दुःख माझे देव झाले,शब्द झाले प्रार्थना : अमोल शिरसाट

 गझलसम्राट सुरेश भट गेल्यानंतर ‘अन उदेला एक तारा वेगळा’(२०११) हा काही मान्यवरांच्या लेखांचा गौरवग्रंथ डॉ. राम पंडित यांनी संपादित केला. यातील ‘खंत एका कलंदर झंझावाताची’ या लेखात शाहीर सुरेशकुमार वैराळकर म्हणतात ‘सुरेश भटांची प्रेरणा आणि मार्गदर्शन यांचे महत्व मान्य करीत त्यांच्यापासून सन्माननीय अंतर राखून गझललेखन करणारे अनेक रचनाकार मोठ्या संख्येने दर्जेदार गझलरचना करीत आहेत.’ या लेखात त्यांनी नावे दिली नाहीत परंतु या रचनाकारांमधे अग्रस्थानी नाव येते श्रीकृष्ण राऊत ! तब्बल चार दशकांपासून गझल लेखन करणाऱ्या राऊतांनी मराठी गझल क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

                  माणूस एकवेळ बाहेरच्या शत्रुंसोबत संघर्ष करू शकेल पण आपल्याच शरीरात रहात असलेल्या आणि जगात अजूनपर्यंत औषध नसलेल्या दुर्धर शत्रूसोबत कसे लढायचे? दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोण असेल तरंच ही लढाई शक्य असते. 'हायपरट्रॉफीक स्युडोमस्क्युलर डिस्ट्रफी' नावाच्या क्वचित आढळणाऱ्या जीवघेण्या आजाराशी श्रीकृष्ण राऊत वयाच्या सतराव्या वर्षांपासून झुंज देत आहेत. या आजाराशी झुंज देता देता आपले जीवनानुभव मांडताना एक वेगळी धार त्यांच्या लेखणीला प्राप्त झाली आहे.

सरावा जन्म हा सारा अशा कैफात स्वानंदी
निरागस लेकरू तान्हे जसे झोपेत हासावे

              मद्य माणसाला धुंदी चढण्यासाठी परत परत घ्यावे लागते पण गझलेचा कैफ चढलेल्या शायराला दुसऱ्या नशेची गरजच पडत नाही. आयुष्यभर तो एका वेगळ्या तंद्रीत राहत असतो. राऊतांच्याच शब्दात सांगायचे झाले तर -

ना झोपतो ना जागतो मी वागतो वेड्यापरी
तंद्रीत एका वेगळ्या मी राहतो वेड्यापरी

                   एखाद्या गोष्टीचं वेड लागल्याशिवाय कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही. झपाटलेपण माणसाला स्वस्थपणे झोपूच देत नाही. आणि अशा गझलेच्या वेडातूनच राऊतांचा १९८९ साली प्रकाशित झालेला केवळ पन्नास गझलांचा 'गुलाल' हा संग्रह म्हणजे मास्टरपीस आहे. या संग्रहात नवीन गझला समाविष्ट करून 'गुलाल आणि इतर गझला ' या नावाने दोन आवृत्त्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत.

                          गझल असो किंवा कविता... त्यात व्यक्त झालेल्या भावना किंवा अनुभव स्वतःचे नसतील तर ती फार काळ टिकत नाही. गझलेमधून तर वृत्ताचे बंधन असल्यामुळे तावूनसुलाखून आशय बाहेर पडत असतो. त्यामुळेच गझलेचे शेर सुभाषितांप्रमाणे वापरली जाऊ शकतात. आयुष्यभरात लिहिलेला एखादा शेर जरी लोकांच्या स्मरणात राहिला तरी पुरे असते. राऊतांचे अनेक शेर या ताकदीचे आहेत.

सांजवेळी संगतीला एक नाही पाखरू
तेरवीच्या पंगतीला खूप आली माणसे

                          गझल या काव्यप्रकारात गझलकाराला आपले म्हणणे आकृतीबंधाचे बंधन पाळून मोजक्या शब्दांत मांडायचे असते. आकृतीबंध एखाद्या रिकाम्या घटाप्रमाणे असतो. त्यात अमूर्त स्वरूपात असलेले आशयरुपी पाणी भरायचे असते . पाण्याला आकार नसतो. घटामुळे पाण्याला एक आकार मिळतो. घट आणि पाणी एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. कारण रिकाम्या घटाला काहीही अर्थ नसतो . पाणी वेगळे केले तर त्यालाही आकार उरणार नाही. तसेच आकृतीबंध आणि आशय एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. पण घटामधे पाणी भरण्याइतके आकृतीबंधांत आशय ओतणे सोपे नसते. गझलेच्या आकृतीबंधांत आशय ओतण्यासाठी गझलकाराकडे एक नैपुण्य असावे लागते. हे नैपुण्य राऊतांच्या अनुभवाधिष्ठीत गझलेला प्राप्त झाले आहे. ते अगदी सहजपणे व्यक्त होतात -

नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या;
मी सूर्य पाळलेला आहे उरात माझ्या.

                           राऊतांच्या गझलेचा एक महत्त्वाचा पैलू उलगडताना मंगेश पाडगावकर म्हणतात विसंगती हेरण्याची आणि चांगल्या अर्थाने वक्तृत्वपूर्ण उठाव देण्याची उत्तम शक्ती त्यांच्या शैलीत आहे. २०११ साली अकरावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या गझलेतील उपरोक्त शेर याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांची शैली काव्याच्या व्यासंगातून संपन्न झाली आहे. त्यामुळेच कवी कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, ना.घ.देशपांडे, मंगेश पाडगावकर, डॉ.अविनाश सांगोलेकर, डॉ.मधुकर वाकोडे यासारख्या साहित्यिक व अभ्यासकांनी त्यांच्या गझलेची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. डॉ. राम पंडित तर त्यांची तुलना प्रसिद्ध शायर दुष्यंत कुमार यांच्या गझलेशी करतात. दुष्यंत कुमारांचा ‘साये मे धूप’ हा केवळ ५२ गझलांचा संग्रह गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून रसिकांच्या मनावर राज्य करीत आहे. त्यांना फार कमी आयुष्य लाभले. परंतु ‘साये में धूप’ भारतीय साहित्यातील अजरामर कलाकृती आहे. दुष्यंत कुमारांची विसंगती हेरण्याची आणि वक्तृत्वपूर्ण उठाव देण्याची शैली राऊतांच्या लेखणीला सुद्धा प्राप्त झाली आहे.

तुझ्या हासण्याचे दिवाणे किती
तुझे चाहते कोण जाणे किती

किती जीवघेणा अबोला तुझा
मला जाळण्याचे बहाणे किती

                          सामाजिक आशय वक्त करताना धारदार होणारी राऊतांची लेखणी प्रेमभावना व्यक्त करताना सुद्धा सहज, सुंदर आणि संवादी होते. ती वाचकाला आपलीशी वाटते. कविता वाचताना वाचकाला जेव्हा आपल्या भावना व्यक्त झाल्या आहेत असे वाटू लागते तेव्हा कवी खऱ्या अर्थाने यशस्वी झालेला असतो. राऊतांची गझल या कसोटीवर खरी उतरते.

                  वयाच्या तेविसाव्या वर्षी (१९७८) पहिली गझल लिहिणाऱ्या राऊतांचे गझललेखन आज वयाच्या पासष्टाव्या वर्षीदेखील अविरतपणे सुरू आहे. त्यांनी ‘गुलाल आणि इतर गझला’ व ‘कारुण्य माणसाला संतत्व दान देते’ (२०१९) या दोन संग्रहातील गझला मिळून केवळ १५२ गझला लिहिल्या आहेत. बेचाळीस वर्षांच्या कालावधीत लिहिलेल्या गझलांची संख्या पाहता असे वाटते की त्यांना लिहिण्याची कुठलीही घाई नाही. जे लिहायचे ते मोजके आणि मौलिक लिहिले गेले पाहिजे, हेच त्यांचे सूत्र आहे. ही गोष्ट खरोखरच नव्याने लिहिणाऱ्यांनी नोंद घेण्यासारखी आहे. त्यामुळेच राऊतांना मौलिक गझल लेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठान, मुंबईचा जीवन गौरव पुरस्कार (२०११), यु.आर.एल. फौंडेशनचा गझलगौरव पुरस्कार (२०१४) यासारखे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गझललेखनाबरोबरच ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’(कवितासंग्रह), ‘तुको बादशाह’ (अभंगसंग्रह) या दोन संग्रहांना देखील अनेक सन्मान मिळाले आहेत. अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन करणाऱ्या राऊतांची गाणी आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर यांनी गायिली आहेत. तसेच त्यांच्या गझलांना अनेक आघाडीच्या गझल गायकांनी आपला स्वर दिला आहे. जगण्यावर सच्ची निष्ठा असली की आपसुकच सगळे घडून येते.

            संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बी.एससी. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली श्रीकृष्ण राऊतांची एक गझल

दुःख माझे देव झाले,शब्द झाले प्रार्थना;
आरती जी गात आहे तीच माझी वेदना.

मी पुजारी माणसांचा, दुःखितांचा भक्त मी;
आंधळ्यांना वाट दावी तीच माझी अर्चना.

रोज देव्हा-यात आत्मा सांजवाती लावतो;
रोमरोमी जाळणारी ज्योत आहे यातना.

दुःख माझे एक राधा,एक मीरा आणखी;
व्याकुळांच्या गोकुळी मी करु कशाची वंचना?

हुंदक्याचे फूल काढी अंतरंगी स्वस्तिके;
आज दिंडी आसवांची येत आहे लोचना.

(श्रीकृष्ण राऊत)

- अमोल शिरसाट

9049011234

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा