.
स्वस्तात फार ज्याने विकले मला अवेळी;
तो गौर कातडीचा कोणी दलाल होता.
.
सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;
कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये लग्नसंस्कारा सारखा महत्त्वाचा ठरणारा एक संस्कार आज निव्वळ एक व्यापार होऊन राहिला आहे. मुलगी दिसायला कशी आहे? तेथून तर हुंडा किती मिळणार? अशा आर्थिक बाबी पर्यंत या संस्कारांमध्ये निव्वळ व्यवहार भरलेला आहे. यामध्ये स्त्रीच्या मनाचा विचार कोणीही करत नाही. त्याचमुळे अशा व्यवहारी आणि दलालीयुक्त लग्न संस्कारांमध्ये जे कुंकू कपाळावर रेखले जाते त्याला सौभाग्यलेणे न म्हणता मढ्यावरचा गुलाल म्हणून संबोधण्याची वेळ या व्यवस्थेने स्त्रियांवर आणली आहे. नितांत सुंदर अशा गझलेमधून वर्तमान पिढीतील दर्जेदार गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी वरील व्यथा मांडली आहे. मराठी काव्यप्रदेशात गझल या काव्यप्रकाराचे अनेक शिलेदार आपल्या रचनांनी मराठी काव्यविश्व समृद्ध करत आहेत. सुरेश भट यांच्या नंतर विदर्भातील गझलदालन समृद्ध करणारे एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्रीकृष्ण राऊत हे होय. श्रीकृष्ण राऊत म्हणजे कविता आणि गझल दोन्हीवरही सारखीच हुकूमत असलेला मराठी साहित्याचा प्रामाणिक वारकरी होय. सामाजिक घडामोडीच्या बारीक सारीक नोंदी घेऊन वर्तमानातील जगण्याचा मागोवा घेण्याचे काम जे कवी करतात त्यातील एक महत्त्वाचे कवी म्हणजे श्रीकृष्ण राऊत असे म्हणता येईल. श्रीकृष्ण राऊत यांचा जन्म १ जुलै १९५५ रोजी झाला, त्यांचे 'गुलाल आणि इतर गझला ', 'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला ', 'तुको बादशहा ', 'चार ओळी तुझ्यासाठी ' आणि नुकताच प्रसिद्ध झालेला गझलसंग्रह 'कारुण्य माणसाला संतत्व दान देते ' असे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितेमध्ये, गझलांमध्ये स्त्रियांची अनेक रूपे पाहायला मिळतात.
.
'स्वयंपाक घरातला देव तिचा,
बैठकीतली पुस्तकं माझी;
झोपण्याचा पलंग मात्र दोघांचा,
अशी केली घराची वाटणी.
. अगदी सहज मान्य अशा वरील शब्दांमधून घराघरातील स्त्री आणि पुरुष ह्यांच्या जगण्याची रीत आणि घराची ठेवण कवींनी शब्दांकित केली आहे. यामध्ये पुस्तके माझी, देव तिचा या शब्दांमधून मनुष्य लवकरच ज्ञानाची कास धरतो स्त्री मात्र देव सोडायला तयार नसते असे वातावरण घराघरात पाहायला
दहा वर्षे झाली, तरी तुझ्या आईच्या मनातून मी देव काढू शकलो नाही.
. वर्षानुवर्षे गेले तरी स्त्रियांच्या मनातील देवभोळेपणा नष्ट होणे सोपे नाही, म्हणूनच २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या मुलासोबत संवाद साधताना कवीने वरील शब्दांमधून एक प्रकारची खंत व्यक्त केली आहे. हा बदल झाला पाहिजे, स्त्रियांनाही पुस्तकाचे दालन आपले वाटले पाहिजे या जाणिवेतून कवीने शब्दरूपी अंजन घालण्याचे काम या ठिकाणी केलेले आहे. श्रीकृष्ण राऊत यांची वर्तमान सामाजिक नोंदी आणि घडामोडी यावर सूक्ष्म निरीक्षणातून व्यक्त होण्याची शैली फार महत्वाची आहे. आमिर खानशी संवाद साधतांना ते म्हणतात,
. 'सोडेन बायकोला जर ऐकणार नाही;
पण देश सोडण्याचा माझा विचार नाही. '
पत्नीचे ऐकून देश सोडावा इतक्या हलक्या कानाचा आणि स्त्री मर्जीने आणि विचाराने चालणारा मी नक्कीच नाही मात्र,
.
'तो देव एक सच्चा बाकी दुकानदारी;
होताच स्पर्श स्त्रीचा जो बाटणार नाही. '
.
जर देवाला स्त्रीचा स्पर्श झाल्यावर तो बाटणार असेल तर तो देवच नाही इतके परखड मत कवीने मांडले आहे, स्त्रियांना मंदिरामध्ये जाण्यास असलेला मज्जाव आणि त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर असलेला अनिर्बंध याचा आपल्या शब्दांमधून कवीने निषेध केला आहे असे आपल्याला स्पष्टपणे जाणवत. स्त्री आणि तिची मानसिकता यावर कवींनी अनेक रचना केल्या आहेत. त्यामध्ये कृष्णावर प्रेम करणाऱ्या रुक्मिणी आणि मीरा यांचा मनोभाव टिपण्याचे काम करताना कवी म्हणतात,
.
'शेजेवरती सांगे ताबा घरी रुक्मिणी;
कोणी वेडी मीरा दारी प्रेम मागते. '
तसेच स्त्रियांचा मूळ स्वभाव किंवा सवती-मत्सर कुठे आणि कसा बाहेर येईल हे सांगता येत नाही याचीसुद्धा कवीला जाणीव आहे. म्हणूनच रुक्मिणी आणि सत्यभामा या दोघींसोबत जेव्हा श्रीकृष्ण सलगीने वागतात त्यावेळी
.
'रुक्मास गूज सांगे कानात सत्यभामा-
रात्री विठूस देते चोरून फूल राही.'
अशा शब्दांमध्ये किंवा
.
'वेडास नाव कृष्णा तू ठेव कोणतेही;
मांडेन प्रेम-पूजा मीरा तुझी दिवाणी. '
. अशा रचनांमधून कृष्ण काळातील स्त्रिया कृष्णा वरील प्रेमात किती वेड्या होत्या, या जाणीवेसह त्यांचे प्रेम किती पराकोटीचे होते याची जाणीव सुद्धा कवींनी करून दिलेली आहे. स्त्रीला दैवीरूप देऊन तिची पूजा करणाऱ्या समाजामध्ये,
'भरल्या घरात अडगळ ती शोभलीच नसती;
वृद्धाश्रमात गेली आई किती शहाणी! '
. अशाप्रकारे केविलवाण्या स्थितीमध्ये आजच्या समाजव्यवस्थेने आणून ठेवले आहे.आजच्या काळात आई-वडिलांसाठी कोणतेही कष्ट किंवा जबाबदारी झटणारे लोक आपण पाहतो मात्र त्याचवेळी,
.
'सत्तेसाठी काही पण
विकून खाऊ आई पण. '
.
'एक मागणी साहेबी
आण बाटली, बाई पण '
.
'एक बायको सुंदर दे
असो देखणी साळी पण '
. असे जेव्हा कवी लिहितात तेव्हा राजकीय सारीपाटावर स्त्रियांची अब्रू आणि इज्जत यांची कशी विटंबना होते हेच कवीने वरील शब्दाचा वापर करून दाखवले आहे. एक प्रकारे स्त्रीच्या अब्रुचा लिलाव आजच्या समाजाने मांडलेला आहे असेच काहीसे चित्र सातत्याने पाहायला मिळते आहे. कवी म्हणतात,
. 'लावा खुशाल बोली विक्रीस गाव आहे;
चौकात मांडलेला अमुचा लिलाव आहे.
.
देतोस थोरली तू की धाकटीस नेऊ;
हा कर्ज फेडण्याचा साधा उपाव आहे.'
.
कर्ज फेडण्यासाठी लहान किंवा मोठ्या मुलीची मागणी करणे ह्यामध्ये या समाजव्यवस्थेमध्ये कुणाला काहीही वावगे वाटत नाही उलट सोपा उपाय वाटतो ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. काही बँकांमधील वसुलीसाठी अधिकाऱ्यांनी स्त्रियांच्या अब्रुची मागणी केली अशा काही बातम्या मध्यंतरी वाचण्यात आल्या नेमका तोच धागा पकडून वर्तमान परिस्थितीमध्ये स्त्रियांची किती भीषण आणि बिकट अवस्था आहे हेच जणू कवींनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते. अनेक वेळा स्त्रियांना कामाला लावून त्यांच्या कमाईवर आरामात जीवन जगणाऱ्या माणसाला श्रीकृष्ण राऊत यांनी नीच म्हटले आहे,
.
'सापडेना नीच त्याच्याहून कोणी ,
तेवढे सोडून बाकी थोर होता
.
नोकरीला बांधली लांडोर होती ,
लेकरे सांभाळणारा मोर होता. '
नोकरीला लांडोर आणि लेकरे सांभाळणारा मोर या विलक्षण कल्पनेत नोकरी करणारी बायको आणि घरी लेकरं सोबत राहणारा नवरा यांची जीवनशैली कवीने व्यक्त केली आहे, त्यातल्या त्यात नोकरी करणारी स्त्री त्यांनी रेखाटली खरेतर मजुरी करून स्त्रीने आणलेला पैसा दारूमध्ये उडवणारे उडाणटप्पू प्रवृत्तीचे लोक आज समाजामध्ये लाखोच्या संख्येत आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रीची अपेक्षा असलेल्या वर मंडळीला फक्त तिची नोकरीतील कमाई पुरेशी नसते म्हणूनच ते हुंड्याचीसुद्धा मागणी करतात तेसुद्धा कवींनी आपल्या शब्दातून परखडपणे मांडले आहे,
.
'कवितेतल्या सुंदर ओळींनी सजवावी लग्नपत्रिका;
वधू चांगली कमावती अन वरून नगदी हुंडा घ्यावा. '
.
एकंदरच समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीचे अस्तित्व नेमके किती अधोगतीस नेऊन ठेवले आहे हे कवींनी वारंवार आपल्या रचनांमधून सांगितलं आहे. स्त्रीची सतत उपेक्षा आणि विटंबना करणारा पुरुष वर्ग मात्र दुटप्पी धोरण अवलंबत प्रसंगी स्त्रीला देवीपद बहाल करतो. तिची पूजा करतो पण वास्तव जीवनामध्ये मानाचे स्थान देत नाही. कवी मात्र आपल्याला जन्म देणाऱ्या, लहानाचे मोठे करणाऱ्या आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात,
.
'रक्तात वाहणारे आई तुझेच गाणे,
प्रत्येक पावलावर करते मला शहाणे
.
होऊन बाळ वाटे मांडीवरी निजावे ,
घे एकदा कडेवर मज लेकराप्रमाणे '
.
आईमुळे आपल्याला हे जीवन मिळाले याची परिपूर्ण कल्पना ठेऊन आपली कृतज्ञता व्यक्त करत असतानाच,
. .
'सुखदुःख सांगण्याला उरली कुठे न जागा ,
शोधू तुला कुठे मी जग हे उदासवाणे. '
.
आई निघून गेल्याचे दु:ख, ती आता कुठे शोधूनही सापडणार नाही, आणि तिच्याशिवाय हे संपूर्ण जग उदासवाणे आहे अशी भावभावना ते व्यक्त करतात. आई सोबत घरामध्ये एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे पत्नी होय, तीसुद्धा एक स्त्री आहे, तिलासुद्धा मानसन्मान हवा असतो म्हणून,
.
'रांगेत येत जा तू, परतून जात जा तू;
जेव्हा मिळेल तुकडा शिस्तीत खात जा तू '
.
पत्नी उभी कधीची औक्षण तुझे कराया,
घेऊन चार नोटा आता घरात जा तू ! '
.
पत्नीला लहान सहान गोष्टी मधून दुःख दिल्यापेक्षा तिच्या इच्छेप्रमाणे संसारामध्ये काम करावे, घरामध्ये जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, असा मोलाचा सल्ला सुद्धा कवींनी दिलेला आहे. स्त्रियांची मानसिकता काय असते, किती लहान-लहान अपेक्षा ती मनात ठेवून असतो याचा अभ्यास करूनच कवी वरील सल्ला देतात हे निश्चित,
.
'उद्या चुलीच्या गुलाम कायम;
आज मुलींना खेळू तर द्या. '
. पृथ्वीवाणी सोशिक होण्या;
माती चुंबुन घेऊ तर द्या! '
.
आई आणि पत्नी बरोबरच एक स्त्री म्हणून कवी स्वतःच्या मुलीचा सुद्धा विचार करतात तिच्या भविष्यामध्ये चूल स्वयंपाक पाणी, प्रापंचिक जबाबदाऱ्या येणारच मात्र त्या येतील तेव्हा येऊ द्या, आज मात्र तिला मनसोक्त जगू द्या, हा फार मोलाचा सल्ला एक बाप म्हणून कवीने सर्व मुलींच्या बापाला दिलेला आहे.
.
'जत्रेमध्ये तिचा देह धन्य झाला;
गो-या हातावर गोंदला विठ्ठल. '
. स्वतःच्या अंगावर नवऱ्याचे नाव गोंदून घेत त्याची मर्जी संपादन करण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या स्त्रीच्या जीवनात हे नवऱ्यासोबतचे भांडणच सुरू असते हेच सांगण्याचा प्रयत्न श्रीकृष्ण राऊत यांनी केला आहे.
.
'रात्रभर त्याने केली वादावादी;
सकाळी सकाळी घोरला विठ्ठल.
.
मंदिरात नाही,नाही हृदयात;
अज्ञातवासात धाडला विठ्ठल! '
. सरतेशेवटी ती स्त्रीसुद्धा हृदयामध्ये जागा देण्यासाठी प्रयत्न न करता त्याला अज्ञातवासात पाठवते म्हणजेच त्याला मनातून काढून टाकते. व्यावहारिक पातळीवर स्त्रियांचा हा स्वभाव जाणून घेत कवीने आपल्या शब्दांमधून स्त्री-पुरुषाचे परस्पर संबंध व्यक्त केले आहेत. स्त्रीने सातत्याने पुरुषाची मनधरणी करावी आणि पुरुषाने मात्र तिचे मन, जीव आणि शरीर यांचा निव्वळ खेळ करावा अशी प्रथा सातत्याने आपण पाहत आलो आहोत, म्हणूनच कवी वाचणार्याच्या काळजात चर्र होईल इतक्या प्रभावीपणे भीषण सामाजिक वास्तव शब्दबद्ध करत अंतर्मुख करणारा प्रश्न कवी विचारतो,
.
'कशी कळेना अजून आहे इथे वडांची सुरूच पुजा;
जिथे कधीही नवीनवेली उभ्याउभ्याने जळून जाते '
.
ह्या प्रश्नाचे उत्तर आजवर कोणी देऊ शकले नाही, यापुढेही देणार नाही हीच खरी पुरुष प्रधान संस्कृतीची मेख आहे.
.
'पाय चेपा सूर्यदेवा;
झोपते ही बारबाला.
.
फाटका बाहेर थांबा;
आतुनी आवाज आला.
.
तोच खुंटा,तीच दोरी;
तीच आहे बंदिशाला. '
. बारबाला रात्रभर बाहेर राहून जगण्याशी तडजोड करते जेव्हा सकाळी सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देत असतो तेव्हा ती रात्रीचा थकवा दूर करण्यासाठी झोपलेली असते, तिच्या संसारासाठी ती जे करते त्यात काही वावगे कवी शोधत नाही.
.
'एक मुन्नी कोवळी अन पोरसवदा एक शीला;
मध्यरात्री नाचणारा हा कुणाचा बार बापू? '
.
खरे म्हणजे कोवळ्या आणि पोरसवदा मुलींचा नाच पाहणारे बार मधील लोक कोण असतात आणि बार कोणाचा असतो? याबाबत प्रश्नचिन्ह उभे करत कवीने व्यवस्थेला दोषी धरले आहे. त्याचप्रमाणे संसारदक्ष स्त्री घरात माणूस नसला म्हणजे दारात येणाऱ्याला सरसकट बाहेर थांबायला लावते, परपुरुषाच्या समोर न येणे, आले तरी पदराने चेहरा झाकून घेणे असा प्रकार आपण सरसकट पाहतो हा एक प्रकारे बंदिवास आहे, तिला स्वातंत्र्य दिलेली नाही असा अर्थ त्यातून निघतो.
.
'प्रेमात ठेव पोरी व्यवहार पारदर्शी ,
होईल मग सुखाचा संसार पारदर्शी'
.
अशा शब्दात कवींनी मग स्त्रियांना सुखी संसारासाठी कसे जगावे, कोणती बंधने पाळावी? किती पारदर्शी असावे? बाबत मोलाचा सल्ला दिला आहे. स्त्रियांची ही गुलामगिरी दूर करण्यासाठी अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले मात्र तरीही त्यांचा वनवास संपला नाही, शेवटी भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री संरक्षणार्थ काही कायदे केले आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मागील छळवाद थोडा कमी झाला. याबाबत बोलताना श्रीकृष्ण राऊत म्हणतात,
. 'अबलांच्या पाठीमागे कायदा उभा तू केला; शिवलेल्या ओठांवर मग हक्कांची आली गाणी. '
.
कायद्याचे संरक्षण मिळाल्यापासून त्या हक्काने आणि सुरक्षित असे जीवन जगू लागले आहेत त्याबद्दल असा कायदा करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कवीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. खऱ्या अर्थाने सर्वच शोषित पीडितांसाठी कार्य करणाऱ्या बाबासाहेबांचे स्त्रीमुक्तीसाठी आणि स्त्री स्वातंत्र्यासाठी किती मोलाचे योगदान होते हेच यातून दिसून येते. मात्र कायद्याचे एवढे संरक्षण असूनही स्त्री किती सुरक्षित आहे याबाबत अजूनही प्रश्नच पडतो, कारण पुनम पाटील रिकू पाटील अशा शाळकरी मुलींवर एकतर्फी प्रेमातून शाळेमध्येच झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा जीव जाणे अशा प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या घटना पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये घडल्या आहेत. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे श्रीकृष्ण राऊत सातत्याने वर्तमानातील कुप्रथांवर आसूड ओढताना दिसतात पुनम पाटीलच्या प्रकरणात व्यक्त होताना ते म्हणतात,
.
'अहिंसेचं तत्त्वज्ञान,
सार्या जगाला शिकविणार्या महात्म्याच्या नावानं उघडलेल्या
महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात
झालेले चाकूचे वार,
नव्हते तुझ्या गळ्यावर;
ते होते,
स्त्रीत्त्वाच्या मंजुळ कंठातून फुटणा र्या
मायेच्या बोलांवर,
सुगंध वाटणार्या ममतेच्या फुलांवर
आणि गळ्याच्या त्वचेला साक्षी ठेवून
मायची आण घेणार्या निरागस मुलांवर.
.
प्रचंड अस्वस्थ करणारी आणि सत्य घटनेवर आधारित असलेल्या या कविता माणसाला स्त्रीसंरक्षणाबाबत वारंवार विचार करायला लावतात. महात्मा गांधी या स्त्री-मुक्ती दात्या महापुरुषाच्या नावाने सुरू असलेल्या महाविद्यालयामध्ये असला प्रकार व्हावा ही आणखी एक विसंगती कवीने दाखवून दिली आहे. त्याच अनुषंगाने एका गझलेच्या शेरामधून
.
' तू राहतेस हल्ली कोण्या भ्रमात पोरी;
वैरीण होत आहे काया तुझीच गोरी. '
.
असा महत्त्वाचा सल्ला देत सावध राहण्यासंबंधी सूचनासुद्धा कवीने केलेली आहे. तरुण मुलींवर होणारे एकतर्फी प्रेमातील हल्ले कवीला जितके अस्वस्थ करतात तितकेच विवाहितेचे तत्कालीन जळून मरणेसुद्धा अस्वस्थ करत होते याची प्रचिती त्यांच्या अनेक कविता मधून सातत्याने होत राहते. .
'कुणाची आर्त किंकाळी? कसा आवाज हा आला?
कशी ही पेटली होळी? नभाला झोंबती ज्वाला.
.
नव्या या उंब-यावरती जळे पाऊल लक्ष्मीचे ;
कुणी हे लावले आहे इथे रॉकेल मापाला? '
.
नव्या उंबऱ्यावरती जळे पाऊल लक्ष्मीचे ह्या ओळी मधून नवविवाहितेची जळून मरणे तिच्यावर होणारे अन्याय अत्याचार या सर्वांचा सारासार विचार करून त्याबद्दल आपल्या मनातील दुःख आणि खंत व्यक्त करत कवीने समाजासमोर भले मोठे प्रश्नचिन्ह पुढे केले आहे. त्याहीपलीकडे जाऊन जळणारी स्त्री मरणाच्या दारात असतानासुद्धा जे बयान देते ते खरंच संवेदनाहीन समाजमनाचा विद्रूप चेहरा दर्शवणारे असते हे पुढील ओळी वाचताना जाणवते.
'-नाही नाही, माझ्याच नजरचुकीने पेटला माझा पदर. होय खरंच सांगते मी, मी पोलिसांनाही असंच सांगितलं.
कालच वटसावित्रीची पूजा केलीय मी,
तुझ्याशी खोटं कशाला बोलू? '
.
नवऱ्याला वाचवून स्त्री आपल्या मुलीला मात्र, .
'पोरी, तू अशी।
गाढ झोपू नकोस पाळण्यात; जागी हो! '
. असा सावधगिरीचा सल्ला देते. आपल्या जीवनाचा कोळसा झाला तरी आपल्या मुलीचे मात्र सोने झाले पाहिजे, तिला सर्व सुख लाभले पाहिजे हीच जाणीव प्रत्येक मातेच्या मनामध्ये असते हे निश्चित, खरेतर वर्तमान परिस्थितीमध्ये भारतीय समाजव्यवस्थेमध्ये नव्हे तर संपूर्ण जगात स्त्री किती सुरक्षित आहे याबाबत प्रश्नचिन्हच आहे. मुलींना शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अनेक देशांची कहाणी आपण जाणतो.
. 'थेंबाथेंबासाठी वणवण मरता मरता बायांनो,
मुली वाचवा मुलीस शिकवा ऐका नारे सटरफटर. '
.
घोटभर पाण्यासाठी सुद्धा ज्या देशांमध्ये संघर्ष करावा लागतो, स्त्रियांचे अर्धे आयुष्य पाणी भरण्यासाठी किंवा दारूच्या पाण्यामुळे बरबाद होते अशा देशांमध्ये 'मुलगी वाचवा मुलगी शिकवा ' असे बेगडी नारेही जोरात असतात हे तितकेच सत्य आहे. आपल्या समाजव्यवस्थेचे जळजळीत सत्य समोर आणून त्यावर आसूड ओढणार्या खालील ओळी बघा
.
‘केली होती जरी परीक्षा गर्भजलाची;
चौथ्यानेही मुलगी होऊन डसली चिंता.’
.
महाराष्ट्रात बंदी आहे म्हणून दुसऱ्या राज्यात जाऊन किंवा लाखभर रुपये देऊन चोरून लपून गर्भजल परीक्षण करणारी पिढी आपल्या देशात कशी कार्यरत आहे याचा सरळ सरळ नमुना कवींनी या ठिकाणी दिला आहे.
.
'परीक्षा संपली कोठे अरे अद्याप सीतेची;
मला सांगू नको रामा, तुझा वनवास थोडासा. '
.
अशा ओळींमधून कधी स्त्रीच्या अग्निपरीक्षेचा तर कधी तिच्या नशिबात असलेल्या वनवासाचा आढावा कवी घेतात मर्यादा पुरुषोत्तम म्हटल्या जाणाऱ्या रामानेसुद्धा सीतेची अग्निपरीक्षा घ्यावी हा दुर्दैवी निर्णय रामायणातील एक कलंकित ग्रहणच आहे. त्याचप्रमाणे खऱ्या सुखाचे रहस्य शोधणाऱ्या गौतम बुद्धाशी संवाद साधत,
.
'कर दूर गौतमा तू शंका यशोधरेची-
नव्हते घरात का ते, जे शोधलेस दारी? '
.
जीवनाचे रहस्य जाणून घेणाऱ्या गौतमालासुद्धा घरामध्ये सुख समाधान आणि ज्ञान मिळाले असते पण त्यांनी तेथे ते शोधले नाही आणि यशोधरेच्या नशिबात मात्र एक अलिखित वनवास नोंदवला गेला याची जाणीव कवी करून देतात. कवी येथेच थांबत नाहीत तर तुकारामाच्या वैकुंठगमनाच्या प्रश्न खून की वैकुंठ गमन या चर्चेला बाजूला ठेवत,
.
'तुझ्या विमानात
नाही काय जागा
सांग पांडुरंगा जिजाईला?'
.
तुकारामाची पत्नी जिजाई,तुकारामाची सेवा करते सर्वतोपरी काळजी करते, सुख-दुःख झेलते मात्र तिच्यासाठी विमानामध्ये जागा नसावी म्हणजेच जी किंमत तुकारामाची होते तसा मानसन्मान जिजाईच्या नशिबात नाही अशी खंतच कवी व्यक्त करतात. सामान्यतः माणसाच्या जीवनामध्ये आई पत्नी आणि मुलगी या तीन स्त्री रूपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कवीने एकाच कवितेमध्ये आई पत्नी आणि मुलगी यांचा उल्लेख करून त्यांच्याबद्दलच्या आठवणी, जबाबदारी आणि कर्तव्य निष्ठा याबाबत आपला मनोभाव व्यक्त केला आहे. ते म्हणतात, .
'आठवाने मी तिच्या अस्वस्थ होतो...
गंध येतो माउलीचा गोधडीला.
. फाटक्या पदरास बांधे गाठ लक्ष्मी,
लेक झुरते एक साध्या फुलझडीला.
.
आईच्या आठवणीने अस्वस्थ होणे, प्रापंचिक अडचणी मध्ये पत्नीला पुरेसे समाधान न मिळणे, आणि लहानग्या मुलीचा हट्टसुद्धा पूर्ण न करू शकणे, ह्या अडचणीमधूनसुद्धा कवींची स्त्रीयांबाबत असलेली संवेदनशील वृत्तीच दिसून येते.
.
'जरी पत्र सांगे मुलांची खुशाली,
कसा होत जातो तरी कंठ ओला.
. तिच्या कंठण्याची कुठे सांग सीमा;
कुठे अंत आहे तिच्या सोसण्याला'
.
दूरदेशी असलेल्या मुलाची खुशाली, सर्व काही चांगले चालू आहे असा निरोप ऐकून सुद्धा आईचा कंठ ओला होतो, ही स्त्रीसुलभ मातृत्व भावना अधोरेखित करतानाच मुलगा सुद्धा तिला सोडून सुखाच्या मागे धावत आहे, त्यामुळे स्त्रीच्या सोसण्याला अंत नाही याची जाणीवही कवी वारंवार करून देतात. सरतेशेवटी पती-पत्नी यांच्या मधील नातं एका क्षणी माय-लेकराच्या नात्याप्रमाणे होऊन जाते असे असले तरीही कवी म्हणतात त्याप्रमाणे नवरा मुलासारखा असतो पण मुलासारखाच असतो पत्नीमध्ये ज्याला फक्त मादी दिसते आणि ते नाते कोणत्याही क्षणी माय लेकराचे नाते होत नाही हे स्पष्ट करताना कवी म्हणतात,
.
'तू केलंस माझं दुखलं-खुपलं,
हागलं-मुतलं होय-नोय.
मी चोखली तुझी स्तनं
तू फिरवली बोटं माझ्या केसातून.
तू मला आईसारखी.
मी तुला मुलासारखा.
-पण सारखाचना !
माझ्या जननीचा पाडलास विसर मला; पण झाली नाहीस माझी माय.
.
एकंदरीत श्रीकृष्ण राऊत यांच्या कवितेमध्ये अनेक स्त्री प्रतिमा, स्त्रीपात्रे, स्त्री प्रतीके वेगवेगळ्या संदर्भानुसार भेटत राहतात, आई, मुलगी, पत्नी प्रापंचिकरूपापासून सीता, यशोधरा, जिजाई अशा पौराणिक ऐतिहासिक स्त्रीजन्माचा आढावा आणि आलेख कवीने आपल्या कवितांमधून सादर केलेला आहे. त्यांच्या कवितेतील स्त्री सोशिक, शोषित, समर्पण करणारी आणि कष्टाळू अशी आहे. वेदना आणि संवेदनाच्या पातळीवर श्रीकृष्ण राऊत यांच्या कवितेमधील स्त्री वाचकाला आपल्या आजूबाजूला, परिसरात, संसारात वावरणारी आणि आपलीशी वाटणारी आहे यात शंका नाही.
_________________________________________________________
किरण शिवहर डोंगरदिवे,
वॉर्ड नंबर 7 समता नगर,
मेहकर
ता.मेहकर जि बुलढाणा 443301
मोबा. 7588565576
२ ऑगस्ट, २०१९ / दै. तरुण भारत / आकांक्षा पुरवणी )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा