अकोला ते अकोट रोडवर एक फाटा आहे पळसोद. गाव तसं लहानचुकलं. पण त्यानं आपलं नाव खूप चमकवलं. मराठी सारस्वताच्या नकाशावर झेंडा लावला. आता हे गाव ख्यातनाम साहित्यिक डॉ.मधुकर वाकोडेंचे पळसोद म्हणून ओळखले जाते.
कोणतं चिखलगाव ?
आपल्या बाजीराव पाटलाचं !
कोणतं रौंदळा ?
आपल्या बजरंग सरोदेंचं !
कोणती हिंगणी ?
लोककवी डॉ.विठ्ठल वाघांची !
अन्कोणतं पळसोद !
आपल्या डॉ.मधुकर वाकोडे सरांचं !
अकोला जिल्ह्यातल्या गावांना असं स्वत:चं नाव कमावून लावणारे वर्हाड मातीचे पूत जन्मा आले. आणि ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ ह्या म्हणीचे सार्थक झाले !
पळसोदच्या मातीवर वाकोडे सरांचा खूप जीव आहे. इथल्या ‘पांढरी’नं जशी त्यांना एकाहून एक चढी अशी व्यक्तिचित्रं दिली. तसंच इथल्या ‘काळीनं’ त्यांचा पिंड पोसून खास वाणीच्या हुरड्यासारखा गावरान बनवला.
‘अन्वरशा फकीर’ नावाचं व्यक्तिचित्रं लिहीतांना वाकोडे सरांनी एक फार छान वाक्य लिहिलं-‘वर्हाडी हीच त्याची भाषा नि गावावरील प्रेम हीच त्याशी नशा होती.’
हेच वाकोडे सरांनाही तंतोतंत लागू पडतं.
त्यांचा मनमोकळा स्वभाव आणि माणसांचा लळा पाहिला की वाटतं सर अंजनगावला रहात असले तरी त्यांचे पाय अजूनही पळसोदच्या मातीवरच आहेत.पळसोदला तशी तीन मधुकरांची ‘परेल’ नांदली. मधुकर कोल्हे,मधुकर पोतले आणि मधुकर वाकोडे. तिन्ही लंगोटी यार. जिगरी दोस्त. पक्के मैतर. नाहीतर आमची जनाबुढी म्हणते तसे ‘खायापियाचे यार अन्निऊन टाक्याले दोनचार तं लय अस्तात.’
हे तीन मधुकर म्हणजे आपापल्या खेळातले तीन एक्केच. पण त्यातल्यात्यात मधुकर वाकोडे म्हणजे हुकुमाचं पान ! त्यांनी हुकुम सोडला ‘का पोतले बुवा, आपल्याले आत्ताच्या आता कार्ल्याचा झिंगाभोयाचा बजार पाहाले जा लागते!’का हातचे सात कामधंदे सोडून पोतलेबुवा फाट्यावर हजर!‘सिलिपशेरा’ ही भटक्या झिंगाभोई जमातीवरची कादंबरी वाकोडे सर लिहित होते. त्या दरम्यानची ही गोष्ट. ह्या मैत्री विषयी वाकोडे सर मोठ्या अभिमानानं बोलत असतात.
सरांची पहिली कादंबरी ‘झेलझपाट’ ही कोरकू आदिवासींचे वस्तुनिष्ठ शब्दचित्र रेखाटणारी तर ‘सिलिपसेरा’ ही भटक्या झिंगाभोई जमातीच्या जीवनानुभवांना प्रभावीपणे शब्दातून मांडणारी कादंबरी. सरांच्या कादंबर्यांचे हे कुंवार जमिनीसारखे ‘अहिल्या’ विषय पाहिले की लोकसंस्कृतीची मुळं आदिम संस्कृतीत शोधणार्या त्यांच्या शोधक मनाचं लालित्यच कादंबरीच्या रुपात प्रगट होत असल्याचं प्रकर्षानं जाणवतं.
‘काळी माती निळी नाती’ ह्या त्यांच्या पुस्तकाला नुकताच राज्य पुरस्कार मिळाला. सरांनी आठवणीनं ते पुस्तक मला भेट दिलं. मी पुस्तक उघडलं. अर्पणपत्रिका वाचली -‘विठ्ठल वाघ, उमेश ढोक, तुळशीदास पिम्प्राळे, सखाराम बाभुळकर, मधुकर पोतले या पंचवटीस प्रेमपूर्वक अर्पण’ यात मधुकर पोतलेंचे नाव वाचून जेवढा हरीख झाला तेवढाच पंचवटी शब्द वाचून आनंदही. आपल्या पाच मित्रांसाठी ‘पंचवटी’ असा शब्द केवळ वाकोडे सरांनाच सुचू शकतो.ह्या पंचवटीतल्याच कविवर्य विठ्ठल वाघांच्या ‘काया मातीत मातीत’ या संग्रहाला वाकोडे सरांनी लिहिलेली प्रस्तावना तर चांगलीच गाजली. लोकतत्वांचं एवढं अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडणारी दुसरी प्रस्तावना माझ्यातरी वाचनात नाही. विठ्ठल वाघांना ‘लोककवी’ हा किताब बहाल करताना वाघांचा बहिणाबाईशी आणि बहिणाबाईचा हालाशी जो अनुबंध वाकोडे सरांनी जोडला त्याला तोड नाही.
२००२ साल तसं वाकोडे सरांना चांगलंच लाभी ठरलं. त्यांच्या पळसोदच्या वावरात यंदा हरभर्याचा ‘अॅव्हरेज काय पडला माहीत नाही. पण पळसोदच्या काळ्या मातीतून उगवलेल्या आणि निळ्या नभाशी नातं सांगणा-या व्यक्तिचित्रांना राजमान्यता मिळाली. आता आमचे वाकोडे सर खर्या अर्थाने राजमान्य राजश्री मधुकरराव रुपराव वाकोडे झालेत.
‘मौखिकता आणि लोकसाहित्य’ हे त्यांनी संपादित केलेलं पुस्तकही साहित्य अकादमीनं याचवर्षी काढलं.हे झालं एकसरणी अन्दुभारण म्हणसान तर नागपूरला झालेल्या कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुखांच्या विचारांना समर्पित विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांच्याकडे चालून आला.
याले म्हन्तात आमराई लदबदली अन्गहूबी बम्म पिकला !अन्‘रसाई’ च्या आशेनें आमची मूठमूठ काळीजं सुपाएवढी झाली !२००२ मधे वाकोडे सर सहज बोलले, ‘झालं गड्या, पुढच्या वर्षी मी रिटायर होतो अन्मंग मस्तपैकी पूर्णेची परिक्रमा करतो.’
तेव्हा पटकन डोक्यात लाईट लागला म्हणजे सरांनी बोलता-बोलता साठी गाठली. आणि माझ्या डोळ्यासमोर त्यांच्या जीवनाचा पट उलगडू लागला.नव्या कॅलेडरच्या नव्या पानासोबत ब्रिटीश अमदानीत १ जानेवारी १९४३ ला सरांचा जन्म झाला. अकोल्हा जिल्ह्याल्या पळसोदला.त्याकाळची शिक्षणाची वाट म्हणजे एक डोंगर चढता. एक डोंगर उतरता. असे सात डोंगर चढत सात डोंगर उतरत काट्याकुट्याचा रस्ता तुडवत एकदाचा शिक्षणाचा सातपुडा सर केला - मराठीत एम.ए.केल.
एम.ए. तर झालं. पण पुढे काय ? दोsम! साहेब दोsम! म्हणत एकदाचा शादलबुवा पावला अन्शिक्षणाचं चीज झालं. अंजनगावसुर्जीच्या सारडा कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी लागली. रोजीरोटीचा प्रश्न सुटला. पण केवळ नोकरीवर समाधानी होतील ते वाकोडे कसले?
पळसोदची माती पुन्हा एकदा सणाण तापली आणि म्हणाली ‘आपुन काय जिंदगीभर पोट्टयायले निरा मराठी शिकवाव काय’? ते तं कोनी करते. नाव निंघालं पाहिजे असं जिंदगीत काही करायचं अशीन तं नुसता सातपुडा गाठून नाही चालत अजून वैराट लांब आहे ! अभी तो धूपगढ दूर है !
लोकगीते, लोककथा, लोकसंस्कृती या विषयात आधीपासूनच आवड. आवड असली की सवड निघतेच. मग गाणे जमा करा. गोष्टी गोळा करा. पुस्तक वाचा. प्रबंध लिहा. ह्या कामातही या बुवानं बाजी मारली अन्१९७७ साली त्यांच्या ‘लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती’ या प्रबंधाला विक्रम विश्वविद्यालयाने पीएच.डी. दिली आणि वाकोडेसर आचार्य झाले. आजकालच्या मराठीत सांगायचं म्हणजे डॉक्टरेट झालेत.
एव्हाना त्यांच्या धमन्यातली लोकधारा लोकतत्वांच्या शोधात वाहताना चांगलीच वेगवान झाली होती. तेव्हापासून उज्जैनच्या विक्रमादित्यानं आणि पैठणच्या सातवाहनानं हे ‘झाड’ जे झपाटलं ते कायमचंच!१९९२ साली साहित्य अकादमीनं काढलेलं ‘मराठी लोककथा’ हे त्यांचं पुस्तक म्हणजे त्याच झपाटलेल्या ‘झाडाला’ आलेलं फळ आहे.दुर्गा भागवत, द.ग.गोडसे रा.चि.ढेरे अशी लोकसाहित्याच्या व्यासंगी अभ्यासकांची महाराष्ट्रात जी दोनचार गिनीचुनी नावं आहेत त्यात मधुकर वाकोडे हे नाव आपल्याला हमखास जोडावं लागतं. एवढी कमाई त्यांनी या क्षेत्रात जोडली आहे.
अशा बावनकशी कमाईकडे आम्ही कानाडोळा करतो अन्एखाद्याचं लौकिक यश पुरस्कारांच्या संख्येत आणि रकमांच्या आकड्यात मोजतो. तर पुरस्काराच्या बारक्या पर्हाटीनंही वाकोडे पाटलांच्या वावरात चांगलीच झडती दिली.वाकोडे सरांना आजपर्यंत पाच पुरस्कार मिळालेत. १९८८ साली ‘झेलझपाट’ कादंबरीला ह.ना.आपटे पुरस्कार. १९९५ ला ‘काया मातीत मातीत’ या पुस्तकाच्या उत्कृष्ट संपादनासाठी यशवंतराव चव्हाण पुरस्कार. १९९९ साली तर सरांना दोन पुरस्कार मिळालेत. एक त्यांच्या ‘सिलिपशेरा’ कादंबरीसाठी वर्ध्याच्या दाते प्रतिष्ठानचा बाबा पद्मनजी पुरस्कार आणि पुण्याच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा श्रेष्ठ वाड्.मय निर्मिती पुरस्कार.२००१ चा राज्य पुरस्कार मिळाला तो त्यांच्या ‘काळी माती निळी नाती’ या पुस्तकातील अस्सल ‘वर्हाडी तेज’ असलेल्या व्यक्तिचित्रांना.
थोडक्यात काय, का बुवा वाकोडे सरांना पुरस्काराची काही नवाई नाही! पण या सगळ्याहून श्रेष्ठ पुरस्कार मला वाटतो तो रा.चिं. ढेर्यांनी दिलेला.
१९९४ साली प्रसिध्द झालेलं ‘लोक प्रतिभा आणि लोकतत्वे’ हे सरांचं पुस्तक मला मराठी साहित्यात त्यांच फार महत्वाचं योगदान वाटतं. या पुस्तकाची पाठराखण करताना रा.चि.ढेरे लिहितात-‘या अभ्यासक्षेत्रात त्यांनी आपली जिज्ञासा व्रतपूर्वक शुद्ध राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू ठेवला असल्यामुळे नवी तथ्ये-सत्ये सहजपणे स्वीकारण्याची आणि आवश्यक तेव्हा स्वत:ला दुरुस्त करण्याची तयारीही त्यांनी निरहंकार मनाने दाखविली आहे.’
वाकोडे सरांशी बोलतांना, चर्चा करातांना, त्यांना नवे काही सूचवताना त्यांच्या मोठेपणाचा दबाव आपल्यावर हावी होत नाही याचे मूळच त्यांच्या मनाच्या या निरहंकारी वृत्तीत आणि अनाग्रही भूमिकेत आहे.‘लोकसंसकृतीची प्रतिके’ हे त्यांचे व्याख्यान ऐकणे आणि गाडगेबाबांच्या कानातल्या फुटक्या कवडीचा प्रतिकात्मक अर्थ त्यांच्या तोंडून समजून घेणे ही तर सोमवती पर्वणीच आहे. मुर्ह्याला राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात एकदा मला ते भाग्य लाभले आहे. त्यादिवशी तृप्त झालेल्या कानांनी नंतर खूप ऐकले पण त्या दिवशीची श्रृती म्हणजे तर कानांनी अजूनही मिरवावीत अशी कर्णफुलेच आहेत.
त्यादिवशी विद्यार्थ्यांशी गप्पाटप्पा करताना मी गाडगेबाबांच्या कीर्तनाच्या शैलीत बोललो होतो- ‘गडेहो, मले तुमचा हेवा वाटते हेवा. तुम्ही ज्या कॉलेजात शिकता ते वाकोडे सरांचं कॉलेज हाये अन्वाकोडे सर काही लहान सहान हस्ती नाही. लोकसंस्कृतीचं चालतं बोलतं विद्यापीठ हाये विद्यापीठ. अशा विद्यापीठाचे तुम्ही विद्यार्थी आहात! मले तुमचा हेवा वाटते राजे हो हेवा!
आयुष्यात सशासारखं टणटणाटण उड्या मारत धावणं सरांच्या प्रकृतीला काही मानवत नाही. त्यांचं काम आपलं धिमे धिमे कासवाच्या गतीनं चाललेलं असतं. वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी पहिलं पुस्तक प्रकाशित झालं तरी त्यांना काही त्याचं फारसं सुखदुख नसतं. आणि आता वयाची साठी गाठता चारपाच पुस्तकं अन्दोनचार पुरस्कार म्हणजे त्यामानानं काहीच नाही असं आपण म्हणू! पण त्यांच्या मनात कुठेतरी एक ‘आनंद’ आपल्याच मस्तीत जगत असतो. जो त्यांना सतत बजावतो-
‘जिन्दगी लम्बी नही बडी होनी चाहिए’ अन् पुढे धावत जाऊन सशासारखं झोपल्यापेक्षा हे आपलं बरं आहे-सदा निभी. स्लो बट स्टडीड विन्स द रेस!
लेखनाला पाहिजे तसा निवांत वेळ अलिकडे फारसा मिळत नाही अशी टोचणी त्यांच्या मनाला लागलेली असते. त्याला कारणही तसंच सबळ असतं आजकाल ह्या बुवाचा पाय काही घरी ठहरत नाही. सदान्कदा पायाला भिंगरी.आज काय तर विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेची सभा. उद्या काय तर कला शाखेचे अधिष्ठाता म्हणून कुठली तरी मिटिंग. ह्या चकरात अंजनगाव अन्अमरावती म्हणजे जसं काही काही घर-आंगण झालेलं असतं.
हे नसलं तर मग चलो बम्बई. राजधानीत साहित्य संस्कृती मंडळाची बैठक किंवा राज्य मराठी विकास संस्थेचें आवतण. जागतिक मराठी परिषदेचं आमंत्रण नाही तर मग इंडियन नॅशनल थिएटरचं निमंत्रण. हे काहीच नसलं तर मग साहित्य अकादमीच्या नेमाडे मास्तरांच्या ‘कडक’ शाळेत हजर रहावं लागतं.
आपण कधीही फोन केला तरी वहिनींचं उत्तर येतं-औरंगाबादला गेले लोकसाहित्य परिषदेसाठी. नाशिकला गेले लोककला प्रतिष्ठान करिता. धुळ्याला गेले भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे ‘धुरकरी’ म्हणून.हे सगळं करुन कॉलेजात एम.ए.च्या विद्यार्थ्यांनी मागेही नाव काढावं असं जीवतोड शिकवणं अन्आमच्या सारख्या पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्वक मार्गदर्शन.
या सगळ्या फापटपसार्यातून वेळात वेळ काढून एखादा धावपटू जसा चोरून धाव काढतो तसा एखादा लेख मर्ढेकरांवर आणि एखाददुसरा ग्रेसवर.हे सगळं करताना पुन्हा चिडचिड नाही. तपातपी नाही. अपशब्द नाही. सगळं कसं हसत खेळत गोडीगुलाबीनं चाललेलं असतं अन्चेहर्यांवर हास्याचं कारंजं सदोदित उसळत असतं.
गोष्टी तशा साध्यासुध्या असतात. बारीक चिरीक असतात. पण त्यातून माणूस कळतो. आपल्या अध्यक्षपदाच्या आनंदात त्यांच्या मनात असलेली खंत ते सहज बोलून गेले-‘मरता मरता बाजीराव पाटलाले अध्यक्षपदाचा सन्मान भेटायला पाहिजे होता गड्या!’
बाजीराव पाटील गेले तेव्हा वाकोडे सरांनी त्यांच्यावर लेख लिहिला होता- ‘वेष असावा बावळा’ आजच्या घडीला बाजीराव पाटील जाऊनही आठवर्ष झालीत. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. पण वाकोडे सरांच्या अंत:करणातला ओलावा आहे तसाच आहे. बाजीराव पाटलांवर प्रेम करणार्या आपल्यासारख्यांच्या हृदयाला पाझर फोडणारा.
ऐकतांना मला वाटलं ह्या माणसाच्या मनात एक ‘बुलाखराव बापू’ जिवंत आहे. उपाशी गावकर्यांच्या घरी आपल्या कणगीतली ज्वारी धाडणारा.मनातल्या मनात मी पळसोदच्या वेताळबुवाला म्हटलं ह्या माणसाच्या मनातला हा बुलाखराव असाच जिता राहू दे.मी तुले फूल नाही फुलाची पाकळी वाहीन अन्सव्वा रुपयाचे पेढे वाटीन!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा