तुकोबांचे अर्थशास्त्र

जोडोनिया धन उत्तम वेव्हारे।
उदास विचारे वेच करी।।

तुकाराम महाराजांनी या अभंगातून एक अर्थपूर्ण असे अर्थशास्त्र सांगितले आहे. कमाई करायची, पैसे मिळवायचे, धन जोडायचे तर ते कसे? लोकांच्या माना मोडून? नाही. कोणाला फसवून? नाही. बेईमानी करून? नाही. तर उत्तम व्यवहार करून धन जोडायचे. इमाने—इतबारे केलेल्या व्यवहारातही तुकारामांनी प्रतवारी केली आहे. तुकारामांना कनिष्ठ व्यवहार चालत नाही. मध्यम व्यवहार चालत नाही त्यांना पाहिजे अगदी चोख व्यवहार. रोकडा व्यवहार. बेईमानीच्या भेसळीचा थोडासही अंश त्यांना चालत नाही. उत्तम म्हणजे उत्तमच असा व्यवहार तुकारामांना अपेक्षित आहे. इंग्रजी भाषेत जशा गुड, बेटर आणि बेस्ट अशा चांगुलपणाच्या तीन डिगर्‍या आहेत. तुकारामांना गुड व्यवहार चालत नाही त्यांना व्यवहार कसा हवा तर अगदी दी बेस्ट! पंच्चाहत्तर टक्के उत्तम, नव्वद टक्के उत्तम अशा पळवाटा त्यांना नकोत त्यांना पाहिजे शत—प्रतिशत उत्तम. शंभर टक्के. तर—तम भावातील तम अशी अवस्था म्हणजेच उत्तम आणि अशा उत्तम व्यवहारातून आपण धन जोडले पाहिजे. थोडक्यात काय की, आजकालच्या भाषेत सांगायचे झाल्यास धन कसे जोडावे? तर ज्याला आपण 'एक' नंबरचा व्यवहार म्हणतो त्या व्यवहारातून जोडावे. आपली कमाई कशी असावी तर ती 'एक' नंबरची असावी 'एक' नंबरचा व्यवहार तो उत्तम व्यवहार. अव्वल दर्जाचा व्यवहार आणि 'दोन' नंबरचा व्यवहार तो अधम व्यवहार. नीच व्यवहार. आजकाल आपण बरेचदा ऐकतो, आपलाच कुणीतरी एखादा मित्र म्हणत असतो, 'तेथे पगार भरपूर मिळतो रे पण जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणशील ना तर ते कवडीचे नाही.' आता सांगा जेथे काम करण्याचे समाधानच मिळत नाही तो व्यवहार उत्तम कसा होईल? तो व्यवहार उत्तम असल्याची ग्वाही तुमचे मन तुम्हाला कधी देईल का? आपले मन आपल्याला सतत खात राहील आणि आपले मनच जर आपल्याला खात असेल तर तेथे समाधान ते कसले?धन जोडण्यासाठी तुकाराम जसा उत्तम व्यवहाराचा आग्रह धरतात तसेच ते खर्च करताना आपण उदास विचारे ते खर्च केले पाहिजे असा सिद्धांतही ते मांडतात. आता विचारांच्या उदासीनतेला सिद्धांत का म्हणावे तेही लक्षात घेण्यासारखे आहे. 'उदास' या शब्दाचा अर्थ आपण नेहमी दु:खी, कष्टी, खिन्न असा घेतो 
'आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे।।
अशी आनंदावस्था भोगणारे तुकाराम महाराज उत्तम व्यवहारातून जोडलेले धन खर्च करताना खिन्न व्हायला, कष्टी व्हायला, दु:खी व्हायला कसे सांगतील? 'साधकाची दशा उदास असावी' असे जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा त्यांना म्हणायचं असते उदास म्हणजे अनासक्त. मालकाचे पैसे खर्च करताना नोकराला जसे काही देणे-घेणे नसते तितक्याच अलिप्तपणे आपण स्वत:चे पैसे स्वत:च खर्च केले तर उत्तम व्यवहाराचे समाधान दु:खात परिवर्तीत न होता समाधीत परिणत होईल.
(लोकमत अकोला_लोकधारा_ दि.४ दिसेंबर २०११ वरून साभार)

1 टिप्पणी:

  1. तुकोबा महाराजांनी जीवन कसे जगावे याबद्दल खूपच छान माहिती दिली आहे राम कुष्ण हरी 🙏🙏

    उत्तर द्याहटवा