कविता वाचनाचा आनंद

आपली कवितेशी पहिली ओळख होते ती अभ्याक्रमातल्या पुस्तकात. मराठी-हिंदी-इंग्रजी कविता आपल्या अभ्यासक्रमात नेमलेल्या असतात. आपले विषय शिक्षक आपल्याला त्या कविता शिकवतात. त्या कवितांवरची प्रश्नोत्तरे आपल्याकडून वहीत लिहून घेतात. पाठ करुन घेतात. उत्तर पत्रिकेत आपण ते लिहितो. विषय शिक्षक ते तपासून आपल्याला गुण देतात. काळाच्या ओघात त्या कविता नंतर विसरून जातो.
अशा प्रकारच्या परीक्षार्थी कविता वाचनातून आपल्याला कविता वाचनाचा आनंद कितपत मिळतो? याविषयी मी साशंक आहे. पण कवितांची पहिली वहिली ओळख अशा प्रकारच्या सक्तीच्या कविता वाचनातूनच होते हेही तेवढेच खरे आहे.
कविता वाचनाचा आनंद आपल्याला प्रयत्नपूर्वक मिळवावयाचा असेल तर त्याची पहिली अट म्हणजे लेख-कथा-कादंबरी सारखी कविता मनातल्या मनात वाचायची नाही. कविता मोठमोठ्याने वाचायची. आपण वाचलेली कविता अगदी स्पष्टपणे आपल्याला ऐकू येईल इतक्या मोठयाने ती वाचली पाहिजे. म्हणजे डोळे शब्दांवरुन सावकाश फिरत राहिले पाहिजेत, ओठांनी ते शब्द उच्चारले पाहिजेत आणि कानांनी ते शब्द ऐकले पाहिजेत. डोळे-ओठ-कान अशा  तिहेरी मार्गाने कविता मनात शिरली पाहिजे. कवितेतलं उपजत संगीत जाणवलं पाहिजे. वर्गात कवितांचे सामुहिक वाचन गळ्यावर म्हणण्याइतके उच्च कंठरवाने गेलेले गायन दीर्घ कालीन अमिट संस्कार करते, असा अनुभव आहे.
चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी अशा पद्घतीने म्हटलेल्या कवितांच्या ओळी आजही मला आठवतात.
‘शर आला तो आला धावुनी काळ
विव्हळला श्रावण बाळ’
 ‘बा नीज गडे, नीज गडे लडिवाळा,
नीज नीज माझ्या बाळा’
‘गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या
का गं गंगा-यमुना ही या मिळाल्या’
अशा कितीतरी ओळींनी मला कविता वाचनाचा दिलेला आनंद माझ्या स्मरणात आजही ताजा टवटवीत आहे. कालौघात कवींची नावे विस्मरल्या जातात. पण कवितांच्या ओळी आणि त्यांनी दिलेल्या निखळ आनंदमात्र मर्मबंधातली ठेव म्हणून मनाच्या कोपर्‍यात कायम असतो.
अलीकडच्या शिक्षण पद्घतीत भाषा विषय शिकवणार्‍या शिक्षकांनी आपला आणि विद्यार्थ्यांचा कविता वाचनाचा आनंद ठेवा या पद्घतीने जपायला पाहिजे. परीक्षेकरीता हे पाठांतर तर कामी येईलच. पण त्यासोबतच ते आयुष्यभर सोबतीला असेन. वारसा हक्कानं पुढच्या अनेक पिढ्याही हा आनंद उपभोगतील.
‘असेन मी नसेन मी तरी असेन गीत हे’ हे शांता शेळके ह्या कवयित्रीने लिहून ठेवलं, त्याचाही अर्थ याहून वेगळा काय असणार? 
कविता ही बहुरुपिणी आहे. ‘एक गहू आणि प्रकार बहू’ अशा नानाविध रुपात कविता आपल्याला भेटते. कधी ती ज्ञानेश्र्वराची ओवी होऊन येते. कधी तुकोबारायांचा अभंग. कधी समर्थांचे मनाचे श्लोक. कधी गणपतीची आरती. कधी शाहीर प्रभाकराचा पोवाडा. कधी रामजोशांची लावणी. कधी शांता शेळक्यांचे भावगीत. कधी बहिणाबाईची गाणी. कधी सुरेशभटांची गझल. कधी मंगेश पाडगावकरांची बोलगाणी... ही यादी खूप मोठी करता येईल. पण तिला जंत्रीचे स्वरूप येईल. म्हणून ती आवरतो. सांगायचा मुद्दा असा की, कवितेची नानाविध रुपं शब्दांतून साकारत असतात.
कुणाला कोणत्या प्रकारची कविता आवडावी ह्याचं काही एक गणित नाही. वय, संस्कार, कालखंड अशा घटकांनी प्रभावित होत कवितेची आवड व्यक्तिवराचे बदलत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपली आवड जपली पाहिजे. ती इतरांवर लादता कामा नये. ही आवडच आपल्याला आणखी कविता वाचनाकरिता प्रेरीत करीत असते.
जाणीवपूर्वक कविता वाचन करणार्‍यांची संख्या प्रत्येक कालखंडात मर्यादित असल्याने ग्रंथालयात सुद्घा. कथा-का दंबर्‍यांच्या तुलनेत कविता संग्रहांची संख्या अत्यल्प असते. विरंगुळा म्हणून वाचन करणार्‍यांना टी. व्ही., सिनेमा अशी विरंगुळ्याची आधुनिक साधने उपलब्ध झाल्यावर तोच वाचक प्रेक्षक झाला. आणि वाचकांची संख्या आणखी कमी झाली. वाचन संस्कृती नष्ट होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. पण हळुहळू ग्रंथालयाकडे वाचकांचे पाया पुन्हा वळू लागले. तरी कवितेच्या वाचक बोटावर मोजण्याएवढाच राहिला. पण त्यांच्याकरिता ग्रंथालयात कविता संग्रहांची उपलब्धतता कितपत असते. हा प्रश्नच आहे.
ना. घ. देशपांडे, बा. सी. मर्ढेकर या कवींचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या कविता संग्रहाचा शोध मुंबईमधल्या ग्रंथालयात घेण्याचा प्रयत्न करणार्‍या वाङ्मयाच्या अभ्यासक असलेल्या एका विद्यार्थीनीच्या वाट्याला निराशाच आली असे नुकतेच वाचनात आले. तेव्हा उर्वरीत महाराष्ट्रातल्या छोट्या-मोठ्या शहरातल्या ग्रंथालयाकडून काय अपेक्षा करावी? शालेय महाविद्यालयीन ग्रंथपालांनी आणि भाषा विषय शिकवणार्‍या शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही. विद्यार्थ्यांना कवितेची गोडी लावणे, आणि त्यांना काही कविता संग्रह ग्रंथालय उपलब्ध करुन देणे अशी दुहेरी भूमिका शिक्षक-ग्रंथपालांनी जबाबदारीने पार पाडली तरच हे चित्र बदलेल.
ग. दि. माडगुळकरांचे ‘गीत-रामायण’, कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’, मंगेश पाडगावकरांची ‘बोलगाणी’, सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’, बहिणाबाई चौधरींची ‘बहिणाबाईची गाणी’शांता शेळके ह्यांचे ‘तोच चंद्रमा नभात’, नारायण सुर्वे यांचे ‘माझे विद्यापीठ’ पाडगावकरांनी संपादित केलेली विंदा करंदीकरांची ‘संहिता’, अरुण कोलटकरांची ‘भिजकी वही’ वसंत आबाजी डहाकेंचा ‘चित्रलिपी’ ना.धों.महानोरांच्या ‘रानातल्या कविता’.
जाणीवपूर्वक वाचलेच पाहिजेत असे हे काही कविता संग्रह आहेत. ते मिळाल्यास ग्रंथालयातून किंवा उपलब्ध होतील तिथून विकत घेऊन.
सध्याची पिढी खूप भाग्यवान आहे. इंटरनेटसारखे माध्यम त्यांना उपलब्ध आहे. ई-बुक्स आणि ऑनलाईन लायब्ररीचं फार मोठं दालन बोटाच्या टिचकी सरखी त्यांना खुलं होत आहे. ज्ञानेश्र्वरी, तुकाराम गाथा, दासबोध ह्या सारखे ग्रंथ, आणि घ्कविता-कोशङ सारख्या साईटवर हिंदी-उर्दू कवितांचं देवनागरी लिपीतलं प्रचंड भंडार वाचकांची वाट पाहते आहे.
तेव्हा भरपूर कविता वाचा, मोठ्याने वाचा आणि कविता वाचनाच्या आनंदाने धनी व्हा. यासारखे दुसरे ऐश्वर्य नाही आणि या सारखी पहिली श्रीमंतीही नाही.
‘आम्हा घरी धन शब्दाचिच रत्ने’ म्हणणार्‍या तुकोबारायांचे आपण वंशज आहोत याचा विसर कदापि पडू नये म्हणजे गंगेत घोडे न्हाले !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा