विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठी कवितेचे वास्तव काय आहे? आज सर्वसामान्य वाचक कवितेपासून दूर गेला आहे. कवितेविषयी कमालीची अनास्था आजच्या मराठी समाजात दिसून येते. प्रकाशकांना कवितेच्या प्रकाशनात रुची नाही. असे असले तरी संबंध महाराष्ट्रात आज हजारो कवी कवितेची निर्मिती करताना दिसतात. एकीकडे कवितेविषयी कमालीची उदासीनता आणि दुसरीकडे खच्चून कवितेची निर्मिती सुरु आहे. कवितेने आपले मूल्य हरवले आहे, अशी सर्वसाधारण तक्रार साठोत्तर मराठी कवितेच्या कालखंडात दिसून येते. मराठी जेव्हापासून मुक्तछंदाचा वापर करण्याची पद्घत रूढ झाली तेव्हापासून कवितेसाठी छंदवृत्त, लय, गेयता, शब्दकळेची अचूक निवड, काव्यमूल्य वगैरेंची काहीही गरज नाही, असे आमच्या बहुसंख्य कवींना वाटते. कविता म्हणजे सहज लिहिता येण्यासारखी नैमित्तिक अशी बाब आहे आणि त्याकरिता कोणत्याही अभ्यासाची, परिश्रमाची आणि लोकाश्रयाची गरज नाही, अशी कवीची खात्री झालेली दिसते. अशा अनेक चुकीच्या समजांमुळे मराठी कवितेपासून रसिक आणि वाचक दुरावला आहे. पुरवठा मोठा असला तरी मागणी नगण्य, अशी मराठी कवितेची या विसाव्या शतकाच्या अखेरीस स्थिती झालेली आहे.
साठोत्तरी मराठी कविता ही मर्ढेकरांच्या प्रभावात निर्माण झाली. एखादे सूत्र, महानोर अशाही दबावात अपवाद ठरतात. मर्ढेकरांचा प्रभाव हा लघुनियतकालिकवाल्यांच्या कवितांवर ठळकपणे दिसून येतो. आशय आणि मांडणीच्या पातळीवर कवितेला आलेले काठिण्य साठोत्तरी कवितेत वाढत गेले आणि त्यामुळे कविता वाचकापासून दुरावली. देशीय परंपरेपासूनही दुरावली. केशवसुत-मर्ढेकर-चित्रे अशी परंपरा सांगितली जाते पण तुकोबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, ना. धों. महानोर, विठ्ठल वाघ आदी कवींच्या देशी असलेल्या कवितेची सलग मांडणी करून कवितेची नीट समीक्षा करण्याचेही टाळले जाते.
1975 नंतरची कविता आणि श्रीकृष्ण राऊत
इ. स. 1975 ते 2000 ह्या कालखंडात ठळकपणे आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्घ करणारे कवी कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर देणे तितकेसे सोपे नाही. या कालखंडातील साधारणपणे कमीजास्त प्रमाणात यश मिळवून स्थिरपद झालेले नारायण सुर्वे, शंकर वैद्य, शंकर रामाणी, म. म. देशपांडे, ना. धों. महानोर, ग्रेस, दि. पु. चित्रे, अनुराधा पोतदार, नामदेव ढसाळ, मधुकर केचे, शिरीष पै, मंगेश पाडगावकर, वसंत सावंत, वसंत आबाजी डहाके, पुरुषोत्तम पाटील, सुरेश भट, आरती प्रभू, यशवंत मनोहर, लक्ष्मीकांत तांबोळी, केशव मेश्राम श्रीधर शनवारे, प्रभा गणोरकर इत्यादींच्या नंतरच्या फळीत विलास सावंग, नारायण कुलकर्णी कवठेकर, फ. मु. शिंदे, गुरुनाथ धुरी, द. भा. धामणस्कर, हेमंत जोगळेकर, सतीश काळसकेर, रजनी परुळेकर, किशोर पाठक, अरुण ढेरे, खलील मोमीन, लोकनाथ यशवंत, आनंद जोर्वेकर, इंद्रजित भालेराव, प्रज्ञा लोखंडे, नीरजा, प्रकाश होळकर यांची नावे सामान्यपणे घेण्यात येतात. त्यातच एक नाव श्रीकृष्ण राऊत ह्या कविचेही आहे. श्रीकृष्ण राऊत गेल्या पंचवीस वर्षांपासून तरी कविता लेखन करीत आहेत. शब्दालय ने त्यांचा गुलाल (1989) हा गझलांचा एक कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. ह्या पंचवीस वर्षात त्यांनी काव्यलेखात विविध प्रयोग केले आहेत. सातत्याने कवितेत प्रयोग करण्याचा ध्यास येणे, हे कवीच्या काव्यप्रवासाचे एक विशेष वैशिष्ट्य आहे. कवीचे पाव शतकाच्या आपल्या प्रवासात मांडणीच्या अंगाने तुकाराम, बालकवी, मर्ढेकर, ग्रेस, महानोर वगैरे कवींच्या रूपबंधाचा कसून अभ्यास केला. प्रभाव जाणवणार नाही अशा अंगाने काव्यनिर्मितीही केली. कवितेच्या अभिव्यक्तीचे निरनिराळे छंद, वृत्ते हाताळली. मुक्तछंदातही प्रयोगशीलता दाखवली. महाराष्ट्रात मराठी कवितेचा छंदवृत्तादि अंगांचा आणि काव्यनिर्मितीच्या अंगांचा खोलवर अभ्यास असणारे जे मोजके कवी आहेत, त्यात श्रीकृष्ण राऊतांचा समावेश करावा लागतो. कवितेची मांडणी आणि कवितेची निर्मिती ह्यांचा जाणीवपूर्वक विचार करणारा हा कवी पंचवीस वर्षे सलगपणे काव्यनिर्मिती करूनही मराठी काव्यक्षितिजावर ठळकपणे प्रसिद्घी पावला नाही. कारण कोणत्याही एका विशिष्ट साच्यात या कवीने आपली कविता ओतली नाही. कोणत्याही गटाचे सदस्यत्व धारण केले नाही. विविध छंदांचे प्रयोग करून, आजच्या काळाला जिवंत करण्याचा ह्या कवीचा ध्यास, कवितेविषयी सजग नसलेल्या मराठी बाण्याने, कधी लक्षात घेण्याचा प्रयत्नच केला नाही.
सतत प्रयोगशील असणारी ह्या कवीची कविता मराठीतल्या दिग्गज असलेल्या मौज, अनुष्टुभ, कविता-रती सारख्या जवळपास सर्वच मुख्य नियतकालिकांतून गेल्या पंचवीस वर्षात प्रकाशित झालेली आहे. कोणत्याही पद्घतीने स्थिरत्व न पावलेला हा कवी ताकदीचा असूनही दुर्लक्षित राहिला. त्यांचा गुलाल हा गझलांचा पहिला कवितासंग्रह सुरेश भट हे गझलसम्राट ठरवून टाकल्यावर श्रीकृष्ण राऊतांनी कितीही श्रेष्ठ आणि आशय-मांडणीच्या पातळीवर आपले स्वयंभू वैशिष्ट्य सिद्घ करणारी गझल लिहिली तरी, तिचा विचार करण्यसाची कधी कुणाला गरज वाटली नाही. मराठीत एखाद्या प्रकारात नाव सिद्घ झाले की त्याच प्रकारात कुणालाही लेखन करण्याचा जणू अधिकारच नसतो. गझलांच्या निर्मितीनंतर ह्या कवीने कोरकू आदिवासींच्या पाड्यांवर राहून वेगवेगळ्या पारंपारिक छंदवृत्तींचा प्रयोग करीत आदिवासी कोरकूंच्या जीवनाला साकार करणार्या कविता लिहिल्या. आधुनिक युगाच्या विभ्रमांना अभंग ह्या छंदात ताकदीने मांडणार्या कविताही या कवीने लिहिल्या आहेत. डुंडा ओळा पिपल साई आणि तुका झालासे प्रसन्न या नावाने अनुक्रमे त्यांच्या कवितांचे सदर्हू संग्रह कदाचित रसिकांना आणि प्रकाशकांना कविता भावल्याच्य तर, भविष्यात प्रकाशित होण्याची शक्यता आहे. प्रकाशकांच्या निराशाजनक व्यवहारवादाला कंटाळून अखेर या कवीने स्वत:च्या खिशाला खार लावून स्वत:च एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्या तान्ह्या मुला हा छत्तीस कवितांचा कवितासंग्रह ऐन एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर प्रकाशित केला आहे. एका अस्सल कवीची वेदना आणि दु:ख, आशय आणि अभिव्यक्तीच्या नव्या वळणाने मांडणारी ही कविता, क्लेशदायक विसाव्या शतकाच्या पार्श्र्वभूमीला सामोरी जावून, एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरचे नवे गीत गाताना दिसते. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर ह्या कवीच्या निर्मितीला विशेष महत्त्व आहे म्हणूनच मराठी कवितेच्या हरवलेपणाच्या संदर्भात पुन्हा कविता सापडल्याची आशा निर्माण व्हावी, अशी ह्या कवितेची निर्मिती आहे. विसाव्या शतकाचे एका कवीचे मनोगत म्हणूनही ह्या कवितासंग्रहातील कवितांना विशेषत्व लाभले.
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर...
याच नावाच्या कवितासंग्रहात याच नावाची ही एकदम दर्शनी असलेली पहिली कविता आहे. मुक्तछंदाच्या विस्कळित वापर करण्याच्या या काळात मुक्तछंदाचे परिणामकारक उपयोजन करणारी ही कविता आहे. मुक्तछंदाची मराठी कवितेत अशी दु:खदायक स्थिती आहे तशीच ती सरणार्या विसाव्या शतकाचीही आहे. कवी सजगपणे ह्या विसाव्या शतकाकडे पाहातो आहे. विसाव्या शतकाच्या शेवटी एकूणच समाजाची, राज्याची, देशाची, संस्कृतीसभयतेची चिंताजनक स्थिती झालेली आहे. आधुनिकीकरणातून फोफावलेला वसाहतवाद आणि मुक्त अर्थव्यवस्थेतून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सबंध अर्थव्यवस्थेला गिळंकृत करताना निर्माण केलेली धास्ती हळूहळू आपले अस्त्त्िव सिद्घ करू लागली आहे. शेतीप्रधान आणि खेड्यात वसलेला, सोन्याचा धूर सोडणारा आपला देश आणि प्राचीन सभ्यतेची गरिमा विश्र्वाला सांगतानाच बुद्घाचा, शांती-अहिंसेचा संदेश देणारा आपला देश, एका विचित्र पोकळीत सापडला आहे. माणसाच्या जगण्याची सर्व धडपड त्याच्या अस्तित्वासाठीच असते. अस्तित्वासाठीच माणूस संघर्ष करीत असतो. मानवाच्या पृथ्वीतलावरील अस्तित्वापासूनच त्याच्या अस्तित्वाचा संघर्ष सुरु आहे. द्बितीय महायुद्घोत्तर कालखंडात मानवाचे अस्तित्व निरर्थक आणि अर्थशून्य झाले. पिपात मेले ओले उंदिर सारख्या कवितांद्बारे विसाव्या शतकाच्या सहाव्या दशकात मर्ढेकरांनी मानवी अस्तित्वाचा प्रश्न आपल्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रयत्नाचा धागा पुढे नेण्याचा प्रयत्न मराठीत, आडवळणाला असलेल्या श्रीकृष्ण राऊत नावाच्या एका कवीने केलेला आहे.
मर्ढेकरांच्या नंतर काळ झपाट्याने बदलला. दूरदर्शन, संगणक, यंत्रमानव, कृत्रिम रेतन पद्घतीने मानवाची निर्मिती, चंद्रावरील मानवाचे पदार्पण, अणुपरमाणूंचा ध्वंसक आविष्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले शीतयुद्घ, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भारतावरील अतिक्रमण, खिळखिळी झालेली मुक्त अर्थव्यवस्था आणि सुशिक्षितांच्या नोकर्यांची गळती, बंद पडायला आलेल्या कंपन्या आणि बेरोजगारीचे वाढलेले प्रमाण, मोडीत निघालेला रशियातील मार्क्सवाद, तंत्रज्ञान आणि विज्ञानाची मुक्त घेवाणदेवाण वगैरेंचा आपल्या देशी आणि परंपराप्रिय समाजावर आणि संस्कृतीवर झालेला खोलवरचा परिणाम टिपून एकविसाव्या शतकातील भारत कसा असेल? याचे चिंतनीय आणि चिंता निर्माण करणारे चित्र कवीने अनोख्या पद्घतीने एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर ह्या कवितेत मांडले आहे. काळाचे भान असणारे कवीचे मन आणि कवीचे डोळे जे पाहातात आणि अनुभवतात, ते कुण्याही भारतीय मनाच्या नागरिकाला चिंताभिमुख करणारे आहे.
'गर्भातच व्हावे
तुझ्यावर चांगले संस्कार
म्हणून
तुझ्या आईने
तू पोटात असताना
जो ग्रंथ वाचला होता,
तोच
वाचतो आहे मी
मन:शांतीसाठी
तुला जवळ घेऊन,
आणि हे काय-
तू चक्क लघवी केलीस त्या ग्रंथावर!'
आपल्या समाजाला धार्मिकतेचा एक शाप भोवला आहे. धर्मग्रंथांनी एक विषमतेची आणि जातीयवादाची अभेद्य भिंत माणसामाणसात निर्माण केलेली आहे. एकविसाव्या शतकातल्या मुलाच्या लेखी ह्या धर्मग्रंथाची किंमत कोणती? ती त्याच्या, नव्या शतकात जन्म घेताच, केलेल्या स्वाभाविक प्रतिक्रियेतून - कृतीतून कवीने स्पष्ट केले आहे. सैपाकघरातला देव तिचा आणि बैठकीतली पुस्तकं माझी, परंतु झोपण्याचा पलंग मात्र दोघांचा, अशी केली घराची वाटणी, असे कवी म्हणतो. परंतु सैपाकघरातला देव काही नष्ट होता होईना. आंधळेपणाने देवाचा स्वीकार - संपुर्ण अंधश्रद्घ असलेली बहुसंख्य स्त्रीजमात आणि दुसरीकडे वाढत चाललेली विज्ञाननिष्ठ ह्यांच्या द्बैतातून जन्माला येणारे हे मूल येत्या शतकातील जीवनाची किती आणि कोणकोणती आव्हाने पेलणार आहे? कवीसमोर हा प्रश्न आहे. एकविसाव्या श्ताकाचे चित्र मोठे भयावह असल्याची जाणीव कवीला झालेली आहे. जीवनात असलेला निरागसपणा हरवत चालला आणि विज्ञानतंत्रज्ञानाने आविष्कृत झालेल्या माध्यमातून येणारी नवी संस्कृती, देशीयतेच्या पार्श्वभूमीवर कवीला आपल्या देशीय मुळांच्या उध्वस्ततेकडे नेताना दिसते.
'सायंकाळी
घराच्या ओढीने
बैलांनी उचलावीत भराभर पाऊले
गळ्यातील घुंगरमाळांच्या नादात,
तशा
हारी लागल्या मुली
उरकतात भुलाईची गाणी पटापट
चित्रहार साठी
सांजवेळी
सवयीने लागतो दिवा
देवघरात, तुळशी पुढे,
पण कॉस्टिक सोड्याने धुवून काढले
मुलांच्या ओठांवरून
शुभं करोति
आता आमची
भूपाळी आणि शेजारती
केवळ एकच
वॉशिंग पावडर निरमा
वॉशिंग पावडर निरमा
टी. व्ही. वरील जाहिराती पाहून
तुझी आठ वर्षांची बहीण
विचारते मला
निरोध म्हणजे काय?
काय सांगू तिला
सांग माझ्या मुला.'
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगणार्या कोणत्याही संवेदनशील माणसाला जाणवणारा सांस्कृतिक र्हास कवीला विशेषत्वाने जाणवल्याचे दिसते. साहित्य हे नेहमीच आधुनिकीकरणाला आणि विज्ञानतंत्रज्ञानाच्या प्रगतीला टोकदारपणे आणि उपहासाच्या अंगाने पाहताना दिसते. नव्या आणि जुन्या पिढीत जे काळाचे अंतर पडले त्यातून निर्माण होणारा हा देशीयता विरूद्घ आधुनिकता असा संघर्ष आहे. देशीयतेचे मनोहारी रूप कवीला भावणारे असते. संवेदनशील माणसाला नेहमीच आपल्या सभ्यतेच्या चांगल्या संस्कारांचा अभिमान असतो. जेव्हा संस्कारांना घाणेरडी भोके पडू लागतात तेव्हा नव्या पिढीला ते सवयीचे आणि नित्याचे असते परंतु जुन्या पिढीच्या माणसाला मात्र संस्कृतीचे किळसवाणे दर्शन नकोसे होते. विसाव्या शतकात माणसाचे जीवन स्वस्त झाले. पैसा महाग झाला. माणूस माध्यम बनला आणि राजकारणी आक्रमक खेळाडू अनले. जीवनाचे निरागस आणि नैसर्गिक रूपही तंत्रज्ञानाच्या छायेत विकृत झाले. शहरे माणसांना खावू लागली आणि खेडी ओस पडू लागली. मानवी नातीगोती आणि मानवी संबंधातला ओलावा औपचारिकेपुरताच शिल्लक राहिला. कोणत्याही योनीत जीवनाचा परम अर्थ शोधणारी माणसांची नवी पिढी निर्माण झाली. यंत्रमानवाने माणसाचे मुडदे पाडल्याची वेबसाईटही इंटरनेटवरच सुरू झालेली आहे. यंत्रमादीच्या हाती शरीरसुखाची पर्यायी तृप्ती शोधणार्या नराचा रिमोट असण्याचेही दिवस दूर नाहीत. एकुणच विसाव्या शतकाच्या अखेरीस शंभर वर्षात समाज ज्या आधुनिकतेला आणि तंत्रज्ञानाला सामोरा गेला आहे त्यातून उद्भवलेल्या कमालीच्या विकृतीकरणाने मानवाची सबंध ओलच शोषून घेतली आहे. असे कवीला वाटते. मर्ढेकरांनी आपल्या काळाच्या वेदना आपल्या कवितेतून मांडल्या होत्या. ह्या कवीने तर विसाव्या शतकाच्या अखेरीस वेदना अत्यंत तीव्र अशा मुक्तछंदाच्या लयदार अभिव्यक्तीतून पीळदारपणे मांडल्या आहेत. शेवटी एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणार्या तान्ह्या मुलाला एकच गोष्ट कवीला सांगावीशी वाटते. तीच सनातन आणि शाश्वतही आहे. म्हणून कवी म्हणतो,
'इतक्या प्रगल्भ सभ्यतेचा
नागरिक झाल्यावरही
माझ्या तान्ह्या मुला,
तुझे मन राहिलेच अशांत
तर तू जाशील कुठे?
भगवद्गीते जवळ
की
महासंगणकाजवळ?
कुठेही जा,
पण जेवून घेशील आधी,
कारण
एकच गोष्ट सनातन
आणि तेवढीच शाश्वत-
ईश्वराइतकी अनंत दु:खे
फुलांच्या आयुष्याएवढे सुख,
विश्र्वाला व्यापून शिल्लक आहे
मुंगीच्या पोटात इवली भूक.'
अखेर जगात सत्य आहे ती कुडीची भूक. अनंत दु:खे आहेत. सुख जवापाडे दु:ख पर्वताएवढे. हत्तीचा बळी घेण्याचे बळ जरी मुंगीत असले तरी तिच्या पोटात असलेली भूक हेच मानवी आणि मानवेतर जीवनाचे सनातन सत्य आहे. तिथे भगवत्गीता आणि महासंगणक फलदायी ठरत नाहीत. दु:खे ही मानवनिर्मित आहेत. सुखेही मानवनिर्मित आहेत. केवळ भूकच निसर्गनिर्मित आणि स्वाभाविक आहे. सहज आहे. सत्य आहे. अनादी आहे. निरंतर आहे. शाश्र्वत आहे. मानवी जीवनाच्या सबंध अशांत आणि अस्वस्थतेच्या संदर्भात नैमित्तिक गरज असली तरी तेच खरे जीवनाचे सत्य आहे. साध्याशाच गोष्टीत जीवनाचे सत्य आणि गूढ दडलेले असते. कवीने एकविसाव्या शतकाच्या दु:खाला दिलेले उत्तर अस्वस्थ करणारे आहे.
मानवी अस्तित्वावर गंभीर विचार
मानवी अस्तित्वाचा गंभीर विचार करण्याची वाङमयीन परंपरा तुकारापासूनची आहे. ओस झाल्या दिशा मज भिंगुळणवाणे, जीवलग नेणे मज कोणी असा तुकोबांचा टाहो मानवी अस्तित्वाच्या क्षणभंगुरतेचीच साक्ष देणारा आहे. मर्ढेकरांनाही आपल्या युगात-
एकला असून । मनी दोन झालो,
आता मात्र भ्यालो । मला मीच ॥
किंवा
जेथे जातो तेथे । मीच माझा सांगाती
डोळ्यांच्याच भिंती । झाल्या ऐशा ॥
असा तुकोबांच्याच अभंगाच्या माध्यमातून अस्तित्वाचा संघर्ष मांडावा लागला. श्रीकृष्ण राऊत या कवीलाही आपल्या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाच्या शेवटच्या दशकात, हीच अस्तित्वाची सुन्न करणारी जाणीव प्रखरतेने जाळीत असल्याचे दिसते. कवितासंग्रहातील जवळपास एकतृतीयांश कविता ह्या मानवी अस्तित्वाच्या सुन्न करणार्या निरनिराळ्या परींना अभिव्यक्ती देणार्या आहेत. साठोत्तरी मराठी कवितेचे हे एक मुख्य वैशिष्ट्य आहे की, मर्ढेकरांना झालेल्या जाणिवेचा पुढचा धागा त्यांच्याच आशयाभिव्यक्तीची पद्घत स्वीकारून त्यांच्याच प्रतिमानिर्मितीच्या मार्गाने पुढे गेला आहे. राऊतांच्या प्रतिमा मात्र काही वेगळ्या आणि स्वतंत्र आहेत. त्या मर्ढेकरांच्या गिरणीच्या घर्घरीपेक्षा लोकसंकेतांना साकार करताना दिसतात.
'डोक्यावर जुलमी आभाळ
अन्
पायाखाली सरकती वाळू'
अशी मर्ढेकरी ढंगाची अभिव्यक्ती राऊतांना प्रभावित करीत असली तरी मानवी अस्तित्व हादरविणार्या वसाहतवादी संबंधातून आलेले औपचारिकतेचे कोरडेपण रिन्युअल या कवितेत अत्यंत साध्याच पद्घतीने व्यक्त झाले आहे. आपल्या परंपरेला जपण्याचा प्रयत्न करीत आणि आधुनिकीकरणाला सामोरे जात आपापसातले मानवी व्यवहार कसे कोरडेपाषाण पद्घतीने पार पाडले जातात ते मुळातूनच पाहाण्यासारखे आहे. शेवटी ताण म्हणजे,
'आपण थोडे परिचित वगैरे असल्याने
एकमेकांची ओळख विसरू नये
म्हणून निमित्ते शोधून
रेशनकार्डासारखे रिन्युअल करू या
आपल्या ओळखीचे.'
वरवरच्या ओळखीचेही रिन्युअल करण्याचा माणसावर आलेला प्रसंग मन सुन्न करणार आहे. अशा अमानुषतेतूनच मग आधी मध्ये कवी बिनमनगटांच्या संकरित बिजाची पैदास खूप वाढत असल्याची तक्रार करतो. शिवाय मानवी अस्तित्वाची खरी ओळख असलेली मनगटेच आता गहाळ झाली असून लोकांनी आता प्लॅस्टिकची कचकडी मनगटं धारण केली आहेत; नव्या लॉटमध्ये तर अशा मनगटांवर फ्री गिफ्ट म्हणून बांगड्याही राहणार आहेत म्हणे. माती ह्या कवितेत क्षणोक्षणी ढेकळाढेकळांनी जागच्या जागी विरत चाललेली माती म्हणून माणसाचे वसातवादी संस्कृतीत होणारे कमालीचे अध:पतन सूचित होते. ग्रीटिंग कार्ड ह्या कवितेत कवी म्हणतो-
'कावळ्याच्या शापाने
जशा मरत नसतात गाई
तितकीच असते
शुभेच्छाही वांझ.'
ग्रीटिंग कार्डाचे माध्यम वापरून आपले प्रेम व्यक्त करताना माणसे हरखून जातात. समोरासमोर भेटणार्या माणसांच्याही मधेएक काचेरी भिंत असते. अशा युगात -
'जेथे
शुभेच्छा कशाशी खातात
हेच नसते ठाऊक
तेथे
कवडीमोल असते पसायदान
अन्
कविता तर नसते त्यांच्या गावीही.'
पसायदान आणि कवितेशी आजच्या युगाचे नाते तुटल्याचे दु:ख कवी असे व्यक्त करतो. परंतु हाच कवी आपल्या निराशेच्या गर्तेत मात्र-
'माणसाला लागणार्या
कुठल्याच गोष्टीचा पर्याय
होऊ शकत नाही
कविता,'
असे म्हणतो. कवितेला शस्त्र मानणारे तुकोबा निराशेतही जग जिंकण्याची भाषा बोलतात. मर्ढेकरांची कविता अर्थशून्य जगण्याच्या भानातून गांगरून जाते आणि ईश्वराला शरण जाते. राऊतांची कविता ईश्वराला शरण जात नाही परंतु निराशेतून सावरण्याचा प्रयत्नही करताना फारशी दिसत नाही. अनेकदा ती आपल्या अभिव्यक्तीचे सहज स्वाभाविक सामर्थ्य प्रतिमा आणि प्रतिकांच्या नादी लागून गमावताना दिसते. ह्या कवीची प्रकृतीच इतकी स्वाभाविक अभिव्यक्तीला तोलणारी आहे की कवितेच्या ह्या दुर्बोधी जंजाळात अडकण्याचे तिला काही कारण नाही. परंतु प्रतिभावंतांनाही आपल्या काळातील वाङमयीन किरकोळ आणि लौकिक संकेतांना टाळण्याचा मोह आवरता येत नाही. त्याला श्रीकृष्ण राऊतही कसे अपवाद ठरतील?
'डिसेंबर ब्याण्णवचे मर्ढेकर'या कवितेत कवी मर्ढेकरांच्याच आशयात्मक मांडणीच्या मोहात गुरफटला जातो. समाजाचे भोवतालचे राजकीय आणि सामाजिक वास्तव बिघडलेले आहे. ह्या विषारी वास्तवाला भिडताना मर्ढेकरी पद्घतीनेच कवी अभिव्यक्ती करू पाहातो.
'पायाखाली माती नाही,
अस्मानाशी तुटले नाते;
अंधातराची उलटी गंगा
पुन्हा एकदा गोते खाते.'
मर्ढेकरांच्या आवडत्या पादाकुलक वृत्तात लिहिलेल्या ह्या कवितेत शेवटी तर कवी जुलुमशाही आणि धर्मांधतेचे परिणाम पाहून विसाव्या शतकाच्या अखेरीने मातेलाच एक मादी ठरवून तलवारीच्या जोरावर भर बाजारात द्रौपदीसारखे नग्न केल्याचे सांगतो. विसाव्या शतकाच्या मेंदूने धारण केलेले हे अमानवी रूप कवीला अस्वस्थ करणारे आहे. मर्ढेकरांच्या ईश्वराजवळसुद्घा विसाव्या शतकाच्या अखेरीस अमानुष झालेल्या माणसाला शहाणे करण्याचा उपाय दिसत नाही. कवीजवळसुद्घा असा कोणताही उपाय नाही. कवीने आपली ही मर्यादा कविता याच शीर्षकाच्या कवितेत सांगितली आहे. कविता हे दुधारी शस्त्र असल्याचे आणि कवितेनेही जगात क्रांती केल्याचे तत्वज्ञान सांगणार्या सिद्घांतावर कवीने एकप्रकारे प्रश्नचिन्ह लावले आहे.
कवी निराश झालेला आहे परंतु मानवी जगण्याचे रहस्य शोधण्याची त्याची धडपड थांबलेली नाही. कवितेला ताकद देणारे शब्द वास्तवात जाणवत नसले तरी मानवी जीवनातील काही भावना आणि जगातल्या कोणत्याही उदासपणावर मात करणारे हसू मात्र पुन्हा, भुकेसारखेच सनातन आणि निरर्थक अस्तित्वाच्याही संदर्भात, त्याला खास उतारा वाटतो. मर्ढेकरांना मानवी जीवनातले हसू दिसले नाही. परंतु कवीला मात्र अखिल मानव जातीच्या अस्तित्वाचे भूकंप जाणवत असतानाही मानवी जीवनातील आपलेच हातापायाचे ऐहिक शरीर आणि त्या शरीरातले आपल्याच हक्काचे असलेले हसणे मात्र, दु:खावरील शाश्वत उपाय वाटतो. भाई मध्ये कवी म्हणतो-
'हसण्यावाचून जगी आपले कोणी नसते भाई;
जगण्यासाठी आधाराला हसणे असते भाई.'
तसेच
'लाख होउ दे सभोवताली उजाड बागबगीचे;
गाव फुलांचे मनात हसर्या अमुच्या वसते भाई.'
लौकिकार्थाने ही कविता पुलंवर कवीने लिहिलेली आहे. परंतु कवीच्या एकूण काव्यप्रकृतीचे जे मानवी अमानुषतेविरुद्घ बंड पुकारले आहे त्या धर्तीवर जगण्याचा एक सुंदर मंत्र कवीने दिलेला आहे. दु:खावर एकमेव उपाय आणि तोही जगण्याचे सौंदर्य खुलवणारा उपाय सांगणारा. हा मराठीतील लक्षणीय कवी आहे. गझलच्या ढंगात मात्रावृत्तात कवीने केलेली ही अभिव्यक्ती आशय आणि रचनेच्याही पातळीवर परिणामकारक वाटते. छंदवृत्ताची कलाकुसरी मान्य करूनही कवितेचे सौंदर्य वाढवणार्या छंदवृत्तीला प्रतिभावंत कवी कसा न्याय देवू शकतो, हे या कवितेच्या अंगाने पाहण्यासारखे आहे.
कवीच्या संवेदनशीलतेचे केंद्र : स्त्री
स्त्री ही पूजनीय आहे, माता आहे. क्षणाची पत्नी आणि दीर्घकाळाची माता आहे वगैरे खरेच आहे. मर्ढेकरांनी स्त्रीचे पूर्ण रूप एका कवितेत मांडले होते. पोरसवदा होतीस कालपरवापावेतो; होता पायांतही वारा कालपरवापावेतो; नंतर आज टपोरले पोट जैसी मोगरीची कळी; पडे कुशीतून पायी छोट्या जीवाची साखळी; शेवटी पोरसवदा होतीस कालपरवापावेतो, थांब उद्याचे माऊली, तीर्थ पायांचे घेईतो... एका स्त्रीच्या संपूर्ण रूपाची जाणीव मर्ढेकरांनाही साध्यासुध्या सत्त्ववेधी भाषेतून मांडता आली. मर्ढेकरांच्या कवितेच्या निर्मितीमागे स्त्री होती आणि ती असणेही गैर नाही. कुण्याही प्रतिभावंत कवीच्या मागे स्त्री उभीच असते. कुणी कवी तिला पुढे करतो एवढेच. कुण्या कवीला दिसते तिचे बाह्य सौंदर्य तर कुण्या कवीला दिसते तिच्यातले आंतरिक सौंदर्य. खर्या अर्थाने रोमँटिक कविता लिहिणारे कवी हे जात्याच प्रतिभावंत असतात. त्यांच्या कवितेत स्त्रीचे विडंबन नसते. स्त्रीला मादीच्याही भूमिकेत सादर करताना एक मानवी आदिमत्वच ते व्यक्त करतात. अशा अंगाने महानोरांनी कविता लिहिली आहे. मर्ढेकरांनी स्त्रीचे दु:ख पाहून तिला माऊलीचाच दर्जा दिला आहे. राऊतांनी तिच्यातले संसाराचे तारू तारून नेण्याचे कसब पाहून आणि तिच्यातील स्त्रीत्वाचे क्षणोक्षणी होणारे खच्चीकरण पाहून, तिच्या आदिम काळापासूनच्या दु:खाला करुणार्त अशी अभिव्यक्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. विसाव्या शतकात स्त्री ही एक जाळण्याची वस्तू बनल्याचे विदारक सत्य कवीने मांडले आहे. जागी हो या कवितेत जळल्यावर काळ्या ठिक्कर पडलेल्या वेदनाग्रस्त स्त्रीने आपल्या स्त्रीत्वाचा वारसा पुढे नेणार्या सोनुल्या बाळेला काय सांगावे?
'मला पाहून भिऊ नकोस.
जरी आज
काळी ठिक्कर पडली माझी त्वचा
आणि
हा देह संपूर्ण विद्रूप झाला असता
तरी पहिल्या रात्री
याच देहावर
वेडापिसा झाला होता गं
तुझा बाप...'
स्त्रीने आयुष्यभर माया जपावी आणि आपल्या खोट्या नवर्यालाही पदराखाली घालावे. आपल्या अस्सल मातृत्वाचा प्रत्यय फक्त तिनेच द्यावा. तिला दिवसाढवळ्या जाळून टाकणार्या पुरुषोत्तमाला एकाकी प्रेमाच्या नावाखाली सोडून द्यावे. स्त्रीचे हे किती विडंबन आहे? हजारो वर्षांपासून सुरू असणारे स्त्रीत्वाचे हे शारीरिक, मानसिक शोषण थांबवण्याची चिन्हे दिसत नाहीत म्हणून कवीने आपली चीड पून उर्फ राणी पाटील या कवितेतून व्यक्त केली आहे.
'पूनम,
कोणत्या अमावस्येच्या तिमिराने
गिळून टाकले
माऊलीचे पसायदान,
तुकोबाचा कळवळा,
ज्योतिबाची तळमळ,
सावित्रीबाईचे धडे
आणि
बाबासाहेबांचे जागरण.
आणि मायबाई,
तुझ्या पायाचे तीर्थ घेण्याची
लायकी नसलेल्या
आणि कलात्मक तटस्थतेने
समकालीन वास्तवाच्या
रोमँटिक कविता लिहिणार्या
आम्हा शब्दप्रभूंना
तू क्षमा कर!'
असे कवी म्हणतो. कवितेत आणि विचारात, प्रत्यक्ष वास्तवाला सामोरे जाण्याची ताकद का नसते? असा प्रश्न पुन्हा एकदा कवीने विचारला आहे. तुकोबांच्या काळी असलेली शब्दांची शस्त्रशक्ती इतक्यातच विसाव्या शतकात कशी क्षीण झाली? पसायदानातल्या आणि सुधारकांच्या शब्दांतली करुणाही कशी कार्यरत होत नाही? कवीची ही अस्वच्छता अधिकाधिक वाढत जाते. महानोरांना कवितेतले शब्द भुंडे वाटतात तर राऊतांना कवितेतल्या शब्दातली ताकदच क्षीण झाल्याची जाणीव होते.
कवीला स्त्रीमधले मातृत्व विशेष प्रिय असल्याचे दिसते. सून आणि सासू तसेच आई आणि मुलगी असा पारंपारिक आकृतिबंधच मुळात निकालात निघावा अशी कवीची इच्छा दिसते. स्त्रीची ही विविध रूपे नसून एकाच रूपाच्या त्या वयोमनाप्रमाणे बदलणार्या काया आहेत, असे कवीला वाटते. 'मुकुट' मध्ये कवी म्हणतो-
'डोक्यातून काढून टाक
सिनेमातली सुहागरात
अन् उजेड थोडा पडू दे
थेटरातल्या अंधारात.'
किंवा
'मुकुटावाणी डोक्यावर
मिरव तिचे कष्टाळू हात;
पोलाद वाकविण्याची धमक
येईल तुझ्याही मनगटात.'
'सवाष्ण' आणि 'भूमिका' ह्या कवितांतील सवाष्णीचे संसारी रूप आणि तिच्या अंगकांतीचे दु:खाच्या ओझ्याखाली कलेकलेने क्षीण होणार्या ऐहिक रूपाचे दर्शन कवीने करुणस्वराने केले आहे. 'लज्जागौरी' ही कविता तर स्त्रीत्वाचे परमोच्च अभिव्यक्तीकरण आहे. स्त्रीचे आदिम अस्तित्व ह्या कवितेत कवीने मांडले आहे. स्त्रीच्या विविध भूमिकात दिसणारी स्त्री ही एकच आहे. तिला भोगावे लागणारे दु:खही तितकेच आदिम आहे.
'पोट
अन्
ओटीपोट
भरल्यावर
का होत जातो
दुय्यम पुरुषोत्तम !
तुझी योनी,
तुझे स्तन:
अख्खे तुझे आईपण.'
स्त्रीच्या मातृत्वालाच सिद्घ करणारे स्त्रीचे अस्तित्व. माती आणि स्त्री सृजनाचे रूप. सृजनासाठीचा संभोग हाच पुरुषोत्तम मानला जातो. सृजनानंतरचीही तीच स्त्री, नव्या नव्या सृजनातही, सृजनाची शक्ती निर्माण करण्याचे सृष्टिकार्य करीत असते. अशा आदिम स्त्रीच्या शक्तीला, लज्जागौरीला उमा, पारू, गौरी; तुला म्हणू तरी काय? असा कवीसमोर प्रश्न आहे. स्त्रीच्या मातृत्वाला साकार करणारे सृजनशीलत्व हे केवळ स्त्रीजवळ आहे. माणसाजवळ असे काहीही नाही. जगातला सर्व ओलावा साकळला आहे तो स्त्रीजवळ. पुरुष कोरडे असूनही पुरुषोत्तम झाले. आपले पुरुषोत्तमत्व टिकवण्यात आणि राबवण्यातच त्यांना धन्यता वाटते. अश्वमेध यज्ञातला घोडा आपले शिर अर्पण केल्यावरच राणीसोबत झोपण्याचा अधिकारी होतो. शिर गेल्यावरही त्याचे पुरुषत्व कायम असते. परंतु जीवच जीवात नसतो. पुरुषांना जर आपल्या पुरुषत्वाच्या अहं ब्रह्मास्मि पणातच पुरुषार्थ जाणवत असेल आणि आपल्या अनिवार्य असलेल्या जोडीदार स्त्रीला तो नगण्य समजत असेल तर त्याचे पुरुषत्व कोण्या कामाचे? स्त्रीशिवायच्या त्याच्या पुरुषोत्तमपणालाही काय अर्थ आहे? पुरुषोत्तमत्व हे शिर गेलेल्या घोड्याचेच प्रतीक असल्यासारखे आहे, असे तर कवीला म्हणावयाचे नाही ना?
विसाव्या शतकाचे अस्तित्व कसे आहे?
विसावे शतक हे तसे वेदनेचेच शतक आहे. एकीकडे महात्मा गांधी, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक जागरण आहे तर दुसरीकडे हिंसा, महायुद्घ, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, सर्व क्षेत्रात वाढलेला कमालीचा भ्रष्टाचार, अनैतिकतेला मिळणारी प्रतिष्ठा, ढासळलेली आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकून पडलेली नव्या पिढीची समाजव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्थेतून कोसळलेले आर्थिक संकट, आटोक्याच्या बाहेर वाढलेला वसाहतवाद, अतिरेकी कारवायांनी जर्जर झालेला देश आणि निरपराध माणसांच्या मानगुटीवर असलेले मृत्यूचे सावट, कुठेही होणारे स्फोट आणि जीवनात निर्माण झालेली अस्थिरता, अनेक प्रकारच्या समाजविघातक कारवायांच्या पार्श्र्वभूमीवर वेगाने पुढे गेलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पुन्हा त्याचाही मानवी जीवनाला होणार भयंकर ताप-अशा गर्तेत विसावे शतक सापडले आहे. कुण्याही कवीला ही भयावह परिस्थिती मुळापासून हादरविणारी आहे.
आधुनिक मराठी कवितेला मर्ढेकरांच्या नवकवितेपासून ही चाहूल जरा अधिक वेगाने लागल्याचे दिसते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात परिस्थितीची दाहकता वाढली तेव्हा मर्ढेकर नाहीत परंतु त्यांचे उत्तराधिकारी मात्र भरपूर आहेत. मर्ढेकरांसारखी भिडणारी कविता साठोत्तर कालखंडात अपवादानेच निर्माण झाली, ही बाब वेगळी. परंतु मराठी कवितेने राजकीय, सामाजिक वगैरे नावाखाली बिघडलेल्या समाजाचे चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुक्तछंद कवितेने ही चाहुल अधिक वेगाने मांडण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे बिघडलेल्या समाजाचे चित्र मांडताना कविताही बिघडत आहे. याकडे कुणाला विशेष लक्ष द्यावेसे कधी वाटले नाही. प्रतिभावंत कवींनी मात्र कवितेचे वेगवेगळे प्रयोग करून कवितेतून आपापल्या काळातल्या मानवी समस्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी कवितेत मर्ढेकरांच्या नंतर सुर्वे, चित्रे, डहाके, काळसेकर, नेमाडे वगैरे कवींनी अशी लक्षणीय प्रगती केलेली आहे.
श्रीकृष्ण राऊतांनीही आपल्या कालखंडातल्या दाहक वास्तवाची अभिव्यक्ती करण्यासाठी पारंपारिक मार्ग न स्वीकारता लोकछंदाचा आणि लोकसं केतांचा वापर करून काव्यनिर्मिती केल्याचे दिसते. म्हणूनच त्यांच्या काव्यनिर्मितीची जातकुळी ठरविताना पारंपारिक मराठी कवितेच्या विद्यापीठीय वर्गीकरणाचा आधार घेता येत नाही. त्यांची कविता एकाच वेळी एकाच कवितेच्या मांडणीत छंदांचाही प्रयोग करते आणि आशयालाही नवीन परिणाम देण्याचा प्रयत्न करते. पाऊस सृजनाचे प्राणतत्व. पावसाचे आक्रमक रूप केवळ शेतीचीच उलंगवाडी करीत नाही तर माणसाच्या जीवनाचीही उलंगवाडी करते. श्रावण या कवितेत कवी म्हणतो,
'घनगर्द अभ्रांच्या
काळ्या मांडवाखाली
लादलेल्या करांसारखी
बरसणारी ही श्रावणझड.'
शेतीवर ज्यांची पोटे आहेत त्यांच्या जीवनात 'श्रावणझड' ही बालकवींच्या कवितेचे सुख निर्माण करीत नाही. कवी हताश होतो आणि बालकवींच्या कवितेसारखे पावसाचे अनोखे रूप पाहणे त्याला प्रयत्न करूनही जुळत नाही. कारण बालकवींचा पाऊस हिरव्या बोलीच्या माध्यमाने मानवी मनाला हिरवे आश्र्वासन देणारा आहे. जिथे हिरवेपणाला मरण आहे तिथे कसा पाहू मी इंद्रधनूष्य? कसे वाचू तुझे गीत ? असे कवीला वाटणे स्वाभाविक आहे. एकीकडे पाण्याचा भरमार मारा तर दुसरीकडे पाण्यासाठी दयाघनाची प्रार्थना करणारी आणि मृगांच्या किड्यांची पूजा करणारी खेड्यातली माणसे. 'पाणी-कुंकू' ही कविता लोकसंकेतांच्या आश्रयाने मनाचा ठाव घेते. बाभुळबन या कवितेत खेड्यांच्या अंगाखांद्यावर विषारी विषारी वृक्षासारख्या वाढणार्या बाभळी, खेड्यांचा जिवंतपणा शोधून घेताना दिसत आहेत. विषारी वातावरणात आणि ह्या विसाव्या शतकाच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या माणूसरूपी बाभळीचा काय भरवसा?
'नजरकैदेत पहार्यासारखा
डोक्यापर्यंत खाली आलेल्या
या फांद्यांचाही काही नेम नाही,
कधी काही हिंमत करून
आपण खालची नजर वर केली
तर खप्पकन्
एखादा काटाच खुपसायचा डोळ्यात.'
अशा काळात जगणार्या गावकर्यांच्या अनवाणी पावलांचे आता काय होईल? ही कवीची खरी चिंता आहे. अशा खेड्यापाड्यातील साध्याभोळ्या माणसांचा जीव आजही वसाहतवादाच्या आणि आधुनिक सुखसोयींच्या विराट जबड्यातून गुदमरताना दिसतो आहे. खेड्याचे माणूसपण अजूनही शाबूत असल्याची ग्वाही कवीला पटलेली आहे. अत्यंत साध्या पद्घतीने एक आंतरिक लय कायम ठेवून शहरा या कवितेत कवी म्हणतो-
'तुझ्या जमिनीवर पाय ठेवल्याबरोबर
माझी नजर अडकते
सिनेमांच्या पोस्टरवरील
नट्यांच्या उत्तान स्तनावर.'
हा भारतीय माणूस आपला खिसा चाचपत आणि शहराच्या कर्णकर्कश कोलाहलात रहदारीचे नियम सांभाळून चालू शकत नाही इतका गांगरून जातो.
'म्हणून काय
रिक्षावाल्याने मला आईवर शिवी द्यावी
सायकलवाल्याने धक्का मारावा,
स्कूटरवाल्याने खाऊ की गिळू पहावे,
कारवाल्याने अंगाला चाटून जावे,
आणि ट्रकवाल्याने चिरडावे किड्यामुंगीसारखे...'
शहरातला हा सर्व झगमगाट पाहून आपल्या अस्तित्वाचे स्वातंत्र्य टिकवत जगणार्या ह्या माणसांना जेव्हा वसाहतवाद चिरडून टाकतो तेव्हा वसाहतवादाचे मानवी प्रयोजन काय? हा प्रश्न कवी विचारतो आहे. भारतमाता ही कविता विसाव्या शतकाचे भारताचे चित्र उभे करते. भारतमातेला निघालेले कुबड सरळ करण्याचे बळ आपल्या हातात नसल्याने कवी खिन्न होतो. आपल्यातल्या नाममात्र कृष्णाची जाणीव होताच त्याला विद्रूप झालेल्या भारतमातेचे दु:ख सुन्न करते-
'मा,
या तृष्णेच्या पोटात
दु:खाचा गर्भ
आडवा होताना ऐकतो
पिंपळाची सळसळ;
दु:खम् सरणम् गच्छामि.'
तृष्णेचे पोट, दु:खाचा आडवा गर्भ ह्या प्रतिमांच्या सहाय्याने दु:खी भारताचे विसाव्या शतकाचे रेखाचित्र कवीने काढले आहे. आशेचा किरणही जागा ठेवला आहे. पिंपळाची सळसळ. अजूनही बुद्घाचा महाध्वनी बुद्घम् सरणम् गच्छामि... ह्या दु:खाच्या कराल पोकळीत मानवी जीवनाला आश्वस्त करतो आहे. 'भरोत दिवस', 'दर्शन', 'पंधरावी विद्या', 'देवबाप्पा नारायणा', 'इडियट बॉक्स', 'काळाशार बोका'ह्या कविताही विसाव्या शतकातील सामाजिक आणि राजकीय खराबीचे चित्रण करणार्या आहेत. 'सुरंग' या कवितेत उंदरासारखे चंट आणि हुशारीचे उपद्रवी प्रतीक घेवून कवीने सामाजिक आणि राजकीय जीवनातील भ्रष्टाचाराची गोदामे करणार्या आणि अशा गोदामांची मालकी असणार्यांचे सिंहासन क: पदार्थ असलेल्या उंदरांच्या म्हणजेच सर्वहारा माणसांच्या उपद्रवमूलक कृतीतूनच ध्वस्त होणार असल्याचे सुचविले आहे. मग तुम्ही त्याला क्रांती म्हणा की बंड म्हणा की उपद्रवमूल्य म्हणा!
'गोदामात पडलेली
उंदरांची बिळेच
लावत असतात
सुरुंग
कुठल्याही
सिंहासनाला...'
कवितेतल्या शब्दांचीच ही ताकद नव्हे काय? तुकोबांनी शब्दांची ताकद जाणली होती. या कवीलाही ती जाणवली आहे. 'तुको बादशहा' ह्या कवितेतून ही शब्दांची ताकद कवी व्यक्त करतो. मंबाजी आहेत म्हणूनच तुकाराम जन्माला येतो ना?
'तुमच्या वाकड्या सहाणेने
लावली शब्दांना अभंग धार
नि
वीणेला दिला
तुमच्या तेढ्या खुंटीने आधार
तुमच्या दगडी भिंतीशिवाय
एवढा उसळलाच नसता
त्रिगुणाचा चेंडू.'
तुकोबांचे चरित्र केवळ त्रिगुणाचा चेंडू ह्या दोन शब्दांतूनच कवीने व्यक्त केले आहे. अल्पाक्षरातही बव्हर्थ असतो तो असा. मांडणीची धारदार पद्घती आणि उपहासाला तिरकसपणाची जोड दिल्यामुळे ही कविता कमालीच्या उंचीवर पोहोचली आहे. शिवाय संतांच्या आयुष्यातील चमत्कारांना अत्यंत चलाखीने कवीने फटकारले आहे.
'तुमच्या विज्ञानाने तर
कमालच केली मंबाजी,
पूर्वी त्यानं भिंतीला मोटर काय लावलीन्
रेड्याच्या मुखी स्पीकर काय बसवला
अन्
आता बनवलं
खास विमान
तुक्याचा देह उडवण्यासाठी...'
तेराव्या शतकापासून तर सतराव्या शतकापर्यंतचे दडवलेले सत्य कवीने एका फटकार्यात निकालात काढले आहे. ज्या विसाव्या शतकाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आभाळाला स्पर्श केला तिथल्याच भुईवर राहणार्या विसाव्या शतकातल्या खोट्या श्रद्घा पांघरलेल्या लोकांच्या मुखवट्याला, तंत्रज्ञान आणि विज्ञानाचाच सरळ दाखला देत कवीने शह दिला आहे. उगीच कवितेचा फाफटपसारा न वाढवता कवितेच्या अलौकिक शक्तीचा प्रत्यय कवी या कवितेतून देतो.
मुक्तछंद हा कसा असतो? मुक्तछंदाच्या अभिव्यक्तीचे अल्पाक्षरत्व कसे असते? कवितेचा आटोपशीरपणा कसा सांभाळावा? मुक्तछंदातही कशी अंतर्गत आणि बहिर्गत लय अनुस्यूत असते? आपल्या कालसापेक्ष संवेदनांना आणि स्थलकाल परिणामांना कवितेच्या आशयात कसे मांडावचे लागते? संवेदनशीलता आणि काव्यमूल्य मुक्तछंदात छंदबद्घ कवितेपेक्षा कसे कमी नसते? अशा आशयाच्या आणि मांडणीच्या संदर्भात निर्माण होणार्या आजच्या कवितेतील बहुतेक प्रश्नांची उत्तरे श्रीकृष्ण राऊतांच्या कवितेत मिळतात, हीच एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरील मराठी कवितेसाठी समाधानाची बाब आहे.
('कविता-रती' मार्च-एप्रिल व मे-जून 2001)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा