छंदमुक्तीच्या आविष्कारणरितींना दूर सारले आहे. लोकगीतांच्या पध्दतीने या लौकिक कविता उद्भवल्या आहेत. लोकगीतांची सुगमता अर्थसुस्पष्टता-सौम्य सूचकता-भाव- शब्दआवृत्ती, समूहमनांचे प्रकटीकरण अशी वैशिष्ट्ये असतात. मेळघाटाचे आदिम ताल- नाद-तोल तत्त्व सांभाळण्याच्या प्रक्रियेत लोकगीतांचे आकृतिबंध औचित्याने निवडलेले वा स्फुरलेले आहेत.
येथे लहान वाक्यबंध, शब्दबंधांची आवृत्ती, वाक्यबंधांची आवृत्ती, कडव्यांची मर्यादित-नियमित रचना, यमक-अनुप्रासांची सहज योजना यांमुळे नादसौंदर्य आणि अर्थसौंदर्य प्रकट होते. काही उदाहरणे पाहा - 'धडपड़ पेटे / झावातून ऊन,/ लहालहा जळे /भट्टीवाणी रान/ भुरूभुरू चरे / गवतानं आग/ काळेकाळेभोर / भुईवर डाग/, डांगडांग नंगी /झडे पानपान / थेंबाथेंबासाठी / काय वणवण' (धडधड पेटे/ पृ.५२) येथे 'धडधड, लहालहा, भुरूभुरू, काळेकाळेभोर, डांगडांग, थेंबाथेंबासाठी, वणवण' हे अभ्यस्त शब्द आले आहेत. उन्हाळ्यातली पाण्यासाठी होणारी 'वणवण' या कवितेत आली आहे. जळणारे रान - उन्हाच्या ज्वाळा यांची धग शब्दावृत्तीमधून अधिक दाहक बनते. सारे दृश्यच दृक्-स्पर्श संवेदन जागे करते. 'अंगणवाडीचा धिंगाणा' (पृ.५८) या कवितेत 'धिंगाणा धिंगाणा', 'येईनाS येईना S', 'घरीनाS घरीना', 'बुजना S बुजना S' ही शब्दावृत्ती लय आणि नकारास्थिती आवृत्त करते. 'मीठ न्या हो' (पृ.५७) या कवितेत बाजार-व्यवहार यातील व्यापारीवृत्ती आवाहकता आणि सामान्याची लुटमार आहे. बाजारातल्या हाकाच ऐकू येतात- 'एक उडी/ दुजी उडी,/ उडी मेंढरांची / जारी सुगी/ भारी सुगी,/ सुगी लांडग्यांची.' उडी -उडी - उडी यांची आवृत्ती, सुगी- सुगी यांची आवृत्ती; शिवाय 'जारी सुगी-भारी सुगी /मेंढरांची-लांडग्यांची' या शब्दबंधातील यमकरचना नादसौंदर्यवर्धक आहे. मेंढरे (आदिवासी लोक) आणि लांडगे (व्यापारी) यात लांडग्यांची सुगी मात्र फोफावते ! बाजारात होणारी लुबाडणूक आणि आदिवासीचे भोळेपणाचे सामूहिक वर्तनही लक्षात येते.
पाऊस वाजतो (पृ. ५०) या कवितेतील पाऊसधारांचा आवाज त्याच वेळी आदिवासींची होणारी कुंचबणा यांना एक लय प्राप्त झाल्याचे दिसते.
पाऊस वाजतो पाऊस / वाजतो
सागाच्या पानी सागाऽच्या पानी
पोटाच्या आगीला पोटाच्या / आगीलाS
पुरेना पाणी पुरेऽना पाणी
१ २
हे कडवे (१) दोन दोन शब्दांच्या चार ओळींचे आहे, कविता वाचताना (२) ते एका खास ठेक्यावर उच्चारले / वाचले जाते. 'पानी-पाणी' हे यमकही नादानुकूलता निर्माण करते. शब्दक्रम हे गद्यपध्दतीने वाचून जरी पाहिले तरी या सर्वच कवितामधून गीतलय-ध्वनिसौंदर्य निर्माण होते. गेयता-नादानुकूलता अशी शब्दबांधणी हे या कवितांचे मर्मस्थान आहे. विशेष म्हणजे विविध लयबद्धता कवीने स्वीकारली आहे. काही उदा. पाहा.
'घरी रडे' (पृ. २५) या कवितेत -
१ घरी रडे शब्द = २ अक्षरे = ४
२ दारी रडे शब्द = २ अक्षरे = ४
३ आभाळाचा डोळा शब्द = २ अक्षरे =६
४ बासाड्याचे शब्द = १ अक्षरे=४
५ कोंब केले शब्द = २ अक्षरे= ४
६ भाजीसाठी गोळा शब्द = २ अक्षरे= ६
तिसऱ्या आणि सहाव्या ओळीत अक्षरे ६ आहेत
पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या ओळीत अक्षरे ४ आहेत.
'हांड्यावर हांडा चढे' (पृ.२३) या कवितेत ५ कडवी आहेत प्रत्येक कडव्यात. ८+६+८+६ अशी अक्षरसंख्या आहे.
'उगवली बाई' या कवितेत १४ कडवी आहेत. प्रत्येक कडवे तीन ओळींचे, प्रत्येक ओळीत सहा अक्षरे आहेत, शब्द लहान लहान आहेत. (मात्र फक्त तिसऱ्या कडव्यात ५ अक्षरे आली आहेत) सुरवातीची दोन कडवी -
उगवली बाई
सुकाची चांदणी
उघड पापणी
.
चांदणी पापणी यमक
तव्यावर थाप
काटी-कुटी जळे;
झोपडी उजळे
.
जळे - उजळे - यमक
प्रत्येक कडव्याच्या शेवटी पूर्णविराम. कडव्याच्या शेवटच्या शब्दाचे वाचन नेमके थांबते आणि 'विराम' येतो.
'तुझा वाजे पावा' या कवितेत ५ कडवी आहेत, ४ ओळींचे एक कडवे. प्रत्येक ओळीत ६ अक्षरे येतात. हे नृत्यगीत आहे, समूहाने गायचे नाचायचे, परस्परांशी संवादी ताल - ठेके घ्यायचे असे कल्पून रचले आहे. शेवटची दोन कडवी पाहा- 'चांद गेला डुबी / नाच आला रंगा;/ होश नाही अंगा/ रातभर नाचा./ नाकाच्या शेंड्याला/ कुंकवाचा थेंब / चोळीसंगं चिंब / रातभर नाचा.' पावा-ढोल यांच्या साथीने गायन+ नर्तन असे पवित्रे घ्यायचे आहेत. मोहाच्या दारूची धुंदीही वाढली आहे. पायात घुंगरूही साथ ताल सावरणारे आहेत. या कडव्यांमध्ये अनुनासिकांची आवृत्ती आहे. रंगा-अंगा, थेंब-चिंब यात नादसाधर्म्यही आहे. 'रातभर नाचा' या शब्दबंधांनी प्रत्येक कडव्याची अखेर होते. फेर धरून गोलाकार साधत हे नृत्यगीत रंग भरते
नाद सौंदर्याचे वैविध्य म्हणून 'सिपना बनात' (पृ.३५) ही कविताही महत्त्वाची ठरते. 'सिपना बनात झाकट पडे,/ झाकट पडे;/ उजेडावाचून काही ना अडे,/ काही ना अडे./ हिरव्या पानाची येटोळी केली,/ येटोळी केली;/ पालूत गुंडली, चुंबळ झाली, / चुंबळ झाली.'
'झाकट पडे', 'काही ना अडे', 'येटोळी केली', चुंबळ झाली' या वाक्यबंधांची आवृत्ती गेयता - ताल-ठेका मिळून नादसौंदर्याचे विशिष्ट क्रमाने आवर्तन घडवते.
अशा विविध लयींचा लोकतत्त्वीय संचय म्हणूनही येथील कविता वैधर्म्यपूर्णता दर्शवितात. नादसौंदर्य-भावसौंदर्य आणि लोकतत्त्वीय दृष्टी या बाबतीत आजच्या गद्यभरड वास्तवाला लोकगीतात्मक स्पर्श येथे होतो. वैविध्यपूर्ण नादलयींमुळे या कविता गुणगुण करावयास भाग पाडतात. हरपत चाललेले नादगुण आणि अर्थगुण येथे 'मोहात' पाडतात. मोहबने नादलयींची बने बनतात.
(मेळघाटच्या कविता, श्रीकृष्ण राऊत, संवेदना प्रकाशन, फेब्रुवारी २०२२, पृ.१०४, मूल्य रू. १५०.) (डॉ. एकनाथ पगार, व्ही रस्ता, देवळा, जि. नाशिक, भ्रमणध्वनी क्र. ९४२१५०७५०९)
(कविता-रती/ दिवाळी २२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा