‘विसरुन रंग सारे’ च्या निमित्ताने

‘वाहून दैन्य जावे आता बरस असा तू;
 देऊ नको घना रे हे थेंब-थेंब पाणी.’

असा प्रार्थनात्मक सुंदर शेर लिहिणार्‍या श्रीराम  गिरींनी  मला पहिल्यांदा 2003 मध्ये फोन केला.‘सर मला तुम्हाला भेटायचं आहे. माझ्या काही गझला तुम्हाला दाखवायच्या आहेत. माझ्या मित्रांनी तुमचं नाव मला सुचवलं. तुमचं मार्गदर्शन हवं आहे.’अशा आशयाचं ते बोलणं होतं. त्यानंतर दुसर्‍यांदा ते भेटले ते माझ्या मुलाच्या लग्नात आले तेव्हा 2013 मध्ये. दहा वर्षात अशा प्रत्यक्ष भेटी दोनच. पण फोनवर आम्ही बरंच बोलत राहिलो. ह्या संवादातून त्यांना जे काय मिळालं असेल त्याला ते मार्गदर्शन म्हणत असावेत.
कवितेच्या बाबतीत ‘मार्गदर्शन’ किंवा गझलच्या संदर्भात ‘इस्लाह’म्हणजे सलाह-सल्ला कोणी मला मागितला की  माझ्या  अंगावर  भीतीने काटाच येतो. विशेषत: गझलच्या संदर्भात इस्लाह’च्या नावाखाली नवोदित गझलकारांच्या गझलात ‘उस्ताद’ कवीने स्वत: केलेल्या काही शब्दांच्या, काही ओळींच्या दुरुस्त्यांचे नमुने पाहिलेत की दुरुस्तीनंतर येणार्‍या  सफाईचं,थोड्याफार वाढलेल्या दर्जाचं श्रेय उस्तादला द्यायचं की नवोदिताला? असा एक यक्ष प्रश्न माझ्या मनात सतत येतो. दुसरं असं की, हे नुतनीकरण‘उस्तादांनी’ किती दिवस करत राहायचं? आणि नवोदितांनी असा ‘सल्ला’ किती दिवस घ्यायचा? की आजन्म ‘उस्तादां’वर अवलंबून राहायचं?
आजारपणात औषधाच्या दुकानातून विकत आणलेली जीवनसत्वे शरीराला आवश्यक असतात. पण शरीराला कायम अशी आयती जीवनसत्त्वे मिळत गेली की शरीरातील त्यांची नैसर्गिक निर्मिती थांबणं तब्येतीसाठी चांगलं नसतं;तसंच ह्या ‘इस्लाह’चं झाल्यामुळे अनेक कवींचं गझललेखन नंतर कायमचं थांबल्याची उदाहरणे आहेत.
‘इस्लाह’च्या अशा दुष्टचक्रात अडकायचं नाही म्हणून अगदी माझ्या गझललेखनाच्या प्रारंभापासून मी ना कुणाचा ‘इस्लाह’ घेतला ना नंतर तो कुणाला दिला! हे मी श्रीराम गिरींना सुरुवातीला ठणकावून सांगितलं.
मग मी त्यांना ‘मार्गदर्शन’ केलं म्हणजे नेमकं ‘काय’ केलं? तर मी त्यांना सांगितलं की, तुमच्या गझला वाचून मी तुम्हाला काही सूचना करेन त्या तुम्हाला पटल्या तर त्या दिशेनं तुम्ही विचार करायचा. नाहीतर सोडून द्यायच्या. गझल मध्ये काय ‘हवे’ या पेक्षा काय ‘नको’ हे मी सांगू शकेन. ते तुम्हाला पचनी पडलं तर त्यानुसार तुम्ही स्वत:च्या गझलात स्वत:च परिष्करणे करायची. श्रीराम गिरींच्या काव्य जाणीवेला आत खोलवर कुठंतरी ते पटलं असावं, मानवलं असावं असं दिसतं. अन्यथा दहा वर्षाहून अधिक काळ त्यांच्या सर्जनशीलतेचा स्वर माझ्याशी असा संवादी राहिला नसता. 
कवितेच्या-गझलच्या बाबतीत जर संभवू शकत असेल तर एवढेच किमान मार्गदर्शन संभवू शकते असे मला प्रकर्षाने वाटते.
श्रीराम गिरींच्या गझलांच्या अभिव्यक्तीचा स्वर मंद्रसप्तकातला आहे. त्यांची गझल कधीही चढ्या स्वरात बोलत नाही. खूप भोगल्या-सोसल्यावर समजुतदार झालेल्या माणसाच्या बोलण्यात जो धीरगंभीरतेचा स्पर्श असतो;जो श्रीराम गिरी ह्या व्यक्तीच्या बोलण्यात आहे,तोच त्यांच्या गझला वाचतानाही आपल्याला ऐकू येतो. व्यक्ती आणि अभिव्यक्ती मधलं असं अद्बैत अपवादानंच आढळतं. कविता हा आत्मानिष्ठ प्रकार आहे. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा एक अर्थ असाच व्यक्ती-अभिव्यक्तीच्या एकरुपतेशी निगडित असावा.
अभंग, ओवी ह्या काव्यप्रकारांची शब्दरचनेच्या अंगांनी जशी वैशिष्ट्ये असतात. तशीच ती गझलचीही आहेत. एकेकाळी केवळ अध्यात्म आणि भक्तिभाव व्यक्त करणार्‍या अभंगाला जसा आज सामाजिक जाणीवेपासून तर श्रृंगारापर्यंत एकही विषय वर्ज्य राहिलेला नाही तसेच गझलचेही आहे. आजच्या मराठी कवितेत शेती-मातीतल्या ग्रामीण जीवनानुभवापासून महानगरीय संवेदनापर्यंतचं माणसाचं संबंध जगणं जसं येतं तसंच ते मराठी गझलेतही येतं. गझल हा कवितेचाच एक प्रकार असल्यानं हे घडणं अगदी स्वाभाविक आहे.
रचनेच्या अंगानं दोन ओळींचा शेर हे गझलचे अंगभूत वैशिष्ट्य. दोन ओळीत एक जीवनानुभव उत्कटपणे मांडणारी लघुत्तम कविता म्हणजे शेर. अशा लघुत्तम कवितेची माळ यमकांच्या-काफियांच्या  धाग्यात गझलेमधे ओवलेली असते.
कवी त्याच्या प्रत्येक कवितेत एकसारख्या गुणात्मक उंचीला पोचणे शक्य नसते. त्याच्या एकूण काव्यलेखनात थोडं अधिक-उणं, डावं-उजवं, उन्नीस-बीसं होत असतं. संग्रहासाठी एकूण कवितांचा विचार करताना कवीला काही कविता संग्रहात समाविष्ट करण्यालायक वाटत नाहीत. त्या कविता बाद होतात. अगदी तसेच गझलमध्ये सुचलेले सर्व शेर म्हणजेच दोन-दोन ओळींच्या कवितांपैकी काही कविता म्हणजेच काही शेर कवी बाद करतो.  महाकवी   गालिब साहेबांनी तर असे तीन हजार शेर बाद केल्याची नोंद आहे. नवोदित-ज्येष्ठ अशा सर्व गझलकारांनी ह्या नोंदीची दखल घेतली पाहिजे. तेव्हा कुठे एकयमकीपणाच्या धाग्यात ओवलेली अनेक कवितांची कविता म्हणून गझल ही शाब्दकलाकृती म्हणून आपला दर्जा उत्तम राखू शकेल असे वाटते. अशा प्रकारचा दर्जा सांभाळण्यात श्रीराम गिरींची गझल यशस्वी होत  आहे हे  प्रस्तुत गझलसंग्रहाच्या निमित्ताने सांगता येईल.
‘हिरे आणि इतर गझला’ पासून ‘विसरून रंग सारे’ ह्या प्रस्तुत गझलसंग्रहापर्यंत त्यांची वाटचाल सजगपणे न्याहाळली तर श्रीराम गिरींच्या काव्य जाणीवेचा सर्जक विकास स्वागतशील वाचकाला जाणवावा. पण अल्पसंतुष्ट होण्याचा त्यांचा स्वभाव नाही,ह्या पडावाबद्दल त्यांना वाटतं-

अजून कोठे पुरा उमललो, अजून कोठे फुलास दरवळ
हवा मला वेळ अजून थोडा, मनात दुनिये तुझ्या बसाया’

कलेच्या सर्जनशीलतेतील न्यूनाची ही रुखरुख जोवर प्रत्येक कवी-कलावंताला आहे तोवर आजतागायत झालेल्या निर्मितीहून आणखी चांगल्या सृजनाची अपेक्षा त्या कवी-कलावंताकडून करायला काहीच हरकत नसते. पण हे होताना दिसत नाही. चतकोरभर प्रसिद्घी अन्‌ नखभर मान्यता मिळाली की, लगेच ‘बन चुके’ पण येतं आणि कवी-कलावंताच्या सर्जन प्रवाहाला वाहते ठेवणारे जिवंत झरे आटू लागतात आणि पुढे घातल्या पाण्याची गंगा वाहू लागते. ती किती दिवस शुद्घ राहणार? 
गझलेची गुणवत्ता पारखताना गझलकाराचे वय, लिंग, पेशा, पदवी,प्रतिष्ठा याचा विचार खरेतर गौणच म्हटला पाहिजे. एखाद्या कौतुकसोहळ्याच्या निमित्ताने तसा उल्लेख होत असेल तर तो  गझलकारांनी औपचारिक तारतम्याने घेतला पाहिजे.
गझलेची संहिता ज्या भाषा-माध्यमातून सिद्घ होते त्या भाषा-माध्यमाचे प्रगल्भ आणि सम्यक आत्मभान त्या गझलकार-कवीला कोणत्या प्रतीचे आहे हीच गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची मानली पाहिजे.शब्दांची ‘रत्ने’ किंवा प्रसंगी ‘शस्त्रे’ होण्यासाठी जे ‘यत्न’ करावे लागतात. ते करण्यासाठी ‘आह को चाहिए इक उम्र असर होने तक’ इतका धीर धरावा लागतो.
हिरव्या रंगाच्या सत्तेचाळीस छटा आहेत असं जी.एं.नी एका ठिकाणी लिहिलयं;ते भाषेच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. शब्दांच्याही अनेकविध अर्थच्छटा कळायला आणि त्यांचे नेमके उपयोजन जुळायला ‘थोडा वेळ’ तर लागणारच. तरच ‘दुनियेच्या मनात’ आपलं बिर्‍हाड थाटता येईल.
वाट्टेल त्या लटपटी-खटपटी करून लोकप्रिय होण्याचा ध्यास धरणे, सतत वाचक-श्रोत्यांच्या समोर राहून ‘सुपरडुपर हिट’ होण्याच्या नादी लागणे, वाङमयबाह्य प्रलोभनाने,प्रत्यक्ष लेखनाशी कवडीचाही संबंध नसलेल्या तथाकथित गायनाचार्यांचे  लांगुलचालन करणे ह्या आणि अशा    अनेक अपप्रवृत्तींच्या आहारी जाऊन ‘मोठं’ होण्याचा ‘शॉर्टकट’ घेताना आजचे  श्रीराम गिरी दिसत नाहीत;ही चांगली गोष्ट आहे. उद्याबद्दल मात्र आज कोणीच काही सांगू शकणार नाही!

'कसा दोष देऊ तुम्हा निंदकांनो;
तुम्ही काम केले खरे अंजनाचे.'

कवी म्हणून ह्या भूमिकेशी श्रीराम गिरी जोपर्यंत एकनिष्ठ आहेत. तोपर्यंत त्यांच्या ‘काव्यदृष्टी’ची काळजी करण्याचे कारण नाही. तोवर ‘दूरदृष्टी’चे ते धनी आहेत. कवीला आपण उगीच ‘द्रष्टा’ म्हणत नाही. अल्पकाळ चमकणार्‍या कोणत्याही ‘मोतीबिंदुंची’ लालुच त्याला नडू नये एवढंच.
 मराठी गझलचा विचार मराठी कवितेच्या सातशे वर्षाच्या प्रदीर्घ परंपरेच्या संदर्भातच करावा लागेल. संत वाङमय, शाहिरी वाङमय हे जसे मराठी काव्यपरंपरेचे कालखंड आहेत तसाच हा मराठी गझल वाङमयाचा कालखंड आहे. गद्यावतरण झालेल्या हल्लीच्या मुक्तछंदाच्या पुरस्कर्त्यांनी केवळ यमकप्रधानतेमुळे मराठी गझलेवर कायम कृत्रिमतेचा आरोप करुन हीन लेखणं जसं उचित नाही तसंच साचेबद्घ होऊ पाहणार्‍या मराठी गझलने सकस मुक्तछंदाची तद्दन हेटाळणी करणं योग्य नव्हे. चांगली कविता कोणत्या आकृतीबंधात प्रकट होईल याचा कुठलाही ठोकताळा किंवा कोणतंही गणित मांडता येणं मुळातच शक्य नसतं; याची तीव्र जाणीव कवी-वाचक-समीक्षक ह्या सर्वांना असावी तरच मराठी काव्य परंपरेची निकोप वाढ होण्याची शक्यता बळावेल. 
मला आवडलेले श्रीराम गिरींचे अनेक शेर येथे उद्धृत करता येतील.पण आवडणे-नावडणे हे कवितेतील प्रतिमांच्या भाषेला प्रतिसाद देणार्‍या वाचकांच्या आकलन शक्तिशी आणि वाचताना असलेल्या त्याच्या मन:स्थितीशी सापेक्ष असल्याने तेवढा अवकाश वाचकांसाठी नेहमी मोकळा असू द्यावा,असं मला वाटतं. 
   आजच्या मराठी गझलच्या कक्षा कमालीच्या रुंद होत चालल्या आहेत. मानवी जीवनानुभवाच्या व्यापक पैलूंना त्या कवेत घेत आहेत. ग्रामीण-शहरी-महानगरी-जागतिकीकरण-विद्रोही-राजकीय अशा बहुआयामी जाणीवांची तगमग मराठी गझलेतून अभिव्यक्त होत आहे.
अनुकरण आणि प्रभावाच्या पार जाणारी स्वत:ची भाषा, स्वत:चा सूर तिला सापडत आहे. अशा वाङमयीन पर्यावरणात श्रीराम गिरींची गझल प्रगत होत आहे. मराठी गझल आणि श्रीराम गिरी अशा दोघांनाही अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी  ज्येष्ठ गझलकार म्हणून मी  मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
- श्रीकृष्ण राऊत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा