दोन आसवांचे मोती



हंबरून वासराले चाटते जव्हा गाय
तिच्यामंदी दिसते मले तव्हा माही माय

कुठल्याशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन करताना निवेदकानं ही कविता म्हटली. सभागृह दणाणून सोडणार्‍या टाळ्या घेतल्या. ही नारायण सुर्वे यांची कविता आहे, असा उल्लेख केला. त्या कार्यक्रमात सादर झालेल्या कवितेची व्हिडिओ क्लिप मोबाईल टू मोबाईल प्रवास करत महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात पोचली. अकोल्या शेजारी असणार्‍या बाभुळगावात माझी भाची राहते. एक दिवस ती कुठल्याशा निमित्ताने घरी आली. मी कविता करतो म्हणून तिला माहित. तिनं मला विचारलं, “मामा, ही कविता तुमची आहे का?” मी म्हटलं, “नाही”. एरवी कवितेशी तीळमात्रही संबंध नसणार्‍या पोरीनं मला पहिल्यांदा कवितेसंबंधी विचारावं ह्याचं मला आश्चर्य वाटलं आणि माझं कुतुहल चाळवलं. मी ह्या कवितेचा शोध घेऊ लागलो. माझ्या मुलाच्या मित्रानं ह्या कवितेची व्हिडिओ क्लिप मला आणून दाखवली.
काही दिवसांनी माझे मित्र नरेंद्र लांजेवार यांनी लिहिलेला लेख वाचण्यात आला. तो लेख म्हणजे वाङमयीन शोध पत्रकारितेचे उत्तम उदाहरण होय. त्या लेखावरुन मला कळलं ही कविता स. ग. पाचपोळ यांची आहे. फेसबुकवर ह्या कवितेच्या कर्त्यासंबंधी खूप  चर्चा ही झाली. त्यात लांजेवारांच्या लेखातील ठोस पुराव्याने मूळ कवीचे श्रेय त्याला परत मिळाले. बरेचदा असं होतं की एखाद्या कवितेला किंवा गझलच्या एखाद्या शेराला मिळणारी ख्याती ही त्या कवीच्या नावाला असणार्‍या तथाकथित प्रसिद्घीपेक्षा कितीतरी मोठी असते. ह्या कवितेच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. काळाच्या पडद्याआड गेलेला ह्या कवितेचा कवी काळाच्या ओघात संपूर्ण अज्ञातवासातच होता. लांजेवार केवळ लेख लिहून थांबले नाही; त्यांनी कवीच्या कुटुंबाचा शोध घेतला. जुन्या डायर्‍या, कात्रणे यांचा शोध घेतला. त्यात आणखी काही कविता सापडल्या आणि त्यातून सिद्घ झालेला संग्रह म्हणजे ‘स. ग. पाचपोळ यांची कविता’ लांजेवारांचे हे संशोधन त्यांच्या कविताप्रेमातून उमलले, फुलले, आणि फळले. टोकाच्या आत्मकेंद्री झालेल्या हल्लीच्या जगात लांजेवारांची ही काव्यनिष्ठा कौतुकास्पद तर आहेच पण त्याहून अधिक ती अनुसरणीय आहे.
प्रशस्तिपत्र किंवा स्तुतिपत्र असं स्वरूप प्रस्तावनेला हल्ली प्राप्त झालेलं आहे. कवितांचं साक्षेपी विवेचन त्यातून अभावानेच आढळते. अशा कालखंडात प्रस्तावनेचे चार शब्द लिहिण्याचं मी धाडस करतो आहे याची मला शुद्घ जाणीव आहे.

जगाच्या पाठीवर जेव्हढ्या भाषा बोलल्या जातात. त्या प्रत्येक भाषेत आईवर लिहिल्या गेलेल्या कवितांची संख्या सर्वाधिक आहे. बाप त्या मानानं उपेक्षितच राहिला. ‘बाप रूखमा देवीवरू’असे एखाद्या वेळी संतांनी देवाला म्हटले असले तरी ‘विठू’कायम ‘माऊली’च राहिली आहे. कवितेत ‘ममत्व’ हा ‘देवत्वा’ चा समानार्थी  शब्द आहे. ‘माय-लेकरू’ साठी ‘गाय-वासरू’ ही आर्ष प्रतिमा आदिम जीवनाच्या प्रारंभापासून मानवी समुहमनात रूढ आहे. स. ग. पाचपोळांच्या ‘माय’ कवितेचं आवाहन आपल्या मनाला भिडतं ते याच कारणानं. समाजाच्या सांस्कृतिकरणाचा प्रवास आदिवासी-ग्रामीण-नागरी अशा स्थित्यंतरातून झालेला आहे. त्यामुळे बाह्यांगाने माणूस कितीही आधुनिक झाला तरी त्याच्या मनातल्या भावभावनाचं संचित मात्र आदिमच असते. पाचपोळांच्या ‘माय’ कवितेचा आकृतिबंध लोकगीताच्या मुसीतून अवतरला आहे. छंदाचं शैथिल्य हे लोकगीताचं वैशिष्ट्य ह्या कवितेच्या रचनेत सेंद्रियत्वाने भिनलेलं आहे. पीठात पाणी घालून त्याला ‘दूध’ म्हणून पाजणार्‍या मायचा पाय इचूकाट्याले ‘मोजत’ नव्हता! तिच्या डोळ्यात आपल्या लेकरासाठी ‘तापी-पूर्णामाय’ भरून येत होत्या. नातवंडाचं मुख पाहणं तिच्यासाठी ‘दुधावरची साय’ पाहण्यासारखं आहे. ह्या सर्व आर्ष प्रतिमा ही ‘माय’ कवितेची बलस्थाने आहेत. त्यांच्या ‘आई’ कवितेत ‘पिकले फळ कधी का झाडास भार होते’ अशी सुंदर प्रतिमा येते. तिची जातकुळीही आर्ष प्रतिमेचीच आहे.
पाचपोळांच्या मनात ‘प्रेम पंढरीचा’ एक ‘वारकरी’ आहे. तो प्रेम भावनेला ‘अभंगात’व्यक्त करतो. जीव लावल्यावर तिच्यासाठी जीव देण्याची त्याची तयारी आहे-

‘तुझ्या वाटेवरी
ठेवीन मी देह
मनात संदेह
ठेवू नको.’    (वारकरी)

प्रेम भावना, श्रृंगार, सामाजिक जाणीव अभंग छंदात व्यक्त करू नयेत. कारण तो भक्तिभावना अभिव्यक्तिचा छंद आहे. ह्या प्रस्थापित संकल्पनेला केशवसुत, मर्ढेकर, ग्रेस यांनी छेद देऊन अभंगाला ‘मुक्ती’ दिली;त्याच वाटेवर पाचपोळांनीही दोन पावले टाकली आहेत. त्यांना पडणार्‍या समतेच्या स्वप्नातल्या गावात-

‘कुणी नाही छोटा
कुणी नाही मोठा
एक पाणवठा
सर्वांसाठी’       (स्वप्नातला गाव) 

-असावा असे त्यांना वाटते. पण हा ‘स्वप्नातला गाव’ स्वप्नातच राहतो. आणि त्यांना सामोरे येणारे वास्तव मग विद्रोहाचे पाणी पेटवत मुक्तछंदात व्यक्त होताना दिसते-

‘या गावातल्या मंदिराची पायरी चढण्या अगोदर
सादर करावे लागते जातीचे प्रमाणपत्र
...
एखादं जनावर मेल्याची बातमी कळते
तोच दिवस स्वातंत्र्यदिनापेक्षाही मोठा ठरतो
कारण
‘कोरड्यास’ अन्‌ दोन भाकरीची सोय लागून
निदान त्या दिवसापुरती तरी 
त्याच्या पोटाची चिंता मिटणार असते.’(माझं गाव)

कवी कधी असे भयाण वास्तव शब्दबद्घ करतो. कधी ‘आमचा श्रावण’ मधून ‘भाकरीचे तत्वज्ञान’ मांडतो. तर कधी तमाशात नाचणार्‍या पोरीसाठी कवीचा जीव तुटतो. कवी म्हणतो-

‘तर मायबाप हो ! तुम्ही एवढे कराल का?
तुमच्या अंगणातील तुळस होण्याचे भाग्य
त्यांना बहाल कराल का?’   (चंद्रकोर)

विद्रोही कवितेच्या परंपरेतील ह्या कविता असल्याने त्यांचा सूर थोडा वरच्या पट्टीत असणं स्वाभाविक आहे.

निळ्या रंगाच्या रंग प्रतिमेला घेऊन येणार्‍या पाचपोळांच्या काही भावतरल ओळी वाचकांना खिळवून ठेवतात. आणि रसिकांकडून दाद अक्षरश: लुटून नेतात-

‘निळ्या आभाळाचा रंग तुझ्या मायेना डोळ्यात
येई विसाव्याला चंद्र गालावरच्या तळ्यात
तुझ्या पदराशी वारा रोज करतो मुजोरी
देतो लुटून अवघी लाख मोलाची तिजोरी.’ (काहूर)
---
‘निळ्या आभाळाची शोभा
जशी नदीच्या पाण्यात
सांज खुलते प्रीतीची
तशी सखीच्या मनात.’ (सांज)

प्रस्तुत संग्रहातल्या निम्मे रचना गझलच्या आकृतिबंधातल्या आहेत. गझल लेखनासाठी लागणारे कवीचे वृत्तांवरील प्रभुत्व मात्र ह्या रचनांमध्ये जाणवत नाही. ढोबळ लय पकडून त्या रचलेल्या वाटतात. चांगली गझल वृत्तात लिहिण्यासाठी कवीला प्रारंभी जो लेखनाचा रियाज करावा लागतो. त्या प्रक्रियेतल्या ह्या संग्रहातील गझला असल्याने त्यांच्या रचनात वृत्ताचे शैथिल्य आहे. रदीफ, काफिया, दोन ओळींचा स्वतंत्र शेर असे गझल रचनेचे घटक ह्या रचनात अंतर्भूत आहेत. अशा प्रकारच्या रचनांना गझलसदृश रचना किंवा मुक्त गझल म्हणण्याचा प्रघात आहे.अनेक प्रसिद्ध कवींना गझलच्या आकृतिबंधाने आकर्षित केले.त्यांच्याही अशा प्रकारच्या रचना प्रयत्न केल्यास संशोधकांना सापडू शकतात.

पाचपोळांना चांगली गझल सापडू लागली होती; हे पटवणार्‍या अनेक खुणा ह्या रचनात आहेत;अर्थात वृत्ताच्या अचुकतेसह. उदा-

‘स्वर्गात काय झाली चर्चा तुझ्या रूपाची
ऐकून उर्वशीचा गेला चढून पारा’   (चर्चा तुझ्या रूपाची) 

‘अन्याय न्याय झाला राज्यात दुर्जनांच्या
सत्यासही खुलासा करणे कठीण झाले’    (पराभव)

‘नाही कुठेच रुजली देशात अजुनि समता
घे धम्मचक्र हाती ते एकदा पुन्हा तू’ (ये एकदा पुन्हा तू)

‘आहे अजून येथे रेडा तहानलेला
सारे भरून गेले आपापल्या पखाली’ (बाजार)

स. ग. पाचपोळातला गझलकार परिपक्व होऊ लागला होता. त्यांची काव्यकन्या वयात येऊ लागली होती. परंतु तिचा सुखी संसार पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले  नाही. पाचपोळ अकाली गेले. जाताना आपल्या लाडक्या लेकीला त्यांनी जगावेगळं आंदण दिलं-

‘रूप पाहून बापाच्या फुले मनात चांदणं
दोन आसवांचे मोती देले लेकीले आंदन’ ( आज हयद फिटली)

हेच ‘मोती’आता रसिकांनी जतन करायचेत.

- श्रीकृष्ण राऊत  

1 टिप्पणी: