उत्तम शेराची लक्षणे


एखादा शेर वाचल्यावर मानवी जीवनदर्शनाच्या कुठल्या तरी पैलुचा उत्कट प्रत्यय वाचकाला आला की त्याच्या तोंडून सहज दाद निघते,
''वा ! क्या बात है ! "
गझलकाराने वाचकाशी साधलेला हा अर्थपूर्ण संवाद असतो.
हे विशेष संदेशवहन (communication) पूर्ण होताना  शब्दकोषाच्या किंवा आस्वादक समीक्षेच्या कुबड्या घेण्याची गरज वाचकाला पडत नाही. मुद्देसुदपणे हे सांगायचं झालं तर-
.
१.शब्दकळा
.
लिहिणाऱ्याच्या शेरातली शब्दकळा वाचणाऱ्याच्या दैनंदिन जीवनातली असते.
आणि त्यामुळेच गझलकार ते वाचक हा संवाद अर्थवहनातल्या अडथळ्याविना थेट होत असतो. कधीतरी क्वचित एखाद दुसरा अपवाद वगळता वाचकाला शब्दकोषाची गरज पडत नाही. खरं तर तेवढीही गरज पडता कामा नये.
.
२.प्रतिमा
.
शेराची शब्दकळा जशी वाचकाला सुपरिचित असावी लागते.तशाच शेरातल्या प्रतिमाही वाचकाच्या ओळखीच्या असल्या पाहिजेत,तरच गझलकार ते वाचक हा संवाद काव्यसौंदर्याने अधिक खुलतो. त्यासाठी वाचकाला आस्वादक समीक्षेची मदत घ्यावी लागत नाही.
.
३. अनेकार्थ सूचनक्षमतेच्या मर्यादा
.
अनेकार्थ सूचनक्षमता
हे उत्तम कवितेचे लक्षण मान्य केले तरी
प्रत्येक शेराच्या बाबत ते लागू पडतेच असे नाही. 'अनेकार्थ सूचनक्षमता ' ही  संज्ञा तिच्या मर्यादांसह अत्यंत तारतम्याने विचारात घेतली पाहिजे. स्थळ, काळ, परिस्थिती आणि वाचकाची मनस्थिती बदलली की मुख्य अर्थाशिवाय त्याच शेराचा वेगळा अर्थ ध्वनीत होऊ शकतो.
.
४.प्रसाद गुण
.
शेराचा प्रसाद गुण वरील तीन मुद्यांपेक्षा वेगळा नसतो.
.
५.विद्वत्तापूर्ण चर्चा
.
जो शेर गझलकाराला स्वतः किंवा
आस्वादक समीक्षेला समजून सांगण्याचे काम पडते अशा शेराच्या वाटेला वाचक जात नाही.
शेराला पिळून अर्थ काढणाऱ्या
विद्वत्तापूर्ण चर्चेत
त्याला रस नसतो.
.
● श्रीकृष्ण राऊत
......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा