'काफिया' : तीन नोंदी

'काफिया' :  तीन नोंदी : श्रीकृष्ण राऊत
______________________________

1.
काफिया आणि रदीफ या दोन्ही संकल्पनांसाठी मराठीत अनेकदा यमक हा एकचशब्द वापरला जातो.रदीफला अंत्य यमक आणि त्याच्या अगोदर येणा-या काफियाला उपांत्य यमक म्हटले जाते किंवा काफियाला नुसतेच यमक म्हटले जाते.

काफियाला यमक म्हणणे व्यंजन काफियाकरिता एक वेळ चालेल.
पण स्वर काफियाच्या बाबतीत कितपत चालेल ?
उदा. नखरे / शहाणे
ह्या दोन शब्दांच्या  शेवटी येणाऱ्या 'रे ' आणि 'णे ' ह्या अक्षरातील 'ए' स्वराच्या साम्यामुळे
त्यांना गझलमध्ये स्वर काफिया म्हणता येते. परंतु इतर काव्यप्रकारात
'नखरे ' हया शब्दाला 'शहाणे ' चे यमक म्हणणे योग्य होणार नाही.
व्यंजन काफियाच्या बाबतीत काफियाला यमक म्हणताही  येईल पण रदीफला यमक का म्हटले जाते हेच कळत नाही. शास्त्रामध्ये प्रत्येक संकल्पनांचे अर्थ काटेकोर असतात. कारण त्याशिवाय विशिष्ट संकल्पनांची विवक्षितता स्पष्ट होत नाही. माळलेस, गाळलेस, ढाळलेस, चाळलेस, जाळलेस या शब्दांमध्ये ‘ळलेस’ अशा तीन अक्षरांची पुनरावृत्ती तर होतेच पण त्याशिवाय ह्या पुनरावृत्तीपूर्वी मा, गा, ढा, जा, ह्या अक्षरांतला ‘आ’ हा स्वर देखील आवृत्त होतो. म्हणजेच ज्या शब्दांत समान अक्षरे अगोदरच्या स्वरांसह आवृत्त होतात त्या शब्दांना आपण यमक किंवा गझल मधील व्यंजन काफिये   म्हणतो.

परंतु ‘मला’ हा शब्द जसाच्या तसा पुन्हा पुन्हा आवृत्त होत असेल तर त्याला यमक म्हणत नाहीत. ‘माळलेस’ या शब्दाचे यमक ‘गाळलेस’ असे होईल पण ‘मला’ या शब्दाचे यमक ‘मला’च कसे होईल? म्हणून रदीफसाठी अंत्ययमक किंवा उपयमक असा शब्द योजू नये.

उदाहरणार्थ :

चराग़-ओ-आफ़्ताब ग़ुम, बड़ी हसीन रात थी

शबाब की नक़ाब ग़ुम, बड़ी हसीन रात थी’


सुदर्शन फाकिर यांच्यावरील गझलेत ‘ग़ुम,बड़ी हसीन रात थी’एवढे एक पूर्ण वाक्य रदीफ म्हणून पुनरावृत्त होते. तेव्हा ह्या वाक्याला अंत्य यमक म्हणणे कितपत सयुक्तिक होईल? म्हणून आपण रदीफला मराठीत अंत्ययमक किंवा उपयमक न म्हणता रदीफ हाच शब्द स्वीकारावा. तसेच काफियासाठी ‘यमक’, शेरासाठी ‘द्विपदी’ तसेच
मतल्यासाठी शीर्ष-द्विपदी’ वगैरे आग्रही मराठी शब्द न स्वीकारता रूढ असलेले काफिया, शेर, मतला असेच शब्द स्वीकारणे योग्य होईल.
2.
गझलेमध्ये काफियाचे शब्द हे Key Words असतात.कल्पनेला वेगळ्या त-हेने सुचविण्याची किल्ली काफियांच्या शब्दात असते. ही किल्ली विविध आयामात फिरविण्याची क्षमता  कवीच्या प्रतिभेत कितपत आहे यावर शेरांच्या सृजनाचा दर्जा अवलंबून असतो.
काफियाचा शब्द,त्याच्या अर्थच्छटेच्या परिघामध्ये कल्पना सुचवतो आणि
शेराचे सृजन होते. या दृष्टीने काफियाच्या शब्दांना  की वर्ड म्हणायचे.ही शेराची निर्मितीप्रक्रिया लिहिण्याचा प्रत्यक्ष अनुभव असणा-यांच्या चांगली परिचयाची असते.काफियाच्या सहा शब्दांकडून हे काम चोखपणे करून घेता आले तरी एक मतला आणि चार शेर अशी पाच शेरांची चांगली गझल होऊ शकेल.पण सुचतील तेवढे काफिये कामी लावून तेरा-चौदा शेरांची गझल जेव्हा केल्या जाते तेव्हा गझल ह्या यमकप्रधान काव्यप्रकारात काफियाच्या अंगाने तंत्रशरणता येईल.लिहिलेल्या एकूण शेरांपैकी स्वतःला उत्कृष्ट वाटणारे चारच शेर मतल्या सोबत गझलमध्ये ठेवले तरी ते वाचकांच्या स्मरणात राहतील.कोण्याही गझलकाराचे असे वीस-पंचवीस शेर जरी वाचकांना अनेक वर्षे आठवत राहिले तरी त्या गझलकाराच्या गझललेखनाचे सार्थक झाले असे समजावे.
काफियाच्या की वर्डने नवकल्पनाविस्ताराने शेराचे सृजन केले की त्या काफियाच्या शब्दाचे स्वतंत्र अस्तित्व शेराच्या विधानात एकजीव होऊन गेलेले असते.असा सुटा शेर वाचतांना मूळ गझलेचा मतला माहीत नसल्यास
काफियाचा की वर्ड शोधणेही बरेचदा कठीण होऊन जाते. उदा.

वर उल्लेख केलेल्या सुदर्शन फ़ाकिर यांच्या गझलेतील हा शेर-

लिखा था जिस किताब में कि इश्क़ तो हराम है
हुई वही किताब गुम बड़ी हसीन रात थी।

मतल्याचा शोध न घेता केवळ हा शेर वाचला तर सानी मिस-यातला कोणता शब्द काफियाचा आहे ?असा प्रश्न पडावा.

रदीफाचे शब्द त्यामानाने दुय्यम असतात. काफियाने सुचवलेल्या कल्पनेच्या अंगाने सानी मिस-याचे विधान पूर्ण करून त्याला अर्थ प्रदान करण्याची जबाबदारी रदीफ निभवत असतो.
3.
वेगळे काफिये ( व्यंजनाचे किंवा स्वराचे ) आणि वेगळे रदीफ शोधणं केव्हाही चांगलं.गझलकाराचं वेगळेपण त्यातून सिद्ध होण्याच्या शक्यता अधिक असतात. पूर्वीच्या एखाद्या उत्कृष्ट कल्पनेने प्रेरित होऊन  त्याच कल्पनेचा स्फुरलेला वेगळा आयाम विरळा आणि त्याच कल्पनेची केलेली सही सही नक्कल निराळी .'खयाल' सेकंड हॅन्ड असला आणि 'अंदाजे बयाँ'कितीही फर्स्ट हॅन्ड ठेवला तरी त्याला गझलेतील नावीन्य (Originality) म्हणता येणार नाही.कला आणि कौशल्य यातल्या सीमारेषा गझल लिहिणा-याला पारखता आल्या पाहिजेत.
.........................................................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा