आदिवासींचे जीवनदर्शन घडवणारा काव्यसंग्रह : मेळघाटच्या कविता -प्रा. डॉ. विनोद देवरकर

 ‘मेळघाटच्या कविता' हा कवी श्रीकृष्ण राऊत यांचा पाचवा संग्रह. आक्षरछंदातील एकेचाळीस कवितांचा. कोरकुंच्या संस्कृती आणि संघर्षाशी समरस होऊन आत्मनुभुतिशी तादात्म्य पावत जन्मलेल्या ह्या कविता आहेत. कोरकुंच्या जीवनातली प्रत्यक्ष वणवण अशी अनेक स्थित्यंतरं सोसत असलेल्या समाजाच्या संवेदना आणि व्यथांची कैफियत या कवितांमधून मांडली आहे. कोरकूंच्या जीवनाशी निगडीत प्रतीके आणि प्रतिमा, बोलीभाषेतून जतन केलेले शब्द, चालीरीती, परंपरा, आदींच्या वापरामुळे कविता अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. आदिवासी लोकजीवनावर आधारित कवितांचा पूर्ण काव्यसंग्रह काढणेच मोठे आव्हान असते. राऊतांनी आव्हान स्वीकारून आदिम संस्कृती आणि जीवनसंघर्षाचा काव्यात्म दस्तऐवज रसिकांच्या  सुपूर्द केला आहे.

कवितेवरील संस्कार काव्यनिर्मितीचा आत्मा असतात. तो जपण्यात राऊत यशस्वी झाले आहे राऊतांची कविता लोकगीतांच्या लयीतून नैसर्गिक स्वभावधर्म जोपासत प्रसवते. ज्येष्ठ समीक्षक किशोर सानप यांचे दीर्घ भाष्य राऊतांच्या कवितेची उंची अधोरेखित करते. कविता आणि कवितेवरील भाष्य एकत्रितपणे छापण्याचा हा पहिलाच प्रयोग असावा. आदिवासींचा जीवनसंघर्ष कवितेच्या किंवा साहित्याच्या माध्यमातून अनेकांनी मांडला आहे. पण या साऱ्यांनीच आदिवासींच्या जीवनातील दुःख, अत्याचार, संघर्ष आणि वेदनाच मांडल्या आहेत. त्यातही दलित-आदिवासी महिलेचा जीवनसंघर्ष साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. परंतु ‘मेळघाटच्या कविता’ या कवितासंग्रहातील मोजक्या कविता सोडल्या तर प्रत्येक कवितेतून कोरकू स्त्रीच वाचकाशी संवाद साधते आहे. जीवन म्हणजे फक्त संघर्षच नाही तर जगणंही असते. राऊतांच्या कविता वाचतांना हे जाणवत राहते. हेच या कवितांचे वेगळेपण आहे. म्हणूनच दलित-आदिवासी मराठी साहित्यात स्त्री जाणिवेचा सन्मान करणारा, सर्वार्थाने व्यक्त होणारा पहिलाच काव्यसंग्रह असावा असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.
सिपना नदी आणि त्याभोवतीचे सागाचे बन म्हणजे कोरकुंचा जीवनाधार. खेकडे, मासे, सावलीला कपारी, वन्यजीवांना पाणी आणि पोरीची लाजही पदर बनून झाकणारी ही सिपना माय. कवी लिहितो-

सिपना वो माय,
लेक डुंबली न्हाण्याला;
लुगडं वाळते-
फुटे पदर पाण्याला.

पण सिपना बारमाही वाहत नाही. पावसाची वाट पाहत कोरकू हवालदिल होतो. वरुण राजाला त्याच्या डोळ्यातून करुणा झरू दे! अशी विनवणी करतो. कवी लिहितो-

तहानेचे बुंद
खुरात साचू दे,
मुळांचा आनंद
शेंड्यात नाचू दे.

देवही कोरकुंची परीक्षाच पाहत असतो. भुकेस शांत करण्याचा कसाबसा प्रयत्न बाया-बापडे करतात. पण लेकरांचे काय? कवी उपासमारीची भीषणता शब्दात मांडतो -

पोटात लागे वणवा पेटूs
लागलं तोंड धुक्याला गिटूs  
बेसूद नको डोळे तू मिटूs
जो जो रेs बाळाss जोs
  
कोरकू डोंगरदेवास मानतात. तो सागाचे, बांबूचे बन उभे करतो. सिपना बनात प्रियकर प्रेयसीचा रांगडा प्रणय रंगतो. कवी लिहितो-

चित्त्याची झडप
मोरपीस वाटे,
हरणीच्या अंगी
सायळीचे काटे.

कुपोषण, अवर्षण कोरकुंच्या पाचवीला पुजलेले. आदिवासींसाठी असलेल्या सरकारी योजना त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणा, काही बिगर सरकारी सेवाभावी संस्था करतात. त्यातही भ्रष्टाचार होतो. लाभार्थ्यांचे फोटो चार पैसे हातावर टेकवून काढले जातात. हे वास्तव मांडतांना कवी लिहितो-

बरगड्या- छाती-
पाठ-पोट-एक
वाळली खारीक
असा फटू काढ.

या काव्यसंग्रहातील बहुतेक कविता अल्पाक्षरी आक्षरछंदात लिहिल्या आहेत. अपवादात्मक मात्रावृतांचाही वापर लय सांभाळून केलेला आहे. मोजक्या कवितांमध्ये मिश्रछंद-वृत्ताचाही प्रयोग बेमालूमपणे केलेला दिसतो. या काव्यसंग्रहातील डॉ. किशोर सानप यांनी प्रत्येक कवितेचे केलेले समीक्षणात्मक विश्लेषण मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे या सेवाभावी डॉक्टर दांपत्यास अर्पण केलेल्या या संग्रहास जयंत गायकवाड यांचे अप्रतिम मुखपृष्ठ लाभले आहे.  श्रीधर अंभोरे यांच्या समर्पक रेखाचित्रांनी संग्रहाचे सौदर्य वृद्धिंगत केले आहे. मधुकर वाकोडे यांची प्रस्तावना आहे.

काव्यसंग्रह : मेळघाटच्या कविता
कवी : श्रीकृष्ण राऊत
प्रकाशन : संवेदना प्रकाशन, पुणे
किंमत : रु.१५०
- प्रा. डॉ. विनोद देवरकर
मो. ९४२१३५५०७३
.
(दि. १o मे २०२२ / दै.सकाळ,औरंगाबाद आवृत्ती /मैफल )