श्री. रा. रा. जोतीराव गोविंदराव फुले,
पुणे,
यांना
अकोल्याहून श्रीकृष्ण नारायणराव राऊत यांचा
शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष.
पत्र लिहिण्यास कारण की, मला तुम्हाला काही सांगायचे आहे. माझं मन तुमच्याजवळ मोकळं करायचं आहे. तुमच्याशी बोलायचं आहे. पण बोलण्याची हिम्मत नसल्यामुळे - हे अगदी सरळ आहे. यात तिरकसपणा वगैरे काही नाही - मी आपला बापडा मराठीतला एक छोटासा कवी तुम्हाला हे पत्र लिहितो आहे.
तर सांगायचा मुद्दा असा की, तुम्ही मला आवडत असूनही मी तुम्हाला ‘प्रिय’ यासाठी नाही लिहिलं, की ते तद्दन इंग्रजीतल्या ‘डिअर’ वरून आयात केलेलं आधुनिकतावादाचं मराठीकरण आहे. आणि आम्ही पडलो ‘देशी’ वाले-
थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा ।
तोच पैसा भरा, ग्रंथासाठी ॥
-असे ‘देशी’ वाले नव्हे ‘देशीयते’ वाले हो, म्हणून ‘प्रिय’ टाळले.
दुसरे असे की, तुम्हाला ‘ज्योतीबा’ मी यासाठी संबोधित नाही की, मला तुमच्या नावामध्ये चिकटलेले ‘बा’ हे उपपद विठोबा, ज्ञानोबा, नामोबा, सावतोबा, तुकोबा या परंपरेतले वाटते. तसे परंपरा म्हणून ते ‘देशी’ च ठरते हे खरे. पण त्यामुळे तुम्हाला संतत्व चिकटण्याची भीती मला सारखी वाटते आहे. बरं त्यातल्या त्यात तुम्ही ‘अभंग’ ही लिहिलेत. म्हणजे भीतीच भीती!आणि एकदा संतत्व चिकटवलं की चमत्कार चिपकायला वेळ नाही लागत.
उदाहरणार्थ चांगदेवांनी वाघावर स्वारी करून नागाचा चाबुक केला की, ज्ञानदेवांना भिंत चालविणे भाग पडते. नामदेवाच्या हातून विठ्ठलाला जेवावे लागते. आपला सावता ‘माळी’ या स्पर्धेत मागे राहू नये म्हणून खुरप्याने पोट कापून साक्षात परब्रह्मालाच सावतोबाने पोटात लपविल्याची कथा आमचे लोकमानस घडवते. तिला लोकगीतात गुंफते. बिचार्या नामदेवाचे ‘मडके’ पुन्हा एकदा वाजवून पाहते व ‘कच्चे’ राहिल्याचा निर्वाळा देते. कोणत्या ताणाने नामदेवाची ‘शिलाई’ अशी वारंवार ‘उसवते’ काही कळत नाही. यात वापरलेला ‘धागा’ नक्कीच ‘फुसका’ असला पाहिजे. लोकगीतातून ही कथा मोरोपंतांच्या काव्यात अवतरते आणि शब्दप्रामाण्याला चिकटून बसणारे लोकमानस त्याला चमत्कार करून टाकते. आणि तुकोबा तर चक्क ‘विमान’च उडवतात. ते ‘कळस’ असल्याने आमचे लोकमानस त्यांच्याकडून एवढे तर करवून घेणारच!
यात आणखी एक नवा ‘अध्याय’ म्हणजे ज्यांचे संतत्व आम्ही स्वीकारतो, त्यांचे कवित्व नाकारतो आणि ज्यांचे कवित्व मानतो त्यांचे संतत्व अव्हेरतो.
अशा लार्जस्केलवर झालेल्या महाराष्ट्रातल्या अफरातफरी तुमच्या कानावर असतीलच. म्हणून मी तुम्हाला ‘ज्योतिबा’ संबोधने टाळतो. शिवाय ‘राव’ म्हणण्यात एक खास ‘पुणेरी’ टच आहेच की !
तुमचं बाकी एकेक अजबच आहे, जोतीराव. एकीकडे तुम्ही ‘छत्रपती’ वर पोवाडा लिहिता. दुसरीकडे ‘महंमदा’वर अभंग ! तिसरीकडे ‘ख्रिस्ता’ ला बंधुपरी पोटाशी धरता. धर्मातीत झालेलं तुमचे हे ‘विराट’ रूप आमच्या चर्मचक्षूंना दीपवून टाकणारं, पापण्या बंद करायला लावणारं आहे. आणि मग वैदिक संस्कृतीचा इतिहास लिहिणारे आमचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘पृथ्वीवरील ईश्वराचे राज्य ही कल्पना ज्योतिबांना ख्रिश्चन धर्मापासून मिळाली असावी असे स्पष्ट दिसते’ तुमच्यावर राष्ट्रपतीपदक विजेता चित्रपट काढणारे आचार्य प्र. के. अत्रे म्हणतात - ‘परमेश्वरावर परमनिष्ठा हा रानडे यांचा धर्म - फुले यांचा धर्म, ईश्वराविषयीची शुद्घ कल्पना जी उपनिषदांत सांगितली आहे.‘ईशावास्य...’ एक ईश्वर -अर्थात एकच धर्म.आता बोला ! तर्कतीर्थ आणि आचार्यांच्या या लढाईत तुम्ही कोणत्या बाजूचे? तुमचा सार्वजनिक सत्यधर्माचा शोध काय सांगतो? तुम्ही ‘सत्य’ असलेल्या धर्मावर किंवा धर्मातल्या ‘सत्या’वर जी सत्यशोधक समाज चळवळ उभी केली, तिचे पर्यवसान तुमच्या निधनानंतर ‘ब्राम्हण-ब्राह्मणेतर’ चळवळीत झाले आणि व्हायचे तेच झाले- इकडे तुमचे निधन झाले. तिकडे ‘चळवळ’ दफन झाली. ‘ब्राह्मणांचे कसब’ ‘गुलामगिरी’ ‘शेतकर्यांचा असु्ड’ मधील तुमचा वैचारिक हल्ला ‘ब्राह्मणां’वर नव्हता तर ‘ब्राह्मण्या’वर होता. म्हणून तुम्ही टिळकांच्या जामिनासाठी सावकारांची घरं पालथी घातली. जोगेश्वरीच्या बोळातील, चिपळुणकरांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. तो भाग काही मागासलेल्या लोकांचा नव्हता. म्हणजे ही मुलींची शाळा पुढारलेल्या ब्राह्मणवर्गातील मुलींसाठी होती. माणसातल्या पशुच्या वासनेची शिकार झालेल्या बालविधवांच्या पोटी आलेल्या नवजात नवजात बालकांच्या गळ्याला नख लावणारी क्रूरता आणि तोंडाने ‘खळांची व्यंकटी सांडो’ म्हणणारी दांभिकता तुम्हाला पाहवेना. म्हणून तुम्ही ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ आपल्या राहत्या घरात उघडले. काशीबाई या ब्राह्मण विधवेला आत्महत्येपासून परावृत्त करून तिच्यापोटी आलेल्या ‘यशवंता’ ला दत्तक घेतले. हे आमच्या शब्दशूरांना आणि वाचावीरांना कसे मानवावे? तुमच्या जाण्याला १२३ वर्षे झाली.त्यामुळे इये मराठीचिये नगरी’ काय काय चालले आहे याची तुम्हाला खबरबात नसेल नाही का?अहो,अलीकडे मराठीत नवकथा आली. नवकाव्य आले. नवसमीक्षा आली. समाजवाद, साम्यवाद, वास्तववाद, अस्तित्ववाद वगैरे वाद आले. ग्रामीण, दलित, आदिवासी, जनवादी वगैरे सवतेसुभे आले आणि त्यासोबतच प्रत्येक समाजात नवशिक्षित, नवमध्यम, नवश्रीमंत असा वर्ग आला. आणि याची अपरिहार्य परिणती म्हणून नवतुच्छता वाद - आजकाल आम्ही याला ‘ब्राह्मण्य’ वगैरे म्हणत नाही - आला आणि तुम्ही शोधलेले ‘सत्य’ झाकोळून गेले. आज संघर्षाचे रूप उघड उघड असे ‘स्थूल’ राहिलेले नाही तर ‘सूक्ष्मतम’ झाले आहे.
याचा अर्थ एकच होतो जोतीराव. की ‘सत्य’ हे उपनिषदकालीन असो की, समकालीन. ते एकच असते. फक्त काही भाष्यकारांनी भाषेच्या गुंतागुंती करून ते संवेष्टित करून टाकलेले असते. आणि प्रत्येक काळी त्याच सत्याचा पुन्हा पुन्हा शोध घ्यावा लागतो. तो ‘अखंड’ पणे चालू ठेवणे हेच लिहिणार्याच्या हातात असते. लिहिल्या - छापल्या गेलेल्या शब्दांची किंमत मी तुम्हाला सांगावी एवढी माझी लायकी नाही. पण तुमचा शब्द छापला गेला नसता, आणि बाबासाहेबांनी तो प्राणपणाने जपून ठेवला नसता तर कदाचित इथल्या व्यवस्थेने तुमचाही ‘चार्वाक’ करून टाकला असता, असे मनात आल्यावाचून राहत नाही.
बाबासाहेबांवरून आठवलं बाबासाहेबांना आपल्या मायबाप भारत सरकारनं ‘भारत रत्न’ दिल्याचे तुमच्या ऐकिवात आहे की नाही? तुमच्या शिष्याला ‘भारतरत्न’ मिळाल्याचा आनंद गुरु म्हणून तुम्हाला नक्कीच झाला असणार ! तुमचं ‘महात्मा’पण ‘भारतरत्न’ पेक्षा कितीतरी विशाल आहे. हे आम्हाला कळतं.पण कधी राजकीय स्वार्थासाठी, कधी निवडणुकीवर डोळा ठेवून अशा मागण्या करण्याचं काम तोतये पुरोगामी समाजाच्या सर्व स्तरावरून करतात; आणि एक प्रकारे त्यातून - माफ करा पण नाइलाजाने म्हणावं लागतं - ‘तुमच्या’ माळी समाजाला इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि अख्ख्या बहुजन समाजाला तुमच्या नावावर ‘अंडरप्लेड’ करणंही शक्य होतं. जोतीराव, आता सगळे कसे ‘राष्ट्रीय’ आणि ‘राष्ट्रवादी’ झाले आहेत. यात कोणीच सच्चा ‘महाराष्ट्रवादी’ नाही का? की जो दिल्ली दरबारी तुमच्या-सावित्रीबाईंच्या ‘भारतरत्न’ चा प्रश्न धसास लावेल. इंटरनेटवर तुमची एखादी वेबसाइट काढेल. आणि ‘सत्य’ अदृश्य करण्यासाठी ती वेबसाईट पुसणारा एखादा व्हायरसही सोडेल !
म्हणून म्हणतो जोतीराव, ‘सत्य’ धर्माचा शोध न संपणारा आहे. तुमचे ‘अखंड’ आणि ‘असूड’ इतक्यातच असे म्यान करून ठेवू नका!ते समर्थ हातात द्या.म्हणजे काही अफरातफरींचे ‘सत्य’तरी हाती लागेल. उदाहरणार्थ,
काल मी सहज तुमच्या ‘निर्मिक’शब्दाचा अर्थ पाहू म्हाणून ऐंशी हजार शब्द असलेला ‘आदर्श मराठी शब्दकोश’ पाहिला तर त्यात ‘निर्मिक’चा समावेशच नाही.ही एक प्रकारची भाषिक अस्पृश्यताच नव्हे काय जोतीराव?
बहुत काय लिहिणे.आपण सुज्ञ असा.
इतिश्री लेखनसीमा.
आपला नम्र,
श्रीकृष्ण नारायण राऊत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा