समाधान

ठेविले अनंते तैसेचि रहावे ।
चित्ती असो द्यावे समाधान ॥

तुकोबाचा हा अभंग मराठी भाषेत सुभाषित होऊन बसला आहे़. हज्जारो वेळा तो आपण ऐकला असेल आणि ऐकवलाही असेल. 
अति परिचयाने अवज्ञा व्हावी तसं ह्या अभंगाच्या बाबतीत आपलं थोडसं झालं आहे किंवा आपण आपल्यातल्या उणिवा झाकण्यासाठी त्याच्यावर आपापले अर्थ लादले आहेत़  माणूस मोठा चलाख प्राणी आहे़  तो जे जे भलं बुरं करतो त्याला समर्थन मिळावं.म्हणून तो संतांच्या वचनांना वेठीस धरतो. 
एखादे काम त्याला टाळायचे असेल, त्यासाठी त्याची कष्ट करण्याची तयारी नसेल; तर ज्या द्राक्षांना हात पुरत नाही ती आंबट असावी; म्हणून तो आपले समाधान करुन घेतो़.ह्या समाधानाला खरोखरच तुकारामाच्या समाधानाचा अर्थ आहे का ? नक्कीच नाही. कारण इथं तो अल्पसंतुष्ट राहण्याला समाधान म्हणतो आहे. स्वतःच्या विकासाच्या शक्यता कुंठीत करतो आहे.आपल्याला अनंताने म्हणजे परमेश्वराने ठेवले तसेच आपण राहावे असं स्वतःला बजावतो आहे.मुळातच आळशी असलेल्या माणसाला तुकारामाच्या या अभंगाने तर सुगीच सापडल्यासारखी होते. 
पण माणसाच्या ढोंगीपणावर एकामागून एक जोरदार फटके मारणारा तुकोबासारखा संत माणसाला आळशी राहण्यासाठी कसा सांगेल?
हे एक ठीक आहे की प्रत्येकाला सचिन तेंडुलकर होता येत नाही. लता मंगेशकर होता येत नाही़   म्हणून काय आपण क्रिकेट खेळणंच सोडून द्यायच.गाणं म्हणणं सोडून द्यायचं.आपण कोणासारखं तरी व्हायचं असं ठरवणं म्हणजेच खरं तर फार मोठी चूक करणं होय.परमेश्वरानं जन्माला घातलेला प्रत्येक चेहरा जसा वेगळा बनवला.तसंच त्याला वेगळं बनायलाही सूचवलं आहे.एकाच मायबापाच्या पोटी जन्माला आलेली मुलं सारख्या रंगाची, सारख्या उंचीची, सारख्या बुद्धिमत्तेची नसतात. त्यातल्याच एकाला दुसर्‍यासारखं होणं शक्य नसते़. 
अवतीभोवतीच्या सृष्टीला आपण जाणीवपूर्वक न्याहाळलं तर वैविध्याच्या सापेक्षतेनेच ही सृष्टी आपल्याला सुंदर दिसते.असं आपल्या लक्षात येईल.कल्पना करा की या पृथ्वीतलावरची सगळी झाडं नारळाच्या उंचीची झाली आहेत किंवा बागेतली सगळी फुलं एकाच रंगाची आहेत किंवा सगळयाच स्त्रियांनी हिरव्या रंगाच्याच साड्या घातल्या आहेत किंवा सर्व पुरुषांनी  पिवळ्याच रंगाचे शर्ट-पॅन्टस घातले आहेत.   संगीतातले सात स्वर कोकिळेचे अनुकरण करून केवळ पंचमातच गात आहेत. 
असं जर झालं तर मित्रांनो आपल्या जीवनाचं गाणंच बेसूर होईल. ते गोड करण्यासाठी आपल्या स्वराची नेमकी जागा आपल्याला ओळखता आली पाहिजे.त्यातली महत्तम तीव्रता आणि कमालीची कोमलता जोखता आली पाहिजे.आणि तिला ‘तैसेचि' ठेवता आले पाहिजे. आणि ते साधले तर त्यासारखी दुसरी ‘समाधानाची’ गोष्ट नाही!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा