'देवकी नंदन गोपाला' या चित्रपटात एक संवाद आहे 'आपल्या आयुष्याचं लोखंड व्हावं, सोनं व्हावं. की परिस व्हावं हे ज्याचं त्यानं ठरवायच असतं' गाडगेबाबा परीस झाले त्यांनी महाराष्ट्रातल्या भोळ्या, अडाणी बहुजन समाजाचं सोनं केलं.असाच एक परीस आज चौर्याहत्तर उन्हाळे - पावसाळे पाहून पंचाहत्तराव्या वर्षात दमदार पाऊल ठेवत आहे. लोहा-लोखंडापेक्षाही कवडीमोल असणारी सामान्य माणसांची कितीतरी आयुष्ये ज्याच्या स्पर्शाने उजळून निघाली त्या परिसाचं नाव आहे. माननीय वसंतरावजी धोत्रे.
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांनी बहुजन समाजाच्या मागासलेपणाचं दुखणं नेमकेपणाने ओळखलं होतं शिक्षणाशिवाय ह्या समाजाला तरणोपाय नाही. म्हणून भाऊसाहेबांनी शिक्षण संस्था काढली तिला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले. नांगर चालवणार्या शेतकर्यांच्या हाती शिवाजी महाराजांनी तलवार दिली आणि मराठ्यांचे राज्य निर्माण केले तर त्याच शेतकर्यांच्या मुला-मुलींच्या हातात भाऊसाहेबांनी लेखणी ठेवली आणि विदर्भात विज्ञानाचे फुलझाड लावले. मेडिकल, इंजिनियरींग अशा शाखांनी ते फुलले. चिखली ते पवनी असा विस्तीर्ण, भूप्रदेश ‘शिवाजी’ च्या पवित्र नावाने सुगंधित झाला. अमरावतीला भाऊसाहेबांच्या स्मृतीकेंद्राच्या रुपाने आधुनिक तीर्थक्षेत्र अवतीर्ण झाले. 2000 साली तेव्हाचे राज्यपाल माननीय पी. सी. अलेक्झांडर यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेला ’उत्कृष्ट संस्था पुरस्कार’ देऊन एक प्रकारे राजमान्यता दिली. गाडगेबाबा राज्य पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार संस्थेला मिळाला आधीच असलेली लोकमान्यता चहुदिशांनी बहरली.
सर्वांना सोबत घेऊन चालणारा लोकसंग्रह, कालबद्घ नियोजन आणि असामान्य प्रशासन कौशल्य हे सर्व पैलू धोत्रे साहेबांच्या संपन्न व्यक्तिमत्वात चांगले मुरलेले आहेत. काल मी एक फोटो पाहिला. ज्यात भाऊसाहेबांची परिवर्तन पालखी धोत्रे साहेब आपल्या खांद्यावरून वाहून नेत आहेत. अर्थाने ओतप्रोत भरलेली एखादी आशयसंपन्न कविता असावी. असा तो फोटो मला वाटला.
बहुजन भोळे गिळून टाकले होते अंधाराने
घरे मोडकी उभी राहिली तुझ्याच आधाराने
भाऊसाहेबांवर लिहिलेल्या माझ्याच कवितेतल्या ह्या ओळी तो फोटो पाहून मुर्तिमंत झाल्या सारख्या मला वाटल्या. परिवर्तनाची पालखी धोत्रेसाहेबांनी आपल्या खांद्यावरून वाहून तुमच्या-माझ्या अंगणात आणली बहुजनांची नवी पिढी शिकून सवरून शहाणी होऊ लागली. सभा संमेलनं गाजवू लागली. भाऊसाहेबांचं स्वप्न धोत्रे साहेबांच्या दूरदृष्टीनं पूर्ण होताना दिसू लागलं. आपण कोणत्या पदावर आहोत? त्या पदाची इतिहासदत्त जबाबदारी काय आहे. बदलत्या काळाची पावलं कोण्या दिशेनं पडत आहेत? याचेसजग भान धोत्रे साहेबांना असते.
संस्था महटली की हजारो माणसं, हजारो प्रवृत्ती हजारो स्वभाव यांचा अचूक अभ्यास लागतो. संस्थेची प्रतिष्ठा आणि शेतकरी-कष्टकरी माणसांचे हित याकरिता प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी आपले-परके, नाती-गोती, दोस्त-मित्र हे सर्व बाजुला ठेवाव लागतं. धोत्रे साहेबांच्या करारी स्वभावाला ते सहज जमतं अर्थात त्यामागे त्यांचा सहकार क्षेत्रातील प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे.
अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सुरु झालेला त्यांचा प्रवास श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदापर्यंत यशाची उत्तुंग शिखरे गाठणारा आहे. त्यातल्या एका महत्वाच्या या मुक्कामावर साहेबांनी सहकार खात्याचं मंत्रीपदही भूषविलं आहे. जिनिंग प्रेस असो की सूत गिरणी, कुक्कुट विकास असो की साखर कारखाना आणि मार्केटिंग फेडरेशन असो की, विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद प्रत्येक ठिकाणी काम करतांना त्यांनी आपली छाप पाडली. कामात जीव ओतला. कमालीच्या सचोटीने आणि आत्यंतिक निष्ठेने आपली जबादारी यशस्वीपणे पार पाडली. वारकर्यांच्या भक्तीभावाने या दिंडीत वाटचाल केली. म्हणून तर त्यांना संस्था ही मंदिरा इतकी पवित्र वाटते आणि भाऊसाहेब दैवताइतके पूजनीय वाटतात.
मुद्दा अंधश्रद्घेचा असो. संत तुकारामांच्या वैकुंठगमनाचा असो की शेतकर्यांच्या आत्महत्यांचा असो त्याबद्दल आपली परखड, वस्तुनिष्ठ मते कुणाचीही भीड मुर्वत न ठेवता ते स्पष्टपणे मांडतात. तेव्हा माझ्या सारख्यांच्या मनातला त्यांच्या बद्दलचा आदर शतगुणीत होतो. त्यांचे भाषण ऐकण्याची एकही संधी मी सोडत नाही.
शेतकर्यांना अधिक उत्पन्न मिळावे म्हणून ज्या कृषी तज्ज्ञांनी रासायनिक खताची शिफारस केली होती तेच कृषी तज्ज्ञ आता म्हणतात की, रासायनिक खतांमुळे शेती निकस होते, अन्न विषारी होते म्हणून तेच तज्ज्ञ आता सेंद्रिय खतांची शिफारस करीत आहेत. शेतकर्यांच्या जीवाशी खेळ खेळणार्या अशा दुटप्पी कृषी तज्ज्ञांचे परखड ऑडिट ते आपल्या भाषणात करतात.एखाद्या पट्टीच्या वक्त्यालाही वाकवता येणार नाही अशा तर्हेने ते मराठी भाषेला वाकवत असतात. वर्हाडी बोलीतला गोडवा आणि बोलण्याची लकब आपल्याला थेटपणे गाडगेबाबांच्या कीर्तन शैलीची आठवण करून देते. जीवनाची समग्र जाण आणि समाजाचे भान त्यांच्या शब्दाशब्दांतून ओथंबत असते. त्यात कधी किशोर मोरेंना पुण्याला जाऊ नका म्हणून आत्मीयतेने सुचविलेले असते तर कधी खांद्याला खांदा लावून काम करणारा डॅडी सारखा सहकारी मित्र गेला म्हणून मनभरुन जिव्हाळा असतो.
त्यांच भाषण असं वेगवेगळ्या प्रसंगी अनुभवांच्या रोकड्या तत्वज्ञानानं मला आत आत खोलवर भिडलेलं आहे. प्रेमानं जवळ घेऊन समजावणार्या प्रेमळ मातेसारखे अशावेळी ते वाटतात. तर शिक्षक-कर्मचार्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देताना त्यांचे कठोर शब्द मला आपल्याच भल्यासाठी बोलणार्या पित्यासारखे असतात.
अशा पितृतुल्य माणसाच्या वाढदिवशी अभिष्टचिंतनाचे चार शब्द लिहितांना संत तुकाराम, गाडगे बाबा आणि भाऊसाहेब या आपल्या दैवतांच्या चरणी प्रार्थना करुन धोत्रे साहेबांसाठी निरामय आयुष्याचे शतक पूर्ण होण्याचे वरदान मागू या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा