दोन आसवांचे मोती



हंबरून वासराले चाटते जव्हा गाय
तिच्यामंदी दिसते मले तव्हा माही माय

कुठल्याशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन करताना निवेदकानं ही कविता म्हटली. सभागृह दणाणून सोडणार्‍या टाळ्या घेतल्या. ही नारायण सुर्वे यांची कविता आहे, असा उल्लेख केला. त्या कार्यक्रमात सादर झालेल्या कवितेची व्हिडिओ क्लिप मोबाईल टू मोबाईल प्रवास करत महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात पोचली. अकोल्या शेजारी असणार्‍या बाभुळगावात माझी भाची राहते. एक दिवस ती कुठल्याशा निमित्ताने घरी आली. मी कविता करतो म्हणून तिला माहित. तिनं मला विचारलं, “मामा, ही कविता तुमची आहे का?” मी म्हटलं, “नाही”. एरवी कवितेशी तीळमात्रही संबंध नसणार्‍या पोरीनं मला पहिल्यांदा कवितेसंबंधी विचारावं ह्याचं मला आश्चर्य वाटलं आणि माझं कुतुहल चाळवलं. मी ह्या कवितेचा शोध घेऊ लागलो. माझ्या मुलाच्या मित्रानं ह्या कवितेची व्हिडिओ क्लिप मला आणून दाखवली.
काही दिवसांनी माझे मित्र नरेंद्र लांजेवार यांनी लिहिलेला लेख वाचण्यात आला. तो लेख म्हणजे वाङमयीन शोध पत्रकारितेचे उत्तम उदाहरण होय. त्या लेखावरुन मला कळलं ही कविता स. ग. पाचपोळ यांची आहे. फेसबुकवर ह्या कवितेच्या कर्त्यासंबंधी खूप  चर्चा ही झाली. त्यात लांजेवारांच्या लेखातील ठोस पुराव्याने मूळ कवीचे श्रेय त्याला परत मिळाले. बरेचदा असं होतं की एखाद्या कवितेला किंवा गझलच्या एखाद्या शेराला मिळणारी ख्याती ही त्या कवीच्या नावाला असणार्‍या तथाकथित प्रसिद्घीपेक्षा कितीतरी मोठी असते. ह्या कवितेच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. काळाच्या पडद्याआड गेलेला ह्या कवितेचा कवी काळाच्या ओघात संपूर्ण अज्ञातवासातच होता. लांजेवार केवळ लेख लिहून थांबले नाही; त्यांनी कवीच्या कुटुंबाचा शोध घेतला. जुन्या डायर्‍या, कात्रणे यांचा शोध घेतला. त्यात आणखी काही कविता सापडल्या आणि त्यातून सिद्घ झालेला संग्रह म्हणजे ‘स. ग. पाचपोळ यांची कविता’ लांजेवारांचे हे संशोधन त्यांच्या कविताप्रेमातून उमलले, फुलले, आणि फळले. टोकाच्या आत्मकेंद्री झालेल्या हल्लीच्या जगात लांजेवारांची ही काव्यनिष्ठा कौतुकास्पद तर आहेच पण त्याहून अधिक ती अनुसरणीय आहे.
प्रशस्तिपत्र किंवा स्तुतिपत्र असं स्वरूप प्रस्तावनेला हल्ली प्राप्त झालेलं आहे. कवितांचं साक्षेपी विवेचन त्यातून अभावानेच आढळते. अशा कालखंडात प्रस्तावनेचे चार शब्द लिहिण्याचं मी धाडस करतो आहे याची मला शुद्घ जाणीव आहे.

जगाच्या पाठीवर जेव्हढ्या भाषा बोलल्या जातात. त्या प्रत्येक भाषेत आईवर लिहिल्या गेलेल्या कवितांची संख्या सर्वाधिक आहे. बाप त्या मानानं उपेक्षितच राहिला. ‘बाप रूखमा देवीवरू’असे एखाद्या वेळी संतांनी देवाला म्हटले असले तरी ‘विठू’कायम ‘माऊली’च राहिली आहे. कवितेत ‘ममत्व’ हा ‘देवत्वा’ चा समानार्थी  शब्द आहे. ‘माय-लेकरू’ साठी ‘गाय-वासरू’ ही आर्ष प्रतिमा आदिम जीवनाच्या प्रारंभापासून मानवी समुहमनात रूढ आहे. स. ग. पाचपोळांच्या ‘माय’ कवितेचं आवाहन आपल्या मनाला भिडतं ते याच कारणानं. समाजाच्या सांस्कृतिकरणाचा प्रवास आदिवासी-ग्रामीण-नागरी अशा स्थित्यंतरातून झालेला आहे. त्यामुळे बाह्यांगाने माणूस कितीही आधुनिक झाला तरी त्याच्या मनातल्या भावभावनाचं संचित मात्र आदिमच असते. पाचपोळांच्या ‘माय’ कवितेचा आकृतिबंध लोकगीताच्या मुसीतून अवतरला आहे. छंदाचं शैथिल्य हे लोकगीताचं वैशिष्ट्य ह्या कवितेच्या रचनेत सेंद्रियत्वाने भिनलेलं आहे. पीठात पाणी घालून त्याला ‘दूध’ म्हणून पाजणार्‍या मायचा पाय इचूकाट्याले ‘मोजत’ नव्हता! तिच्या डोळ्यात आपल्या लेकरासाठी ‘तापी-पूर्णामाय’ भरून येत होत्या. नातवंडाचं मुख पाहणं तिच्यासाठी ‘दुधावरची साय’ पाहण्यासारखं आहे. ह्या सर्व आर्ष प्रतिमा ही ‘माय’ कवितेची बलस्थाने आहेत. त्यांच्या ‘आई’ कवितेत ‘पिकले फळ कधी का झाडास भार होते’ अशी सुंदर प्रतिमा येते. तिची जातकुळीही आर्ष प्रतिमेचीच आहे.
पाचपोळांच्या मनात ‘प्रेम पंढरीचा’ एक ‘वारकरी’ आहे. तो प्रेम भावनेला ‘अभंगात’व्यक्त करतो. जीव लावल्यावर तिच्यासाठी जीव देण्याची त्याची तयारी आहे-

‘तुझ्या वाटेवरी
ठेवीन मी देह
मनात संदेह
ठेवू नको.’    (वारकरी)

प्रेम भावना, श्रृंगार, सामाजिक जाणीव अभंग छंदात व्यक्त करू नयेत. कारण तो भक्तिभावना अभिव्यक्तिचा छंद आहे. ह्या प्रस्थापित संकल्पनेला केशवसुत, मर्ढेकर, ग्रेस यांनी छेद देऊन अभंगाला ‘मुक्ती’ दिली;त्याच वाटेवर पाचपोळांनीही दोन पावले टाकली आहेत. त्यांना पडणार्‍या समतेच्या स्वप्नातल्या गावात-

‘कुणी नाही छोटा
कुणी नाही मोठा
एक पाणवठा
सर्वांसाठी’       (स्वप्नातला गाव) 

-असावा असे त्यांना वाटते. पण हा ‘स्वप्नातला गाव’ स्वप्नातच राहतो. आणि त्यांना सामोरे येणारे वास्तव मग विद्रोहाचे पाणी पेटवत मुक्तछंदात व्यक्त होताना दिसते-

‘या गावातल्या मंदिराची पायरी चढण्या अगोदर
सादर करावे लागते जातीचे प्रमाणपत्र
...
एखादं जनावर मेल्याची बातमी कळते
तोच दिवस स्वातंत्र्यदिनापेक्षाही मोठा ठरतो
कारण
‘कोरड्यास’ अन्‌ दोन भाकरीची सोय लागून
निदान त्या दिवसापुरती तरी 
त्याच्या पोटाची चिंता मिटणार असते.’(माझं गाव)

कवी कधी असे भयाण वास्तव शब्दबद्घ करतो. कधी ‘आमचा श्रावण’ मधून ‘भाकरीचे तत्वज्ञान’ मांडतो. तर कधी तमाशात नाचणार्‍या पोरीसाठी कवीचा जीव तुटतो. कवी म्हणतो-

‘तर मायबाप हो ! तुम्ही एवढे कराल का?
तुमच्या अंगणातील तुळस होण्याचे भाग्य
त्यांना बहाल कराल का?’   (चंद्रकोर)

विद्रोही कवितेच्या परंपरेतील ह्या कविता असल्याने त्यांचा सूर थोडा वरच्या पट्टीत असणं स्वाभाविक आहे.

निळ्या रंगाच्या रंग प्रतिमेला घेऊन येणार्‍या पाचपोळांच्या काही भावतरल ओळी वाचकांना खिळवून ठेवतात. आणि रसिकांकडून दाद अक्षरश: लुटून नेतात-

‘निळ्या आभाळाचा रंग तुझ्या मायेना डोळ्यात
येई विसाव्याला चंद्र गालावरच्या तळ्यात
तुझ्या पदराशी वारा रोज करतो मुजोरी
देतो लुटून अवघी लाख मोलाची तिजोरी.’ (काहूर)
---
‘निळ्या आभाळाची शोभा
जशी नदीच्या पाण्यात
सांज खुलते प्रीतीची
तशी सखीच्या मनात.’ (सांज)

प्रस्तुत संग्रहातल्या निम्मे रचना गझलच्या आकृतिबंधातल्या आहेत. गझल लेखनासाठी लागणारे कवीचे वृत्तांवरील प्रभुत्व मात्र ह्या रचनांमध्ये जाणवत नाही. ढोबळ लय पकडून त्या रचलेल्या वाटतात. चांगली गझल वृत्तात लिहिण्यासाठी कवीला प्रारंभी जो लेखनाचा रियाज करावा लागतो. त्या प्रक्रियेतल्या ह्या संग्रहातील गझला असल्याने त्यांच्या रचनात वृत्ताचे शैथिल्य आहे. रदीफ, काफिया, दोन ओळींचा स्वतंत्र शेर असे गझल रचनेचे घटक ह्या रचनात अंतर्भूत आहेत. अशा प्रकारच्या रचनांना गझलसदृश रचना किंवा मुक्त गझल म्हणण्याचा प्रघात आहे.अनेक प्रसिद्ध कवींना गझलच्या आकृतिबंधाने आकर्षित केले.त्यांच्याही अशा प्रकारच्या रचना प्रयत्न केल्यास संशोधकांना सापडू शकतात.

पाचपोळांना चांगली गझल सापडू लागली होती; हे पटवणार्‍या अनेक खुणा ह्या रचनात आहेत;अर्थात वृत्ताच्या अचुकतेसह. उदा-

‘स्वर्गात काय झाली चर्चा तुझ्या रूपाची
ऐकून उर्वशीचा गेला चढून पारा’   (चर्चा तुझ्या रूपाची) 

‘अन्याय न्याय झाला राज्यात दुर्जनांच्या
सत्यासही खुलासा करणे कठीण झाले’    (पराभव)

‘नाही कुठेच रुजली देशात अजुनि समता
घे धम्मचक्र हाती ते एकदा पुन्हा तू’ (ये एकदा पुन्हा तू)

‘आहे अजून येथे रेडा तहानलेला
सारे भरून गेले आपापल्या पखाली’ (बाजार)

स. ग. पाचपोळातला गझलकार परिपक्व होऊ लागला होता. त्यांची काव्यकन्या वयात येऊ लागली होती. परंतु तिचा सुखी संसार पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले  नाही. पाचपोळ अकाली गेले. जाताना आपल्या लाडक्या लेकीला त्यांनी जगावेगळं आंदण दिलं-

‘रूप पाहून बापाच्या फुले मनात चांदणं
दोन आसवांचे मोती देले लेकीले आंदन’ ( आज हयद फिटली)

हेच ‘मोती’आता रसिकांनी जतन करायचेत.

- श्रीकृष्ण राऊत  

अश्वमेध_नामदेव चं.कांबळे

श्रीकृष्ण राऊत खरे तर गझलकार  श्रीकृष्ण राऊत. गझल लेखनात उमेदवारी करता करता ते प्रस्थापित कवी झाले. त्यांच्या गुलाल आणि इतर गझला कविता संग्रहावर वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, ना. घ. देशपांडे, मंगेश पाडगावकर आदी मान्यवरांनी आपापले अभिप्राय देवून त्यांच्या कवितेचे तोंड भरुन कौतुक केले.
गझल रचना प्रकारात पाय रोवून उभा असलेला हा कवी गझलेतच न रमता नंतर गद्य कवितेकडे वळला. राऊत गद्य कवितेकडे फक्त वळलेच नाहीत तर त्यांनी तेथेही आपला दमदार ठसा उमटवला. उमटवतच आहेत. याचे खरे कारण जर कोणते असेल तर त्यांचे काव्यगत विषयाविषयीचे मनन, चिंतन आणि त्या मुशीतून अविष्कृत होणारी त्यांची कविता!
'अश्वमेध' हे कवितेचे शीर्षक एकूण कविता प्रथमदर्शनी विसंगत वाटतात. कारण फार पूर्वी म्हणजे राजे, महाराजे असतानाच्या काळात त्यांचे सैन्य रथदल, गजदल, अश्वदल, पायदल असे विभागलेले असायचे. अश्व रथाला ओढायचे आणि स्वारांना घेवूनही दौडायचे. घोडदौड प्रगतीचे आणि राज्याच्या भरभराटीचे लक्षण मानले जायचे. कधी तर एखादा राजा अश्वमेध यज्ञ करायचा. घोड्याला सजवून त्याच्या पाठीवर राज्याचा ध्वज बांधायचा. संरक्षणासाठी भरपूर सैन्य घ्यायचा आणि घोड्यासह त्याचा प्रवास अनेक राज्यातून व्हायचा. ज्यांना संबंधीत राजाचा अधिकार, शौर्य मान्य असायचे ते खंडणी देवून त्यांचे वर्चस्व मान्य करायचे. अडवलाच कोणी अश्वमेधाचा घोडा तर दोन्ही सैन्यात युद्घ झडायचे. त्यात अश्वमेध करु पाहणार्‍या राजाचा विजय झाला तर दुप्पट खंडणी घेवून घोडा मार्गस्थ व्हायचा. राजधानीत परत आल्यावर राजा यज्ञ करायचा. नंतर त्याला सम्राटपद मिळायचे.
श्रीकृष्ण राऊतांच्या कवितेत असा राजा कुठेच असत नाही. असतात ते स्वार आणि वजीर ! त्यामुळेच कवितेचे शीर्षक प्रथमदर्शनी कवितेशी विसंगत दिसते. परंतु ते तसे नाहीच. कारण कविला ऐतिहासिक घटनेचा परामर्श घ्यायचा नाही. तिचा संदर्भ देत कविला अलिकडच्या राजकारणावर, राजकारण्यांच्या वृत्ती, प्रवृत्तींवर भाष्य करायचे आहे. त्यासाठी कविने घोडा, लगाम, स्वार, वजीर ही प्रतिके वापरली आहेत.
कवितेतील घोडा म्हणजे राजकारणी कार्यकर्ता, त्याचा लगाम म्हणजे त्याचा पक्ष आणि वजीर म्हणजे राजकारणातील त्याचा गॉड फादर या अंगाने कविता उलगडली तर त्या प्रतिकांची संगती लागते.
काँग्रेस पक्षाच्या अश्वमेधाचा वारु 1950 पासून चौखूर उधळत आला. तोच राजकारणातला सम्राट पक्ष. दर पाच वर्षांनी त्याचा अश्वमेध होतो. सम्राटपदाचा मुकूट त्यालाच मिळतो. कारण इतर पक्षांना तो अप्राप्य. फार तर एखाद दुसर्‍या राज्यात हा वारु अडत असेल, युद्घाची नौबत झडत असेल परंतु सम्राटपद त्यालाच. केंद्रातला तेरा वर्षाचा रालोआच्या कारकिर्दीचा काळ सोडला आणि छुटपुट अपवाद वगळले तर तोच सम्राट आजवर तरी !
कवी म्हणतो घोड्या/अरे वेड्या/ असा कुठे चाललास / तुफान दौडत / वार्‍यावर उडत /चौखूर उधळत. कार्यकर्ता वेडा असतो. वेडात उधळले वीर मराठे सात असा वेडा. तो तहान भुकेची पर्वा न करता, घरा दारावर तुळशी पत्र ठेवून बेभानपणे पक्ष कार्यात स्वत:ला झोकून देत असतो. त्याच्या कार्याचे, त्यागाचे त्याला काय फळ मिळेल? मिळेल की न मिळेल? याविषयी कवी साशंक असतो. आणि कवीचे साशंक असणेही साहजिक असते. कारण राजकारणात कार्यकर्त्यांच्या भवितव्याचे काहीच सांगता येत नसते. एखाद्याला राजकारणात लॉटरी लागते. बाकीच्यांना कायम सतरंज्या घालाव्या उचलाव्या लागतात. म्हणूनच कवी म्हणतो, असा कुठे चाललास, हे झाले पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांविषयीचे.
परंतु नंतर कवी ज्या कार्यकर्त्यांविषयी लिहितो तो सामान्य कार्यकर्त्यापेक्षा वेगळा आहे. कवीला त्याच्या दुडक्या चालीतून त्यांचे भवितव्य दिसते. गाव शिवारात कार्यकर्त्याला बर्‍यापैकी नाव मिळालेले असते आणि त्याच्या कार्याची दखल त्याच्या गावाबाहेरही घेतली जावू लागलेली असते. म्हणून कवी म्हणतो, वेशीच्या बाहेर पडेपर्यंत / हे ठीक होतं / आता / गावशीव ओलांडल्यावर / एकेक पाऊल कसं / भुई फुंकत फुंकत / सावध पडलं पाहिजे. राजकारणात कार्यकर्त्याने निदान मोठे होवू पाहणार्‍या कार्यकर्त्याने सतत सावध असायला पाहिजे असा कवी उपदेश करतो. एकदा का पक्षाच्या लक्षात कार्यकर्त्याचा वकुब आला की त्या परिसरातला नेता त्याच्या वाटचालीबाबत बिनधास्त होतो, कार्यकर्त्याला वाढायला पूर्ण वाव मिळेल इतपत त्याच्यावरची आपली पकड सैल करतो.
आता कार्यकर्ता गावशीव ओलांडतो ग्रामपंचायतमध्ये आपला जम बसवून झाले की मग येतो पंचायत समिती, जिल्हा परिषद, कार्यकर्ता आता त्या दिशेने वाटचाल करु लागतो. आता त्याला एकेक टप्पा पार करावा लागणार. त्या त्या टप्प्यावर हिरवीगार कुरणं असणार ती कुरणं भ्रष्टाचाराची असतील खाबुगिरीची असतील त्यात चरता चरता खुरांना बसवून घ्यायच्या / नाला पिवळ्या धम्म / न विसरता असे कवी कार्यकर्त्याला सांगतो.
घोड्याच्या खुरांना लोखंडी नाला बसवतात. त्यामुळे त्याची पळापळ सुकर होते. कवी कार्यकर्त्याला पिवळ्याधम्म नाला बसवायला सांगतो. ह्या पिवळ्याधम्म सोन्याच्याच असणार. सोने श्रीमंतीचे प्रतिक असते. कार्यकर्त्याने श्रीमंती घाटमाट करावा. स्वत:ची पळापळ सुकर व्हावी म्हणून खुशाल गाड्या उडवाव्या. असा कवी त्याला उपदेश करतो.
राजकारणामध्ये कार्यकर्ता असतो. स्थानिक अगर परिसर पातळीवरचा नेता असतो. तो कार्यकर्त्याचा त्या पातळीवरचा गॉड फादर असतो. गॉड फादरचाही वर गॉडफादर असतो आणि सगळ्यात वर असतात पक्षश्रेष्ठी. कार्यकर्ता-नेता-गॉड फादर-पक्षश्रेष्ठी अशी ती साखळी असते. नेत्याचा गॉड फादर कार्यकर्त्यांचाही गॉडफादर असतो. नेत्याच्या मर्जीतला कार्यकर्ता म्हणून त्याची दोघांवरही मर्जी असते. त्याचा उदारतेची किर्ती दिगंत असते. म्हणूनच कवी म्हणतो, त्याच्या मर्जितला होऊन राहिलास / तर तुझ्या अरबी वंशाच्या / सात पिढ्यांना / आरामात पुरतील / एवढे काबुली चणे हात जोडून / उभे राहतील / तुझ्या दिमतीला.
कवी येथे घोड्याच्या अरबी वंशाचा उल्लेख करतो. अरबी घोडे देखणे, चपळ नि भारदस्त असतात. त्यातून कवीला हे सुचवायचे असते की खर्‍या कार्यकर्त्यांचे भविष्य घडवू पाहणार्‍या कार्यकर्त्याचे व्यक्तिमत्व उठावदार तर असतेच शिवाय त्याला राजकारणाचे डावपेच चपलतेने लढवता येत असतात. असा कार्यकर्ता गॉड फादरची मर्जी सांभाळत राहिला तर त्याच्या सात पिढ्यांना पुरेल एवढे धन त्याला कमावता येईल असे कवीला म्हणायचे असते आणि ते खरेच असते. कारण तेवीस वर्षापूर्वी सायकलवर हिंडणारा कार्यकर्ता आज हेलिकॉप्टरमधून फिरतो आहे आणि तीस पस्तीस किलो सोने, काही कोटींची रोकड बाळगतो आहे असे आपण अधूनमधून वाचतो, ऐकतो आहोत. कवी म्हणतो तसा कार्यकर्ता वागला तर लवकरच त्याची राणीसोबत झोपण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे. ही राणी स्त्री नव्हेच. ती आहे सत्ता ! तिच्याशी शैय्यासोबत करण्याची कार्यकर्त्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे. म्हणजेच त्याला तिचा मन मानेल तसा उपभोग घेता येणार आहे. त्यासाठी कवी पण म्हणून कार्यकर्त्याला एक अट सांगतो. ती अट असते त्याने स्वत:चे शीर अर्पण करणे. शीर म्हणजे डोके. डोक्यात असते बुद्घी. बुद्घीत असतात विचार. आणि आपला स्वाभिमान याची आहुती देणार असेल तर आणि तरच त्याला सत्ता  प्राप्ती आणि सत्तेची शैय्या प्राप्त होणार आहे.
शेवटी कवी कार्यकर्त्याला म्हणतो तुर्तास / वजीर बैस म्हणतो / तर बैस ! यातल्या तूर्तास शब्दातून कवी पक्षशिस्तीवर बोट ठेवतो आणि कार्यकर्त्याच्या बंडखोरीवरही बोट ठेवतो. कुठल्या तरी निवडणुका लागतात. आपली योग्यता असूनही आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, असे एखाद्या कार्यकर्त्याला वाटत असते. त्यानेच तो बंडखोरी करतो. म्हणूनच कवी म्हणतो, तूर्तास / वजीर बैस म्हणतो / तर बैस!
वाच्यार्थाने अश्वमेध कविता राजकारण्यांचे समर्थन करणारी वाटते. परंतु ती तशी नसून कवी राजकारणावर उपरोधाचे फटके ओढतात. आपले दायित्व चोखपणे बजावतात. 

वसंतोत्सव



'देवकी नंदन गोपाला' या चित्रपटात एक संवाद आहे 'आपल्या आयुष्याचं लोखंड व्हावं, सोनं व्हावं. की परिस व्हावं हे ज्याचं त्यानं ठरवायच असतं' गाडगेबाबा परीस झाले त्यांनी महाराष्ट्रातल्या भोळ्या, अडाणी बहुजन समाजाचं सोनं केलं.असाच एक परीस आज चौर्‍याहत्तर उन्हाळे - पावसाळे पाहून पंचाहत्तराव्या वर्षात दमदार पाऊल ठेवत आहे. लोहा-लोखंडापेक्षाही कवडीमोल असणारी सामान्य माणसांची कितीतरी आयुष्ये ज्याच्या स्पर्शाने उजळून निघाली त्या परिसाचं नाव आहे. माननीय वसंतरावजी धोत्रे.
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांनी बहुजन समाजाच्या मागासलेपणाचं दुखणं नेमकेपणाने ओळखलं होतं शिक्षणाशिवाय ह्या समाजाला तरणोपाय नाही. म्हणून भाऊसाहेबांनी शिक्षण संस्था काढली तिला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले. नांगर चालवणार्‍या शेतकर्‍यांच्या हाती शिवाजी महाराजांनी तलवार दिली आणि मराठ्यांचे राज्य निर्माण केले तर त्याच शेतकर्‍यांच्या मुला-मुलींच्या हातात भाऊसाहेबांनी लेखणी ठेवली आणि विदर्भात विज्ञानाचे फुलझाड लावले. मेडिकल, इंजिनियरींग अशा शाखांनी ते फुलले. चिखली ते पवनी असा विस्तीर्ण, भूप्रदेश  ‘शिवाजी’ च्या पवित्र नावाने सुगंधित झाला. अमरावतीला भाऊसाहेबांच्या स्मृतीकेंद्राच्या रुपाने आधुनिक तीर्थक्षेत्र अवतीर्ण झाले. 2000 साली तेव्हाचे राज्यपाल माननीय पी. सी. अलेक्झांडर यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला ’उत्कृष्ट संस्था पुरस्कार’ देऊन एक प्रकारे राजमान्यता दिली. गाडगेबाबा राज्य पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार संस्थेला मिळाला आधीच असलेली लोकमान्यता चहुदिशांनी बहरली.
सर्वांना सोबत घेऊन चालणारा लोकसंग्रह, कालबद्घ नियोजन आणि असामान्य प्रशासन कौशल्य हे सर्व पैलू धोत्रे साहेबांच्या संपन्न व्यक्तिमत्वात चांगले मुरलेले आहेत. काल मी एक फोटो पाहिला. ज्यात भाऊसाहेबांची परिवर्तन पालखी धोत्रे साहेब आपल्या खांद्यावरून वाहून नेत आहेत. अर्थाने ओतप्रोत भरलेली एखादी आशयसंपन्न कविता असावी. असा तो फोटो मला वाटला.
बहुजन भोळे गिळून टाकले होते अंधाराने
घरे मोडकी उभी राहिली तुझ्याच आधाराने
भाऊसाहेबांवर लिहिलेल्या माझ्याच कवितेतल्या ह्या ओळी तो फोटो पाहून मुर्तिमंत झाल्या सारख्या मला वाटल्या. परिवर्तनाची पालखी धोत्रेसाहेबांनी आपल्या खांद्यावरून वाहून तुमच्या-माझ्या अंगणात आणली बहुजनांची नवी पिढी शिकून सवरून शहाणी होऊ लागली. सभा संमेलनं गाजवू लागली. भाऊसाहेबांचं स्वप्न धोत्रे साहेबांच्या दूरदृष्टीनं पूर्ण होताना दिसू लागलं. आपण कोणत्या पदावर आहोत? त्या पदाची इतिहासदत्त जबाबदारी काय आहे. बदलत्या काळाची पावलं कोण्या दिशेनं पडत आहेत? याचेसजग भान धोत्रे साहेबांना असते.
संस्था महटली की हजारो माणसं, हजारो प्रवृत्ती हजारो स्वभाव यांचा अचूक अभ्यास लागतो. संस्थेची प्रतिष्ठा आणि शेतकरी-कष्टकरी माणसांचे हित याकरिता प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी आपले-परके, नाती-गोती, दोस्त-मित्र हे सर्व बाजुला ठेवाव लागतं. धोत्रे साहेबांच्या करारी स्वभावाला ते सहज जमतं अर्थात त्यामागे त्यांचा सहकार क्षेत्रातील प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे.
अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सुरु झालेला त्यांचा प्रवास श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदापर्यंत यशाची उत्तुंग शिखरे गाठणारा आहे. त्यातल्या एका महत्वाच्या या मुक्कामावर साहेबांनी सहकार खात्याचं मंत्रीपदही भूषविलं आहे. जिनिंग प्रेस असो की सूत गिरणी, कुक्कुट विकास असो की साखर कारखाना आणि मार्केटिंग फेडरेशन असो की, विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद प्रत्येक ठिकाणी काम करतांना त्यांनी आपली छाप पाडली. कामात जीव ओतला. कमालीच्या सचोटीने आणि आत्यंतिक निष्ठेने आपली जबादारी यशस्वीपणे पार पाडली. वारकर्‍यांच्या भक्तीभावाने या दिंडीत वाटचाल केली. म्हणून तर त्यांना संस्था ही मंदिरा इतकी पवित्र वाटते आणि भाऊसाहेब दैवताइतके पूजनीय वाटतात.
मुद्दा अंधश्रद्घेचा असो. संत तुकारामांच्या वैकुंठगमनाचा असो की शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा असो त्याबद्दल आपली परखड, वस्तुनिष्ठ मते कुणाचीही भीड मुर्वत न ठेवता ते स्पष्टपणे मांडतात. तेव्हा माझ्या सारख्यांच्या मनातला त्यांच्या बद्दलचा आदर शतगुणीत होतो. त्यांचे भाषण ऐकण्याची एकही संधी मी सोडत नाही.
शेतकर्‍यांना अधिक उत्पन्न मिळावे म्हणून ज्या कृषी तज्ज्ञांनी रासायनिक खताची शिफारस केली होती तेच कृषी तज्ज्ञ आता म्हणतात की, रासायनिक खतांमुळे शेती निकस होते, अन्न विषारी होते म्हणून तेच तज्ज्ञ आता सेंद्रिय खतांची शिफारस करीत आहेत. शेतकर्‍यांच्या जीवाशी खेळ खेळणार्‍या अशा दुटप्पी कृषी तज्ज्ञांचे परखड ऑडिट ते आपल्या भाषणात करतात.एखाद्या पट्टीच्या वक्त्यालाही वाकवता येणार नाही अशा तर्‍हेने ते मराठी भाषेला वाकवत असतात. वर्‍हाडी बोलीतला गोडवा आणि बोलण्याची लकब आपल्याला थेटपणे गाडगेबाबांच्या कीर्तन शैलीची आठवण करून देते. जीवनाची समग्र जाण आणि समाजाचे भान त्यांच्या शब्दाशब्दांतून ओथंबत असते. त्यात कधी किशोर मोरेंना पुण्याला जाऊ नका म्हणून आत्मीयतेने सुचविलेले असते तर कधी खांद्याला खांदा लावून काम करणारा डॅडी सारखा सहकारी मित्र गेला म्हणून मनभरुन जिव्हाळा असतो.
त्यांच भाषण असं वेगवेगळ्या प्रसंगी अनुभवांच्या रोकड्या तत्वज्ञानानं मला आत आत खोलवर भिडलेलं आहे. प्रेमानं जवळ घेऊन समजावणार्‍या प्रेमळ मातेसारखे अशावेळी ते वाटतात. तर शिक्षक-कर्मचार्‍यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देताना त्यांचे कठोर शब्द मला आपल्याच भल्यासाठी बोलणार्‍या पित्यासारखे असतात.
अशा पितृतुल्य माणसाच्या वाढदिवशी अभिष्टचिंतनाचे चार शब्द लिहितांना संत तुकाराम, गाडगे बाबा आणि भाऊसाहेब या आपल्या दैवतांच्या चरणी प्रार्थना करुन धोत्रे साहेबांसाठी निरामय आयुष्याचे शतक पूर्ण होण्याचे वरदान मागू या. 

माझी गझल : तीन गोष्टी

पहिली गोष्ट-

मराठीत ग़ज़ल असे लिहिणे आता-आतापर्यंत रूढ नव्हते.कविवर्य सुरेश भट गेल्यानंतर काही लोकांनी आपण काहीतरी नवीनच Contribution द्यायला पाहिजे या भ्रमाने ‘गझल’ ला ‘ग़ज़ल’केले.भट साहेबांनी आयुष्यभर ‘गझल’ हेच शब्दरूप स्वीकारल्याचे भरपूर छापील पुरावे आहेत.तसेच मराठी विश्वकोषाचे मुख्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही ‘गझल’हेच शब्दरूप मराठी विश्वकोषात सर्वत्र स्वीकारले आहे.आणि तेच बरोबर आहे असे मला वाटते. कारण मराठी वर्णमालेमधे ‘ग+ ह’ आणि ज+ह असा ‘हकार’युक्त घशातून निघणारा उच्चार दर्शविणारा ग़ आणि ‘ज़’ वर्ण नाही.अक्षरांखाली नुक्ता देऊन उच्चार दर्शविण्याची मराठीची परंपराच नाही.
दुसरी गोष्ट-
‘शब्दांवर हुकुमत असली आणि लय अंगवळणी पडली तर कविता लिहिणे फारसे कठीण नसते’हे मर्ढेकरी सूत्र मला गझलच्या बाबतीत तर अधिक गांभीर्याने  घेतले पाहिजे असे वाटते.लिहिता येते म्हणून लिहित राहणे मला उचित वाटत नाही.मी गझल लिहायला सुरुवात केली तेव्हा माझ्या समोर दोन रोल मॉडेल होते.एक:सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’. दुसरे : दुष्यंतकुमारांचा ‘साये मे धूप’.यातले दुष्यंतकुमार मला अजूनही अधिक भावतात.केवळ बावन्न गझलांच्या निर्मितीने त्यांचे स्थान हिन्दी गझलांच्या विश्वात अव्वल आहे.एकीकडे गझलांची संख्या जशी जास्त नाही तशीच प्रत्येक गझलांच्या शेरांची संख्याही पाच- सहाच्या वर नाही.काही मोजक्या गझला सात शेरच्या आहेत.शिवाय कुठल्याही गायकाने गायिल्यामुळे त्यांच्या गझला प्रसिद्ध पावल्या नाहीत.‘मै जिसे ओढता बिछाता हूँ।’ ही एकमेव गझल  मीनू पुरुषोत्तम यांच्या स्वरात ऐकल्याचे मला आठवते.दुष्यंतकुमारांच्या प्रखर सामाजिक जाणिवेच्या अभिव्यक्तीला नादमधुर शब्दकळा आणि गायनसुलभ आशय मानवणारे नव्हते. तरीही  त्यांची रसिकप्रियता गेल्या पस्तीस वर्षात  कमी न होता उलट नव्या पिढीसोबत वाढलेली दिसते.याचे गुणगमक मराठी गझलेला गवसले पाहिजे असे मला वाटते.
तिसरी गोष्ट-
मराठीतल्या अनेक थोरा-मोठ्यांनी माझ्या गझलेला  वाखाणले नसते तर कदाचित गेल्या पस्तीस वर्षात उण्या-पुर्‍या शंभरेक गझला लिहिण्याचे धाडसच मी करू शकलो नसतो.असे मला नम्रपणे नोंदवावेसे वाटते.त्यातले काही मासले साभार आपणापुढे  ठेवतो-
पु.ल. देशपांडे-
‘तुम्हाला गझलरचनेची नस सापडली आहे.’
वि.वा.शिरवाडकर
‘गझल प्रकारावर आपले चांगले प्रभुत्व आहे.’
ना.घ.देशपांडे-
‘रविकिरण मंडळ व त्यांच्यापैकी माधव ज्यूलियन यांनी मराठीत गझल बरेच रचले. त्यानंतर आता श्रीयुत सुरेश भट यांनी मराठीत गझल ब-याच प्रमाणात केले. आता हा श्रीयुत राऊत यांचा गझलांचा संग्रह मराठीत आला.या कवीची मनोभूमिका शोकात्मक आहे. जगाने या कवीवर अन्याय केला आहे अशी त्याची तक्रार आहे. या भावनेने हा संग्रह भरलेला आहे. `Our sweetest songs are those that tell of saddest thought'या शेलेच्या वचनाची आठवण हा संग्रह वाचताना येते.
______________________________________
मंगेश पाडगावकर-

‘विसंगती हेरण्याची आणि चांगल्या अर्थाने वक्तृत्वपूर्ण उठाव देण्याची उत्तम शक्ती तुमच्या शैलीत आहे. तसेच, क्षुद्र स्वार्थाच्या, हपापाच्या पलीकडच्या उदात्त जगण्याचे खोल आकर्षण तुम्हाला आहे. ही सर्व तुमच्या या गझलांतील जमेची बाजू आहे. परंतु इथे एका गोष्टीकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. अशा त-हेच्या गझला वाचताना नंतर नंतर एकसुरीपणा जाणवतो. जीवन-दर्शनात तोचतोपण आल्यामुळे, शैलीतील वक्तृत्वाचे घटक काहीशा भडकपणे स्वत:कडे लक्ष खेचून घेण्याचा प्रयत्न करु लागतात! उपरोधामागची सात्त्विक प्रेरणा फिकी होऊन, त्यात एक प्रकारचा नाटकी आवेश शिरू लागतो; आणि हळूहळू यशस्वी लकबींची हुशारीने केलेली पेरणी असे स्वरूप लेखनाला येण्याची शक्यता निर्माण होते. तुमचे असे झालेले नाही.
______________________________________
गझलगंधर्व सुधाकर कदम-
 ‘उत्कर्षाचा मार्ग नेहमीच खडतर, अवघड असतो़. हा मार्ग पार करायचा असेल तर अंगावरील रुढींचे सारे पाश आणि दुबळ्या विचारांचे दोरखंड तोडूनच वाटचाल करावी लागते़. ही बाब शिक्षण घेत असतांनाच श्रीकृष्णाच्या लक्षात आली़. त्यानुसार त्याने स्वतःला घडविले़. ह्या गोष्टीचा त्याला योग्य अभिमान असला तरी दुराभिमान नाही. समाजात ज्या नीती - कल्पना, परंपरा चालत आल्या त्या सदैव कल्याणकारीच असतात असे नाही हे त्याने बरोबर हेरले होते. त्याचे प्रतिबिंब गझलांमधूनही ठळकपणे दिसून येते. बालपणापासून ग्रामीण भागातील शेतकरी-कामकरी वर्गात वाढल्यामुळे त्याला या वर्गाची विचारसरणी प्रामाणिक आणि जवळची वाटल्यामुळे त्याचाही प्रभाव श्रीकृष्णाच्या गझलांवर पडलेला दिसतो़.’
_____________________________________
डॉ.अविनाश सांगोलेकर-
‘श्रीकृष्ण राऊत ह्यांची गझल ही तंत्रशुद्ध आणि अस्सल मराठमोळ्या मराठी गझलेचा जिताजागता नमुना आहे़ विदर्भाने मराठी गझलसृष्टीला अमृतराय, उ. ऱा़. गिरी, सुरेश भट ह्यांच्यासारखे ज्येष्ठ व श्रेष्ठ गझलकार दिले; डॉ़ राम पंडितांसारखे तळमळीचे गझल अभ्यासक दिले़ श्रीकृष्ण राऊत हे ह्याच विदर्भातील आहेत आणि ते विदर्भाची ही उज्वल परंपरा पुढे नेतील, इतकेच नव्हे तर ही परंपरा अजून अधिक उज्वल करतील़ असा भरंवसा त्यांच्या गझलेतून मिळत राहतो़ त्यांच्या गझलेचे स्वागत सुरेश भट, वि़.वा़.शिरवाडकर, पु़.ल़.देशपांडे, ना़.घ़.देशपांडे, मंगेश पाडगावकर अशा अनेक दर्दी ज्येष्ठांनी केलेले आहे़
______________________________________
डॉ.मधुकर वाकोडे-
‘संतांचे अभंग असोत किंवा पंडितांचे श्लोक असोत. कविची कविता असो किंवा शायरची गझल असो... कालातीत असण्याचा एक मोठा मापदंड म्हणजे ह्या रचनांना लाभलेले सुभाषितांचे सामर्थ्य! श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेतील कितीतरी शेर, कितीतरी चरण सुभाषितांच्या पातळीवर वावरतात.’
______________________________________
डॉ.किशोर सानप-
‘कवी श्रीकृष्ण राऊतही तुकोबांच्याच कविकुलातले कवी आहेत. तुकोबांच्या शब्दांना आजच्या काळात धार देण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी, तुकारामांच्याच वारसदारांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. तुकारामा ह्या गझलेत तुकोबा कुलीन उत्तरदायित्व कवीनं जोखलं आहे. ही गझल त्याची साक्ष आहे.’
______________________________________
वसंत केशव पाटील-
‘राऊतांच्या गझलेचा प्रदेश आणि भावार्थाची भूमी केवढी प्रमाथी तसेच प्रभावी आहे, हे वेगळे सांगावे लागत नाही. शेवटी, एक गोष्ट आवर्जून नोंदवावीशी वाटते. ती म्हणजे राऊतांच्या गझलांमध्ये ठायीठायी अन्याय-अत्याचाराविषयीचा जो आकांत आला आहे, त्याबद्दल. ही काही कवीची स्वतःची एकट्याची व्यक्तिगत कैफियत आहे असे न समजता, तो व्यापक जनसमूहाचा पुकार आहे, हे ध्यानात घेतले की कवीच्या अनुभूतीचा आसमंत किती अपार आहे. हेच मनावर ठसते. हा गझलयात्री आजही नवनव्या गोष्टींना स्वागतशीलपणे भिडतो आहे, हे प्रसादचिन्ह मला फार मोलाचे वाटते.’
____________________________________

काळाच्या दगडावरची रेघ : श्रीधर अंभोरे


प्रिय श्रीधर अंभोरे,
मे १९८३ ला तुझ्या रेखाचित्रांना मिळालं फाय फौंडेशनचं पारितोषिक पाच हजार रुपयांचं. हे ऐकून-वाचुन आज माझं मन  प्रसन्न झालं आहे. वार्‍यापेक्षाही हलकं... अगदी तरल मनात आत... आत... खोल... खोल... अंतर्मनाच्याही पार पल्याड कुठंतरी हळुवार  उमलत आहेत एका अलौकिक हर्षकमळाच्या पाकळ्या. ह्या उमलण्याची मोरपंखी संवेदना जाणवत आहे मला तीव्रपणे, ह्या आनंदलाटा, ही  सुखद भरती, हा हर्षकल्लोळ...! अभिनंदन ह्या तोकड्या शब्दांच्या इवल्याशा ओंजळीत सामावणारे नाही. सामावणे केवळ अशक्यच!  जगातल्या संपूर्ण भाषा आणि तमाम लिपींनाही शक्य् ा नाही माझी ही सविकल्प समाधी शब्दबद्घ करणं... मी अनुभवीत आहे एक  शब्दातीत स्पंदन हृदयाचा गाभारा झंकारित करणारा एक नादमय हिंदोळा... शब्दांच्या मिळीला लख्ख आव्हान करणारा काव्यमय पारा.  जो निसटू पाहतो आहे क्षणोक्षणी आणि मी... जिवाच्या आकांतानं करतोय प्रयत्न त्या काव्यमय पार्‍याला अलगद धरण्याचा... अलगद  कवटाळण्याचा... अध्धर उचलण्याचा...
रूपाला आग लागलेल्या अभिजात सौंदर्यवतीच्या सौंदर्याची द्यावी दाद तिच्या हातबोटांची पटापट चुंबनं घेऊन, तशी द्यावीशी  वाटते मला दाद... आज... तुझा निग्रोसारख्या काळ्याशार बोटांची, घ्यावीशी वाटतात चुंबनं पटापट... कदाचित... कदाचित... तीही माझ्या  मनाचं वाटणं व्यक्त करू पाहणारी असेल एक देखणी तर्‍हा..
तुझ्या जीवघेण्या रेषा तर केव्हाच गोंदून घेतल्या आहेत मी माझ्या डोळ्यावर आणि ओवाळून टाकला आहे जीव तुझ्या  रेखाचितांवरून, तुझ्या मैत्रीवरून व तुझ्यावरूनही त्रिवार ! अशा विलक्षण नात्यानं घ्माझ्याङ झालेल्या तुझ्या अफलातून रेषांची कदर केली  आहे फाय फौंडनने. पाच हजारांचं पारितोषिक देऊन.
डॉ. जयंत नारळीकर, आर. के. लक्ष्मण, जी. ए. कुलकर्णी यांच्यासोबतच तुझाही गौरव करणार्‍या फाय फौंडेशननं तुझ्या  गौरवाला दिली एक झळाळती किनार, एक लखलखती झालर, एक वेगळं डायमेन्शन...! हे तर सगळे आपापल्या क्षेत्रातले घ्बापङ आणि  तुझ्या सुकुमार रेषांची नव्हाळी... आताशा कुठं घ्मॅच्युअरङ झालेली. तुझ्या तारुण्याच्या आणि तुझ्या रेषांच्या यौवनाच्या उंबरठ्यावर असं  घ्मापङ शिगोशिग भरून ठेवणार्‍या फाय फौंडेशनचं मी करतोय मन:पूर्वक अभिनंदन आणि देतोय शतश: धन्यवाद फाय फौंडेशनला.
ग्रेसच्या शब्दांची सोबत करण्याची तुझ्या रेषांची इच्छा पूर्ण केली तरुण भारतातल्या घ्मितवाङ नं. माझ्या कवितांसाठी तू  काढलेल्या त्या रेखाचित्रांनी मला दिलेल्या तुझ्या इच्छापूर्तीचा आनंद अनुभवतानाही मी झालो होतो असाच हलका, तरल, हळवा.
कवींना भेटायला याव्यात कल्पना, शब्द तशाच येत असतील तुला भेटायला रेषा... विविध आकार लयबद्घ करीत लवचिकपणे  आणि घनगर्द मेघातून नर्तन करीत यावी वीज तशा असतील उमटत तुझ्या बोटांतून कागदावर... शाईतून जळत... उजळत...
अकोला जिल्ह्यातील चिखलगावला तुझ्या जन्मगावी... अंबादास अंभोरे-तुझे बाप... बापाच्या हातात दोर... कधी सरळ... कधी  लयदार... मधात ढोर... अलीकडे सगळं बळ एकवटून ढोराला लोटणारा तुझा इवलासा जीव आणि एक क्षण मंतरलेला, भारावलेला, तुझ्या  रोमरोमी भिनलेला. अख्खे अस्तित्व व्यापून टाकणारा, तुझ्या डोळ्यापुढं अस्पष्ट होत गेला पलीकडचा बाप आणि पुसट होत गेले  अलीकडचे ढोरही... तुझ्या घनगर्द बुबुळांवर विजेचे भयभयाटी नर्तन करणारा फक्त दोर ठळकपणे... कधी सरळ... कधी लयदार... कधी  सरळ ! दोर राहिलाच नाही. तो झाला अभिव्यक्तीचं एक रूप. एक रेषा. तुझ्या बोटांना एक अपूर्व कंप, एक नवथर थरथर, एक नवजात  अप्रूप ! याचक्षणी झाली तुला रेषा प्रसन्न-कधी सरळ, कधी लयदार...
एक वेगळाच कॅमेरा झाला तुझ्या डोळ्यात फिट. आखरातल्या निष्पर्ण बाभूळबनातील एकमेकात गुंतलेल्या काळ्याभोर  असंख्य काड्या स्वत:चे आकार ठसवीत शिरल्या तुझ्या डोळ्यात कायमच्या. बसल्या रुतून. निगेटिव्ह बनून. कधी त्या उमटायच्या  पॉझिटिव्ह होऊन शाळेच्या पांढर्‍या शुभ्र भिंतीवर कोळशानं तर कधी उमटायच्या काळ्या डांबरी सडकेवर लेखणीच्या तुकड्यानं. जशी ही  अभिव्यक्ती होती अटळ, अपरिहार्य, अविभाज्य, बाहेरून कुणाची जबरदस्ती नव्हती तुझ्यावर-तू चित्रं काढावीस म्हणून. तुझा छंद  जोपासण्याची नव्हती कुणाची इच्छा आणि ऐपतही. ही होती फक्त तुझी निखळ अंत:प्रेरणा, व्यक्त होण्यासाठी बेचैन  करणारी  उमटण्यासाठी अस्वस्थ करणारी.
अशीच एकदा चिखलगावात लागलेली आग. अजूनही जळते तुझ्या डोळ्यात एक निगेटिव्ह बनून. आग विझवण्यासाठी घागरी  घेऊन जाणार्‍या बाया... त्यांच्याही देहांचे घट आणि लयदार घाट उमटतात त्या निगेटिव्हमधून लयबद्घ आकार घेत. देहांचे घट आणि  मातीच्या घागरी एकमेकात मिसळून... ‘अस्मितादर्श’च्या पानावर... एक अप्रतिम रेखाचित्र होऊन.
डॉ. पानतावणे सरांनी सर्वप्रथम तुला दुकानात नेऊन दिली करून ओळख... आर्टपेपरची शाईची... विविध पेनांची आणि  रंगांचीही. नंतर रंगांशी खेळून पाहिलंस तू काही दिवस; पण रंग लागले नाहीत तुला धार्जिणे, जमला नाही तुझा सुर त्यांच्याशी आणि  खुणावत राहिल्या तुला रेषा नवनव्या तर्‍हेनं. कात टाकून नजर ठहरू न देणार्‍या नागिणीसारख्या पुन: पुन्हा...
बसस्थानकावर दहाच्या पुढं सर्व बसेस निघुन गेल्यावर जसा भोगी मिळाला तशी रात्र काढीत... आरामात देह अंथरणार्‍या  प्रवाशांचे आकारही बनतात. तुझ्या डोळ्यात निगेटिव्हज... आणि त्यांच्या हातापायांची वळणं... देहाची लय...अंगभूत वेदनांची जाणवते  तुला. मग त्या वेदनेचा वेध घेणार्‍या रेषा उमटवितात कागदार थकलेले भाग, तिच्या अंगावरची कोमलता व्यक्त करतात फुलं अशावेळी  तुझं रेखाचित्र इतकं काव्यमय होऊन गेलेलं असतं की, वाटतं रेषांनी संवाद करू पाहणारी ही एक कविताच आहे.
जगण्याचे संदर्भ, आकार, स्पर्श, वळणं, निद्रा, सौंदर्य... आपण जे अनुभवतो, जगतो ते सर्व तुझ्या रेषा पकडू शकतात सहज.  तुझ्या रेषा म्हणजे आमच्या अवतीभोवतीच्या संपूर्ण जीवनाचा बिलोरी आरसा, प्रतिबिंबं, माणसांची, झाडांची, चिमण्यांची, पाखरांची, फुलांची,  पानांची, मंगळसूत्राशी खेळत चुटुचुटु दुध पिणार्‍या तान्हुल्यांची. हीच आहेत तुझ्या चित्रकलेची विद्यालयं, महाविद्यालयं आणि विद्यापीठंही.
अहमदनगरच्या पोस्टाच्या काऊंटरवरही आल्या एखाद्यावेळी भेटायला रेषा तर आता टाळणं नाही तुझ्या हातात आणि  हातात असलेला पगार पुस्तकं विकत घेण्यात आणि चक्रमुद्रित घ्आदिमङ चे छापील दिवाळी अंक काढण्यात लावतोस तू सत्कारणी.  मिळवतोस दूर, दूर परदेशातही जिवाभावाचे मित्र, मैत्रिणी. अशी तुझी जगावेगळी कमाई ! तुझ्या रेखाचित्रांतील झाडांवर, पानांवर, फुलांवर,  दगडांवर आणि माणसांवरही येऊन बसणार्‍या इवल्या-इवल्याशा चिमण्या तुझ्या चित्रांना करून टाकतात सजीव, ह्या चिमण्या म्हणजे तर  चैतन्य तुझ्या चित्रांचे, प्राण तुझ्या रेषांचा. किती इमानदार असतात चिमण्या ! तू जेवतोस त्यांना ताटात घेऊन आणि त्या तुझ्या चित्रात  ओततात जीव स्वत:च्या इवल्याशा अस्तित्वानं.
तुझ्या रेखाचित्रांतील माणसांना नसतात चेहरे; पण अवतीभोवती डोळसपणे पाहिलं की दिसतात आम्हाला तुझ्या  रेखाचित्रातील माणसं जगताना, हिंडताना, झोपताना, तुझ्या रेखाचित्रांवर लिहिताना अर्थातच सुस्पष्टपणे ठाऊक आहे मला माझ्या जाणिवेचं  सामर्थ्य आणि मर्यादाही. त्या दोहोंवरही पारखून आणि कस लावूनच मी घ्वेगळेपणङ मागंपुढं ओळखलंही जाईल अंभोरेशैली म्हणून  आणि काळाच्या दगडावर उमटेल एक ठसठसीत रेघ... तेव्हा येणार्‍या पिढ्या सांगतील एकमेकांना त्या रेषेचं नाव-श्रीधर अंभोरे !

झिंगतो मी कळेना कशाला


सुधाकर कदम, ये किस चीजका नाम है?
हे आता जवळ जवळ संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे़ पुन्हा सांगण्याची काही गरज नाही, वाट आहे फक्त आता एकच की महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून कॅसेट रेकॉर्डरवर हा आवाज दर्दी गझल प्रेमींना कधी मोहिनी घालायला सुरवात करतो आणि तो नुसताच मोहिनी घालणार नाही तर त्यापुढे जाऊन थेट हृदयात त्याचे स्वतःचे घर ही करेल, आणि तुम्ही-आम्ही नुसतेच बघत राहू-ऐकत राहू़ इतकं स्वर, सौंदर्य व काळजात सरळ उतरवण्याची देखणी अदा सुधाकरच्या गळ्यात आहे़ मागेपुढे एखाद्या मैफिलीत सर्वांच्या समक्ष एखाद्या दर्दी गझल ने त्यांच्या गळ्याचे चुंबन घेतले नाही तर नवल नाही़.
कवीला काय म्हणायचे आहे? काय सांगायचे आहे? काय सुचवायचे आहे? ते कवी कमीतकमी आणि नेमक्या शब्दात मांडतो़ तरी आशयाचा एखादा पैलू, अर्थाचा एखादा पदर रसिकाला गझल वाचून पूर्णपणे उलगडेलच असे नाही आणि गझलच्या बाबतीत तर ‘समजणे’ हे क्रियापद किती थिटे आहे हे आपल्याला कालांतराने का होईना पण समजल्याशिवाय राहत नाही़ तेव्हा अर्थाच्या पूर्णत्वाकडे आणि आशयाच्या सघनतेकडे रसिकाला हळुवार सुखवटीतून घेऊन जाण्याचे काम गझल गायक आपल्या गळ्याच्या ताकदीने करीत असतो़. आणि मला वाटते गझल गायनाचं खरं सामर्थ्य यातच आहे़ नुसत्याच गायकीचं कसब दाखवायचं असेल तर इतर गायन प्रकार काय थोडे आहेत?
ही जाण सुधाकर कदमांना आहे़ याचा मनापासून आनंद झाला़. ती जसजशी विकसित झाली; तसतशी गझल त्यांना प्रसन्न झाली.
शब्दातील आशयाचा सुगंध कधी दरवळू लागला,स्वरांच्या सौंदर्यलहरींनी कधी काळजात भरू लागला ह्याचे भान श्रोत्यांनाही राहू नये व गझल गायकालाही. इतका गझल गायकाने महफिलचा अंशनअंश गझलमय करून टाकला पाहिजे. म्हणजेच शब्दांतील आशयाचा सुगंध व स्वरातील सौंदर्य हळुवार आंजारत- गोंजारत एकाच वेळी शब्दातील कवी व स्वरातला गायक एकमेकांशी खेळीमेळीने वागत असल्यासारखे पेश केले पाहिजे. सुधाकर कदमांना हे साधलं आहे हे विशेष ! ते शब्दातल्या कवीला कुठे दुखावत नाहीत तर स्वरातल्या गायकाला कुठे मुरड घालत नाहीत; हे त्यांना जितके अधिक आत्मसात होईल तितकी त्यांच्यावर जान देणार्‍यांची संख्या वाढत-वाढत जाऊन चांदण्यांसारखी मोजता येणार नाही़.
गझल पेश करण्यापूर्वी गझलच्या एकंदर रुपाची झलक एखाद्या शेरमध्ये दाखविण्याची त्यांची शैली गुलाम अलीची आठवण करून देणारी असली तरी काही आठवण फार सुखद असतात, त्या तर्‍हेची ही आठवण आहे़. त्यामुळे होणार्‍या वातावरण निर्मितीने श्रोत्यांना विश्वासात घेतल्या जाते; नंतर स्वतःच्या आयुष्यातील एखादा अनुभव ज्या तन्मयतेने आपण हळुवार सांगतो तितक्या आत्मियतेनं कवीच्या शब्दातला अनुभव फुलविल्या जातो - खुलविल्या जातो - श्रोत्यांपर्यंत पोचविल्या जातो व त्यांना पुनः प्रत्ययाचा आनंद होतो़.तो एक प्रकारचा सूचक असा गोड इशारा असतो़. वाट कोणत्या स्वर्गाकडे जाते हे दिग्दर्शीत करणारा फलक असतो़. आणि मला वाटते ही शैली गझल गायनाचा एक शृंगार आहे़.
मी सुखद आठवण म्हणतो ते या अर्थाने. रसिकांना ही सुखद आठवण चालेल कारण त्यानंतरची स्वर्गनिर्मिती ही आपल्या साधनेच्या ऐपतीप्रमाणे करणे हे प्रत्येक गझल-गायकाचे स्वतःचे योगदान असते आणि ते योगदान सुधाकर कदम आपल्या स्वरांच्या आरोह-अवरोहातून, रागांच्या माध्यमातून आणि हार्मोनियमवरील आपल्या बोटातून ‘दिल खोलके’ देतात तेव्हा ऐकणारा तृप्त होतो़.आणि गुणगुणत राहतो-

‘झिंगतो मी कळेना कशाला
जीवनाचा रिकामाच प्याला.’

सुरेश भटांची मराठी गझल

सुरेश भटांची मराठी गझल
श्रीकृष्ण राऊत
□□
मराठी कवितेच्या इतिहासाला कविवर्य सुरेश भटांचं नाव विसरता येणार नाही. गझलचा शक्तिशाली आकृतीबंध त्यांनी मराठी कवितेला दिला. स्वत:च्या मराठी गझलांनी त्यांनी मराठी कवितेचं दालन समृद्ध केलं.मराठी कविता अधिक श्रीमंत केली.
एखादं मिशन चालवावं इतक्या निष्ठेने त्यांनी मराठी गझलचा प्रसार-प्रचार केला. उर्दू गझलकारांच्या परंपरेप्रमाणे उस्तादाच्या भूमिकेतून नव्याने गझल लिहिणा-या कवींच्या गझलात दुरूस्त्या सुचविल्या. त्यांना ‘इस्लाह’ दिला. मराठी कवितेच्या परंपरेत एखाद्या जेष्ठ कवीने अशा प्रकारे नव्या कवींच्या रचनात दुरूस्त्या करणे बसणारे नव्हते. म्हणून त्यांच्यावर टीकाही खूप झाली. ‘नव्या कवींची एक पिढी त्यांनी वाया घालवली’ असा इल्जाम त्यांच्यावर लावण्यात आला. पण त्यांनी अशा प्रकारच्या टीकेला भीक न घालता, समीक्षकांच्या तथाकथित विरोधाला न जुमानता आपले मिशन अधिक नेटाने, अधिक जोमाने पुढे नेले.
केवळ गझल ह्या एखाद्या काव्यप्रकाराला वाहिलेली संमेलनं आज भरवली जातात. आणि ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाइतकीच साहित्येतर कारणांसाठी गाजतातही. मराठीतल्या ह्या गझल प्रेमाचे मूळ कविवर्य सुरेश भटांच्या ‘गझल मिशन’ मध्ये आहे, हे विसरून चालणार नाही.
मराठी गझलचा हा सिलसिला आजपासून जवळपास पन्नास वर्षांआधी सुरू झाला आहे. १९५५ पासून सुरेश भटांनी मराठी गझल लेखनास प्रारंभ केला. एकाहत्तर वर्षांच्या आयुष्यातली पन्नास वर्षे सुरेश भटांनी मराठी गझलला दिली आहेत. तेव्हा कुठे आत्ता आत्ता अलीकडे तिला प्रतिष्ठा प्राप्त होते आहे. गझल प्रेमाच्या वेडाने झपाटलेला हा अर्धशतकाचा कालखंड पाहिला की सहजपणे उर्दूतील श्रेष्ठ गझलकार गालिबचा शेर आठवावा -
.
‘आह को चाहिए इक उम्र असर होने तक
कौन जिता है तेरी जुल्फ के सर होने तक’
.
आपल्या आयुष्यातली पन्नास वर्षे मराठी गझलला अदा केल्याची पावती म्हणून मराठी रसिकांनी सुरेश भटांना ‘गझल सम्राट’ हा किताब बहाल केला. हे जग कोणालाच काही फूकट देत नाही. त्याची पुरेपूर किंमत वसूल करून घेते.इतरांच्या यशावर असूयेने जळत आणि आत्मवंचनेने कुंथत राहणा-यांना म्हणूनच तर ते कबीराच्या तो-यात सांगतात -
.
‘फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही’
.
इथे आपल्याला चटकन कबीराची आठवण होते-
.
‘कबीर खडा बजार मे लिए लू काठी हाथ
जो घर जारे आपना चले हमारे साथ’
.
असे खडे बोल सुनावणा-या कबीराचा ‘एल्गार‘ आणि दंभावर प्रहार करणा-या तुकारामाचा ‘झंझावात’ त्यांच्या गझलेत बेमालूम एकरूप झालेला दिसतो.
.
‘इथे मागून ही माझी समाधी बांधली गेली
जिथे मी गाडला गेलो अरे ही तीच आळंदी’
.
ज्ञानेश्वरांच्या समाधीला एक प्रतिमारूप देताना चमत्कारिक इतिहासाविषयी त्यांनी व्यक्त केलेली काव्यात्मक प्रतिक्रिया आपल्याला ‘सत्य-असत्याशी मन केले ग्वाही’याचा पुन:प्रत्यय देणारी आहे.
सुरेश भटांच्या नावावर आजच्या घडीला सहा कविता संग्रह जमा आहेत. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’ ‘सप्तरंग’ आणि ‘रसवंतीचा मुजरा’अशी त्यांची शीर्षकं आहेत.
यापैकी निव्वळ गझलांचे म्हणता येतील असे संग्रह म्हणजे ‘एल्गार’आणि ‘झंझावात’. भटांच्या स्वभावातील रोखठोकपणा आणि आक्रमकता त्यांच्या गझलांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होते तशीच त्यांच्या संग्रहांच्या ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ शीर्षकांतूनही अभिव्यक्त होते.
मराठी कवितेवरील आक्रमण आणि मराठी कवितेतील वादळ म्हणजे गझल असा आशय सूचविणारी ती शीर्षके आहेत.
सुरेश भटांच्या मराठी गझलांचा प्रवास आजही कालानुक्रमे न्याहाळायचा झाल्यास आपल्याला त्यांच्या ‘रूपगंधा’ या पहिल्या संग्रहापासून सुरूवात करावी लागेल.
१९६१ साली प्रसिद्ध झालेल्या ‘रूपगंधा’ या त्यांच्या पहिल्या संग्रहात एकूण ७२ कविता आहेत. त्यापैकी फक्त सात रचनाच गझल प्रकारात आहेत.
.
‘मल्मली तारूण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे
.
रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे ! तू मला बिलगून जावे!’
.
‘रूपगंधा’ या शीर्षकाच्या अशा मल्मली श्रृंगारांच्या रेशमी गझलने संग्रहाची सुरूवात होते.उर्दूत एकच विषय उलगडत नेणा-या गझलला ‘मुसलसल गझल‘ म्हणतात. भटांच्या सुरूवातीच्या अनेक गझला या प्रकारात मोडणा-या आहेत.याच संग्रहातल्या विविध विषयाच्या इतर गझला पाहिल्या तरी त्यांच्यात आशयाचे एकत्र सूत्र पाण्यातल्या तरंगासारखे विस्तारताना आपल्याला दिसते.
.
‘पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी
जीवनापासून माझ्या या मला मुक्ती मिळावी’
.
‘वेदनेला अंत नाही अन् कुणाला खंत नाही’ असं जगणं चाललेलं असताना मृत्यूचं असलेलं स्वाभाविक आकर्षण नंतरच्या संग्रहातूनही त्यांच्या गझलात निनादत राहिलं.
.
‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’

किंवा

‘मेल्यावरी जगाचे आभार मानले मी
जाऊ दिले मला हे उपकार मानले मी’
.
सुरूवातीच्या मृत्यूचं आकर्षण परिपक्व होत होत उदात्ततेकडे झुकताना आपल्याला दिसतं.‘रूपगंधा’ या पहिल्या संग्रहातील आणखी एक प्रसिद्ध गझल अशी आहे-
.
‘माझिया गीतास द्वेषाचा जुना आधार आहे!
माझिया द्वेषास विश्वाच्या व्यथेची धार आहे!
.
हेलकावे मी पुढे येता मिठी सा-या फुलांची,
हे बरे झाले... इथे माझ्या उरी अंगार आहे!’
.
नंतरच्या गझल लेखनाची नांदीच एकप्रकारे या गझलच्या ओळीतून आपल्याला जाणवते.
फुलांच्या मिठीचा नाजुक साजुक श्रृंगार आणि उरात विश्वाच्या व्यथेचा धगधगता अंगार अशा दोन धृवात सुरेश भटांच्या सर्व गझला हेलकावत राहिल्या.
गझल लेखनाला प्रारंभ केल्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा संग्रह १९७४ साली प्रसिद्ध झाला. ह्या संग्रहात एकूण ८२ कविता आहेत. त्यापैकी ३४ कविता ह्या गझल प्रकारातील आहेत.
ह्या संग्रहातील बहुतांश गझला देखील एकच आशय उलगडून दाखविणा-या आहेत. प्रत्येक शेर आशयदृष्ट्या स्वतंत्र असलाच पाहिजे अशी गझलची आग्रही व्याख्या ‘रंग माझा वेगळा’ प्रसिद्ध होईपर्यंत तरी भटांनी स्वीकारल्याचे त्यांच्या गझल लेखनातून जाणवत नाही.
.
‘समजावुनी व्यथेला समजावता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले’

किंवा

‘जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही’

किंवा

‘दिवस हे जाती कसे अन् ऋतू असे छळतात का
विसरतो आहे तुला पण आसवे ढळतात का?’

किंवा

‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले!
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले!’
.
-अशी कितीतरी उदाहरणे घेता येतील. माधव जूलियनांनी दिलेल्या संज्ञेत बोलावयाचे तर अशा सर्व गझला ‘एक पिण्डी भावगीतासारख्या’ उलगडत जाणा-या आहेत.

‘रंग माझा वेगळा’ हे भटांच्या काव्यप्रवासाचे एक महत्त्वाचे वळण आहे. ज्या वळणावर त्यांचे गीत लेखन मागे सुटले आहे. आणि ‘मुसलसल गझल’ देखील मागे पडली आहे.आणखी एक महत्त्वाची गोष्ट ‘रंग माझा वेगळा‘ नंतर घडलेली आपल्याला आढळते. एखाद्या गझलेत जास्तीत जास्त नऊ शेर लिहिणारे भट मात्र ‘एल्गार’ मध्ये सुचतील तेवढे तेरा शेर एकाच गझलमध्ये घालताना दिसतात.आशयदृष्ट्या शेरांची विविधता लक्षात घेतली तरी एकसंध काव्यकलाकृतीला उणेपणा आणत एखादा शेर गझलची विण सैलसर करतो.
निव्वळ गझलांचे असलेले भटांचे दोन संग्रह म्हणजे ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’.
‘एल्गार‘मधे ११९ कविता आहेत. त्यापैकी ९४ गझल प्रकारातल्या आहेत. तर झंझावातामध्ये एकूण ९६ कविता आहेत आणि त्यापैकी ७३ गझला आहेत.
संख्यात्मक वाढीच्या दृष्टीने ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ हे त्यांच्या गझल प्रकारातले महत्त्वाचे पडाव आहेत. पण गुणात्मक वाढीच्या दृष्टीने मात्र ते ‘रंग माझा वेगळा’ इतके गोळीबंद गझल देणारे वाटत नाहीत. आकाराच्या बाह्य अंगाने त्याचे महत्त्वाचे कारण सूचतील तेवढे शेर एका गझलेत घालणे हे जसे असावे, तसेच अंतरंगाच्या अंगाने तपासून पाहिले तर त्याच त्या लाडक्या आणि आवडत्या प्रतिमांची पुनरावर्तने हे दुसरे कारण असावे..
‘झंझावात’च्या प्रस्तावनेत भटांनी लिहीलेले एक वाक्य आहे ‘मानवी प्रेम जगाला सुंदर बनवते, पण ज्या जगात प्रेम, चंद्र, चांदणे, तारे, फुले, संगीत, साहित्य आणि अजून कितीतरी सुंदर गोष्टी आहेत. ते जग हृदय असलेल्या जिवंत माणसांनी जगण्याच्या लायकीचे बनवले पाहिजे’.
या त्यांच्या वाक्यातील प्रेम, चंद्र, चांदणे, तारे, फुले, संगीत, साहित्य ही जी यादी आहे. त्यात अश्रु आणि स्वप्ने मिळवली की तेच त्यांच्या गझलातील प्रतिमा विश्वाचे वर्तुळ पूर्ण होते.
आणि दुसरीकडे सामान्य माणसांच्या दु:ख दारिद्र्याचा कैवार घेण्यासाठी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक दंभावर घनाघाती प्रहार करताना त्यांच्या गझला जेव्हा चीड, संताप व्यक्त करतात तेंव्हा त्यांच्यातली सूचकता नष्ट होऊन त्यांच्या शब्दांचा स्वर अधिक चढा झाल्यासारखा जाणवतो. त्यांना अपेक्षित काव्यातील प्रासादिकतेलाही तो कधी कधी ढोबळपणाची बाधा आणत तर नाहीना,असे वाटते.
‘सप्तरंग’ या त्यांच्या शेवटच्या संग्रहात एकूण ८० कविता आहेत. त्यापैकी ४६ गझला आहेत. एकूण समाविष्ट कवितांच्या तुलनेत हे प्रमाण बरेचसे ओसरल्या सारखे वाटते. ब-याचशा जुन्या कविता ज्या इतर संग्रहात समाविष्ट होऊ शकल्या नाहीत त्या या संग्रहात समाविष्ट करून संग्रह सिद्ध केल्यामुळे ते घडले असावे.

४ फेब्रु. २००७ ला नागपूर येथे संपन्न झालेल्या ८० व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनातील स्व. सुरेश भट गझलवाचन सत्रात माझ्या हस्ते प्रकाशित झालेल्या सुरेश भटांच्या
‘रसवंतीचा मुजरा’  ह्या अखेरच्या संग्रहात एकूण ८३ कविता आहेत.त्यापैकी केवळ ६ गझला आहेत. सुरेश भटांच्या नावावर असलेल्या  सहा संग्रहात समाविष्ट कवितातील/ संग्रहनिहाय गझला
रूपगंधा ७२ / ०७
रंग माझा वेगळा ९२ /३२
एल्गार ९६/९१
झंझावात ८९/७६
सप्तरंग  ८१/५१
रसवंतीचा मुजरा ८३ / ०६
...........................

अशा एकूण ५१३ कवितांपैकी निम्म्याहून अधिक २६३ गझला आहेत.
‘सप्तरंग’ ह्या संग्रहात समाविष्ट ‘ह्म्द’(पृ.३९) ‘न आत शरीफ’(पृ.४०) आणि ‘पाच वर्षांनी!’(पृ.६६)आणि ‘खुलासा’(पृ.७६)दोन हझला अशा चार रचनांचा आकृतिबंध गझलांचाच आहे.त्यांना धरून गझलांची संख्या २६३ होईल.‘न आत शरीफ’ ही रचना ‘झंझावात’ ह्या संग्रहातही पृ.५० वर समाविष्ट आहे.
वरील आकडेवारीत मुसलसल गझलांचाही समावेश आहे.ज्यांना ‘रंग माझा वेगळा’नंतरच्या कालखंडात सुरेश भट गझलांच्या फॉर्म मधल्या कविता म्हणत असत.
‘सप्तरंग’ वाचताना आपण ‘एल्गार’ आणि ‘झंझावात’ मधल्या गझलाच पुन्हा पुन्हा वाचतो आहोत की काय असा भास व्हावा एवढा प्रतिमांचा सारखेपणा जाणवतो.
एकंदर गझलात हे जिथे जिथे नाही तिथे प्रतिमांचे नावीन्य आणि आशयाची उत्कटता आपल्याला थेटपणे भिडते. त्या ओळी आपल्या स्मरणात राहतात आणि भाषिक उपयोजन करण्याएवढे सुभाषितत्वही त्यांना लाभते उदाहरणार्थ -
.
‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’

किंवा

‘संपली ती रात्र होती मानतो आम्ही, परंतू
जो निघाला सूर्य त्याचा चेहरा काळा कशाला?’

किंवा

‘चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेंव्हा?’

किंवा

‘राग नाही तुझ्या नकाराचा
चीड आली तुझ्या बहाण्याची!’

किंवा

‘अता आजन्म कोणाला कुणी सांगायचे नाही-
कुणापाशी कुणी वेडा प्रवासी थांबला होता.’

भटांच्या सहा संग्रहातल्या मुसलसल आणि गैर मुलससल अशा दोन्ही प्रकारच्या गझलांची एकूण संख्या २६३ इतकी आहे. त्यासाठी त्यांनी पन्नास वर्षे सातत्याने गझला लिहिल्या आहेत.
१९७४ मध्ये ‘रंग माझा वेगळा’ प्रसिद्ध झाल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत तीन दशकं त्यांच्या गझलांनी मराठी कवितेवर चेटूक केले आहे.
भटांच्या गझलांचा हा ताळेबंद मांडताना त्यांनीच केलेल्या कवितेच्या यशाची एक व्याख्या सहजपणे आठवली. ‘झंझावात’च्या प्रस्तावनेत ते लिहितात - ‘जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर रसिकांच्या कायम स्मरणात राहते, जिचा नेहमीच्या जनजीवनात प्रत्यय येतो, ती यशस्वी कविता!’  
आपल्या गझलांचे समर्थन करण्यासाठी भट आज हयात नाहीत पण काळाच्या कठोर समीक्षेला पुरून रसिकांच्या स्मरणात पिढ्यानुपिढ्या उरेल एवढे गुण त्यांच्या गझलात नक्कीच आहेत म्हणूनच तर त्यांच्या ह्या ओळी अधिक अर्थपूर्ण वाटतात-
.
‘जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!’

.https://youtu.be/yLIB-AfsXrY

मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता?

  • मोगलांनी दोन सौंदर्यशाली गोष्टी भारताला दिल्या. एक गझल. दुसरी ताजमहल. अरबी-फारसी भाषा ही गझलची मूळ जननी आहे. तेथून ती उर्दूत आली. उर्दूतून हिंदीत आणि नंतर एकेक सुभा काबीज करीत पंजाबी, सिंधी, गुजराती, व्रज पासून तर दक्षिण भारतातल्या मराठी आणि इतर अनार्य भाषांमध्ये गझलने आपली अधिसत्ता स्थापन केली. एका अर्थाने संपूर्ण भारतवर्ष गझलमय झाले. धर्मांधतेच्या दबावाखाली किंवा अत्याधुनिक रासायनिक अण्वस्त्रांच्या धाकाखाली हा इतिहास घडला नाही; तर आपल्या अंगभूत आविष्कार सामर्थ्याने गझलने अखंड भारत जोडला आहे. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतीय साहित्यविश्वात केवळ लेखणीच्या बळावर घडलेली ही गझलक्रांती जागतिक वाङ्मयाच्या इतिहासालाही नोंदवावी लागेल इतकी थोर आहे. भारतीय छंदमुक्त कवितेतून हरवत चाललेल्या निखळ काव्यानंदाविषयीची ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे.
गझल हा मूलत: कवितेचाच एक प्रकार आहे. कविता ह्या ललितकलेचे माध्यम आहे भाषा. भाषेचा सर्वात लहान घटक म्हणजे शब्द. कविता छंदात असो की छंदमुक्त, ती शब्दांनी विविध आकारात रचलेली असते. कवितेला शब्दरचना म्हणतात ते या अर्थाने. शब्दरचनेच्या विविध आकारानुसार ओवी, अभंग, गीत, गझल असे वेगवेगळे काव्यप्रकार आपल्याला स्वतंत्रपणे ओळखू येतात. त्यांनाच आपण आकृतिबंध असे म्हणतो.
रचनेने सिद्ध केलेल्या प्रत्येक आकृतिबंधाचे काही नियम, काही कायदे असतात. ह्या नियमांनाच आपण त्या त्या काव्यप्रकाराची लक्षणे, किंवा त्या आकृतिबंधाचे तंत्र म्हणतो. तंत्र कोणत्याही कवितेचे असो;जोवर ते आशयाशी एकजीव झालेले असते तोवर ते स्वतंत्रपणे आपले अस्तित्व जाणवू देत नाही. तीच ख-या अर्थाने त्या तंत्राची शुद्धता असते. आणि ज्यावेळी कवितेत तंत्राचे अस्तित्व स्वतंत्रपणे जाणवण्याइतके ठळकपणे उमटते.तेव्हा अर्थातच त्याने आशयावर मात करून ते कवितेवर हावी झालेले असते. तंत्र जिंकले आणि हारलेला आशय फरफटत तंत्राच्या मागेमागे चाललेला कवितेत जेव्हा दिसून येतो तेव्हा आशय तंत्राला शरण गेला असे आपण म्हणतो.
तात्पर्य, तंत्रशुद्धता किंवा तंत्रशरणता ह्या दोन्ही गोष्टी कोणत्याही कवितेच्या बाबतीत आशयसापेक्षच असतात. गझलही त्यातून सुटलेली नाही. कवितेत आशयसापेक्ष असलेली तंत्रशुद्धता म्हणजे काव्यकला होय, तर आशयाच्या अधिष्ठानाला दुय्यम लेखणारी तंत्रशरणता म्हणजे काव्यकौशल्य होय. संगीताच्या एका उदाहरणाने ही गोष्ट आणखी स्पष्ट करता येईल. गायकाच्या गळ्यातून निघालेल्या सुरावटीला तबला, पेटी आणि इतर वाद्ये साथ करीत असतात. म्हणजेच गायकाच्या गळ्यातून उमटणा-या गाण्याच्या सोबत सोबत चालत असतात; तोपर्यंत गाणे श्रुतिमधुर वाटते. ह्याच अवस्थेला आपण म्हणू तंत्रशुद्धता. पण वाद्यांचा ऑर्केस्ट्रा गायकाच्या स्वरासोबत न चालता आपला ध्वनी वाढवत पुढे पुढे जातो, तेव्हा आपल्या कानाला ते गाणे कर्कशा वाटते. ही कर्कशता म्हणजेच तंत्रशरणता होय. तंत्रशुद्धता आणि तंत्रशरणता ह्या आशयनिष्ठ संकल्पना आहेत. आशयनिष्ठतेच्या संदर्भात आपल्याला त्या मराठी गझलला लावून पाहता येतील. समीक्षेच्या तथाकथित भाषेत तंत्राची व्याख्या मांडावयाची झाल्यास मराठी गझलच्या आकृतिबंधाचे अंगभूत घटक म्हणजेच मराठी गझलचे तंत्र होय. अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास मराठी गझलचे तंत्र म्हणजे मराठी गझलच्या शब्दरचनेचे नियम.
ह्या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सुस्पष्ट केली पाहिजे की, केवळ वृत्ताची निर्दोषता म्हणजे मराठी गझलची तंत्रशुद्धता नव्हे ! उर्दू-हिंदी गझलेच्या तुलनेने मराठी गझलांची वृत्ते अधिक शुद्ध स्वरूपात आढळतात. सुरुवातीच्या काळातील मराठी गझलरचनेतील शैथिल्य ध्यानात आल्याने अरबी-फारसी वृत्ते शुद्ध स्वरूपात मराठीत आणण्यासाठी 1922 ते 1933 या काळात माधव जूलियनांनी ‘गज्जलांजली’ लिहिली. त्यानंतरही अनेक वर्षे गझल हा वृत्ताचा प्रकार आहे की कवितेचा प्रकार आहे, या संभ्रमात अनेक मराठी कवी होते. मराठी मासिकांचे काही जुने अंक पाहिले तर त्यातील कवितांच्या शीर्षभागी ‘वृत्त-गझल’ अशी नोंद आढळते, म्हणजे गझल हा वृत्ताचा प्रकार असल्याचा समज त्याकाळी मराठी कवींचा होता. मराठी कवितेच्या परंपरेतील मराठी गझलची ही नोंद ऐतिहासिक आहे.
१९७४ साली प्रसिद्ध झालेल्या ‘रंग माझा वेगळा’ च्या प्रास्ताविकात पु. ल. देशपांडे लिहितात - ‘सुरेश भटांना गझलेचे फार आकर्षण आहे. कारण गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे’. पु. लं. च्या विधानात ‘केवळ’ या शब्दाने काय घोळ केला, ते लक्षात घेण्याजोगे आहे. त्या एका शब्दाने गझल हे वृत्त तर आहेच पण त्यासोबत ती एक वृत्ती आहे असा अर्थ ध्वनित केला. पु. लं. चे हे विधान खरं तर ‘केवळ’ या शब्दाला वगळून ‘गझल हे वृत्त नसून ती एक वृत्ती आहे’ असे असायला हवे होते.
पुढे पु. ल. लिहितात - ‘गझलेमध्ये नाट्याचा मोठा अंश असतो. तसे या गीतप्रकाराचे नाटकातल्या स्वगताशी फार जवळचे नाते आहे. एखादी अकल्पित कलाटणी श्रोत्याला मजेदार धक्का देऊन जाते. गीतातल्या ओळींच्या डहाळ्यांना अनपेक्षित रीतीने मिळणारे झोके धुंदी आणत असतात’. या विधानांमध्ये पु. लं. नी गझलला ‘गीतप्रकार’ म्हटले आहे. गझल वृत्तबद्ध असल्याने ती गायनसुलभ असते. तसेच गझलगायकीची स्वतंत्र शैली आहे. परंतु एवढया साधर्म्याने आपण गझलेला गीताचा प्रकार म्हणू शकत नाही. कारण आकृतिबंधाच्या दृष्टीने गझलेची रचना गीतापेक्षा तंत्रदृष्ट्या वेगळी असते. प्रत्येक गझलेचा मतला एकाच वृत्तातल्या दोन ओळींचा आणि सयमक असतो. परंतु प्रत्येक गीताचे धृपद दोन सारख्या चरणांचे असतातच असे नाही. गझलचा प्रत्येक शेर दोन ओळींचा असतो तर गीताच्या अंत-यात कमीत कमी तीन चरण आढळतात. त्यातील दोन चरण सारख्या यमकाचे तर तिसरा यमकाच्या दृष्टीने धृपदाशी जुळणारा असतो.
एखाद्या रचनेला गझलच का म्हणावे? आणि ती रचना इतर काव्यप्रकारांपेक्षा कशी वेगळी आहे? हे विवक्षितपणे ठरविण्यासाठी आपल्याला मराठीत थोरा-मोठयांनी अगोदर काय रूढ करून ठेवले होते हे त्यांच्याविषयी मनात असलेल्या नितांत आदराला धक्का न लागू देता अभ्यासणे जरुरी आहे. कारण त्याशिवाय कोणत्याही शास्त्राची प्रगती शक्य नसते. स्थितिशीलता हा शास्त्राच्या विकासातला सर्वात मोठा अडसर असतो कालानुरूप प्रवाहित आणि गतिशील राहिल्यानेच कोणतीही कला आपले अस्तित्व टिकवून ठेवते. मराठी गझलरचनेची कला आणि तंत्र हे दोन्ही त्याला अपवाद नाहीत.
गझल या संकल्पनेची मराठीतली स्थिती कविवर्य सुरेश भटांनी ‘गझलेची बाराखडी’ लिहीपर्यंत वरीलप्रमाणे होती. 1983 साली प्रसिद्ध झालेल्या ‘एल्गार’ या त्यांच्या गझलसंग्रहात ‘कैफियत’ म्हणून याच बाराखडीमधील काही भाग पुन्हा उद्धृत करून अधिक विस्ताराने संग्रहाच्या प्रारंभी अंतर्भूत करण्यात आली. ‘रंग माझा वेगळा’च्या नंतरच्या आवृत्यांमध्येही ‘गझलेची बाराखडी’ समाविष्ट करण्यात आली. जानेवारी 2002 मध्ये ‘एल्गार’च्या पाचव्या आवृत्तीत ‘अलामत’च्या बाबतीत आणखी काही भाग वाढवून ती समाविष्ट करण्यात आली. हे एवढे तपशीलाने सांगावयाचे कारण असे की मराठी गझलरचनेचे नियम कविवर्य सुरेश भटांनी जे ‘गझलेच्या बाराखडी’त मांडलेत तेच मराठीत गझलेचे तंत्र म्हणून सध्या प्रचलित आहेत. अर्थात सुरेश भटांच्या गझल लेखनाच्या दीर्घ व्यासंगाने संस्कारित होत गेलेल्या तंत्राचे परिष्कृत स्वरूप आपल्यासमोर आहे. ‘कसे’ लिहावे यासाठी ‘तंत्र’ या शब्दाचा उपयोगही ‘गझलेच्या बाराखडी’तलाच आहे. ‘गझलेच्या बाराखडी’तल्या त्या ओळी अशा - ‘उत्तम लिहिण्यासाठी How पेक्षा What जास्त महत्वाचे असते. तंत्रापेक्षा मंत्र जास्त महत्वाचा. पण आधी साधना करून तंत्रावर ताबा मिळविल्याशिवाय, तसेच यशस्वी तांत्रिक झाल्याशिवाय मंत्र कसा बरे अवगत होईल? म्हणूनच आधी गझलेचा आकृतिबंध किंवा शरीरशास्त्र माहीत करून घेतले पाहिजे. मगच पुढच्या गोष्टी. गझलचा आकृतिबंध म्हणजेच गझलेचे तंत्र होय, हे वरील उता-यावरून सुस्पष्ट होते.
‘गझलेच्या बाराखडी’त आणि ‘कैफियत’मध्ये ‘गझल म्हणजे काय?’ या ठळक शीर्षकाखाली जाड टाइपात दिलेली व्याख्या अशी -‘एकाच वृत्तातील एकच यमक (काफिया) व अंत्य यमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी दोन-दोन ओळींच्या किमान पाच किंवा त्यापेक्षा अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल.
ह्या गझलच्या व्याख्येत सांगितलेले मुद्दे म्हणजे गझलच्या तंत्राचे घटक आहेत.
१) एकच वृत्त
२) एकच यमक (काफिया)
३) एकच अन्त्य यमक (रदीफ)
४) प्रत्येक कविता दोन-दोन ओळींची (शेर)
५) दोन-दोन ओळींच्या किमान पाच कविता (शेर)
पाच कलमी असलेली मराठी गझलेची ही घटना होय. ह्या पंचकलमी मराठी गझलतंत्राच्या प्रत्येक कलमाचा विचार तंत्रशुद्धता की तंत्रशरणता - ह्या निकषांवर करावा लागेल.
कलम पहिले : एकच वृत्त
वृत्तांचे दोन प्रकार आहेत. पहिला अक्षरगणवृत्ते, दुसरा मात्रावृत्ते. अक्षरगणवृत्तात लघु-गुरूचा एक विशिष्ट क्रम सांगितलेला असतो. त्याच क्रमाने प्रत्येक ओळीत लघु-गुरू आले पाहिजेत. छंदशास्त्रात लघूची एक मात्रा आणि गुरूच्या दोन मात्रा समजल्या जातात. मात्रा म्हणजे शब्दातील प्रत्येक अक्षर उच्चारण्यासाठी लागणारा कालावधी. अ, इ, उ हे स्वर समाविष्ट असलेल्या अक्षरांना उच्चारणासाठी जो कालावधी लागतो, त्याला एकपट समजून त्याची एक मात्रा मोजली जाते. तर आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ: हे स्वर समाविष्ट असलेल्या अक्षरांना उच्चारणासाठी दुप्पट कालावधी लागतो, असे समजून त्या अक्षरांच्या दोन मात्रा मोजल्या जातात. उदा. ‘क’ ह्या अक्षराला हे खालीलप्रमाणे लावून पाहता येईल.
लघूची एकमात्रा
(अक्षरात समाविष्ट स्वर - अ, इ, उ)
व्यंजन + स्वर = अक्षर
क् + अ = क
क् + इ = कि
क् + उ = कु
गुरूच्या दोन मात्रा
(अक्षरात समाविष्ट स्वर - आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:)
व्यंजन + स्वर = अक्षर
क् + आ = का
क् + इ = की
क् + ऊ = कू
क् + ए = के
क् + ऐ = कै
क् + ओ = को
क् + औ = कौ
क् + अं = कं
क् + अ: = क:
याशिवाय जोड अक्षरातील आघाताने अगोदरचे अक्षर ‘गुरू’ होते.
उदा. ‘अश्रू’ ह्या शब्दात ‘अ’ या अक्षरावर ‘श्रू’ मधील ‘श’ चा आघात होऊन त्याचा उच्चार
अश + रू
असा होतो आणि त्यामुळे ‘अश्रू’ या शब्दातील दोन्ही अक्षरांना उच्चारण्यासाठी दुप्पट कालावधी लागत असल्याने दोन्ही अक्षरे ‘गुरू’ होतात.
‘रक्त’ ह्या शब्दात ‘क्’ ह्या अक्षराचा आघात ‘र’ ह्या अक्षरावर होऊन त्याचा उच्चार रक् + त असा होतो. ह्यामुळे ‘रक्त’ ह्या शब्दातील पहिले ‘र’ हे अक्षर ‘गुरू’ तर दुसरे ‘त’ हे अक्षर ‘लघू’ होते.
आपल्या भाषेत शब्दातील अक्षरांच्या उच्चारण्याची मूळ पद्धत काय आहे हे महत्वाचे तत्त्व ह्या ‘लघू-गुरू’ मात्रेच्या मुळाशी आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. उदा. ‘कण्हाया’ या शब्दातील ‘ण्हा’ या जोड अक्षराचा आघात उच्चारण पद्धतीनुसार ‘क’ या अक्षरावर पडत नाही. म्हणून ‘कण्हाया’ या शब्दाच्या मात्रा
क + ण्हा + या
याप्रमाणे लघू + गुरू + गुरू अशा मोजल्या जातात.
यावरून एकच तत्त्व सिद्ध होते की वृत्ताच्या मुळाशी असलेले मात्रांचे नियम हे प्रत्येक अक्षरांच्या उच्चारण पद्धतीवर आधारलेले आहेत.
‘अश्रू’, ‘रक्त’ आणि ‘कण्हाया’ हे तिन्ही शब्द कविवर्य सुरेश भटांच्या ‘एल्गार’ मधल्या ‘निष्कर्श’ या गझलेतून घेतलेले आहेत. त्या ओळी अशा -
‘भुकेलेल्या, तुझी पूजाच खोटी
हवे अश्रू तिच्या दैवी स्मितांना’
‘दिसे हे रक्त साध्या माणसांचे
(कुणी मारी न चाकू प्रेषितांना)
‘जगाची काळजी संभावितांना
कण्हाया लागती दारू पितांना!’
(एल्गार, प्र. आ. पृ. ७०)
अक्षरगणवृत्तात रचना करताना ओळीतील प्रत्येक अक्षरांचा ‘लघू-गुरू’ क्रम सांभाळणे बरेचदा कठीण होते. म्हणून काही वेळा एका गुरूऐवजी दोन लघूंचा उपयोग कवी करतात.
उदा. ‘आनंदकंद’ ह्या वृत्तात प्रस्तुत लेखकाने लिहिलेल्या ओळी अशा -
‘सांगू कशी फुलाचा देठास भार झाला;
हा बहर यौवनाचा देहास फार झाला’
(गुलाल आणि इतर गझला पृ. १३)
‘प्राणापल्याड जपते निवडुंग जागजागी
अन् टाकती फुलांची मोडून मान वस्ती’
(गुलाल आणि इतर गझला पृ.२२)
‘बहर’ आणि ‘जपते’ ह्या शब्दांचे गद्यातले उच्चारण आणि वृत्तबद्ध कवितेत येणा-या त्याच शब्दांचे उच्चारण यातील फरक अगोदरच्या पिढीतले ख्यातनाम कवी ना. घ. देशपांडे यांनी प्रस्तुत लेखकाला पत्रातून कळविला होता. ते लिहितात - ‘मराठीच्या पारंपरिक उच्चारांवर याचा परिणाम होईल की काय अशी शंका येते. काय ते काळच ठरवील. गती तेथे क्रांती असते असेवाटते’. उच्चाराधिष्ठित छंदशास्त्रीय विचार अभ्यासकांनी पुढे न्यावा ह्यासाठी ‘गुलाल आणि इतर गझला’ या संग्रहात प्रस्तुत लेखकाने ते पत्र सहेतुक समाविष्ट केले आहे. उच्चारांच्या शुद्धतेबाबतचा आपला आक्षेप नोंदवत ना. घं. नी त्यासंबंधीचे आपले उत्तरही त्याच विधानात नोंदविले आहे. - ‘गती तेथे क्रांती असते’.
वृत्तबद्ध कवितेतील ‘लघू-गुरू’ क्रमातील उच्चाराच्या शुद्धतेचा आग्रह हा एक प्रकारे गझलच्या तंत्राच्या शुद्धतेचाच आग्रह होय. ना. घं. चे त्याबाबतीतले मत आपण पाहिले. ‘गज्जलांजली’च्या प्रस्तावनेत माधव जूलियन यांनी व्यक्त केलेले मत मात्र अधिक ग्राह्य वाटते. ते लिहितात - ‘‘या सा-या अरबी वृत्तांना जातिरूप द्यावे की नाही? पूर्णपणे जातिरूप दिल्यास रचना सुकर होईल, पण लगक्रमाच्या वैशिष्ट्यामुळे म्हणण्याला आपोआप जे वळण येते ते नष्ट होईल. ‘रसने न राघवाच्या’ हे मोरोपन्ती पद्य वा क्रमांक 28-33 व 51 या चुटक्यांतील रचनेप्रमाणे वृत्तांस मर्यादित जातिरूपत्व दिले तर ते इष्ट होईल.’’ माधव जूलियन यांनी अरबी-फारसी वृत्ते शुद्ध स्वरूपात मराठीत उपलब्ध करून दिली. हे त्यांचे मराठी गझलला फार मोठे योगदान आहे. इतकेच नव्हे तर छंदशास्त्राच्या अत्यंत सूक्ष्मभेदांसह तपशीलवार मांडणी करणारा त्यांचा ‘छंदोरचना’ हा ग्रंथ मराठीत एकमेवाद्वितीय असा. त्यांच्या वरील विधानाची नोंद गंभीरपणे घेतली पाहिजे. मर्यादित प्रमाणात का होईना गझलांच्या वृत्तांना जातिरूप देण्याची एक सवलत माधव जूलियनांनी वरीलप्रमाणे मान्य केली.
‘शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा’ असे सुरेश भटांनी आपल्या ‘गझलेच्या बाराखडी’त ‘महत्वाचे’ या शीर्षकाखाली नोंदविले आहे. म्हणजे वृत्तांच्या बाबतीत सुरेश भटांनी माधव जूलियनांच्या पुढे दोन पावलं टाकत गझलेतील शब्दरचनेच्या सहजतेचा विचार पुढे नेला आहे. सुरेश भटांनी स्वत: दहाबारा गझला मात्रावृत्तात लिहिल्या आहेत. म्हणजे मराठीतील गझललेखनाची प्रवृत्ती आशयाच्या सहज अभिव्यक्तीसाठी अक्षरगणवृत्तांकडून मात्रावृत्तांकडे वळत चालल्याचे दिसते. मनातला आशय शब्दांतून अभिव्यक्त होताना तंत्राच्या शुद्धतेने गुदमरून जात असेल तर ती तंत्रशुद्धता काही कामाची नाही हे नव्या गझलकारांच्या लक्षात आले आहे. गझलेतील काव्य वाचविण्याच्या दृष्टीने ही अतिशय चांगली गोष्ट आहे. उर्दू-हिंदी, गुजराती भाषेतील गझला वाचताना शब्दयोजनेची जी सहजता जाणवते त्याचे कारणही हेच आहे.
‘मराठी गझल : १९२०-१९८५’ या पुस्तकातील पृ. क्र. ९३ वरील प्रा. डॉ. अविनाश कांबळे यांच्या पुढील उद्धरणाने तर त्याला पुष्टीच मिळते. ते लिहितात - ‘अरबी फार्सी वृत्तांमध्ये उर्दू गझल रचताना उर्दू गझलकारांनी त्या वृत्तांमधील लघु-गुरूचा विशिष्ट क्रम व संख्या ह्याकडे काटेकोरपणे लक्ष दिले नाही; तर शब्दोच्चार आणि उच्चाराचे वजन इकडेच फक्त लक्ष दिले. त्यामुळे मुळातील अक्षरगणवृत्तांना मात्रावृत्तांचे स्वरूप प्राप्त झाले. अशाप्रकारे उर्दूतीलच काय, पण हिंदी व गुजरातीतीलही गझल मात्रावृत्तात्मक झालेली आहे.’ (जाड ठसा आणि अधोरेखांकन प्रस्तुत लेखकाचे आहे.)
रचना सहज होण्याच्या दृष्टीने वृत्तांच्या तीन पद्धती आहेत.
१.एका गुरूच्या ऐवजी दोन लघूंचा उपयोग करून मर्यादित प्रमाणात अक्षरगणवृत्तांना जातिरूप करणे.
२.लघू-गुरूंचा विशिष्ट क्रम आणि त्यांची संख्या यांचा विचार न करणा-या मात्रावृत्तांत रचना करणे.
३.अक्षरगणवृत्तांत कविता लिहिणा-या पूर्वीच्या कवींना शब्दातील -हस्व स्वरयुक्त अक्षरे दीर्घ लिहिण्याची आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षरांना -हस्व लिहिण्याची जी मोकळिक होती तिचा अवलंब करणे.
.ही मोकळिक कोणत्या स्वरांच्या बाबतीत किती प्रमाणात घेता येईल याचेही तारतम्य अर्थातच आशयसापेक्ष अपरिहार्यतेवर अवलंबून आहे.
-हस्व स्वरांचे दीर्घ रूपांतर :
अ, इ, उ, ह्या स्वरांनी युक्त अक्षरे दीर्घ करणे.
अ_ स्वर
उदा. ‘कळले’ या शब्दाचे ‘कळाले’ असे रूप अनेक गझलांत आढळते.
‘दर्यात झोपलेल्या लाटांस ना कळाले
केव्हा तुफान झाले? तारू कधी बुडाले?
(माझिया गझला मराठी, खावर पृ. ३८)
इ_स्वर
‘अंतिम’ ह्या शब्दाचे उच्चारण रूप ‘अंतीम’
‘रे दु:ख माणसांचे अंतिम सत्य आहे.
बाकी मवाळ सा-या आहेत जाहिराती.
(गुलाल आणि इतर गझला, पृ. ६०)
शुद्धलेखनानुसार ‘अंतिम’ या शब्दामधील ‘ति’ या अक्षरातील ‘इ’ स्वराचे वरील ओळीतील वृत्तात उच्चारण रूप ‘ई’ असे होते. आणि ‘अंतिम’ शब्दाचे उच्चारण रूप ‘अंतीम’ असे होते.
उ_स्वर
‘परंतु’ ह्या शब्दाचे रूप ‘परंतू’
‘झालो महाग एका थेंबास मी परंतू
माझी चढे रिकाम्या पेल्यास धुंद यंदा’
(एल्गार, प्र. आ. पृ. ५१)
अशात-हेने प्रमाण मराठीच्या शुद्धलेखनानुसार गद्यात -हस्व येणारी अक्षरे कवितेत दीर्घ स्वरूपात स्वीकार्ह समजली जातात.
दीर्घ स्वराचे -हस्व रूपांतर
आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ,अं, अ:
या दीर्घ स्वरांपैकी आ, ई, ऊ या दीर्घ स्वरांनी युक्त शब्दांची -हस्व रूपांतरे रूढ आहेत. ती अशी-
आ_स्वर
‘आता’ या शब्दाचे रूप ‘अता’
‘माझा अखेरीचा अता घेऊ कसा घोट मी
हातातला पेला पुन्हा खाली पडाया लागला
(एल्गार, प्र. आ. पृ. ७३)
ई_स्वर
‘उगीच’ या शब्दाचे रूप ‘उगिच’
उगिच बोलायचे उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे’
(एल्गार, प्र. आ. पृ. ७३)
ऊ_स्वर
‘चुकून’ शब्दाचे रूप ‘चुकुन’; ‘धरून’ शब्दाचे रूप ‘धरुन’
‘चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे’
(एल्गार, प्र. आ. पृ. ७६)
एक काना कमी करून ‘आता’ ह्या शब्दाचे रूप ‘अता’ करता येईल. वेलांटी आणि उकार -हस्व दाखविता येतील. परंतु आ, ई, ऊ, या तीन स्वरांना सोडून उरलेल्या ए, ऐ, ओ, औ,अं, अ: या दीर्घ स्वरांना -हस्व दाखविण्यासाठी कुठलीही चिन्हे देवनागरी लिपीत उपलब्ध नाहीत. याचा अर्थ दीर्घ स्वरांचे -हस्व रूपांतर करणारी उदाहरणे गझलांमध्ये नाहीतच असे नाही; फक्त त्यासाठी आपल्याला हिंदी गझलकडे वळावे लागेल.
ए_स्वर
‘ये सारा जिस्म झुककर बोझसे दुहरा हुआ होगा
ऐ_स्वर
मै सजदे में नही था आपको धोका हुआ होगा’
(साये में धूप - पृ. १५)
हिंदीतील प्रसिद्ध विद्रोही गझलकार दुष्यंतकुमार यांची वरील गझल ‘वियद्गंगा’ या वृत्तात आहे. या वृत्ताचा ‘लघु-गुरू’ क्रम पुढील प्रमाणे -
लगागागा । लगागागा । लगागागा । लगागागा
त्याचे चिन्ह लेखन :
U--- | U--- | U--- | U---
ये सारा जिस् । म झुककर बो । झसे दुहरा । हुआ होगा
U - - - | U - - - | U - - - | U - - -
मै सजदे में । नहीं था आ । पको धोका । हुआ होगा
U - - - | U - - - | U - - - | U - - -
वरील गझलेत ‘ये’ आणि ‘मै’ ही दोन्ही अक्षरे -हस्व स्वराइतक्या एका मात्रेच्या कालावधीत उच्चारावी लागतात. आणि या उच्चारण पद्धतीमुळे ‘ये’ आणि ‘मै’ ही अक्षरे मराठीतील रूढ वृत्तपद्धतीनुसार ‘गुरू’ असली तरी हिंदीतील उच्चाराधिष्ठित वृत्तपद्धतीनुसार ‘लघू’च ठरतात.
ओ_स्वर
‘कोई पास आया सवेरे सवेरे
मुझे आजमाया सवेरे सवेरे’
प्रसिद्ध गझलगायक जगजितसिंग यांनी गायिलेली सैय्यद राही यांची वरील गझल ‘भुजंगप्रयात’ या वृत्तात आहे. या वृत्ताचा ‘लघु-गुरू’ क्रम पुढीलप्रमाणे-
लगागा । लगागा । लगागा । लगागा.
त्याचे चिन्ह लेखन :
U-- | U-- | U-- | U--
कोई पा । स आया । सवेरे । सवेरे
U - - | U - - | U - -| U - -
मुझे आ । जमाया । सवेरे । सवेरे
U - - | U - - | U - -| U - -
वरील गझलेत ‘को’ हे अक्षर -हस्व स्वराइतक्या एका मात्रेच्या कालावधीत उच्चारावे लागते. आणि या उच्चारण पद्धतीमुळे ‘को’ हे अक्षर मराठीतील रूढ वृत्तपद्धतीनुसार ‘गुरू’ असले तरी हिंदीतील उच्चाराधिष्ठित वृत्तपद्धतीनुसार ‘लघू’च ठरते.
औ, अं, अ: ह्या दीर्घ स्वरांना उच्चारानुसार लघुत्व देणारी उदाहरणे शोध घेतला तर उर्दू- हिंदी-गुजरातीत सापडू शकतील. उर्दू आणि गुजराती भाषेचे एकवेळ बाजूला ठेवले तरी हिंदी आणि मराठीची एकच देवनागरी लिपी असल्याने वृत्ताच्या बाबतीतली जी सवलत हिंदीत निर्दोष समजली जाते ती मराठीत तंत्राची अशुद्धता मानली जाऊ नये. कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे छंदशास्त्रातीललघुगुरूचे मूलतत्व प्रत्येक अक्षराचा ‘उच्चारण कालावधी’ हेच आहे आणि उच्चारण कालावधीला जरासे लवचिक ठेऊन एखाद्या शब्दातील एखाद्या अक्षराला आशयसापेक्ष सवलत दिली तर हिंदी भाषेसारखी मराठीतही गझलरचना अधिक सहज होईल. अर्थात त्यातील अपवादात्मकता मराठी शुद्धलेखनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघनही करणार नाही, याचे भान ठेवावे लागेल. याच संदर्भात सुधीर रसाळ यांचे पुढील विधान अधिक बोलके आहे :
‘लघू व गुरू यांच्या उच्चारांचा काळ सापेक्ष असतो. लघू उच्चाराला जो काळ लागतो, त्याच्या दुप्पट काळ गुरू उच्चाराला लागतो, असे मानले जाते. लघुगुरू उच्चारांच्या विशिष्ट प्रकारे होणा-या आवर्तनांनी ही लय निश्चित केली जाते. ही लय शब्दांच्या नैसर्गिक उच्चारांशी निगडित नसते. एकही शब्दोच्चार न करता शार्दूलविक्रीडित, पृथ्वी, नववधू, प्रणयप्रभा, घनाक्षरी, दिंडी हे व असे छंद गुणगुणुन दाखविता येतील म्हणून सर्व छंदांचा कल शब्दोच्चारांच्या नैसर्गिक उच्चारांतून जाणवणा-या लयबद्धतेऐवजी संगीतातील लयबद्धतेकडे झुकलेला आहे. (कविता आणि प्रतिमा, प्र. आ. पृ. ४५५) (जाड ठसा आणि अधोरेखांकन प्रस्तुत लेखकाचे आहे.)
वृत्तांची विविधता
‘गझल लेखनासाठी नेहमी फक्त एकाच वृत्ताचा उपयोग करू नये. वेगवेगळी वृत्ते वापरावीत. त्यामुळे आपली शब्दांवरील पकड अधिक मजबूत होते’. ‘रंग माझा वेगळा’च्या सातव्या आवृत्तीत (जाने.२००२) समाविष्ट असलेल्या ‘गझलेची बाराखडी’मधे ही ‘महत्वाची’ टीप दिली आहे.
गझलसंग्रहात एकाच वृत्तात असलेल्या अनेक गझला लागोपाठ वाचताना किंबहुना मोठ्याने वाचताना वृत्तातल्या उच्चारणसिद्ध लयीचा एकसुरीपणा जाणवतो. नित्य नव्याची आवड असलेल्या चोखंदळ रसिक मनाला तो खटकतोही. त्यासाठी वृत्तांच्या विविधतेची निकड जाणवते. वेगवेगळया वृत्तांची लय शब्दवळणी पडली तर कवीला वेगवेगळया वृत्तात गझल लिहिणे फारसे कठीण नसते; पण अशा वृत्तांच्या विविधतेला कवीसापेक्ष मर्यादा असणारच. कवीने किती प्रकारच्या वृत्तात गझला लिहिल्या? हा प्रश्न महत्वाचा नसून त्याच्या गझलांत प्रतिमांचे नावीन्य किती? हा प्रश्न खरे तर त्या कवीच्या काव्यकर्तृत्वाविषयी अधिक मोलाचा असतो. वृत्तांच्या विविधतेमुळे फार तर उच्चारणसिद्ध लयीचा एकसुरीपणा टाळता येऊ शकेल. परंतु केवळ वृत्तवैविध्यामुळे गझलेतील काव्यात नावीन्य येणार नाही म्हणून वृत्तांची विविधता गझल किंवा इतर कवितांच्या बाबतीत काटेकोर तारतम्याने विचारात घेतली पाहिजे.
अक्षरगणवृत्तात व गझलेच्या ‘देवप्रिया’ आणि ‘व्योमगंगा’ वृत्तांत अधून मधून कविता रचणारे मर्ढेकर नंतर ‘पादाकुलक’ या मात्रावृत्तातच आपल्या जास्तीत जास्त कविता का लिहितात, याचा शोध आपण घेतला तर आपल्या लक्षात येईल की त्यांना आपल्या कवितेतले संगीत हरवू द्यायचे नाही आणि शब्दरचनेची आशयनिष्ठ अकृत्रिमता काव्यकलेच्या पातळीवर न्यायची आहे. उद्याची मराठी गझल कदाचित मर्ढेकरांसारखी मात्रावृत्तात अधिक रमेल अशी चिन्हे आज दिसू लागली आहेत.
वृत्तांच्या संदर्भात आता एक शेवटचा मुद्दा. रचना अधिक सुकर, अधिक सहज करण्यासाठी आक्षरछंदात गझल रचता येईल का? काफिया, रदीफ, दोन दोन ओळींची स्वतंत्र कविता असे बाकीचे नियम पाळले जात असतील तर आक्षरछंदातील कवितेला गझलच म्हणायला पाहिजे.आक्षर छंदात अक्षरगणवृत्तासारखा ‘लघु-गुरू’ क्रम नसतो. मात्रावृत्तासारखे मात्रांचे मापन नसते. केवळ अक्षरसंख्याच मोजली जाते.
छंदशास्त्राच्या नियमानुसार आक्षरछंदातील प्रत्येक अक्षर दीर्घोच्चारी असते. म्हणजे प्रत्येक अक्षरांच्या दोन मात्रा मोजल्या जातात. उदा. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ ह्या तुकारामांच्या अभंगातील चरणात - ‘द’ ‘त’ आणि ‘ग’ ही तिन्ही अक्षरे ‘अ’ ह्या -हस्व स्वरांची असली तरी त्यांचा उच्चार दीर्घ स्वराइतक्या दोन मात्रांच्या कालावधीत करावयाचा असतो. म्हणजे आक्षर छंदाचा छंदशास्त्रीय आधार देखील अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्ताप्रमाणे उच्चाराधिष्ठितच आहे. आठ-आठ अक्षरांची दोन आवर्तने एकाच ओळीत असतील. प्रत्येक अक्षर दोन मात्रांचे मोजून १६-१६= ३२मात्रा होतात. या आक्षर छंदात प्रस्तुत लेखकाची व-हाडी बोलीतली एक गझल-
माह्या जिवाले वाटते
तुह्या डोयात बसावं माह्या जिवाले वाटते;
नाही जगाले दिसावं माह्या जिवाले वाटते.
तोंड लपवण्यासाठी मले नाही कुठी जागा;
तुह्या मनात लपावं माह्या जिवाले वाटते.
तुह्या मुचूक जगणं वाटे जह्यराची पुडी;
तुह्या संगंच मरावं माह्या जिवाले वाटते.
माह्या मनातलं गूज कसं मोठयान मी बोलू;
तुह्या कानात सांगावं माह्या जिवाले वाटते.
माह्या नावापुढे मले लावू वाटे तुहं नावं;
तुहं नावं मिरवावं माह्या जिवाले वाटते.
(‘यक्ष’ दिवाळी २००४, पृ. १०४)
रचना अधिक सहज होण्यासाठी अक्षरगणवृत्तातून गझल जर मात्रावृत्तात येऊ शकते, तर तिला आक्षरछंदात प्रवेश करण्यासाठी कोणाच्याही मान्यतेची वाट पहावी लागणार नाही. भलेही ती आक्षरछंदात फारशी रमणार नाही, परत मात्रावृत्ताकडे आपला मोर्चा वळवेल, कारण चांगली कविता जेव्हा काही मोजकी बंधने स्वत:हून स्वीकारते तेव्हा त्या तिच्या पायात रुमझुमणा-या तोरडया असतात, तर छंदशास्त्राने बाहेरून लादलेले जाचक नियम ह्या तिच्या लालित्यपूर्ण पदन्यासाला अवरूद्ध करणा-या बेड्या असतात.
दुसरे कलम : एकच यमक (काफिया)
काफिया म्हणजे यमक. यमक जुळविणे ही आपल्या बोलण्याच्या भाषेतील स्वाभाविक क्रिया आहे. उदा. ‘काखेत कळसा गावाला वळसा’. मुक्तछंदाच्या आजच्या जमान्यात यमकाचे कवितेतील महत्व कमी झालेले असले तरी ‘यमकाला कमी लेखू नका, ती कवितेची देवता आहे’. असे एके ठिकाणी म्हटले आहे. यमक हा कवितेचा प्राण आहे. मुक्तछंदातल्या कवितेचे आयुष्य कमी का आहे? याचे उत्तरही त्या कवितेच्या निर्यमकीपणात आहे.गझल हा काव्यप्रकार यमकप्रधान आहे. एकाच कवितेत इतकी यमके असण्याचे दुसरे उदाहरण कोणत्याच काव्यप्रकाराचे नाही.
काफिया म्हणजेच यमक. हे गझलचे शक्तिस्थळ आहे. आवडलेले शेर आपल्या नेहमीच्या बोलण्यात सहजपणे ओठावर येतात. आणि अशा त-हेने वारंवार दिल्या गेलेल्या दाखल्याने एक दिवस त्यांना सुभाषिताचा दर्जा प्राप्त होतो. आणि त्यामुळेच गझल ही लोकभाषा होते. अभंगानंतर भाषेचं एवढं सामर्थ्य मराठीत फक्त गझलच्या शेरातच आढळतं. आणि गझलेतील यमक हे त्या सामर्थ्याचं गमक आहे. गझल तंत्रातील काफियाचा विचार गझल लिहिणा-या कवीने अत्यंत दक्षतापूर्वक करणे म्हणूनच निकडीचे आहे. बुद्धिबळाच्या खेळात वजीराचे जे स्थान आहे तेच गझलमध्ये यमकाचे आहे. बुद्धबिळात जसा वजीर पडला की राजा वाचवणं कठीण होतं तसंच गझलात काफिया कृत्रिमतेला फितूर झाला की शेराची अर्थसत्ता धोक्यात येते.
मतल्याच्या पहिल्या दोन ओळीत काफिया स्थापित झाला की त्या काफियाचे म्हणजे त्या यमकाचे इतर शब्द शोधणे, आणि मग त्यातील एकेका यमकाचा धागा पकडून एकेक शेर बांधणे अशी शेरांची निर्मितीप्रक्रिया आहे. यमकाचा शब्द त्या भाषेतल्या आपल्या विशिष्ट अर्थच्छटेच्या परिघात कल्पनाविस्तार करण्यासाठी कवीला ओळी सुचवतो. मग कवीचा जीवनानुभवाचा प्रत्यय काव्यात्म प्रतिक्रियेच्या रूपाने शेर होऊन अवतरतो. बोलभाषेच्या अंगाने त्यात प्रतिमांचे नावीन्य आले की तो शेर त्या कवीला आणि नंतर त्याच्या वाचकालाही नवीन वाचल्याचे समाधान देतो. प्रत्येक भाषेत यमकांचे शब्द मर्यादित असल्याने त्या यमकाच्या शब्दाला योजून आधीच्या कवीने लिहिलेल्या शेरापेक्षा आपला शेर ‘वेगळा’ होणे महत्वाचे असते.
अंगभूत प्रतिभाधर्मानुसार प्रत्येक कवीला ते कमी अधिक प्रमाणात साधते. वृत्त, काफिया, रदीफ अशी सर्व बंधने सांभाळताना बरेचदा कवींना ते अत्यल्प प्रमाणात साधते किंवा मुळीच साधत नाही आणि मग तोच तो आशय, तेच ते काफिये आणि तेच ते रदीफ घेऊन येऊ लागतो. हे उर्दू-हिंदी गझलांत फार मोठया प्रमाणावर झाल्याचे दिसते. मराठी गझलसुद्धा त्यातून सुटली नाही. मराठीच्या बाबतीतच नाही तर कोणत्याही भाषेतील गझल अशी तंत्रशरणता पत्करताना दिसते, ती देखील या काफियाप्राधान्यामुळेच.
सुरेश भटांची पुस्तके उघडणे, त्यातून रफीदसह - काफिये जसेच्या तसे उचलणे आणि कधी कधी तर वृत्त न बदलता शब्दांत थोडीफार फेरफार करून गझल लिहिणे हा प्रकार मराठीत सर्रास सुरू असल्याचे दिसते. देवनागरी लिपीतून उपलब्ध उर्दू-हिंदी गझला वाचल्याचा संस्कारही अशा मराठी गझलांवर फारसा दिसत नाही. जेथे दिसतो तेथे सरळ सरळ कल्पनाचौर्य आढळते. काफियांचा विचार गझलतंत्रात महत्वाचा विचार आहे. काफिया हा गझलेच्या शरीरातला पाठीचा कणा आहे, म्हणून त्याची अधिक तपशीलवार माहिती आपण करुन घेऊ या.
काफियाचे तीन प्रकार आहेत :
१)एकस्वरी काफिया :
यमकाच्या शब्दांत आवृत्त होणा-या समान अक्षरांच्या पूर्वी जो स्वर येतो तो कायम राखणारा काफिया म्हणजे एकस्वरी काफिया होय.
‘माझी भकास शिल्पे शोधीत काल होता;
तो देखण्या व्यथेचा ऐनेमहाल होता.
(गुलाल आणि इतर गझला, पृ. १२)
या गझलेमध्ये मतल्यात येणा-या ‘काल’ आणि ‘ऐनेमहाल’ या काफियांत ‘ल’ हे समान अक्षर आहे. त्यापूर्वी येणा-या ‘का’ आणि ‘हा’ या अक्षरांत ‘आ’ हा स्वर कायम आहे. त्याच गझलेत पुढे येणा-या ‘दलाल’, ‘हमाल’, ‘निकाल’, ‘रुमाल’, ‘गुलाल’ अशा यमकांमध्येही ‘ल’ या समान अक्षराअगोदर ‘आ’ हा एकच स्वर कायम आहे. म्हणून अशा प्रकारच्या यमकांना एकस्वरी काफिया असे म्हणतात.
काफियातील समान अक्षरांपूर्वी येणा-या स्वराला उर्दूत हर्फे-रवी किंवा अलामत (स्वर चिन्ह) असे म्हणतात.
२)बहुस्वरी काफिया :
यमकांच्या शब्दांत आवृत्त होणा-या समान अक्षरांपूर्वी एकच स्वर कायम राहत नाही तेव्हा त्या काफियांना बहुस्वरी काफिया म्हणतात. उदा. सुरेश भटांची ‘दंश’ ही गझल.
‘येणारा दिवस मला हेटाळत हसणारच
जाणारा दिवस मला जाताना डसणारच’
या गझलेत मतल्यात येणा-या ‘हसणारच’ ‘डसणारच’ या काफियात ‘सणारच’ या समान अक्षरांपूर्वी येणा-या ‘ह’ ‘ड’ या अक्षरांत ‘अ’ स्वर आहे. या गझलेत पुढे ‘पुसणारच’, ‘फसणारच’, ‘पिसणारच’, ‘दिसणारच’, ‘सणारच’ अशी यमके येतात. त्यातील ‘सणारच’ या समान अक्षरांपूर्वी ‘पु’ ‘फ’ ‘पि’ ‘दि’ ‘न’ अशा अक्षरात उ, अ, इ, इ, असे अनेक स्वर येतात. म्हणून अशा काफियांना बहुस्वरी काफिया असे म्हणतात. मतल्यातील काफियात येणारा ‘अ’ स्वर कायम राहिला नाही म्हणून याला अलामतीची चूक असे असे सुरेश भटांनी आपल्या ‘गझलेच्या बाराखडी’त म्हटले आहे. उर्दूत हा दोष दूर करण्यासाठी मतल्यातच ‘फसणारच’ आणि ‘पुसणारच’ असा बहुस्वरी काफिया स्वीकारण्याची सवलत दिली आहे.
म्हणजे सवलतीने का होईना पण काफियाचा बहुस्वरी काफिया हा एक प्रकार आहे. एकीकडे प्रत्येक शेराच्या स्वतंत्रतेचा आग्रह धरायचा आणि दुसरीकडे प्रत्येक शेरात काफियातील स्वरचिन्हाला घट्ट चिकटून राहायचे ही देखील एक प्रकारची तंत्रशरणताच होय. मराठी गझलात ही तंत्रशरणता टाळायची असेल तर अशा प्रकारच्या बहुस्वरी काफियांना मतल्यातील सवलतीविना स्वीकारले पाहिजे.
३) केवळ स्वराचा काफिया
ज्या यमकातील शब्दामध्ये कोणतीही अक्षरे समान नसतात आणि फक्त शेवटच्या अक्षरातील स्वर कायम असतो, त्या काफियाला ‘केवळ स्वराचा काफिया’ असे म्हणतात. उर्दूत त्याला ‘अलिफ का काफिया’ असे म्हटले जाते. उदा. खावर यांची गझल पहा-
‘ठेवू नको वेड्या असे स्मरणामधे, विसरून जा !
स्मरणात असलेले तुझ्या, हे मागचे विसरून जा!’’
(गझलांत रंग माझा-खावर, पृ. ५)
या गझलेच्या मतल्यात ‘स्मरणामध्ये’ आणि ‘मागचे’ हे शब्द काफिया म्हणून आले आहेत. त्यांच्यामधे शेवटून कोणत्याच समान अक्षरांची पुनरावृत्ती नाही. ‘धे’ आणि ‘चे’ ह्या शेवटच्या अक्षरांमध्ये ‘ए’ स्वर आला आहे. आणि तो स्वरच येथे काफिया झाला आहे. पुढे या गझलेत - ‘गुन्हे’, ‘पदे’, ‘सांगायचे’, ‘ते’, ‘माणसे’, ‘जुने’ असे शब्द काफिया म्हणून येतात. त्यातील ‘न्हे’ ‘दे’ ‘चे’ ‘ते’ ‘से’ ‘ने’ या शेवटच्या अक्षरांत ‘ए’ हाच स्वर येतो. अशा प्रकारच्या काफियाला केवळ स्वराचा काफिया असे म्हणतात. अशा काफियाची मराठीत सगळयात जास्त उदाहरणे खावर यांच्या गझलांतच सापडतात. खावर यांच्या गझलसंग्रहातून एकूण चौदा गझलांत असा स्वराचा काफिया आढळतो. उर्दू-हिंदीत तर जवळपास चाळीस टक्के गझलांत असा स्वराचा काफिया आढळतो. मराठी गझल अधिक सहज होण्यासाठी काफियांच्या वरील तीन प्रकारांपैकी केवळ पहिल्या एकस्वरी काफियावर अवलंबून न राहिल्यास मराठी गझलेला तंत्रशरणता टाळता येईल.
तुकाराम, बहिणाबाई चौधरी आणि मर्ढेकरांच्या कवितेतल्या यमकांचा जाणीवपूर्वक अभ्यास गझल लिहिणा-यांनी जरूर केला पाहिजे. सहज जुळणारी यमके तुकाराम-बहिणाबाई यांच्या कवितेत लोकभाषेतील म्हणींच्या वाटेने जात त्या ओळींना सुभाषितांचा दर्जा बहाल करतात तर मर्ढेकरांच्या कवितेतील यमके अभिव्यक्तीला आशयनिष्ठ काटेकोरपणा प्रदान करतात.
तिसरे कलम : एकच अंत्य यमक(रदीफ)
काफिया आणि रदीफ या दोन्ही संकल्पनांसाठी मराठीत यमक हा
एकचशब्द चुकीने वापरला जातो.रदीफला अंत्य यमक आणि त्याच्या अगोदर येणा-या काफियाला उपांत्य यमक म्ह्टले जाते किंवा काफियाला नुसतेच यमक म्हतले जाते.
रदीफ म्हणजे यमक नव्हे :
काफियाला यमक म्हणणे अगदी बरोबर आहे. पण रदीफला यमक का म्हटले जाते हेच कळत नाही. शास्त्रामध्ये प्रत्येक संकल्पनांचे अर्थ काटेकोर असतात. कारण त्याशिवाय विशिष्ट संकल्पनांची विवक्षितता स्पष्ट होत नाही. माळलेस, गाळलेस, ढाळलेस, चाळलेस, जाळलेस या शब्दांमध्ये ‘ळलेस’ अशा तीन अक्षरांची पुनरावृत्ती तर होतेच पण त्याशिवाय ह्या पुनरावृत्तीपूर्वी मा, गा, ढा, जा, ह्या अक्षरांतला ‘आ’ हा स्वर देखील आवृत्त होतो. म्हणजेच ज्या शब्दांत समान अक्षरे अगोदरच्या स्वरांसह आवृत्त होतात त्या शब्दांना आपण यमक म्हणतो.
परंतु ‘मला’ हा शब्द जसाच्या तसा पुन्हा पुन्हा आवृत्त होत असेल तर त्याला यमक म्हणत नाहीत. ‘माळलेस’ या शब्दाचे यमक ‘गाळलेस’ असे होईल पण ‘मला’ या शब्दाचे यमक ‘मला’च कसे होईल? म्हणून रदीफसाठी अंत्ययमक असा शब्द योजू नये. उदाहरणार्थ :
‘चराग़-ओ-आफ़्ताब ग़ुम, बड़ी हसीन रात थी
शबाब की नक़ाब ग़ुम, बड़ी हसीन रात थी’
सुदर्शन फाकिर यांच्यावरील गझलेत ‘बड़ी हसीन रात थी’ एवढे एक पूर्ण वाक्य रदीफ म्हणून पुनरावृत्त होते. तेव्हा ह्या वाक्याला अंत्य यमक म्हणणे कितपत संयुक्तिक होईल? म्हणून आपण रदीफला मराठीत अंत्य न म्हणता रदीफ हाच शब्द स्वीकारावा. तसेच काफियासाठी ‘यमक’ आणि शेरसाठी ‘द्विपदी’ आणि तसेच मतलासाठी शीर्ष-द्विपदी’ वगैरे आग्रही मराठी शब्द न स्वीकारता रूढ असलेले काफिया, शेर, मतला असेच शब्द स्वीकारणे योग्य होईल.
‘गझल’साठी हिंदीत गीतकार नीरज यांनी, ‘गीतिका’ मोहन अवस्थी यांनी ‘अनुगीत’ आणि खतौलीहून प्रकाशित विशेषांकात ‘तेवरी’ असे पर्यायी शब्द दिले (‘शामियाँने कांच के’ डॉ.कुँअर बेचैन पृ. ९) तरी ते शब्द रूढ न होता ‘गझल’ हाच शब्द कायम राहिला ह्या गोष्टीची नोंद घेण्यासारखी आहे. म्हणून ‘रदीफ’ला आपण मराठीत ‘रदीफ’च म्हणणे योग्य होईल. गझलेतील काफियानंतर पुनरावृत्त होत जाणारा शब्द किंवा शब्दसमूह म्हणजे रदीफ होय. हा रदीफ गझलेत मतल्याच्या दोन ओळीत आणि नंतर प्रत्येक शेरच्या दुस-या ओळीत पुनरावृत्त होतो. प्रत्येक गझलेत रदीफ असतोच असे नाही. रदीफ नसलेल्या गझलांना गैरमुरद्दफ गझल म्हणतात.
चौथे कलम : प्रत्येक कविता दोन दोन ओळींची (स्वतंत्र शेर)
व्याख्येबरहुकूम आपले अस्तित्व उत्तम कवितेने कधीही संकुचित केले नाही, तर आपल्या लवचिक अस्तित्वाच्या वारंवारतेने व्याख्येला बदलण्यास भाग पाडले आहे. गझलच्या संदर्भात याचे सगळयात चांगले उदाहरण म्हणजे गझलतंत्रातील चौथे कलम : दोन-दोन ओळींच्या स्वतंत्र कवितांची बांधणी. पूर्वीच्या काळी गझलचे सर्व शेर एकाच विषयावरचे असायचे. नंतर नंतर मूळ विषयाशी फटकून वागणा-या शेरांची संख्या गझलमध्ये वाढत गेली. अशा गझलांची संख्या एवढी वाढली की शेवटी व्याख्येला बदलावे लागले. गझलमध्ये प्रत्येक शेरचा संबंध अगोदरच्या वा नंतरच्या शेरांशी असतोच असे नाही (म्हणजेच असूही शकतो) - अशी सकारात्मक व्याख्या, नंतर मात्र प्रत्येक शेर स्वतंत्रच असला पाहिजे, त्यांचा एकमेकांशी संबंध असता कामा नये अशी संपूर्ण नकारात्मक झाली. एकाच विषयावर सर्व शेर असलेल्या गझलला मुसलसल गझल आणि विषय-वैविध्य असलेल्या गझलला गैरमुसलसल गझल असे म्हणतात. मराठी गझलने आपले तंत्र उर्दूतून जसेच्या तसे स्वीकारले असल्याने अर्थात मराठीत देखील अशा गैर मुसलसल गझलांची संख्या वाढत आहे.
एका शेरच्या अगदी मितभाषी अवकाशात आशयाची उत्कट अभिव्यक्ती करणे हे उत्तम कवितेचेच लक्षण आहे. परंतु एखाद्या गझलेत काही किंवा सर्व शेर एकच भावना तेवढ्याच उत्कटपणे मांडणारे असतील तरी तिला आपण गझल म्हटले पाहिजे. उर्दूची संकल्पना स्वीकारून तिला मुसलसल गझल म्हणता येईल. कारण आकृतिबंधाची पृथगात्मता सिद्ध करणारे वृत्त, काफिया, रदीफ असे नियम तर तिने पाळलेलेच असतात. शिवाय अशा प्रकारच्या गझलातील सुटा शेर मागचा पुढचा संदर्भ न घेताही संपूर्ण
अभिव्यक्ती वाटते. उदा. -
‘कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही.’
(एल्गार, प्र. आ. पृ.६)
किंवा
‘चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा.’
(एल्गार, प्र. आ. पृ. ८)
आता गझलतंत्राच्या शेवटच्या कलमाकडे वळूया.
पाचवे आणि शेवटचे कलम : दोन दोन ओळींच्या किमान पाच कविता (पाच शेर)
गझलेतील शेरांच्या संख्येची किमान मर्यादा सुरेश भटांनी पाच सांगितली तर माधव जूलियनांनी कमाल मर्यादा सतरा सांगितलेली आहे. पाचपेक्षा कमी शेरांच्या स्वत:च्याच गझलांना सुरेश भटांनी अपूर्ण गझला म्हटले आहे. त्यामुळे शेरांची संख्या किती असावी, याचे उत्तर देखील कवी किती शेर उत्तम लिहू शकतो असेच आहे. कवीच्या मनातला आशय उत्कटपणे केवळ तीन शेरांतच मांडला गेला असेल तर व्याख्येच्या पूर्ततेसाठी त्याने आणखी दोन शेर लिहून त्याच गझलेत घातले तर ते दुधात पाणी घालण्यासारखेच होईल. काफिये उपलब्ध आहेत म्हणून कवीने सुचतील तेवढे शेर गझलेत लिहून आपले पांडित्यप्रदर्शन करण्यापेक्षा उत्कट जमलेले शेर संपादन करून गझलेत ठेवल्यास कलाकृती म्हणून गझल घाटदार होईल. अन्यथा तिचा बांधा सुघड न दिसता तो सुजलेला वाटेल आणि सूज म्हणजे काही अंगभूत सौंदर्य नव्हे.
गझलेतील किमान शेरांची संख्या मात्र तीन पेक्षा कमी होता कामा नये. कारण दोन शेरांची गझल म्हणजे चार ओळींची गझल आणि चार ओळींची रुबाई सारख्याच होतील. एक मतला आणि एक शेर यातील काफिया जसा पहिल्या, दुस-या आणि चौथ्या ओळीत येतो तसाच तो रुबाईतही येतो. म्हणून गझल आणि रुबाई हे दोन वेगवेगळे आकृतिबंध सिद्ध होण्यासाठी गझलमध्ये कमीत कमी तीन शेर असले पाहिजेत. गझलच्या आकृतिबंधाची पृथकता जपणारी ती मर्यादा आहे. उदा. ‘सत्कार’ गझलमधील दोन शेर-
‘पापण्यांनी खोल केले वार तू;
सात माझे जन्म केले ठार तू.
हासुनी तू प्राण माझा घेतला;
चुंबुनी केले किती सत्कार तू !
(गुलाल आणि इतर गझला, पृ. ३७)
आणि एक रुबाई-
रामाची सीता उपवासी आहे,
राणी भुकेची तर दासी आहे;
मोक्षाची चर्चा भरल्या पोटाची;
रोटी काबा, भाकर काशी आहे!
(काही रुबाया - ‘हंस’, दिवाळी२००२ पृ. ७८)
अरबीत गझलांची सुरुवातीला जशी ठराविकच वृत्ते होती परंतु नंतर अनेक वृत्तांमध्ये गझला लिहिल्या गेल्या. तशीच प्रारंभी रुबायांची म्हणून काही ठराविक वृत्ते होती, पण आता मात्र विविध वृत्तांत रुबाया लिहिल्या जातात.
वृत्त, काफिया, रदीफ, स्वतंत्र शेर आणि त्यांची संख्या या गझलतंत्राच्या पाच कलमांचे विवेचन येथे संपते. गझलच्या संदर्भातल्या आणखी तीन महत्वाच्या मुद्यांची चर्चा तंत्राच्या अनुषंगाने होणे आवश्यक आहे.
१)गझलेला शीर्षक असावे का?
सुरेश भटांनी त्यांच्या गझलांना दिली तशी शीर्षके दिली तरी आकृतिबंधावर त्या शीर्षकांचा काहीच परिणाम होत नसल्याने तंत्राच्या दृष्टीने शीर्षक हा काही महत्वाचा मुद्दा नाही. ‘रंगारंग शायरी’ ह्या प्रातिनिधिक गझल संग्रहात हिंदीत शीर्षके दिली आहेत. पण बहुतांश वेळा एक तर शीर्षके दिलेली नसतात, किंवा मतल्याची पहिली ओळ किंवा तिचा काही अंश शीर्षक म्हणून दिलेला असतो.शीर्षक दिले अथवा दिले नाही किंवा कोणतेही दिले तरी आशयाची उत्कटता त्यामुळे उणावत-दुणावत नाही. उर्दू-हिंदीत शीर्षक नसतात म्हणून मराठी गझलेला शीर्षके नसावीतच हा आग्रह व्यर्थ आहे. ‘लकीर के फकीर’ ठरविणारा आहे.
२) मक्ता :
गझलच्या शेवटच्या शेरात कवीने आपले नाव किंवा टोपण नाव घालण्याची पद्धत सुरुवातीला उर्दू-हिंदीत होती. ती आजकाल काही फारशी आढळत नाही. मराठीत खावर, इ. कवींनी आपली नावे गझलच्या शेवटच्या शेरामध्ये गुंफली आहेत. मराठीत ‘गझलचे छंदशास्त्र’ लिहिणा-या आनंदकुमार आडेंचाही या संदर्भात फार आग्रह होता. परंतु सुरेश भटांच्या एकाही गझलेत असा मक्ता आढळत नाही. मुद्रण कलेचा प्रसार होण्याअगोदर मौखिक परंपरेत तसा मक्ता किंवा शिक्का असणे गरजेचे होते पण आज त्याची काहीच आवश्यकता वाटत नाही. गझलच्या शेवटच्या शेरातील तेवढी जागा आशयसापेक्ष शब्दासाठी वापरणे अधिक चांगले ही सुरेश भटांची भूमिका ग्राह्य वाटते.
3) भाषा :
गझलेची भाषा नाजुक साजुक असावी असाही एक नियम उर्दूत काही काळपर्यंत रूढ होता. आज उर्दू-हिंदीत तोही पाळल्या जात नाही. कारण प्रेमभावनांपासून सामाजिक भानापर्यंत प्रवास करणा-या गझलला केवळ गोंडस भाषेवर विसंबून राहता येणारे नव्हते. प्रत्येक काळात लिहिणारा कवी त्या काळात लोकांच्या तोंडी असलेल्या बोलभाषेत लिहीत असेल तर त्याची कविता वाचणा-याला आपली वाटते. उर्दू-हिंदी-इंग्रजी भाषेतले अनेक शब्द लोकभाषेने स्वाभाविकपणे स्वीकारलेले असतात. अशा दैनंदिन व्यवहाराच्या
भाषेत कवी लिहीत असतो. तेव्हा अमुक शब्द आपल्या भाषेतला नाही म्हणून त्याला अस्पृश्य ठरविणारा भाषिक शुद्धतेचा आग्रह कवीने मानता कामा नये. मग ती कविता छंदमुक्त असो की गझल. कवितालेखनाची वापरून वापरून चोपडीगीर झालेली पुस्तकी भाषा आणि बोलणा-यांच्या जिभेवर आपले अनघडपण जपणारी कंगोरेदार बोलभाषा यांतील अंतर मिटविणे हे श्रेष्ठ कवितेचे लक्षण होय. कविता रचणे हे कौशल्य आहे; तर ती रचलेली आहे हे ओळखू येऊ न देणे ही कला आहे. तंत्राची शरणता आणि शुद्धता ही या संदर्भातच जोखली पाहिजे.
(अमरावती येथे दि. ७-८ फेब्रुवारी २००४ला संपन्न झालेल्या तिस-या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनातील परिसंवादात वाचलेला निबंध.)
(डॉ. श्रीकृष्ण राऊत, शंकरनगर, जठारपेठ, अकोला - ४४४००५)
(पूर्वप्रसिद्धी ‘कविता-रती’ दिवाळी २००४)