अभंग गझल आणि मुक्तछंद : प्रतिभा साबळे

श्रीकृष्ण राऊत हे नाव ऐकताक्षणी/ वाचताक्षणी या नावातील,व्यक्तीमत्वातील सात्त्विकता तुमच्या लिखाणातून गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासारख्या कितीतरी वाचकांच्या मनात नांदत आहे. फेसबुकवर येण्याआधीपासूनच कवितेच्या इतर साईटवर लिखाण वाचनात आलं होतच तेंव्हापासूनच तुमचं लिखाण आपलंसं वाटत आहे. आता फेसबुकमुळे ते सातत्याने वाचालायला मिळतंय याचा खूप आनंद आहे. वैयक्तिक ओळख नसतानाही माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला तुम्ही तुमची पुस्तकं खूप आपुलकीने पाठवली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद...
पुस्तकं पाठवून तीन-चार महिने झाले असतील ...पण मला अभिप्राय द्यायला खरंतर जरा उशीरच झाला त्याबद्दल क्षमस्व.
तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या, अनुभवी माणसाच्या लिखाणावर माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलीने काहीबाही भाष्य करावं इतकी माझी पात्रता नाहीये. पण तुमच्या पुस्तकांनी मला दिलेला आनंद आणि इतर गोष्टी याबद्दल थोडक्यात शब्दबद्ध करण्याचा हा लहानसा प्रयत्न.
मराठी साहित्यातील थोर संतकवी तुकाराम महाराजांची अभंगाची परंपरा जपणारं 'तुको बादशहा ' या पुस्तकापासून सुरवात करते. हल्लीच्या काळात ज्या प्रमाणात मुक्तछंद, गझल या फॉर्मच्या तुलनेत अभंग या फॉर्म मध्ये फार कमी लिहलं जात असल्याने अभंगाला वाहिलेलं हे पुस्तकं नक्कीचं खास ठरतं. तुकारामांवर आधारित सुरवातीलाच सलग दहा बारा अभंगातील प्रत्येक कडवं तुमचं तुकारामाबद्दलचा जिव्हाळा अधोरेखित करतं. त्यातल्या या काही कडवी तर अगदी फारच अप्रतिम आहेत....

*
तुको बादशहा
देई शब्ददान
करी धनवान
लेखणीला
*
अगा शब्दराजा
होई कृपावंत
ओत आशयात
पंचप्राण
*
मुखातून माझ्या
बोले तुकाराम
तोच आत्माराम
अभंगाचा
*
कमीत कमी शब्दांत आशयाचा डोलारा सांभाळण्याची किमया साधल्यामुळे अनेकविध विषयांवर मार्मिक भाष्य या पुस्तकात कितीतरी अभंगात आढळते.

मन भ्रमाचे भांडार
त्याची किमया अपार

दोन ओळीत मनाचं सारं किती अचूक सांगितलंत. अहंकारासारखी
घातक भावनाही तितक्याच चपखलपणे मांडलीय.

आकाश ठेंगणे
अहंकाराहून
ज्ञानाचाही खून
पाडशील
*
जीवनाचे सारं सांगणाऱ्या या दोन ओळी वाचताक्षणी निःशब्द करून टाकतात.

तहानेचे हेच फळ
उरफुटी धावपळ

याव्यतिरिक्तही मानवाचे अनेक भावनांच्या मुळाशी जाऊन त्यातली अपरिहार्यता आपल्या चिंतनाच्या मुशीतून आल्यावर शब्दांशब्दांतून उमटणारा अर्थ सोन्यासारखा उजळून निघतो. मग ती भावना वैराग्याची असो अथवा वासनेची...तितक्याच  प्रामाणिकपणे तुम्ही मांडली आहे.
भावनांचा हा सगळा समग्रपणे आढावा घेत असताना चाणाक्षपणे टिपलेल्या जगण्यातल्या विसंगती ...स्वतःला, समाजाला, देशाला नि देवालाही थेट जाब विचाराण्यामागची तुमची ठाम भूमिका भावते. आजूबाजूला एकूणच सर्वत्र अनिश्चितता भरलेली असतानाही सत्यासाठीचा आग्रही असणं हे जरी कठीण असलं तरी ते आपण निष्ठेने जपायला हवं असं मलाही वाटतं आणि म्हणूनच सत्याचे अद्वितीय सामर्थ्य सांगणारा आठ कडव्यांचा एक अभंग प्रचंड आवडला. धन दौलत संपत्ती सुखाचा मागणे सगळेच मागतात. कवीचे मागणे मात्र इतरांपेक्षा कसे वेगळे असते हे सांगणारा हा खास अभंग.

वेश्येच्या रक्तात
आढळो ना एड्स
ऐसी दे गर्भास
गुणसूत्रे

मेंदूला कवटी
बुबुळाला खाच
तैसे दे कवच
त्याच्या मना

अखंड आसूड
ओढणारे भ्रष्ट
सोसण्या दे पाठ
कासवाची

उलटे काळीज
पालथी आतडी
गेंड्याची कातडी
स्वयंसिद्ध

ठेव दातावर
अभिनयी हसू
ग्लिसरीन आसू
पापण्यात

घाल गर्भवासी
फक्त पुत्ररत्न
पितरांचे ऋण
फेडावया

या पुस्तकातील बरेच अभंग विषयसंपन्न तसेच आशयसमृद्ध आहेत. प्रत्येक कडवं हे स्वतंत्रपणे आत्मसात करण्यासारखे. अभंगाची ही पालखी पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत अशीच वाहती ठेवण्याची अतिशय महत्वाची जबाबदारी हे पुस्तकं चोखपणे पार पाडत राहिलं हे नक्की. कवितेचं,गझलेचं स्थान प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे असलं तरी ते नक्कीचं अनन्यसाधारण आहे.

हिंडतो का जागोजागी तू अनाथासारखा
भंगलेल्या माणसांची ही खरी वाली गझल

पोचलो स्वर्गात मी पण खंत आहे अंतरी
एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल

या शेरांवरून राऊत सर तुमचे गझलप्रेम किती नितांतसुंदर आहे हे कळून येतं.

'कारुण्य माणसाला संतत्व दान देते ' असं शीर्षक असेलल्या गझलसंग्रहाबद्दल वेगळं काय बोलणार?  अभंगामध्ये जसे अनेकविध विषयावर मार्मिक सांगणे आहे तसेच गझलेमध्येही मनाच्या अनेक भावना तरलपणे गुंफल्या आहेत. जवळजवळ सगळ्याच गझला लांबलचक मीटर मध्ये असूनही कुठेच ओढाताण नाही...अगदी सहजपणे आशयाची लय सांभाळली आहे. कुठल्याही निर्मितीच्या मुळाशी चिरस्थायी वेदनाच असते असं मला वाटते...यामुळेचे ती कलाकृती मनामनाचा ठाव घेते. वेदनेचा इतक्या थोर शब्दांत गौरव करणारा हा शेर फार आवडला.

दुःखास धर्म नसतो, ना जात वेदनेला
हे मर्म जाणणारा सर्वज्ञ मानतो मी

दुःखावरचा अजून एक क्लासिक शेर..

घ्यावा मना नव्याने तू एकदा उभारी
तेंव्हा फिटेल मित्रा दुःखातली उधारी

आईवर, राजनीतीवर,मैत्रीवर, वेदनेवर,उपरोध दाखवणाऱ्या, नात्यावर इत्यादी अनेक विषयांवरच्या गझल दरवेळी त्या त्या विषयातील नाविन्य समोर आणतात. नकोसे होतं जाणाऱ्या नात्यावरचा हा शेर किती नाजूकपणे मांडला आहे.

नकोसे होतं जाणारे मरू लागे हळू नाते
फुलांचे होउनी ओझे रुते पाठी तुकारामा

माणसाच्या दांभिकतेचा आरसा दाखवणारी गझल खूप आवडली त्यातला एक शेर..

जितेपणी उपवास किती
मेल्यावरती घास किती

प्रत्येकाला त्याच्या मनातलेच वाटतील असे अनेक शेर आहेत...सगळेच इथे नाही देता येणार. साहित्यामध्ये आजवर प्रेयसीसाठी कितीतरी रोमँटिक कविता लिहल्या गेल्या आहेतच पण या पुस्तकातीत या शेरातील रोमँटिसिझम सर्वांगसुंदर वाटला.

चितेची राख थोडीशी तुझ्या बागेत टाकावी
फुलांचा जन्म घेइन मी तुला शृंगारण्यासाठी

हाय हाय काय कल्पना आहे !!

जीवन सुंदर व्हावं, समृध्द व्हावं यासाठी अनेकजण मार्गदर्शक तत्वज्ञान सांगतातच. अनेक गझलेमध्येही ते खूपदा पहायला मिळतचं. अनुभवांचे अनेक उन्हाळे ,पावसाळे वाहिल्यावर शेवटी शेवटी मनात रेंगाळणाऱ्या सुप्त इच्छा, सुप्त मागणं नकळतपणे ओठांवर येतं.... तेंव्हा त्यामधील गोडव्यात समाधानाची शर्करा एकजीव झालेली असते. अशा वेळच्या मागण्यात उत्कटतेला कोणतीही परिसीमा नसतेच. मौनातली हुंकारही उदात्त वाटतो. अशा उत्कट गोड भावनांनी सजलेली एक नितांत सुंदर गझल मनात झिरपत ठेवावी अशीच.

मृत्यू समोर दिसता विसरून वैर जावे
बसण्या जवळ घडीभर मित्रास बोलवावे

बोलून सांगण्याच्या नसतात सर्व गोष्टी
राहून मूक तेंव्हा हातात हात घ्यावे

कारुण्य माणसाला संतत्व दान देते
आपापल्यापरीने हृदयात वाढवावे

पाणी उथळ कुठे अन .. गहिरे कुठे किती हे
जाणून नाव आहे ...सोसून हेलकावे

देहात क्षीण झाली ती ज्योत वासनेची
आत्मीय प्रेम बाकी आता तुला कळावे

भिंतीवरील फोटो पिवळा पडेल माझा
तेंव्हा तुझ्या मनातुन मी हद्दपार व्हावे

शब्दास पाजले मी जे रक्त रोज माझे
तू वाचशील तेंव्हा डोळ्यातुनी गळावे

अभंग, गझलेनंतर आता मुक्तछंदाकडे जाताना एकविसाव्या शतकात असल्याची पदोपदी खात्रीच होतेय. म्हटलं तर हे शतक मोबाईलचं... वेगवान प्रगतीचं पण त्याच वेळी याच युगातली दुसरी बाजू काळवंडलेली दिसते. त्याकडे डोळस संवेदनशील माणसं तरी दुर्लक्ष नाही करू शकतं. आपण जेंव्हा काय काय कमावले याचा हिशोब मांडतो तेंव्हा त्यासाठी मोजावी लागणारी किंमतही ध्यानात घेणं आवश्यक असते. तरुण पिढीकडे आशेने पाहणारे जुन्याजाणत्या माणसांना त्यांच्या भविष्याबद्दल  काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. या भूमीत जन्म घेणाऱ्यासाठी आजूबाजूचं वातावरण नक्की कसं आहे?...त्यांच्या सकारात्मक वाढीसाठी आपण काय काय देऊ शकतो. याचं सुस्पष्ट चिंतन केल्यावर जे जे काही सत्य समोर येईल ते सर्व मांडणार पुस्तकं...  'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला. '
डॉ.किशोर सानप यांच्या अभ्यासपूर्ण आणि बारकाईने आढावा घेणाऱ्या प्रस्तावनेत  पुस्तकाचं मौलिक सार अतिशय प्रगल्भपणे मांडलंय. पुस्तकाच्या शोर्षकाची पहिलीच कविता खूप दीर्घ आहे. २९ व्या पानावर सुरू होऊन ४५ व्या पानावर संपते. तान्ह्या मुलांच स्वागत करण्यासाठी ओंजळ इतकी कमजोर व्हावी??...की त्याबद्दलची धास्ती कितीही लिहिलं तरी शब्दांच्या आवाक्यातही सामावू शकत नाही.? एकीकडे माणूस चंद्रावर जाऊन पोहचला तरी अजूनही घराघरात देवाच्या, भक्तीच्या नावाने रोज सुरू असलेली कर्मकांडाची अवडंबरे अजून अजून विस्तृत होऊ पाहतायेत. अजूनही खेड्यात रस्त्याच्या कडेला हागणदारी आहे. आत्महत्येसाठी प्रसिद्ध असलेल्या शेतकरी, अतिथी नको वाटणारा महागाईच्या या काळात कसे रुजणार माणूसकीचे धडे??? आई सारख्या पवित्र नात्यातही सरोगसी सारखे आधुनिक उपचार, पदव्यांचा सेल,शुभेच्छापत्रांची औपचारिकता, मोबाईल मध्ये हरवलेले मैदानी खेळ. प्रत्येक ठिकाणी भेसळ, फसवणूक नि नष्ट होत चाललेली जीवनमूल्ये....ही सगळी तळमळ राऊत सर तुम्ही अतिशय परखडपणे मांडलीत...आणि अशा निराशाजनक परिस्थिती असतानाही त्यातून तुम्ही वेचलेली ही निखळ प्रसन्नता.....फारच गोड आहे.

तान्ह्या मुला,
टवटवीत गुलाबापाकळीसारख्या
तुझ्या मऊ मुठीत
दिली आहे मी माझी तर्जनी
कवितेतील
तोकड्या
शब्दांत
किंवा रंगीत छायाचित्रणाच्या
मृत यांत्रिकतेला पकडता येत नाही
तुझ्या हसण्यातील आनंदाचा जिवंत झरा
अन ते पाहून येणारी
माझ्या मनाची प्रसन्नताही.

पैशामागे धावताना जगण्याचं साध्यचं विसरून जावं? जगाचा पोशिंदा अन्नदाता बारोमास उघड्या अंगानं घेतो  सनबाथ पावसाळ्यात गळणारी छपरं, स्वतःची किडनी विकायला भाग पडणारी गरिबी श्रीमंताला मात्र जगवते आहे. ही भयानक दरी असलेल्या या देशात सगळ्या बाजूने अशांत झाल्यावर या तान्हा मुलाने कुठे जायचे उत्तर शोधायला?....हे सांगताना एकमेव शाश्वत सत्य ज्या प्रकारे मांडलंय ते लाजबाब आहे.

माझ्या तान्हा मुला,
तुझे मन राहिलेच अशांत
तर तू जाशील कुठे?
भगवद्गीतेजवळ?
की
महासंगणकाजवळ?
कुठंही जा..
पण जेवून घेशील आधी
कारण
एकच गोष्ट आहे सनातन
आणि तेवढीच आहे शाश्वत;
ईश्वराइतकी अनंत दुःखे,
फुलांच्या आयुष्याऐवढे सुख;
विश्वाला व्यापून शिल्लक आहे
मुंगीच्या पोटात इवली भूक

भुकेचे हे शाश्वत सत्य सांगितल्यानंतर अनेक नागडी सत्य एकामागोमाग एक सांगून आपण जगत असलेलं आयुष्य, त्यातली हतबलता किती टोकाची आहे हे या पुस्तकातीत अनेक कवितांमधून समोर आल्यावर क्षणभर मनात धस्स होतं. आणि हे धस्स होणं कवितेगणिक वाढतच जातं. कविता काय देते? याबद्दलचे गोडवे कितीही गात असलो तरी वास्तवाला सामोरे जाताना त्यातल्या आभासाची प्रचिती वेळोवेळी येत असतेच. प्रत्यक्ष आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी कविता कशी असमर्थ आहे हे सांगणारी 'कविता ' नावाची कविता फारच बोलकी आहे. त्यातल्या काही ओळी....

"वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या
कवितेच्या कागदाला
झाकता येत नाही
फाटक्या झ्यांपरातून दिसणारे
तरुण बहिणीचे उघडे अंग;
की मासिकात छापून आलेल्या
कवितेच्या
चतकोर कात्रणाचे
लावता येत नाही ठिगळ
लहान भावाच्या
ढुंगणावर फाटलेल्या चड्डीला."

वाढदिवस, आणि इतर छोटे मोठे तत्सम समारंभांपुरते एकत्र येऊन तोंड देखली ओळख जपली जाते हल्ली. हे सांगणाऱ्या या ओळी....माणसांच्या बेगडी जगण्याला अधोरेखित करणाऱ्या या ओळी नात्यांमधील सुशोभित झूल उघडी पाडतात.

'आपण
थोडेसे परिचित वगैरे असल्याने
एकमेकांची ओळख विसरू नये
म्हणून निमित्ते शोधून
रेशनकार्डसारखे रिन्युअल करूया
आपल्या ओळखीचे '

श्रावण म्हटलं की कसं सगळं छान छान. विशेषतः कवींना तर त्याच फार अप्रुप. पण उपाशी पोटी श्रावणच काय पण स्वर्गही टोचतच राहिलं ना??..श्रावणाचं हे वेगळं रूप मांडणारी कविता म्हणजे......
'वावरात पोटामागं
मायच्या पायाला
जंगलेल्या खिळ्याच्या देठावरचं
लालबुंद रक्तफूलच. '

आंधळ्या न्यायव्यवस्थेचं चित्र लख्खपणे दाखवणारी 'पुढची तारीख 'ही कविता. तसेच आधुनिकतेच्या नावाखाली शहराला आलेल्या ओंगळवाणं रूपाच चित्रण करणारी 'शहरा' ही कविता. समाजव्यवस्थेचं, वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्येचं दर्शन घडवताना भौतिक सुखाच्या शर्यंतीमध्ये धावणाऱ्या माणसाला विचार करायला लावतात.शिक्षण व्यवस्थेवर टीका करणारी 'पंधरावी विद्या 'ही कविता.
'स्वतःचा तोल जात असलेल्या एका बेवड्याने दुसऱ्या बेवड्याचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न करावा तसे उच्च शिक्षण सावरते मनुष्यबळविकास ' अशा तीव्र शब्दांत भ्रष्ट व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे..... ही सगळी भ्रष्ट व्यवस्था लवकरात लवकर बदलावी अशीच भूमिका, तळमळ प्रकर्षाने त्यामागे जाणवते. पुस्तकाच्या अखेरीला 'अखेर ' नावाच्या  कवितेमध्ये माणसाची उरफुटी धावपळ मार्मिकपणे सांगणाऱ्या या ओळी खूप आवडल्या.

'तहान दुःख निर्मिते कळे न माणसा
पुन्हा पुन्हा खुणावते मनास लालसा
पिढ्या कितीक संपल्या अशा अजाणता

राऊत सर,
तुमच्या या काव्यप्रेमाला आणि साऱ्या संवेदनशील अभिव्यक्तीला  मनापासून सलाम. अनेक दशके तुम्ही कवितेचा वसा प्राणपणाने जपलाय...हे आमच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. काव्यधारेतील सगळ्यात जुना काव्य प्रकार अभंग ते आधुनिक मुक्तछंदा पर्यंत असा काळ व्यापणारा आवाका वर्तमानात तुमच्यासारख्या फार कमी लोकांनी साधलाय. तिन्ही पुस्तकं वेगवेगळ्या छंदामधली असूनही लेखणीची धार मात्र तितकीच प्रभावी आहे. तुमचं हे प्रत्येक प्रकारावर असलेलं प्रभुत्व थक्क करणारं आहे. जगण्याचे इतके सारे व्याप सांभाळून तुम्ही सातत्याने लिहिताय. याचं मला खूप आश्चर्य आणि कौतुकही वाटतं.  तुमच्या लेखणीतील सुस्पष्टपणा नि परखडपणा प्रत्येक कवीमध्ये यायला हवा असं मला आवर्जून नमूद करावंसं वाटतं.
भौतिक प्रगतीची कितीही शिखरे पादाक्रांत केली तरी स्त्रियांचं जग अजूनही सोसण्याच्या पल्याड गेलेलं नाही. तिच्या अस्तित्वाचा, तिच्या कामाचे, तिच्या एकूणच भावनांचे अनेकविध पदर उलगडतानाच्या कविता, तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ......
'बाभूळबन, माती , फुले, भारतमाता, जागी हो, जुलूस,रांगोळी,सवाष्ण, भूमिका , सावित्रीबाईशी संवाद,एका तरुण मुलीचा वाढदिवस '...इत्यादी. या कविता बाईलाच काय पण पुरुषांच्या हळव्या मनाला उराउरी भेटतात.
विशेषतः फुले ही कविता वाचून  माझ्या मनात उमटलेला दरवळ शब्दांच्या पलिकडचा आहे. प्रचंड आवडली ही कविता. याच कवितेने माझ्या या बडबडीची सांगता करते.

फुले

आसमंताचा
संबंध गाभारा
सुगंधित करायला निघालेल्या
फुलांच्या सर्जनशील परागांवर
कोठून येऊन बसतात
ह्या काळ्या माशा झुंडीझुंडीने?
ज्या शोषून घेतात
आतील मध हळूहळू
जसे चालले आहे
निर्बिजीकरण
पाकळ्यांच्या माना
लुळ्या पडत आहेत
लाजिरवाण्या जगण्यासारख्या
आणि
फुले होत आहेत
प्लास्टिकच्या फुलांसारखी गंधहीन
फक्त फ्लॉवरपॉटच्या लायक
कोवळ्या उदयापासून
चिमत चिमत मिटणे टाळताना
फुले अवघडलेली
भर बहरात
फुलांचे उडणारे रंग पाहून
फुलपाखरेही जातात दुरून,
होतात पाठमोरी
तशी
फुले अधिकच तिरस्कार करतात
आतील आवाजाचा
त्यांचे
समजूतदार सज्ञात देठ
गलबलतात खोलवर
आणि
बागेच्या डोळ्यात
साकळते दवं
वेळी अवेळी
अधूनमधून.

@श्रीकृष्ण राऊत

सर, तुमची ही बहुआयामी लेखणी अशीच कायम आम्हाला समृद्ध करत राहो. खूप खूप शुभेच्छा☺️💐

- प्रतिभा साबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा