समाजमनाचा अचूक वेध घेणारे गझलकार, कवी, गीतकार, ब्लॉग डेव्हलपर : श्रीकृष्ण राऊत : निशा डांगे


       जन्मजात दैवी प्रगल्भता लाभलेले दुःखास देव मानणारे कटु अनुभवांना कोळून पिणारे आणि त्या धुंदीतून काळजाला भेदून जाणाऱ्या गझलांचे सृजन करणारे सुप्रसिद्ध कवी, गझलकार व गीतकार श्रीकृष्ण राऊत!


दुःख माझे देव झाले, शब्द झाले प्रार्थना

आरती जी गात आहे तीच माझी वेदना


मी पुजारी माणसांचा, दुःखितांचा भक्त मी

आंधळ्यांना वाट दावी तीच माझी अर्चना 


     आयुष्याच्या पदरात दैवकृपेने दान भेटलेल्या दुःखास त्यांनी देव मानले. शब्दफुलांची आरास रचून प्रार्थना केली तर वेदनांना उराच्या पंचारतीमध्ये पेटवून त्यांनी दुःखाची आरती केली. स्वतःचे दुःख, वेदना बाजूला ठेवून त्यांनी आंधळ्यांना प्रकाशाची वाट दाखवली. ते स्वतःला दीन- दुबळ्या माणसांचे  पुजारी मानतात. 


 वरील मतला व शेर वाचूनच त्यांच्या सखोल आशयाची प्रगल्भता समजून येते. त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, कल्पनांचे रेखाटन करत असतांनाच त्यांनी समाजमनाच्या भावभावनांना, समाजातील  समस्या, अनिष्ट रूढी, परंपरा यावर धारधार प्रहार सुद्धा केला आहे. त्यांच्या "कारुण्य माणसाला संतत्व दान देते" या गझलसंग्रहातील प्रत्येक गझल समाजमनाच्या निरगाठीची उकल करते. त्यांच्या मुक्या संवेदना मुक्तपणे मांडते तर कधी त्यांच्या आक्रोशाला वाचा फोडते. 


तो देव एक सच्चा बाकी दुकानदारी

होताच स्पर्श स्त्रीचा जो बाटणार नाही 


     राऊतांची गझल तळपत्या तलवारीप्रमाणे समाजातील बेगडी चालीरीतीवर अचूक प्रहार करते. समाजाने स्त्रियांच्या ऋतूचक्रावर लादलेल्या जाचक निर्बंधावर बोट ठेवून त्यांनी अशा अनिष्ट प्रथांना कडाडून विरोध केला आहे. या शेरातून त्यांच्या सुधारणावादी दृष्टीकोनाचा परिचय वाचकाला होतो व त्यांना सुद्धा योग्य दिशादर्शन होते. 


सांजवेळी संगतीला एक नाही पाखरू

तेरवीच्या पंगतीला खूप आली माणसे


तुकारामा, अरे यांना जरा तू हाण पैजारा;

मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी 


आहे विचार अमुचा झाडास भेट द्यावी

येथील माणसांची काढून साल द्यावी 


   कधी सूचकतेने तर कधी अगदी सडेतोड रोखठोकपणे त्यांनी योग्य, अयोग्य काय ते सांगितले आहे. कुठलाही विषय त्यांनी वर्ज्य केला नाही. आपल्या लेखणीला कुठल्याही चौकटीत बंदिस्त केले नाही. की लेखणीला टोपण लावून कधी लेखनातून स्वल्पविराम, अर्धविराम देखील घेतला नाही. ते सातत्याने लेखन करत असतात. आपल्या लेखनातून समाजजीवनाचे समग्र दर्शन ते घडवत असतात. स्त्रियांच्या वेदना, अवस्था, गर्भजल परीक्षा, पर्यावरण, राजकारण, भूतकाळ ते वर्तमान सद्य परिस्थिती यांवर अर्थवाही व अगदी सहजपणे ओघवत्या शैलीत ते भाष्य करतात. हेच तर गझलकाराचे खरे कौशल्य असते. त्यांच्या गझलेतील  कोणतेही सुटे शेर घेतले तरीही ते एक सशक्त, आशयघन कवितेच्या रुपात प्रकट होऊन आपले वेगळे अस्तित्व निर्माण करून आपली छाप समाजमनावर प्रभावीपणे पाडून जातात.


त्यांच्या गझल जेवढ्या वैचारिक आहेत तेवढ्याच त्या शृंगारिक सुद्धा आहेत. रसिकांच्या मनावर अलगद मोरपिसे फिरवणाऱ्या अनेक गझल त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांनी १९७८ मध्ये पहिली गझल लिहिली होती.


सांगू कशी फुलाचा देठास भार झाला

हा बहर यौवनाचा देहास फार झाला


आला असा फुलोरा गेली झुकून फांदी

पदरातही लपेना इतका उभार झाला


     राऊत यांची ही पहिलीच गझल प्रकाशित होण्यापूर्वीच गायिल्या गेली आणि लोकप्रिय झाली. जाने १९७९ मध्ये अकोल्यात पद्माकर दादेगावकर यांची   "प्रयोग" नावाची संस्था होती. अरविंद विश्वनाथ  लिखित ऍबसर्ड एकांकिका व नाटकं ती संस्था सादर करीत होती. त्या संस्थेने विदर्भातील कवी, गझलकार यांच्या रचनांचे गायन सादर करण्याचा अनोखा प्रयोग करण्याचे ठरविले. सुप्रसिद्ध गायक "सुधीर फडके" या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. या कार्यक्रमात गायिका जया खांडेकर यांनी राऊत यांची "सांगू कशी फुलाचा.." ही गझल  ठसकेबाज अंदाजात गायिली. दर्जेदार, आशयघन शृंगाराने ओतप्रोत असलेली गझल आणि जया खांडेकर यांचा मधाळ स्वर यांच्या सुरेख मिलाफाने रसिकांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. आणि याच गझलेपासून साहित्यिकांचा तसेच सामान्य माणसांचा राऊतांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांचे गझलेच्या विश्वात अबाधित स्थान निर्माण झाले. १९७९ लाच ही गझल तरुण भारत मध्ये प्रकाशित झाली. 


   खरे तर मराठी गझल उर्दू व हिंदी भाषेतून प्रियकर, प्रेयसी यांचा संवाद, प्रेम- शृंगार, विरह- मिलन हा स्थायी भाव घेऊन मराठी वाङ्मयात स्थिरावली होती. परंतु कालौघात गझलेचे स्वरूप बदलले. सुरुवातीच्या काळातील मुसलसल गझल आता गैरमुसलसल होऊन खयालाच्या विविधतेने नटली आहे. राऊत यांच्या खयालाचा दरवेळी दरवळणारा वेगवेगळा दरवळ वाचकाला भुरळ पाडतो. अजब रसायन असलेले गझल तत्वज्ञ आपल्या तत्वज्ञानी विचारशैलीने आपल्याच बुद्धीचा कस पणाला लावून वाचकांच्या सुपीक डोक्याला सुधारणावादी विचारांच्या मातीत आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी सकस पोषणयुक्त खत आपल्या गझलांतून देतात. 


      गझलचे विलक्षण आकर्षण वाटून गझलवाटेवर वाटचाल करण्यासाठी अनेक नवोदित धडपडत असतात. परंतु त्यांना जोपर्यंत योग्य मार्गदर्शक मिळत नाहीत तोपर्यंतचा त्यांचा हा एकाकी प्रवास खडतर असतो. त्यांना अनेकवेळा अवहेलना सहन करावी लागते. टिकास्त्रांचे वार सोसावे लागतात. याचे यथार्थ दर्शन घडविणारा राऊत यांचा एक शेर-


"येथे परस्परांची या पाठ खाजवाया

बेट्या नवोदितांना वेठी धरा कुठेही..."


      वास्तविकतेचे भयाण चित्रण रेखाटणारा त्यांचा हा शेर केवळ गझल पुरताच मर्यादित न राहता विश्वातील प्रत्येक क्षेत्रातील नवोदितांच्या परिस्थितीला लागू पडतो. वास्तविकता व सर्वसमावेशकता यांचा मार्मिक बंध त्यांनी तावून सुलाखून पक्का केला आहे. त्यामुळे त्यांचा हा शेर वैश्विक झाला आहे.


      मराठी गझलेचे जनक कविवर्य सुरेश भट यांच्यानंतर गझलेची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर गेली चार दशके लीलया सांभाळणारे  व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकृष्ण राऊत! वयाच्या तेविसाव्या वर्षांपासून ते आजतागायत वयाच्या पासष्टाव्या वर्षापर्यंत त्यांचे गझल लेखनातील सातत्य अबाधित आहे. गझलकार हा आधी एक सहृदय उत्तम कवी असावा लागतो. ह्या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण राऊत. गझलच्या बाजूने त्यांनी कविताही तितक्याच ताकदीने लिहिल्या आहेत. त्यांच्या गझल जितक्या दर्जेदार व आशयसमृद्ध आहेत तितक्याच त्यांच्या कविता हृदयस्पर्शी व काळीजभेदक आहेत. मराठी सिने सृष्टीतील गाजलेल्या चित्रपटात त्यांनी गीतलेखन सुद्धा केले आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रातून स्तंभ लेखन सुद्धा केले आहे. या बहुगुणी व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या साहित्यिकाचा साहित्य प्रवास शब्दांच्या चौकटीत बंदिस्त करणे म्हणजे सागरकिनाऱ्यावरील अथांग वाळूला मुठीत पकडण्याचा अशक्यप्राय प्रयत्न होय!


      श्रीकृष्ण राऊत हे सुरेश भटांच्या समकालात गझल लेखन  करत होते. तरीही सुरेश भट यांच्या गझल लेखनाला सन्माननीय समांतर अंतर राखून लिहिणाऱ्या अनेक दर्जेदार गझलकारांच्या अग्रक्रमी श्रीकृष्ण राऊत येतात. सुरेश भट यांच्या 'एल्गार ' गझलसंग्रहानंतरचा मराठी साहित्य विश्वातील पहिला गझलसंग्रह म्हणजे श्रीकृष्ण राऊत यांचा "गुलाल". पन्नास गझलांचा हा त्यांचा पहिला वहिला गझल संग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नव लेखक अनुदान योजनेतून शब्दालय प्रकाशनतर्फे १९८९ मध्ये प्रकाशित झाला. या संग्रहाची दुसरी आवृत्ती २००३ मध्ये "गुलाल व इतर गझला" शीर्षकाने प्रकाशित झाली. आणि त्याची सुधारित आवृत्ती मागच्या वर्षी २०२० मध्ये पुण्याच्या संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केली आहे.


"हिंदीमधील सुप्रसिद्ध गझलकार दुष्यंतकुमार जसे पन्नासेक गझलसृजनाच्या बळावर आपले स्वतंत्र स्थान राखून आहेत त्याचप्रमाणे श्रीकृष्ण राऊत यांनी साठ-सत्तर गझल सृजनाद्वारे आपली स्वतंत्र ओळख मराठी गझलक्षेत्रात निर्माण केली आहे. राऊत हे गझलेतील मौलिक व अनुभवाधिष्ठित अभिव्यक्ती होय!"


"गुलाल आणि इतर गझला" या संग्रहाच्या मलपृष्ठावर ज्येष्ठ गझल समीक्षक, गझलकार डॉ.राम पंडित यांनी हा अभिप्राय देऊन राऊत यांचे भरभरून कौतुक केले आहे. तसेच कवी कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, ना. घ. देशपांडे, मंगेश पाडगांवकर यांनी मुक्तकंठाने राऊत यांची प्रशंसा केली आहे. 


    श्रीकृष्ण राऊत हे सुरेश भटांच्या समकालीन गझल लिहित असले तरीही ते सुरेशभटांच्या नंतरच्या पिढीचे आघाडीचे गझलकार गणले जातात. कारण सुरेश भट यांनी पहिली गझल १९५५ मध्ये लिहिली आणि त्यावर्षीच श्रीकृष्ण राऊत यांचा जन्म १ जुलै १९५५ मध्ये अकोला जिल्ह्यातील "पातूर" या खेडेवजा छोट्या गावात झाला होता. त्यामुळे हे पिढीचे अंतर ग्राह्य धरणे क्रमप्राप्त आहे. मी जवळून अनुभवलेलं आणि अभ्यासलेलं श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकृष्ण राऊत!


   श्रीकृष्ण राऊत यांच्या घरातील वातावरण सुसंस्कृत व धार्मिक होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून कष्टाने पुढे आलेले त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या आईंना अनेक लोकगीते तोंडपाठ होती. त्या कामं करतांना सतत गुणगुणत असत. वऱ्हाडी भाषेतील म्हणी व वाक्प्रचारांचा वापर त्या अगदी सहजतेने करीत. त्यांच्या मावशीचे पाठांतरावर प्रभुत्व होते. त्यांच्या घरी श्रावणातील पोथी लागायची.  शिवस्तुती, हरिविजय, पांडव प्रताप, हरिपाठ, भजनं, प्रार्थना, गुरू वंदना, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता कानावर पडायची.आईच्या तोंडी  असलेल्या लोकगीतांची एक वही त्यांनी लिहून काढली. आजच्या पिढीमध्ये तो वारसा चालत राहण्यासाठी ती प्रकाशित करण्याचाही त्यांचा मानस आहे. 


    धार्मिक वातावरण व धार्मिक साहित्य यांच्यामुळे त्यांच्यावर सुसंस्कार झाले. 


    दुर्दम्य इच्छाशक्ती व सकारात्मक दृष्टिकोनाने ते आपल्या "हायपर ट्रॉफिक स्युडोमस्क्युलर डिस्ट्रफी" नावाच्या दुर्धर आजाराशी वयाच्या सतराव्या वर्षांपासून  आजपर्यंत अथक लढा देत आहेत. 


नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या

मी सूर्य पाळलेला आहे उरात माझ्या


      राऊतांच्या गझल लेखनशैलीबाबत मंगेश पाडगावकर म्हणतात, "विसंगती हेरण्याची आणि चांगल्या अर्थाने वकृत्वपूर्ण उठाव देण्याची उत्तम शक्ती त्यांच्या शैलीत आहे."


   प्राथमिक शिक्षण त्यांनी पातूरच्या नगरपरिषदेच्या शाळेत घेतले. संध्याकाळी शाळा सुटताना वर्गातील सर्व विद्यार्थी एकत्रितपणे मोठमोठ्याने  कविता लयीत म्हणायचे. त्यामुळे कवितांचे बीज त्यांच्या मनात रुजले. महाविद्यालयातील ग्रंथपाल त्यांना ग्रंथालयातील पुस्तकं वापरण्यास सवलत देत असत. या सवलतीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेत वाङमयीन पुस्तकांचे वाचन केले. गझलेचे विलक्षण आकर्षण त्यांच्या मनात असल्याने त्यांनी "माधव ज्युलियन" यांच्या छंदशास्त्र व सुरेश भट यांचा "रंग माझा वेगळा" या संग्रहाचा अभ्यास केला.


     नंतर अकोला येथील शिवाजी महाविद्यालयात एम. कॉम. करत असतांना त्यांना प्रा. विठ्ठल वाघ, प्रा. किशोर मोरे, प्राचार्य डॅडी देशमुख यांचा सहवास लाभला. विठ्ठल वाघ यांच्या प्रभावाने ते वऱ्हाडी भाषेत कविता लिहू लागले. त्यांच्या कविताही लोकमनावर राज्य करू लागल्या. 


अरे पावसाच्या देवा

असा रुसू नको बापा

धरतीच्या पोटातून

पहा निघतात वाफा


राऊत यांची  "एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला" ही कविता अवघ्या महाराष्ट्रभर प्रचंड गाजली. पुढे  १९९१ मध्ये त्यांचा ह्याच नावाचा काव्यसंग्रह आला. संजीवनी खोजे हा ख्यातनाम पुरस्कार ज्येष्ठ काबंदरीकार भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते मिळाला. तसेच अनेक ख्यातनाम पुरस्कार मिळालेत.


     महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात १९७७ ला खामगावचे प्रा. मधुकर उपाध्याय यांनी त्यांना मंचावर कविता सादर करायला आमंत्रित केले होते. परंतु राऊत त्यावेळी खूप लाजरे-बुजरे होते त्यामुळे ते गेले नाहीत.  "एकेकाळी मंचावर जाण्यास घाबरत असलेल्या श्रीकृष्ण राऊत यांच्या मैफिलीत आज रसिक मंत्रमुग्ध होतात." 


   कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाच्या वेळी त्यांनी उपाध्याय यांना आपल्या काही गझल ऐकवल्या. तेव्हा उपाध्याय त्यांना म्हणाले,


"राऊत साहब! आपको दुष्यंत कुमार पढ़ना पड़ेगा!"  


        राऊत यांनी दुष्यंत कुमार यांचा "साये में धूप" गझलसंग्रहाचा अभ्यास केला. एकाचवेळी दुष्यंत कुमार यांच्या सामाजिक जाणिवा, विद्रोह, सर्वसामान्य माणसांच्या आशा, अपेक्षा, घुसमट आणि सुरेश भट यांच्या दर्जेदार आशयसमृद्ध, शृंगारिक, मनमोहक अशा गझलांचा सुसंस्कार त्यांच्या उभरतीच्या गझललेखनावर झाल्याने त्यांची गझल सुसंस्कारीत व समृद्ध झाली.


     शनिवारी कॉलेज संपल्यावर संपादक "गोरा वैराळे" यांना नेऊन देत असत. वैराळे यांनी त्यांना इतर प्रतिष्ठित वृत्तपत्रातही लिखाण करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी मदतही केली. नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या तरुण भारत व विदर्भ साहित्य संघाच्या 'युगवाणी 'मध्ये ते सातत्याने कविता, गझल लेखन करू लागले. 'तरुण भारत 'च्या विविध विषय विभाग पुरवणीचे संपादक वामन तेलंग यांनी त्यांना पत्रातून  योग्य प्रोत्साहन दिले.मार्गदर्शन केले. एक संपादक नवोदित लेखकाची उर्मी, क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यातील लेखनकौशल्य कसे विकसित करतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे "गोरा वैराळे आणि वामन तेलंग!"


     'तरुण भारत ' मध्ये पहिली कविता प्रकाशित झाल्यावर त्यांना १० रु मानधन मनिऑर्डरने घरपोच मिळाले. त्याकाळात संपूर्ण आठवडाभर शेतात मजुरी करून त्यांच्या आईंना ४ रु मिळत असत. त्याच काळात राऊत यांना चक्क १० रु. मानधन मिळाले होते. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण! त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. वृत्तपत्रे, दिवाळी अंक यातून ते सातत्याने लेखन करत राहिले.


     त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात गीत लेखन केले आहे. "राघू मैना" या चित्रपटात त्यांनी "ठिणग्या ठिणग्यांची घुंगरं बांधून" (स्वर आशा भोसले), "चिंब ओलेती मी" (उषा मंगेशकर) "वाटली घडी घडी युगापरी तुझ्याविना" (सुरेश वाडकर, उषा मंगेशकर) ही गाजलेली गीतं लिहिलेत. त्यानंतर २०१९ ला "तू तिथे असावे" चित्रपटात लिहिले. अद्यापही त्यांचे गीत लेखन सुरू आहे. आगामी "ऑनलाइन मिस्टेक" या चित्रपटातही गीतं लिहिली आहेत. 


अनेक सुप्रसिद्ध अलबम्स मध्ये सुद्धा त्यांनी गाणी लिहिलीत. तसेच "ज्ञानगंगेचा भगीरथ" चित्रपटाची पटकथा, संवाद व गीतलेखन केले.


      श्रीकृष्ण राऊत यांच्या कविता व गझल अभ्यासक्रमातही समाविष्ट आहेत. सं. गा. बा. अमरावती विद्यापीठात बी. ए. अंतिम वर्षाला "जो जो रे बाळा" (कालखंड २००२ ते २०१२) "मुकुट" बी. ए. द्वितीय वर्ष (२०१३ ते २०१८) "दिंडी" दुःख माझे देव झाले ही गझल बी. एस. स्सी. प्रथम वर्षाला २०१६ पासून आजपर्यंत शिकवली जात आहे.


रा. तु. म. नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बी. एस. स्सी. प्रथम वर्षाला "एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला" अकरावीच्या अभ्यासक्रमात २०१२ ते २०१४ मध्ये "वीज" -


'नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या' ही गझल समाविष्ट होती.


     श्रीकृष्ण राऊत यांना गझल लेखनातील मौलिक योगदानासाठी ९ जाने २०११ मध्ये  जन बांधण प्रतिष्ठान मुंबईचा जीवन गौरव पुरस्कार सुशीलकुमार शिंदे यांचे हस्ते आणि १५ एप्रिल २०१४ मध्ये यू. आर. एल. फाऊंडेशनचा "गझल गौरव पुरस्कार" महाराष्ट्राच्या माई "सिंधूताई सपकाळ" यांच्या हस्ते मिळाला. साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती, पद्मश्री विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार, सूर्यकांता पोटे ट्रस्ट पुरस्कार, वि. सा. संघाचा शरच्चंद्र मुक्तिबोध पुरस्कार असे अनेक ख्यातनाम पुरस्कार त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.


नागपूर येथे संपन्न झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील स्व. सुरेश भट गझल वाचन सत्राचे ते अध्यक्ष होते. याच कार्यक्रमात त्यांच्या हस्ते सुरेश भट यांचा शेवटचा संग्रह "रसवंतीचा मुजरा" प्रकाशित झाला. 


त्यांची एकूण ७ पुस्तकं प्रकाशित आहेत. "चार ओळी तुझ्यासाठी" हा मुक्तकांचा संग्रह ब्रेल लिपीतही प्रकाशित आहे. 


     श्रीकृष्ण राऊत यांच्या नवोदितांना मार्गदर्शन करण्याच्या कार्यात २०१८ मध्ये शाहीर सुरेशकुमार वैराळकर सुद्धा सहभागी  झाले. गझलेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दोघेही अहोरात्र झटू लागले.


     सोशल मीडियाच्या ग्लोबलायझेशनल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या युगात त्यांनी मराठी गझलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी, नवोदितांना मार्गदर्शन करण्याकरिता १ मार्च २००८ ला "गझलकार" नावाचा ब्लॉग सुरू केला. गझलेबाबत अथ पासून इति पर्यंत माहितीपर लेख या ब्लॉगवर आहेत. या ब्लॉगद्वारे मराठी गझल लेखनातील त्यांचे सेवाकार्य अविरत सुरू आहे. 


   गेल्या १२ वर्षांपासून श्रीकृष्ण राऊत "गझलकार सीमोल्लंघन" नावाचा गझल व गझलसंबंधीत माहितीपर लेखांचा गझल विशेषांक प्रकाशित करतात. "गझलकार सीमोल्लंघन" विशेषांकाने देश विदेशात सीमोल्लंघन केले आहे.


  श्रीकृष्ण राऊत यांच्या अफाट कार्याला व अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा!


त्यांच्या पुढील साहित्य प्रवासाला अनेक शुभेच्छा!


निशा डांगे

पुसद


लेख 'अक्षरबंध ' मासिकाच्या जून २०२१मध्ये (7/6/2021) पूर्वप्रकाशीत आहे. लेख आवडल्यास नावासह शेयर करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा