अश्वमेध_नामदेव चं.कांबळे

श्रीकृष्ण राऊत खरे तर गझलकार  श्रीकृष्ण राऊत. गझल लेखनात उमेदवारी करता करता ते प्रस्थापित कवी झाले. त्यांच्या गुलाल आणि इतर गझला कविता संग्रहावर वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, ना. घ. देशपांडे, मंगेश पाडगावकर आदी मान्यवरांनी आपापले अभिप्राय देवून त्यांच्या कवितेचे तोंड भरुन कौतुक केले.
गझल रचना प्रकारात पाय रोवून उभा असलेला हा कवी गझलेतच न रमता नंतर गद्य कवितेकडे वळला. राऊत गद्य कवितेकडे फक्त वळलेच नाहीत तर त्यांनी तेथेही आपला दमदार ठसा उमटवला. उमटवतच आहेत. याचे खरे कारण जर कोणते असेल तर त्यांचे काव्यगत विषयाविषयीचे मनन, चिंतन आणि त्या मुशीतून अविष्कृत होणारी त्यांची कविता!
'अश्वमेध' हे कवितेचे शीर्षक एकूण कविता प्रथमदर्शनी विसंगत वाटतात. कारण फार पूर्वी म्हणजे राजे, महाराजे असतानाच्या काळात त्यांचे सैन्य रथदल, गजदल, अश्वदल, पायदल असे विभागलेले असायचे. अश्व रथाला ओढायचे आणि स्वारांना घेवूनही दौडायचे. घोडदौड प्रगतीचे आणि राज्याच्या भरभराटीचे लक्षण मानले जायचे. कधी तर एखादा राजा अश्वमेध यज्ञ करायचा. घोड्याला सजवून त्याच्या पाठीवर राज्याचा ध्वज बांधायचा. संरक्षणासाठी भरपूर सैन्य घ्यायचा आणि घोड्यासह त्याचा प्रवास अनेक राज्यातून व्हायचा. ज्यांना संबंधीत राजाचा अधिकार, शौर्य मान्य असायचे ते खंडणी देवून त्यांचे वर्चस्व मान्य करायचे. अडवलाच कोणी अश्वमेधाचा घोडा तर दोन्ही सैन्यात युद्घ झडायचे. त्यात अश्वमेध करु पाहणार्‍या राजाचा विजय झाला तर दुप्पट खंडणी घेवून घोडा मार्गस्थ व्हायचा. राजधानीत परत आल्यावर राजा यज्ञ करायचा. नंतर त्याला सम्राटपद मिळायचे.
श्रीकृष्ण राऊतांच्या कवितेत असा राजा कुठेच असत नाही. असतात ते स्वार आणि वजीर ! त्यामुळेच कवितेचे शीर्षक प्रथमदर्शनी कवितेशी विसंगत दिसते. परंतु ते तसे नाहीच. कारण कविला ऐतिहासिक घटनेचा परामर्श घ्यायचा नाही. तिचा संदर्भ देत कविला अलिकडच्या राजकारणावर, राजकारण्यांच्या वृत्ती, प्रवृत्तींवर भाष्य करायचे आहे. त्यासाठी कविने घोडा, लगाम, स्वार, वजीर ही प्रतिके वापरली आहेत.
कवितेतील घोडा म्हणजे राजकारणी कार्यकर्ता, त्याचा लगाम म्हणजे त्याचा पक्ष आणि वजीर म्हणजे राजकारणातील त्याचा गॉड फादर या अंगाने कविता उलगडली तर त्या प्रतिकांची संगती लागते.
काँग्रेस पक्षाच्या अश्वमेधाचा वारु 1950 पासून चौखूर उधळत आला. तोच राजकारणातला सम्राट पक्ष. दर पाच वर्षांनी त्याचा अश्वमेध होतो. सम्राटपदाचा मुकूट त्यालाच मिळतो. कारण इतर पक्षांना तो अप्राप्य. फार तर एखाद दुसर्‍या राज्यात हा वारु अडत असेल, युद्घाची नौबत झडत असेल परंतु सम्राटपद त्यालाच. केंद्रातला तेरा वर्षाचा रालोआच्या कारकिर्दीचा काळ सोडला आणि छुटपुट अपवाद वगळले तर तोच सम्राट आजवर तरी !
कवी म्हणतो घोड्या/अरे वेड्या/ असा कुठे चाललास / तुफान दौडत / वार्‍यावर उडत /चौखूर उधळत. कार्यकर्ता वेडा असतो. वेडात उधळले वीर मराठे सात असा वेडा. तो तहान भुकेची पर्वा न करता, घरा दारावर तुळशी पत्र ठेवून बेभानपणे पक्ष कार्यात स्वत:ला झोकून देत असतो. त्याच्या कार्याचे, त्यागाचे त्याला काय फळ मिळेल? मिळेल की न मिळेल? याविषयी कवी साशंक असतो. आणि कवीचे साशंक असणेही साहजिक असते. कारण राजकारणात कार्यकर्त्यांच्या भवितव्याचे काहीच सांगता येत नसते. एखाद्याला राजकारणात लॉटरी लागते. बाकीच्यांना कायम सतरंज्या घालाव्या उचलाव्या लागतात. म्हणूनच कवी म्हणतो, असा कुठे चाललास, हे झाले पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांविषयीचे.
परंतु नंतर कवी ज्या कार्यकर्त्यांविषयी लिहितो तो सामान्य कार्यकर्त्यापेक्षा वेगळा आहे. कवीला त्याच्या दुडक्या चालीतून त्यांचे भवितव्य दिसते. गाव शिवारात कार्यकर्त्याला बर्‍यापैकी नाव मिळालेले असते आणि त्याच्या कार्याची दखल त्याच्या गावाबाहेरही घेतली जावू लागलेली असते. म्हणून कवी म्हणतो, वेशीच्या बाहेर पडेपर्यंत / हे ठीक होतं / आता / गावशीव ओलांडल्यावर / एकेक पाऊल कसं / भुई फुंकत फुंकत / सावध पडलं पाहिजे. राजकारणात कार्यकर्त्याने निदान मोठे होवू पाहणार्‍या कार्यकर्त्याने सतत सावध असायला पाहिजे असा कवी उपदेश करतो. एकदा का पक्षाच्या लक्षात कार्यकर्त्याचा वकुब आला की त्या परिसरातला नेता त्याच्या वाटचालीबाबत बिनधास्त होतो, कार्यकर्त्याला वाढायला पूर्ण वाव मिळेल इतपत त्याच्यावरची आपली पकड सैल करतो.
आता कार्यकर्ता गावशीव ओलांडतो ग्रामपंचायतमध्ये आपला जम बसवून झाले की मग येतो पंचायत समिती, जिल्हा परिषद, कार्यकर्ता आता त्या दिशेने वाटचाल करु लागतो. आता त्याला एकेक टप्पा पार करावा लागणार. त्या त्या टप्प्यावर हिरवीगार कुरणं असणार ती कुरणं भ्रष्टाचाराची असतील खाबुगिरीची असतील त्यात चरता चरता खुरांना बसवून घ्यायच्या / नाला पिवळ्या धम्म / न विसरता असे कवी कार्यकर्त्याला सांगतो.
घोड्याच्या खुरांना लोखंडी नाला बसवतात. त्यामुळे त्याची पळापळ सुकर होते. कवी कार्यकर्त्याला पिवळ्याधम्म नाला बसवायला सांगतो. ह्या पिवळ्याधम्म सोन्याच्याच असणार. सोने श्रीमंतीचे प्रतिक असते. कार्यकर्त्याने श्रीमंती घाटमाट करावा. स्वत:ची पळापळ सुकर व्हावी म्हणून खुशाल गाड्या उडवाव्या. असा कवी त्याला उपदेश करतो.
राजकारणामध्ये कार्यकर्ता असतो. स्थानिक अगर परिसर पातळीवरचा नेता असतो. तो कार्यकर्त्याचा त्या पातळीवरचा गॉड फादर असतो. गॉड फादरचाही वर गॉडफादर असतो आणि सगळ्यात वर असतात पक्षश्रेष्ठी. कार्यकर्ता-नेता-गॉड फादर-पक्षश्रेष्ठी अशी ती साखळी असते. नेत्याचा गॉड फादर कार्यकर्त्यांचाही गॉडफादर असतो. नेत्याच्या मर्जीतला कार्यकर्ता म्हणून त्याची दोघांवरही मर्जी असते. त्याचा उदारतेची किर्ती दिगंत असते. म्हणूनच कवी म्हणतो, त्याच्या मर्जितला होऊन राहिलास / तर तुझ्या अरबी वंशाच्या / सात पिढ्यांना / आरामात पुरतील / एवढे काबुली चणे हात जोडून / उभे राहतील / तुझ्या दिमतीला.
कवी येथे घोड्याच्या अरबी वंशाचा उल्लेख करतो. अरबी घोडे देखणे, चपळ नि भारदस्त असतात. त्यातून कवीला हे सुचवायचे असते की खर्‍या कार्यकर्त्यांचे भविष्य घडवू पाहणार्‍या कार्यकर्त्याचे व्यक्तिमत्व उठावदार तर असतेच शिवाय त्याला राजकारणाचे डावपेच चपलतेने लढवता येत असतात. असा कार्यकर्ता गॉड फादरची मर्जी सांभाळत राहिला तर त्याच्या सात पिढ्यांना पुरेल एवढे धन त्याला कमावता येईल असे कवीला म्हणायचे असते आणि ते खरेच असते. कारण तेवीस वर्षापूर्वी सायकलवर हिंडणारा कार्यकर्ता आज हेलिकॉप्टरमधून फिरतो आहे आणि तीस पस्तीस किलो सोने, काही कोटींची रोकड बाळगतो आहे असे आपण अधूनमधून वाचतो, ऐकतो आहोत. कवी म्हणतो तसा कार्यकर्ता वागला तर लवकरच त्याची राणीसोबत झोपण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे. ही राणी स्त्री नव्हेच. ती आहे सत्ता ! तिच्याशी शैय्यासोबत करण्याची कार्यकर्त्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे. म्हणजेच त्याला तिचा मन मानेल तसा उपभोग घेता येणार आहे. त्यासाठी कवी पण म्हणून कार्यकर्त्याला एक अट सांगतो. ती अट असते त्याने स्वत:चे शीर अर्पण करणे. शीर म्हणजे डोके. डोक्यात असते बुद्घी. बुद्घीत असतात विचार. आणि आपला स्वाभिमान याची आहुती देणार असेल तर आणि तरच त्याला सत्ता  प्राप्ती आणि सत्तेची शैय्या प्राप्त होणार आहे.
शेवटी कवी कार्यकर्त्याला म्हणतो तुर्तास / वजीर बैस म्हणतो / तर बैस ! यातल्या तूर्तास शब्दातून कवी पक्षशिस्तीवर बोट ठेवतो आणि कार्यकर्त्याच्या बंडखोरीवरही बोट ठेवतो. कुठल्या तरी निवडणुका लागतात. आपली योग्यता असूनही आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, असे एखाद्या कार्यकर्त्याला वाटत असते. त्यानेच तो बंडखोरी करतो. म्हणूनच कवी म्हणतो, तूर्तास / वजीर बैस म्हणतो / तर बैस!
वाच्यार्थाने अश्वमेध कविता राजकारण्यांचे समर्थन करणारी वाटते. परंतु ती तशी नसून कवी राजकारणावर उपरोधाचे फटके ओढतात. आपले दायित्व चोखपणे बजावतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा