कोई उनसे कह दो हमे भूल जाए


पस्तीस वर्षांपूर्वी बरोबर आजचीच तारीख होती.दिनांक २८ ऑगस्ट १९७६. वार फक्त शनिवार होता. तो गणेश चतुर्थीचा दिवस. सायंकाळी पाच वाजून नऊ मिनिटे. ऑल इंडियाच्या समाराचात तुझ्या निघुन जाण्याची अशुभ वार्ता मोर्याsमोर्याच्या कल्लोळातही कान अचूक टिपतात. मशहूर गुलुकार मुकेश का कल शाम अमरिका मे...

पुढचं ऐकायच्या आतच सर्व गात्र सुन्न पडल्यासारखी वाटली. राहवल्या नाही गेलं यार! जोरान ओरडलो मी, मुकेश, मुकेSSश तुलाही एवढ्यातच जायचं होतं का? अरे बाहेर काय चाललंय बघ तरी. बिचार्‍या तू अमेरिकेत-होतास कालपावेतो-तिथे कसले गणपतीन्‌ बिनपती. अन्‌ हा मोर्याssचा जल्लोष. हर्षकल्लोळ.

तू निघून गेल्यावर, तू निघून गेल्याची बातमी दुसर्‍या दिवशी कळते आम्हाला. चोवीस तासानंतर ! जग अजून काहीच विकसित झालं नाही असं वाटतं. एवढीशी बातमी कळायला तब्बल चोवीस तास!

गणेश चतुर्थीचा - बालगोपालांचा - तरुणांचा हर्ष बघून, त्यांना तू गेल्याचे सांगावंही वाटत नाही. त्यांचा विरस होईल. उद्या कळेलच त्यांना-तरी भेटतील तेवढ्यांना मी सांगतो. सर्वच जण अगदी निकटचा जीवलग दोस्त निघून गेल्यागत सुन्न होतात. तू सर्वांचा होतास. आहेस, राहशीलही. तुझ्या स्वरातला दर्द श्रोत्यांशी रिश्तेदारी ठेवणारा होता.

मंगल गणनायकाचे आगमन अन्‌ तुझे विसर्जन !

एवढा योगायोग गुलशन नंदाच्या बापालाही जमणार नाही. गुलशन नंदा - कटी पतंग - आठवलं यार आठवलं -

जिस गली मे तेरा घर ना हो बालमा

उस गली से हमे तो गुजरना नही

जो डगर ते द्बार पे जाती न हो

उस डगर पे हमे पाँव रखना नही

आताही त्याच गल्लीने गेलास तू ! ज्या गल्लीत तुझ्या प्रियेचे-मृत्युसखीचे घर होते.

तुझ्या स्वरांनी तुझं-आमचं एक शब्दातीत नातं जोडलं. आमच्या हृदयातला दर्द तुझ्या गाण्यातून उमटायचा. आणि तू आमच्या हृदयात भिडत भिडत तुझं घर कोरीत रहायचा.

तू कुठे? आम्ही कुठे? पण आपला संवाद चालायचा गाण्यांच्या ओळीओळीतून.

तुझा फोटो दिसला की तेच तुझं दर्शन. तीच तुझी भेट. आमच्या दु:खांना तू कंठ दिलास. आज तुझ्या निघून जाण्यानं आमचं दु:खच मुकं झालंय.

तुझं गाणं आवडलं नाही असा माणूस दुर्लभच. अगदी अशक्यच. तुझा तो एक प्यार का नगमा-

कुछ खोकर पाना है कुछ पाकर खोना है

जीवन का मतलब तो आना और जाना है

परछाईयाँ रह जाती रह जाती निशानी है

जिन्दगी और कुछ भी नही

तेरी मेरी कहानी है।

खरंच, तुझ्या गाण्याची सावली, तुझ्या स्वरांची निशाणी तेवढीच आमच्याजवळ राहिली.

आज माझ्यासारख्या तुझ्या चाहत्यालाच अश्रू सांभाळता येत नाहीत. तुझ्या जवळच्या मित्राचं काय? कल्पनाही करवत नाही.

मनोज अन्‌ राजचा तू आवडता गायक. लोकप्रियतेच्या अति उच्चशिखरावर किशोरकुमार असताना देखील ह्या दोघांनी स्वत:साठी तरी तुझाच आवाज सातत्याने उसना घेतला. मनोजचं, मै ना भुलुंगा... समय की धारा में... उमर बह जानी है... तुझं ही आयुष्य तसंच वाहून गेलं. आम्ही पहातच राहिलो.

कोई जब तुम्हारा हृदय तोड दे

तब तुम मेरे पास आना प्रिये

आता आम्ही कोणाकडे जायचं, सांग? आमचंही हृदय तोडून निघून गेलास तू.

राजची तर एक परंपरा. आवाजासाठी पोरका झाला होता बिचारा.

सजन रे झूठ मत बोलो

खुदा के पास जाना है

गेलासना शेवटी. पायीच का? नाही रे, तुझ्यासारखी माणसं देवाजवळ पायी जात नसतात. आम्हा सर्वांच्या हृदयांच्या पायघड्यांच्या पालखीतून गेलास तू.

तुझ्या पाऊलखुणा-

मेरे कदम जहाँ पडे सजदे किये थे यार ने

खरोखर तुझ्या पाऊलखुणांवर नतमस्तक होणारे लाखो दु:खी जीव आज किती एकाकी पडले असतील. तुझं एकेक गाणं आठवू लागतं. त्यातलं कोणतं सांगावं ? तुझं गाणं कानांना जबरीन ऐकावं लागत नसे. उलट कानांनाच ओढत घेऊन जायचा तुझा स्वर.

तुझा तो सदाबहार ‘सरस्वती चंद्र’ -

मुझे दोष ना देना जगवालों हो जाऊ अगर मै दिवाना

फूल तुम्हे भेजा है खत मे फूल नही, मेरा दिल है

अन तुझी ती ‘सहेली’ भेटते अधून मधून, जिला तू म्हणाला होतास -

जिस दिल मे बसा था प्यार तेरा

उस दिल को कभी का तोड दिया, हाय तोड दिया

बदनाम न होने देंगे तुझे

तेरा नामही लेना छोडा दिया, हाय छोड दिया

तुझं गाणं कानातून सरळ हृदयात उतरायचं. तू मुळचाच दर्दी. त्यात शायर दर्दी. त्यातल्या त्यात संगीतकार त्याहूनही दर्दी, अन्‌ श्रोते हमदर्दी. गाण्यातून उठणार्‍या भावतरंगावर आम्ही कितीतरी वेळ वाहत जातो. डुंबत जातो. चिंब होत जातो. तू एकदा म्हटलं होतंस-

मेरा प्रेम हिमालय से उँचा

सागर से गहरा प्यार मेरा

एवढंच प्रेम-नाही; त्यापेक्षा कितीतरी पट प्रेम आम्ही तुझ्या गाण्यांवर केलं.

संध्याकाळी तुझा ‘आनंद’ येतो. कानावर अलगद स्वर फेकीत -

कही दूर जब दिन ढल जाए

सांजकी दुल्हन बदन चुराए, चुपकेसे आए

मेरे खयालोके आंगनमें कोई सपनोंके दीप जलाए

ऐकता ऐकता आम्ही तलम मल्मली उदास होऊन जातो.

तुझी ती चांदी की दिवार ना तोडी प्यार भरा दिल तोड दिया आम्ही आमच्या कानांत-मनात पक्की बांधून ठेवली. तुझी मुफ्त हुए बदनाम सारखी जुनी तक्रार असो की कभी कभी मेरे दिलमे सारखं नवं मनोविश्लेषण असो, गोडवा सारखाच. हृदयास भिडणे सारखेच.

तुझं चॉंद को क्या मालूम चाहता है उसे कोई चकोर असो रमैय्या वत्तावैय्या असो, मेरे मन कीगंगा असो की, ये दुनिया एक नंबरी असो, तुझा आवाज चटकन ओळखला जायचा. आपला मुकेशच हा!

१९४१ ते १९७६ ह्या पस्तीस वर्षात पंधरा हजाराहून अधिक गाणी गाणारा तू. तू आता अबोल झाला असला तरी तुझी ही गाणी बोलतच राहतील. अनंत काळपर्यंत. गाणं म्हणणारा कधी अबोल झाला काय?

हृदयविकाराचा बळी तू. एक हृदयविकार आम्हालाही जडवून गेलास. एस. डी. अन्‌ वसंत देसाई दोन तारा तुटल्या. तू गेलास आणि एक सतारच अबोल झाली. कुठं तरी तू म्हटलं होतंस-

मै तो इक ख्वाब हूं

इस ख्वाब से तू प्यार न कर

आमचं एक संगीतमय स्वप्नचं भंगलय रे!

संगीतमय स्वप्ना, तू जेथे असशील तेथे सुखी राहा! तुला देखील कल्पना नव्हती माणसं कोण्या अज्ञात वाटेनं जातात, म्हणून तर तू असा संभ्रमात पडायचास-

जाने चले जाते है कहाँ?

दुनिया से जानेवाले जाने चले जाते है कहाँ?

नहीं कदमो के भी निशाँ जाने चले जाते है कहाँ

आता माहीत झालं का तुला, जाणारे कुठं जातात ते?

सांगना. साग. बोलना. बोल. अरे बोल राजा बोल. काय? काय म्हणतोस?

आँसू भरी है ये जीवन की राहें

कोई उनसे कह दो हमे भूल जाए

भूल जाए?.तुला कसं विसरता येईल मुकेश यार. तू आहेस आमच्या भावविश्वाचा हळवा प्रदेश.तू आहेस आमच्या

मनाचा दुखरा कोपरा.तू आहेस आमच्या काळजाचा घायाळ तुकडा. तुला विसरता येईल? अशक्य!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा