मनीषा कोरडे : मराठी पाऊल पडते पुढे


काल मनीषाचा फोटो पाहिला...प्रसन्न मुद्रेचा........हाती मेमेन्टो.....सोबत कॅप्शन......बेस्ट स्क्रीन प्ले...
आनंदाने हृदय उचंबळून आले...अंत:करणातून सहज उद्गार उमटला...'पोरी,आम्हाला तुझा खूप खूप अभिमान वाटतो!'

आठवणींचा फ्लॅश बॅक सुरू झाला...तीसेक वर्षापूर्वीची गोष्ट...स्थळ : अकोला...दिलीप इंगोले आणि मी सोबतीने एम.ए.मराठीच्या दुस-या वर्षाचा अभ्यास करीत होतो...अधूनमधून केव्हातरी प्रमिलाताई ओक हाॅलमध्ये होणा-या कविसंमेलनात सोबत कविता वाचत होतो...एका कविसंमेलनाला दिलीपच्या सोबत होती एक फ्राॅकमधली चिमुरडी ...चुणचुणीत...माइकसमोर धीटपणे स्वतःची कविता सादर करणारी....टाळ्यांच्या निनादाने हाॅल डोक्यावर घेणारी...दिलीपने ओळख करून दिली...ही माझी भाची...नागपूरची...मनीषा कोरडे...

हीच ती आजची हिन्दी-मराठी चित्रपटाची सुप्रसिद्ध पटकथा-संवाद लेखिका मनीषा कोरडे!

प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनची जाॅइन्ट सेक्रेटरी.
नागपूरच्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली एक मराठी मुलगी नाटक-सिनेमाच्या आवडीनं मुंबईत येते काय...नोकरी-घर-संसार-मुलं अशी पारंपरिक चौकट मोडून... रुपेरी पडद्यासाठी आपली लेखणी आजमावते काय...त्यासाठी जीव ओतून अभ्यास-संशोधन करते काय...यशाच्या अनेक शिखरांवर आपले पाऊल आत्मविश्वासाने रोवते काय...ह्या सगळ्या घटना मला एखाद्या गतिमान चित्रपटासारख्याच वाटतात...
2004 ते 2014 ह्या दशकात तिने लिहिलेल्या हिन्दी-मराठी चित्रपटाचा हा धावता आढावा पाहिला की ते आणखीनच पटू लागतं...
2014 : शटर (पटकथा)
2014 : प्रेम म्हणजे प्रेम असतं (पटकथा-संवाद)
2013 : रंगरेझ (संवाद) 
2010 : बम बम भोले (पटकथा)
2010 : कुश्ती (संवाद) 
2009 : बिल्लू (संवाद)
2009 : चल चला चल (संवाद) 
2008 : मेरे बाप पहले आप(संवाद) 
2007 : भूल भुलैय्या (संवाद) 
2007 : ढोल (पटकथा) 
2006 : मालामाल विकली (संवाद) 
2004 : तुम ? A Dangerous Obsession (संवाद)

काल तिच्या फेसबुकच्या टाइमलाइनचा धांडोळा घेताना तिने शेअर केलेले विजय तेंडुलकरांचे तीन फोटो सापडले.आय सी यू मध्ये काॅटवर उशीला पाठ टेकवून बसलेले तेंडुलकर...नाकात नळी ...समोर लॅपटाप...'दिसामाजि काहीतरी ते लिहावे' हे त्यांचं व्रत अशाही अवस्थेत सुरूच आहे...
...गेल्या वर्षभरापासून टॅबवर लिहिणारा मी...ह्या फोटोंनी अंतर्बाह्य प्रेरित झालो...माझ्या जिद्दीला नवे बळ मिळाले...

मनीषा तेंडुलकरांना 'बाबा' मानते...अशा जीवनव्रती 'बाबां'ची ही लाडकी,मराठी मुलगी रुपेरी आकाशात त्याच व्रतस्थतेने उंच भरारी घेत आहे...तिच्या 'बाबां'च्या आशीर्वादाचे बळ तिच्या पंखांना लाभले आहे...तिला मनभरून शुभेच्छा देताना गाण्याची एक लकेर सारखी रुंजी घालते आहे...
...मराठी पाऊल पडते पुढे!

- श्रीकृष्ण राऊत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा