वेदनांचा हुंकार जागविणाऱ्या 'मेळघाटच्या कविता ' : संदीप वाकचौरे

 


मराठी साहित्यात अनेक प्रकारचे प्रयोग अनेक साहित्यिकांनी केले आहेत. त्यातून विविध वाङ्मयीन प्रवाहाची ओळख झाली.मात्र त्यातील काही प्रवाह सशक्त झाले असले तरी काही प्रवाह अद्यापही सशक्तपणे अभिव्यक्त होऊ शकले नाहीत.मराठीत अनेक प्रकारच्या कविता आल्या.त्या कविता कधी छंदोमय तर कधी मुक्तछंदातील आल्या .कवितांनी जगातील नवे बदल टिपण्याचा प्रयत्न केला, मात्र ते बदल नेमकेपणाने टिपण्यात फार कमी कवींना यश आले आहे.काही कवींनी आपल्या प्रतिभेचा उपयोग करीत बदलांचे नेमकपणाने दर्शन घडविले आहे. आपल्या भोवतालच्या वेदना टिपण्यात कवींच्या कविता यशस्वी झाल्या असल्या तरी या देशात राहणाऱ्या आदिवासींचा जीवन व्यवहार आणि संस्कृती नेमकपणाने शब्दात पकडत वास्तवाचे भान देणाऱ्या कवितांचे संग्रह फारसे दिसत नाहीत.आदिवासी हे आदिम आहेत. मात्र त्यांच्या सध्याच्या जीवन प्रवाहात, त्यांची संस्कृती आणि जीवन व्यवहारातही  फार मोठे बदल झाले आहेत असे  चित्र अजिबात नाही. जागतिकीकरण,मुक्त अर्थव्यवस्था,खाजगीकरणाने झालेल्या बदलाने संपूर्ण जीवनावर परिणाम झाले आहेत. मात्र या देशातील काही आदिवासींचे क्षेत्र वगळता बदलांचा परिणाम दिसत नाही. अशावेळी सध्याचे वर्तमान आणि त्यांच्या जीवन संस्कृतीचे समग्र जीवनदर्शन घडविण्याचे काम प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या 'मेळघाटच्या कविता ' या संग्रहाने केले आहे. मूलतः राऊत स्वतः आदिवासी नाहीत , पण तरी सुध्दा आदिवासींच्या  जीवनातील संघर्ष,वेदना आणि पंरपरेचे वास्तव दर्शन त्यांनी त्यांच्या बोली भाषेतील शब्दांची पेरणी करीत घडविण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्यातील प्रतिभेचेच दर्शन घडवते.
   श्रीकृष्ण राऊत मराठी वाङ्मयीन क्षेत्रात विविध कारणाने ओळखणे जाणारे नाव आहे.त्यांनी मराठी गझल लिहून सुरेश भटांची पंरपरा चालवत मराठी गझल समृद्ध केली आहे.त्याचवेळी त्यांनी अभंगाचा आयाम निवडत पुन्हा नवी वाट दाखविली आहे.मराठी साहित्यात कमी अधिक प्रमाणात आदिवासी जमातीचे जिणे भोगलेली माणसं लिहिती झाली आहेत.त्यांनी आपल्या शब्दांच्या संगतीने जीवनाचे दर्शन घडविले आहे ; मात्र ते समग्रपणे घडविण्याचा प्रयत्न मात्र होताना दिसत नाही.अशावेळी राऊतांच्या कविता मराठी साहित्यात अंत्यत दमदारपणे उभी राहत नव्या युगाचे वारसदार असल्याचे स्पष्टपणे सांगते आहे.त्यांच्या या कविता संग्रहात जसे संस्कृतीचे दर्शन आहे, त्याप्रमाणे त्यांच्या वेदनांचे आणि सरकारी व्यवस्थेच्या परिणामांचे प्रदर्शन घडते आहे.
    माणूस हा तसा स्वयंपूर्ण नाही.त्याच्या अपूर्णतेची जाणीव सातत्याने होते आहे.सध्या माणसांची मने बदलली आहेत.जे काही हवे ते मलाच हवे. माझ्यासाठी मी मागणे करेल मात्र अशा परीस्थितीत स्वतःचे वर्तृळ अधिक मोठे होताना दिसत नाही.अशावेळी हे आदिवासी स्वतःच्या पलीकडे जात विचार करत असतात.त्यांच्या मागण्यात स्वहिताचा लवलेश नाही.ते निसर्गाचे उपासक राहिले आहेत.अशावेळी भोवतालची परीस्थिती कितीही वाईट असली तर चिंता समाजाची आहे, सजीवांची आहे.निसर्गाची आहे.त्यांच्या मागण्यात विचाराच्या समृद्धतेचे दर्शन घडते म्हणून देणारा जो कोणी आहे,त्याला विनंती करताना कवी त्या भावनाना शब्दबद्ध करताना
लिहितात -

गाईच्या पोटाला
हिरवा चारा दे
चिमण्या ओठाला
दुधाच्या धारा दे.

   देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यालाही आता पंच्याहत्तर वर्षे झाली आहेत.त्या वर्षात आदिवासींच्या कल्याणाच्या अनेक योजना आल्या.कोट्यावधी रूपये खपले.मात्र आदिवासींच्या जगण्याचे चित्र किती बदलले हा खरा प्रश्न आहे.कधीकाळी आपल्या राज्यात मेळघाटातील बालकांची होणारी कोवळी पानगळ हा चिंतेचा विषय होता.वर्तमान पत्रात तेथील बातमी यायची.आता त्याही थांबल्या आहेत. क्रिकेटच्या धावा मोजाव्यात त्या प्रमाणे ही संख्या मोजली जाते.ही असंवेदनशीलता की भावनांचा मृत्यू असा प्रश्न पडतो.मात्र वर्तमानातील तेथील छोट्या बालकांच्या आयुष्याचे वर्तमान काय आहे हे सांगताना कवी सहजपण सांगून जातात.पण ते सांगणे वाचकांच्या हदयाला पीळ देऊन गेल्याशिवाय राहत नाही.ते लिहितात -

बरगडया –छाती
पाठ पोट एक
वाळली खारीक
असा फटू काढ

आदिवासी समाजाच्या जीवनातील दारिद्र्य  अजूनही कायम आहे.त्यांच्या जीवनात फारसा बदल झालेला नाही.पोटासाठी त्यांची धावाधाव सुरू असतेच.निसर्गातील पाऊस पडला तरी त्याची जाणीव होत जाते.त्यातून निर्सगातील सजीवांची भूक भागत असेल ; पण त्या पावसाने माणसांच्या पोटात जी भूकेची आग आहे ती काही विझू शकेल असे चित्र नाही.पोटाच्या आगीकरीता ते पाणी पुरेसे ठरत नाही ही जाणीव लक्षात घेऊन कवी नेमकेपणाने आणि तितक्याच संवेदनशीलतेने लिहितात -

पाऊस वाजतो
सागाच्या पानी
पोटाच्या आगीला
पुरेना पाणी

गेले काही वर्ष आपल्या विकासाच्या कल्पना बदलत चालल्या आहेत.निसर्गाचा ऱ्हास करीत आपण जे काही करतो आहोत त्याला विकास म्हटले जाऊ लागले आहे. निसर्गाची जंगले गेली आणि सिंमेटची जंगले उभी राहिली.त्याचा परिणाम पर्यावरणावरती होऊ लागला.त्यातून जंगले कमी झाली आणि सजीवांचा- आदिवासाचा प्रश्न निर्माण झाला.त्यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत येऊन राहू लागले.त्यातील वाघ हा प्रातिनिधिक प्राणी आहे.त्याच्यासाठी असलेले जंगल तोडले जात आहे. आता शहरांच्या पाठोपाठ गावेही बदलत आहेत ,त्याचा विपरित परिणाम होताना दिसतो आहे .त्यामुळे जो परिणाम होतो आहे तो नको असेल तर कवी सल्ला देताना लिहितात -

वाघासाठी हवे घर
गाव तुझे खाली कर
पोट बांध पाठीवर
शहराची वाट धर

माणूस हा समाजशील प्राणी आहे असे ऍरिस्टॉटल यांनी म्हटले आहे.त्यातून माणसांच्या विचारांची देवाणघेवाण सुरू झाली.एकमेकांच्या मदतीने गरजा भागविण्याचा विचार केला गेला.पण त्या पलीकडे देण्याचा विचार हा संस्कृतीमधून पुढे आला.आदिवासींची संस्कृती ही देणाऱ्यांची संस्कृती आहे.त्यामुळे त्याग हा त्यांचा स्थायीभाव आहे.त्यांच्या त्या वृत्तीमुळे प्रत्येक माणूस देव वाटत जातो.विनोबा म्हणाले होते की, ' देतो त्याला देव म्हणतात आणि राखून ठेवतो त्याला राक्षस म्हणतात.' त्यामुळे या संस्कृतीचे मोठेपण दर्शविणारी ही  कविता.माणसांच्या छोट्या छोट्या गरजांची पूर्ती करीत असली तरी त्यातही संस्कृतीचे दर्शन आहे हे विसरता येत नाही.ते नेमकपणाने सांगतात कवी लिहितात -
                                                                   मीठ न्या हो
मिर्ची न्या हो
न्या हो आगपेटी
सुख सांगा
दुख सांगा
सांगा भरहाटी

      आपल्याकडे योजना कितीही चांगली असली तरी त्या योजनेचा लाभ नेमक्या उदात्त उद्देशाने संबंधित लाभार्थींना होतो का ? असा प्रश्न कोणी केला तर त्याचे उत्तर आजही नाही असेच येते.आपल्याकडे अनेक चांगल्या योजनेत झारीतील शुक्राचार्य पाहावयास मिळतात.त्या शुक्राचार्यांमुळे गरिबांच्या पोटची भूक शमत नाही.त्याबद्दलचे वास्तव निरीक्षण आपल्या शब्दातून व्यक्त करताना ते लिहितात -

अंगणवाडीचा
धिंगाणा धिंगाणा
चवळी पोखर
हरबरा टोकर
खाऊन ढेकर
येईना येईना

या देशात गरिबांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजना सुरू केली .त्या योजनेतून गरिबांच्या हाताला काम मिळेल ,गरिबांच्या पोटची भूक भागेल.त्याच्या हाती किमान पैसे मिळतील.पण तसे काही झाले नाही.गरिबांच्या हाताला काम मिळाले असले तरी तेथील झारीतील शुक्राचार्यांनी यांचे पैसे चोरले असे नाही तर त्यांच्या कष्टाचा घामही त्यांनी चोरला आहे. त्या कष्टावरती केलेला हल्ला म्हणजे त्यांच्या प्रवासातील अडथळा आहे.भ्रष्टाचार हा कलंक आहे त्याचे वास्तव चित्र रेखाटताना ते लिहितात -

रोजगार हमी
कशाची कमी ?
अर्ध्यात तुम्ही
अर्ध्यात आम्ही

     निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा त्याचा फटका सर्वांनाच बसतो.पाऊस हा तर सर्वांसाठी देवच आहे.याचे कारण त्याच्या आस्तित्वाने अनेकांचे आयुष्य फुलत असते.त्याचे बरसणे हेच अनेकांच्या आयुष्याला आनंद देणारे असते.पाऊस न पडणे म्हणजे माणसांच्या पोटासाठी लागणाऱ्या अन्नधान्याची टंचाई . जनावरांसाठी देखील लागणारा चारा त्याच्या आस्तित्वाने फुलणार असतो.म्हणजे पाऊस नसेल तर माणसांना जसा घास नाही तसा गुरांनाही देखील चारा नाही.मग सारेच उपाशी राहणार का ? असा प्रश्न पडतो.त्यामुळे पाऊस नसेल तर माणसांच्या पोटावर मारले जाईल पण त्यापलीकडे त्या वासरांना तरी काय चारू ? असा प्रश्न करीत ते पावसाशी संवाद करू पहात आहेत.ते लिहितात -

अरे पावसाच्या देवा
नको पोटावर मारू
लेकराला-वासराला
सांग आता काय चारू ?

    ह्या कविता म्हणजे तेथील आदिवासींच्या जीवनाच्या वास्तवाचे दर्शन आहे.या कवितांमधून त्यांची संस्कृती जशी कळते तसे त्यांचे वास्तव समजावून घेण्यास मदत होते. मूलतः पूर्ण कवितासंग्रहात आदिवासींचे जीवन अनुभवास मिळते.त्यांच्या जीवनाचे होणारे दर्शन वाचकांना भानावरती आणते.त्याच बरोबर अनेकदा आदिवासींच्या लोकजीवनाला शब्दबद्ध करताना त्यांच्याच वापरातल्या शब्दांनी कविता अधिक जवळची वाटत जाते.बोलीतील शब्दांना सोबत घेत कवितेसोबत बोलीभाषा देखील समृद्धतेची वाट चालू शकते याचे दर्शन घडविले आहे.खरेतर बोली ही आपली भाषा आहे.तिचा अभिमान बाळगत संवाद करण्याची गरज असताना ते घडत नाही अशावेळी राऊतांची कविता बोली बोलणाऱ्या समुहाच्या मनात आत्मविश्वास आणि आत्मप्रेरणेची पेरणी करण्यास निश्चित यशस्वी होईल.हा नवा प्रयोग रसिकांना निश्चित आवडेल.त्यातून बोलीचे सौंदर्य देखील अधोरेखित करण्यास मदत होणार आहे.
■ मेळघाटच्या कविता
■ श्रीकृष्ण राऊत
मो.8668685288
■ संवेदना प्रकाशन,पुणे
पाने : १०४
किंमत : रु.१५०

(दै.नायक,संगमनेर
दि. ९ मार्च २०२२ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा