कवी श्रीकृष्ण राऊत हे कवीनाम मराठी भाषिकांना सुपरिचत आहे. बहुतांश कविता छंद-वृत्तात लिहिणारा आणि कवितेला निखळ, शुद्ध काव्यरूप देणारा कवी म्हणूनही त्याची ख्याती आहे. मराठी कवितेत सर्वाधिक प्रयोग करून कालिक आशयाभिव्यक्तीचा आविष्कार करणे, हा श्रीकृष्णाचा काव्य-स्वभाव आहे. पुण्याचे सुविख्यात कथालेखक राजन खान यांच्या अक्षर मानव या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने अत्यंत देखण्या रूपात तुको बादशहाचे प्रकाशन केले आहे. श्रीधर अंभोरे यांचे अर्थघन प्रतीकात्मक मुखपृष्ठ आणि रेखाटने व रवीन्द्र सातपुते यांचे अक्षरलेखन असा अपूर्व योगही साधला गेला आहे. विशेषतः संत तुकारामांचे दहावे वंशज गुरूवर्य डॉ. सदानंद मोरे यांनी प्रस्तावनेत, तुकोबांच्या काव्य परंपेरत कवी श्रीकृष्ण राऊतांनीही कविता लिहिल्याचे मत मांडले. संत तुकारामांच्या वंशजानेच काव्य संग्रहाचा पुरस्कार आणि सन्मान केल्यामुळे, अर्थातच 'तुको बादशहा 'ला आधुनिकतेचेही परिमाण लाभले आहे.
बोल तुको बादशहाऽऽऽकी जयऽऽऽ
अकोला जिल्ह्यातील पातुर माझं जन्मगाव. आमच्या वेटाळात देवी भवानीचं ठाणं. दसर्याच्या रात्री देवीची पालखी उचलताना लोकांनी केलेला घोष-सदाऽऽऽनंदीचाऽऽऽ उदोऽऽऽ! बोऽऽऽल तुकोऽऽऽबादशाऽऽऽकी जयऽऽऽ!कोवळ्या वयात लोकसंस्कृतीतल्या तुको बादशहानं मनात घर केलं. तेच या संग्रहाचं शीर्षक झालं-तुको बादशहा!कवीच्या कोवळ्या मनात संत तुकोबांनी घर केलं. कवीनंही तुकोबांच्या विठ्ठल-परंपरेच्या थाटातच तुकोबा आणि विठोबांशी काव्य-संवाद साधला. अर्थातच कवीची जडणघडण ही लोकसंस्कृती आणि लोकसंचिताच्या मुशीतच झालेली आहे. कालनिहाय लोकसांस्कृतिक महत्ता कवीनं आपल्या सबंध काव्यलेखनातून आजवर उद्धृत केली आहे. अर्थातच कवीचा हा संवाद तुकोबा-विठोबांशी होत असला, तरी संवादाचे खरे माध्यम लोकमन हेच आहे.
तुकोबांनीही आपल्या समकालात लोकमनाशी संवाद अभंग निर्मितीतूनच उजागर केला होता. कवीनेही आपल्या समकालातल्या लोकजीवनाशी साक्षात संवादी पातळीवर रक्तसंबंध मानून, कवितेतून तो उजागर केल्याचे दिसते. तुकोबांची कविता ही जशी समकालीन असूनही कालातीत परिमाण जगासमोर ठेवते. तशीच श्रीकृष्णाचीही कविता समकालीन असून कालातीत परिमाण रसिकांसमोर ठेवते.
तुको बादशहा देई शब्ददान करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा होई कृपावंत ओत आशयात पंचप्राण
नामयाने तुज सांगितले गुज पेर तेच बीज अप्रतिम
परम अर्थाची पायाखाली वीट बसवावी नीट घडवोनी
श्लील-अश्लीलाचा करी तू निवाडा भाषेच्या कवाडा उघडोनी...
तुको बादशहाला काव्यगुरू मानून, त्याच्याच भाषेच्या कवाडातून कवीनं आपली काव्य-लेखणी परजली आहे. तीक्ष्णता, उग्रता, तोंडफोड, रोखठोक, न्यायनिवाडा या अंगानेच ती आधुनिक समकालातील जीवन जाणिवांना पोखरणार्या भाषा-किटकांचीही वाट लावते. नादमाधुर्य आणि भावगर्भताही अनुभूतीच्या कळवळ्यांतून लोकमनावर उमटविते. लोकसंचिताच्या कवाडातूनच अभंगांचे विविध प्रयोग करीत, लोकसंचिताला अधिकाधिक कालनिहाय परिमाणे देऊन व्यक्त करते. उपमा, दृष्टांत, बोली भाषेतील नादमाधुर्य निर्माण करणारी भाषिक रूपं सहजच कवितेच्या आकृतिबंधात अढळ नेतृत्व करतात. समाजाला वठणीवर आणण्याचेही कविकार्य करतात. समाजाच्या मनात दया, क्षमा, शांती, बंधुभाव, करुणा आदी जीवननिष्ठ भावभावनांचीही मानवतावादाच्याच परिप्रेक्ष्यात पेरणी करतात. माणूसपणावर प्रेम करणारी आणि नितांत श्रद्धा व्यक्त करणारी कविता, 'तुको बादशहा 'तून साकार झाली आहे. संतत्व आणि कवित्व यांचं अद्वैत जसं संतकाव्यातून प्रकटलं. कवित्व आणि मानवीयत्व यांचं अद्वैत, कवी श्रीकृष्ण राऊतांच्याही कवितेतून प्रकटलं आहे.
शब्दांपाशी ठेव जीव तू गहाण
तुको बादशहा कवितेचा पंचप्राण. श्लील-अश्लीलाचा निवाडा करण्याचे अधिकार कवी अंतर्मनाला अणूरेणूसारखे व्यापलेल्या तुकोबांना बहाल करतो. विठोबांच्या पायाखाली अठ्ठावीस युगांपासून मुक्तीची वाट पाहात असलेली परम अर्थाची वीटही कवीनं काव्यसृजनाला पायाभूत मानली आहे. मुखातून माझ्या बोले तुकाराम, तोच आत्माराम अभंगाचा. संत तुकाराम आहेत तरी कसे? कवितेचा देव तूच एक तुक्या, बाकी सार्या नख्या कापसात.तूच एक राजा नगदीचे पीक, बाकी झिकझिक उधारीची. तूच कलदार रोकडीचा दाम, बाकी जोडकाम कुसरीचे. तुकाराम श्वास तुकाराम ध्यास, सदा आसपास तुकाराम.काव्याच्या पापाचे भोगतो मी फळ, तुकाराम छळ करी माझा.म्हणे घालविले बेचाळीस वाया, अखेरीस पाया सापडला...अंतर्बाह्य तुकोबा रोमांरोमांत भिनल्यावर कवितेचं पाप करायचं नाही म्हणून अखेरीस कवीला, 'तुको बादशहा 'च्या सृजन निमित्तानं कवितेचाच पाया सापडतो.
साठोत्तरी मराठी कवितेत तुकोबांच्या काव्यकुळात कविता लिहिणारे भरपूर कवी सापडतात. बांध ऐपतीने चिरेबंदी वाडा, हुड्यावर हुडा चढवावा. शब्दांपाशी ठेव जीव तू गहाण, तुला माझी आण तुका म्हणे...तुकोबांच्या काव्यकुलाशी रक्तसंबंध मानून, शब्दांपाशी जीव गहाण ठेवून, समकालातील जीवन जाणिवांना आणि जीवनमूल्यांना तुको बादशहाच्या भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेत, अभंग शैलीचे कालिक प्रयोग करून, काव्यबंधातून लौकिकालौकिक पातळीवर व्यक्त करण्याचा पाया मात्र कवी श्रीकृष्णाला सापडल्याचे दिसते. या कवीला तुका म्हणे ही नाममुद्राही तिच्यातील अंतर्बाह्य प्रतिभासामर्थ्याने गवसली आहे. काव्याच्या पापाचे फ्ळ भोगताना, तुकारामाने केलेला छळही कवीला निखळ, शुद्ध काव्यसृजनाची प्रातिभ पायवाट सोडू देत नाही. तुकोबांच्या काव्यकुलाशी अद्वैत साधणार्या असाधारण काव्याभिव्यक्तीचे समकालातील उदाहरण म्हणून, 'तुको बादशहा 'चा विचार करावा लागतो.
घेई आता पीक मनाजोगे
कोणत्याही काळात सुष्ट विरूद्ध दुष्ट संघर्ष सुरूच असतो.मानवतावादाचे रक्षक दुष्टांना वठणीवर आणण्यासाठी कार्यरत असतात. आधुनिक काळातही मानवाच्या जीवनात मूलभूत गरजांचा अभाव आणि असुरक्षितता कायम आहेच. सत्तांधता, धर्मांधता, जातीयता, विषमता, असमानता, दहशत, भय आदी कारणे प्रत्येक काळात आपसुख चालत येतात. संत आणि महापुरुष रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग मानून संघर्षरत असतात. अंतर्बाह्य जग आणि मनाची तपासणी करीत असतात. आधुनिक काळात संत-महापुरुषांची भूमिका साकार करताना, कवी-लेखक समाजात ज्ञान विचारांची-न्याय्य विचारांची पेरणी करून, मानवतावादाच्या भूमीचं संगोपन करतात. दुष्टांना शह देण्याच्या परंपरेतच लेखक-कवींना आपली लेखणी पाजळावी लागते. मिळाला अखेर हक्काचा आसरा, तुकोबा सोयरा झाला माझा...उशिरा पटली
मातीची ओळख, घेई आता पीक मनाजोगे...ठायी ठायी मन आणि लेखणी शुद्ध केल्यावर, तुकोबांनी दाखविलेल्या वाटेनेच कवी शब्दास्त्रे परजून; फटकळापाशी जाई फटकळ, बोलणे सकळ तोंड फोड...जीवावर उभा बंदुकीचा घोडा, नरमेध खडा दारापाशी...आधुनिक काळातल्या दृष्ट प्रवृत्तींचा समाचार घेताना दिसतो. सर्वहारा माणसाचे दुःखमूळ त्याच्या संसारात दडलेले असते. सुखाचा संसार करताना त्याची तारांबळ उडते.
असा संसाराचा दंड थंड करी सारे बंड
काय सांगू त्याची गत करी जितेपणी खत
असा तापे त्याचा ताप करी जीवनाची वाफ
केला केला त्याने घात नेला प्राण हातोहात...
आधुनिक काळातील समस्यांशी झुंजताना सर्वहारा माणसाच्या जीवनाची सतत पडझड होताना दिसते. वांझोटी नव्हाळी एक तारखेची पाळी, भविष्याचा निधी सरे वर्तमानाआधी, भागवोनी जिणे केले गुणाकार, राखेत अखेर उरे शून्य, सूचू देत नाही आकड्यांचा खेळ कसा रोजमेळ जुळवावा, नाव गोडेतेल खाता तोंड कडू, मिळविणे सोपा वैकुंठाचा पास, शाळेत प्रवेश अवघड, वाजतात कानी देणग्यांच्या घंट्या, जिणे झाले मज कुसळाची शेज, रॉकेलची मिठी पेट्रोलच्या गळा, श्वासा येती कळा भरधाव, जोडवे मोडून ल्याले बिलवर, पाडुनिया घर उभे फ्लॅट, केबलकाचणी सुरू रात्रंदिन, डोळे आणि स्क्रीन धुमश्चक्री, खोटानाटा लोभी धंदा शेंडी लावून गोविंदा, जाती-जातीमधे वाटू कुलनामे पुण्य लाटू, येताजाता क्षण हाणे मोठमोठे घरावर गोटे रात्रंदिन, धारीवर चाल म्हणे तलवार, पोटी आरपार दहशत, साहेबांच्या लाथा मानाव्यात गोड, आले जरी फोड ढुंगणाला, नापिकीचे सालमान मानपान सतरा, उदकाची चोरी करी मारामारी, पाण्यासाठी शुद्ध नियोजित युद्ध;समकालातल्या मानवी समस्या आणि जीवन मूल्यांच्या सतत होत जाणार्या पडझडीला कुठेतरी थांबवता आले पाहिजे. सर्वहारा माणसांच्या आयुष्यात; अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता ह्याच मुख्य गरजा असतात. त्यांच्याच परिपूर्तीसाठी त्यांना सतत संघर्षरत राहावे लागते.
राजकीय आणि भांडवली सुखलोलुप व्यवस्था कधी धर्म तर कधी जाती तर कधी गरिबी, अशा कारणांनी सर्वहारा माणसांचं भौतिक आणि मानसिक शोषण करीत असते. जीवनमूल्यांच्या प्रदूषणाचा झरा वरपासून खालपर्यंत वाहत येतो.जीवनमूल्ये बदलली की जीवनमानही बदलत जाते. मानवतावादी मूल्यांना पायदळी तुडविण्याचा सोस वाढत जातो. कवीनेही अमानुषतेला विरोध करीतच मानवतावादी आणि नैतिकतावादी मूल्यांचे संस्कार समाजावर करण्यासाठी तुकोबांकडून मिळालेले शब्दसंचित आणि शब्दास्त्रे, कवितेच्या माध्यमातूनच रोखठोकपणे वापरली आहेत. मातीची ओळख पटल्यामुळे मनाजोगे काव्यपीक घेण्याचे आत्मबळही कवीला प्राप्त झालेले आहे.
खाजवाया आले नख झाले सुख सागर
कवी आधुनिक युगात विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोणाच्या परिप्रेक्ष्यातच जीवनातल्या दैनंदिन जीवन व्यवहारांकडे पाहतो. हुबेहुब झालो तुझियापासून, तुझाच कलोन आहेना मी, याची जशी कवीला जाण आहे तसेच, खाजवाया आले नख झाले सुख सागर, याचेही त्याला भान आहे. ढुंगणाला पुरे हात आवाक्यात मंगळ, विज्ञानाला पूर चढे मुंगी बुडे मुतात, ही आधुनिक काळातल्या माणसांची गत. काकडी दोडका लागे वेलीवर, तसे का लेकरं लागतील? असा नैसर्गिक सत्याचा स्वीकार करायला लावणारा प्रश्नही कवी उपस्थित करतो. उरली ना फांदी पानातली दाट, पक्षिणी घरटं बांधी कोठे? सृष्टी पर्यावरणातील वृक्षवल्लींचा विनाश करून वसाहतवाद बोकाळल्यामुळे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती, ही भावनाच लोप पावली आहे. व्याकुळले हिंडे वनी वनचर, रातरातभर शोधे पाणी...कवीचं अंतःकरण तिळतिळ तुटतं.
एकविसाव्या शतकाने केवळ ग्लोबल व्हिलेज निर्माण केले असे नाही, तर चंद्र-मंगळावरही माणूस पोहोचला आहे. रोबोट संस्कृती चंगळवादातून उदयाला आली. माणसांचा माणसांशी होणारा सौहार्दपूर्ण संवादही खुंटला. माणसांची आतून बंद बेटं तयार झाली. दोन्ही डोळ्यातून वाहे चंद्रभागा, घडते निर्जला रोज एकादशी, वावर उपाशी तहानले. शेतीमातीचीही हेळसांड झाली. भांडवलीकरण आणि वैज्ञानिक प्रगतीनं सर्वहारा माणूस दुःखाच्या कुळाशी, मृत्युपंथीच पोहोचला. लाव रोज आता नोटांचे तू तास, होशील खलास हत्तीपायी... उरफोड गरजांची पूर्ती करताना माणूस मेटाकुटीला पोहोचला.
माणसांची विविध सुष्टदुष्ट रूपंही कवीनं अभंगातून मांडली आहेत. अनादी काळापासून माणूस अहंकार आणि स्वार्थपरायणतेवर विजय मिळवू शकला नाही. माणसंच माणसांचे वैरी होतात. भिजले शेपूट आतडे पिळले, इमान वाळले थारोळ्यात.टोळांचे टोळके भैरव बेरके.वारियाला काय मारशील लाथा, फोडशील माथा मोक्षावर. आकाश ठेंगणे अहंकाराहून, ज्ञानाचाही खून पाडशील.कोण मुखवटा कोणते श्रीमुख?पटावी ओळख अंतर्यामी. वेचता न येती गव्हातले खडे, चकव्यात पडे वाटचाल...कमलनयन युगावरचं कवीचं भाष्यही मार्मिक आहे.
कमलनयन, दृष्टी चिखलाची खाण
चाफेकळी नाक, मागे सुवासाची भीक
मुखी गोड बोल, नाही अंतरात ओल
बहुश्रुत भोळा, कानी कापसाचा बोळा
देह हत्तीवाणी, मन कोते केसाहुनी...
अवघ्याचे आहे एक दुःखमूळ
आशा-आकांक्षा-अपेक्षा हीच खरंतर जगभरच्या दुःखाची जननी आहे. कुणालाच ती स्वस्थ जगू देत नाही. अवघ्याचे आहे एक दुःखमूळ, अपेक्षिता फळ चुके वर्म...दुःखाचे आणि तृष्णेचेही तेच मूळ आहे. यामुळेच जगभर माणसांचं वर्म चुकत जातं. चुकांचेही तेच मूलवर्म आहे.घेई आता कोण तुझा निका वाण? बुडाले दुकान तुकारामा...हिसकून थान वासरापासून, दुधाचे दुकान फायद्यात...नोटा छापण्याची कला अवगत होवो मला, हीच आजच्या जगण्याची खरी हकीकत आहे. खरंतर माणुसकीचंच दुकान बुडालं आहे. माणुसकीला गिळणारी केवळ फायद्याची दुकानं जगभर थाटली गेली. वैराग्याची धाव बिछान्यापर्यंत, विचारांचा अंत भावनेत, झाल्याचाच हा काळ आहे.माणसाच्यावाणी माणसात राही, नाही तर नाही धडगत, हे विठोबाला सहज सांगता येतं. माणसांना मात्र ते कोणत्याच काळात कधी पटलं नाही. शेवटी, मन भ्रमाचे भांडार त्याची किमया अपार, हेच खरं. सरो आले आता श्वासांचे इंधन, दुःखाचे चुंबन घेता घेता,बसे एका जागी थकलेले ढोर, नाही अंगी जोर उठावया, ही सर्वहारा माणसाची गत. सर्वहारा माणसांविषयी अपार करुणेचा आर्त झरा कवितेतून वाहताना दिसतो. कवी सर्वहारा माणसाची कड घेऊन विठ्ठलाशी संवाद साधताना, त्यालाही लौकिक जगण्याचे प्रश्न सोडविण्याची विनवणी करतो.
समाधीच्या बड्या बाता सांगू नको भगवंता
मोक्ष, मुक्ती-आश्वासन लबाडाचे आवतन
उगा पाडू नको कीस प्राण झाला कासावीस
भुकेसाठी चतकोर असो शिळा वेळेवर
वाळवंटी जिता झरा लाव एक तरी खरा
नाही तर झटपट सोड भिवरेचा तट...
भूक हेच सर्वहारा माणसाचे परमोच्च जगणे आहे. मोक्ष-मुक्ती ह्या पोट भरलेल्यांच्या लीळा आहेत. कोणत्याही धर्मांत आणि देवात, शीळेतून लीळेत येण्याचे-साक्षात लौकिकात अवतरून, लोकांच्या जगण्याच्या समस्या दूर करण्याचे सामर्थ्य नसते. ज्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतात, त्यांना मोक्ष-मुक्तीची चाड असते. तुकोबांना अनुभवानं हे धर्मसत्य आणि देवसत्य जाणवल्यामुळेच त्यांनी रंजल्यागांजल्यात देव शोधण्याचा परमधर्म जगाला सांगितला होता. कवीही मानवतावादी परमधर्माचाच संदेश लोकांना समकालात देतो आहे.
कोणी चालवितो भिंत कोणी बसे विमानात
लोकांचं धार्मिक असणं आणि धर्मव्यवहार-कर्मकांडे खोटीच असतात. मानवतेचा कळवळा त्यात नसतोच. धर्मांधता आणि हिंसा यांनी व्यापलेला धर्म कधीच मानवाला मोक्ष-मुक्तीचा मार्ग दाखवित नसतो. विषमता आणि सत्तांधता हीच दोन मूलतत्त्वे ह्या अमानुष धर्मांधतेच्या पायांमध्ये रूजलेली असतात. सामान्य निरपराध माणसं बळी पडतात. सत्तांध लोकांच्या सत्तेच्या पोळ्या सर्वहारा निरपराध माणसांच्या मढ्यावर शेकल्या जातात. ऊठ माझ्या जीवा चाल बिगीबिगी, उरला ना जगी कळवळा...हे आजचं वास्तव आहे. मीच माझा देश मीच माझा धर्म, वेद-गीता-वर्म ठावे मज. मला विचारून उगवतो सूर्य, चुकण्याचे धैर्य नाही त्याला...बेडकाची उडी काय गाठी पैलथडी? अहंकारी मन तसे दूर देवपण...काळ्या नि पांढर्या नवविध गोट्या, खेळतात खोट्या रातंदिस... समाजावर धर्मसत्ता आणि राजसत्ता गाजविणार्यांची ही अहंवृत्ती पाशवीपणाचे द्योतक असल्याचाच जगाचा आजवरचा इतिहास राहिला आहे. आजच्या धर्मांध कर्मकांड आणि धर्माचा व्यापार करणार्या धर्मगुरू-धर्ममठबाजीला कवीने प्रखर विरोध केला आहे. धर्माचे व्यापारीकरण आणि बाजारीकरण करून, पिढ्यांपिढ्यांची पोटभरू सोय करण्याच्या आध्यात्मिक वृत्तीला कवीने जबर शह दिला आहे. अंदरकी बात काही औरच असल्याचं उजेडात आणलं आहे.
आम्ही असे जुने पापी संत सारे घालू खापी
जाती-जातीमधे वाटू कुलनामे पुण्य लाटू
नाही अधिकार तरी भाष्य करू भरजरी
चिकटवू थोर थोर नवनवे चमत्कार
कोणी चालवितो भिंत कोणी बसे विमानात
याचे त्याचे स्थापू मठ भरू पिढ्या-पिढ्या पोट...
माणूसपणातून जेव्हा सत्य, अहिंसा, शांती, समता निखळून पडते तेव्हा माणसंच माणसांना पायदळी तुडवून, अमानुषपणे मानवतावादी जीवन मूल्यांच्या पतनाला जबाबदार ठरतात. स्व अस्तित्वाची ओळख हाच खरेतर एकमेव जीवन मूल्यांवर श्रद्धा बाळगण्याचा पर्याय असतो. संतांची भक्तिचळवळ ही स्व अस्तित्वाची ओळख पटविण्यासाठीच अस्तित्वात आली होती. अंतःकरणात समत्व आणि ममत्वाच्या उर्मी निर्माण करण्याची चित्तशुद्धीची मानुष-प्रक्रिया म्हणून, संतांनी लोकमानसात भक्ती मार्ग रुजविला होता.
रंजल्यागांजल्यात देव शोधणार्या तुकोबांनी भक्त-भगवताचं अद्वैत मानून, मानवतेच्या सेवेचा मूलमंत्र समाजाला दिला. गंगेमध्ये रोज ढुंगण जो धुतो, त्यास काय नेतो सुखे यम? आजवर जे जे काशीमध्ये मेले जीव-जंतू गेले काय स्वर्गी? असे अनेक नैतिक आणि वास्तविक प्रश्न कवी लोकांना विचारतो. मोक्ष-मुक्ती-पुण्य-स्वर्ग-नरक आदींचाही पुनर्विचार करण्याचा सल्ला देतो. सेवा आणि मुक्तीच्या अद्वैताची मांडणी अभंगातून करताना, कवीनेही मानवतेच्या सेवेतूनच माणसाला उन्नत होता येणे शक्य आहे. असे स्पष्टपणे नमूद केले आहे. अर्थातच जीवनाचं लौकिक अध्यात्मच कवीनं आपल्या कवितेतून मांडलं आहे.
सत्य खरी पूजा सत्य खरा देव
धर्माने माणुसकी जपण्याचा संदेश दिला. धर्मांधतेने माणुसकी जमिनदोस्त करण्याचा आदेश दिला. सर्वहारा माणसं भोळीभाबडी असतात. धर्म जगण्याचा व्यवहार मानून धर्मकायद्यांचा अन्याय-विषमता सहन करतात. धर्मकायदे राबविणार्यांना धर्माचं राजकारण करून आपली पोळी शेकायची असते. वारकरी सर्वधर्मसमभाव मानणारी मानवतावादी परंपरा मानली जाते. भाबडेपणा, गरिबी, अभाव, विषमतेत जगणार्या कुण्याही धर्माची-जातीची माणसं श्रद्धाशील आणि अनुसरणप्रिय असतात. यांच्याच भरवशावर धर्माचं राजकारण केलं जातं. गरिबी-अभावात जगणार्याला कोणतीच जात आणि धर्म नसतो. तो तरी धर्मदोषांना बळी पडतो.रोजच्या जगण्याची तजवीज करताना कुठेतरी मरून पडतो.
बंदा टोचलेला कान ऐकी अजानाची तान
तळलेल्या पापडानं केलं चुरा बालपण
बुरख्याच्या जाळीमागे ओले पदराचे धागे
एकादशी-रमजान बुडे निर्जलात प्राण...
कवीची बहुतांश रचना लोकांना धर्मसत्य आणि देवसत्य सांगण्याचा प्रयत्न करते. तुकोबांशी आणि विठोबांशी संवाद साधताना, ही सर्व रचना भक्तीच्या आर्त कळवळ्यातून होणे अस्वाभाविक नाही. आध्यात्मिक भूक ही जगणार्या जिवंत माणसांच्या जगाची सनातन भूक आहे. भक्तीतूनच ही भूक भागविण्याचा सर्वधर्मसमभाव संतांनी जगाला दिला. धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रांत ज्ञानदीप लावून, समाजात पसरलेला आध्यात्मिक आणि धार्मिक अंधारही दूर केला. समकालात तोच मार्ग कवीनेही अंगिकारल्याचे दिसते. धर्म आणि देवाचा धंदा करणार्या व्यवस्थेविरूद्ध संतांनीही आपल्या काळात धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी, असे म्हणतच, खर्याखोट्याचा निवाडा करून, जगाच्या मानवी अंतरंगात ज्ञानदीप उजळून जीवनमानाला प्रकाशमान केले. सत्य असत्याचा निवाडा समकालात करताना कवी म्हणतो, सत्य नसो कोण्या जातीचे गुलाम, होवो ना हराम सत्य कधी, सत्य नसो कोण्या धर्माचे बटीक, गुह्याचे स्फोटक असो सत्य...सत्य ही कोणाची मालमत्ता नसते. सत्यावर कोणी बंदीही घालू नये. सत्य समतेची संधी असते. नर-मादी असे कोणतेही भेद सत्य करीत नाही. सत्य सूर्यप्रकाशाइतके पारदर्शक आणि प्रकाशमान असते. सत्य खरी पूजा सत्य खरा देव, बाकी उठाठेव असत्याची...सत्यासाठी माझी शब्दविवंचना, या थाटातच सत्य-असत्याचे कार्यक्षेत्रही कवीने विशद केले आहे. शेवटी सत्य हाच धर्म. सत्य हीच भक्ती. सत्याचे दर्शन हेच अध्यात्माचे आणि धर्माचेही कार्य. कवीने सत्याची परंपरा, आधुनिक काळातील सार्वजनिक सत्यधर्माचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फुल्यांपर्यंत समकालीन आणि समकक्ष मानली आहे.
तुको बादशहाचे समकालीनत्व
तुको बादशहा या काव्यसंग्रहात कवीने 100 अभंगांचा समावेश केला आहे. संतपरंपरेतील भक्तीमार्गी रचनाकारांच्या ओवी-अभंगादी आक्षरछंदांचा लोकमानसावरील प्रभाव आजही कालसापेक्ष असल्याची समकालिनता, कवी श्रीकृष्ण राऊतांच्या 'तुको बादशहा 'तून मुखर झाली आहे. लोकजीवनातील उदाहरणे, दृष्टांत, म्हणी-वाक्प्रचार, प्रतिमासृष्टी, रचनेच्या गर्भातील आर्त कळवळा, भक्तीमार्गी भाषिकता, आंतर संवादाची कारुण्यलय, लौकिकालौकिकाला आरपार भिडणारी समकालीन आधुनिक भाषिकता आदींनी कवीची अभंगरचना बादशहाच्याच थाटात झालेली आहे. आधुनिक आणि ग्लोबल युगातील भौतिक, आधिभौतिक, मानसिक, शारीरिक, धार्मिक, आध्यात्मिक, लौकिक, पारलौकिक अशा जगद्व्याळ प्रश्नांच्या तळाशीही कवी पोहोचला आहे.
उदाहरणार्थ, वेश्येच्या रक्तात आढळो ना एडस्, मेंदूला कवटी बुबुळाला खाच सोसण्या दे पाठ कासवाची, ग्लिसरीन आसू पापण्यात, युगे अठ्ठावीस उभा विटेवरी खरा धन्वंतरी एकमेव, पाण्यासाठी शुद्ध नियोजित युद्ध, हासत ऐकाव्या साहेबांच्या शिव्या कानावर ओव्या अमृताच्या, करी पुन्हा त्याच चुका घेई आभाळाचा मुका, धारीवर चाल म्हणे तलवार पोटी आरपार दहशत, तिच्यापाशी दोन सरे एक उरे केवळ, पालीच्या जबड्याखाली जसा किडा करी तडफडा अखेरचा, मुकण्या हत्तीचे जुगणे निष्फळ तैसाचि उथळ भक्तिभाव, आपली ती पाठ आपल्या लोचना तसाच दिसेना आत्मदोष, त्रिखंडात नाही स्वभावाला दवा सप्रेम वागवा लागे तया, परीट घडीचा शुभ्र अंगरखा वर जाता काखा दावी डाग, मुखी नामाचा संबळ मनी 'सावळा ' गोंधळ, कंचीतले फूल काढण्यास गेलो फोडुनी पावलो दोन भांगा, अवघ्याचे आहे एक दुःखमूळ अपेक्षिता फळ चुके वर्म, उंटाच्या फेंडीचा घेऊ पाहे मुका नाही त्याच्या दुःखा पारावार, कुतर्याचे तोंड चघळे हाडूक तसे माझे मुख सुखावते, उरला न काही आपपर भाव अशी माझी हाव बळावली, केल्या लटपटी रांडापोरांसाठी प्राणाचे शेवटी तेच वैरी; अशा अनेक दृष्टांतादि उदाहरणातून कवीने मानवी जीवनातील शाश्वत गुणसूत्रांची मांडणी समकालाच्या परिप्रेक्ष्यातच केलेली आहे.
समकालाची चिकित्सा करताना पारंपरिक संज्ञावलींना समकालाची परिमाणे देऊन; माणूस हेच या जगातील श्रेष्ठ मूल्य असल्याचा श्रद्धाभाव, कवीने अभंगांच्या रचनेतून उजागर केला आहे. संतांची कविता जशी कालातीत माणूसपणाची गाणी गाताना दिसते; तसेच कवीही माणूसपणाचीच समकालातीत गाणी गाताना दिसतो. समकालाला कालातीत करण्याचे आधुनिक उदाहरण म्हणून, कवी श्रीकृष्ण राऊतांच्या 'तुको बादशहा ' चा निश्चितच विचार करता येईल...
तुको बादशहा / श्रीकृष्ण राऊत
अक्षर मानव प्रकाशन, पुणे, 2015
-डॉ. किशोर सानप
कमला नेहरू शाळेजवळ, रामनगर, वर्धा-442001े
दूरध्वनी-9326880523, 9422894205
dr.kishorsanap@gmail.com
( महाराष्ट्र साहित्य पत्रिका _ एप्रिल-जून २०१६ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा