मेळघाटच्या कविता : आदिवासींच्या व्यथा : बदीऊज्जमा बिराजदार

चार दशकाहूनही अधिक काळ श्रीकृष्ण राऊत हे ध्यानस्थपणे, अखंडपणे काव्यसाधना करीत आले आहेत. ते चिंतनशील, प्रयोगशील प्रतिभावंत कवी आहेत. सृजनाच्या पातळीवर त्यांनी अनेक प्रयोग समर्थपणे पेलले आहे. प्रयोगाच्या प्रकृतीनुसार त्यांची ओघवती शब्दकळा असते. त्यामुळे त्यांचा प्रत्येक प्रयोग यशस्वीतेची साक्ष देतच आकाराला येतो. प्रतिभापणाला लावून वर्षानुवर्षे सकस प्रयोगशीलता जपणं ही साधीसुधी गोष्ट नाही. त्यांनी केलेला एकेक प्रयोग आखीव रेखीव काव्यशिल्पच ठरावं. त्यांच्या प्रयोगशील कवितेनं मराठी कवितेत त्यांचं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय.


     'कारूण्य माणसाला संतत्व दान देते', 'एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणाऱ्या तान्ह्या मुला' या त्यांच्या दोन कवितासंग्रहानी मराठी कविता सशक्त केलीय. या दोन्ही संग्रहाच्या शीर्षकावरूनच त्यांची कविता वेगळ्या वाटांची, घाटांची आहे. हे लक्षात येते. मुक्तछंदात ही लयदार कविता लिहिणाऱ्या राऊत यांचा गझल हा अत्यंत आवडीचा, जिव्हाळ्याचा काव्यप्रकार आहे. गुलाल, गुलाल आणि इतर गझला यांच्या गझलसंग्रहांनी अवघं गझलविश्व व्यापलंय. 'गझलाई' हे त्यांचं आस्वादक समीक्षेचं पुस्तकही समीक्षेच्या प्रांतात बहुचर्चित ठरलंय. मराठी गझलेला रसिकाभिमुख करण्यात सुरेश भटांप्रमाणेच राऊतांचंही मोठं योगदान आहे. गझल त्यांच्या रक्तात पूर्णपणे भिनलेली असल्याकारणानं त्यांच्या मुक्तछंदीय कवितेतही छंदोबद्धता आपसूक येतेच. त्यातील त्यांचा मनाचा ताल ऐकू येतोच. 'तुकोबादशहा' या त्यांच्या अभंगसंग्रहातील दर्जेदार अभंग निर्मिती तुकोबांच्या अभंग परंपरेशी नातं सुस्पष्ट करणारी आहे. काव्यप्रकार कुठलाही असला तरी त्याला काळजातून भिडण्याची प्रातिभ उर्मी खळाळत राहते.


     'मेळघाटच्या कविता, हा त्यांचा नवा कवितासंग्रह मराठी कवितेला वेगळी वाट दाखविणारा आहे. मेळघाटातील आदिवासी कोरकू ही वन्यजमात सर्वांर्थानं उपेक्षेच्या वरवंट्याखाली जगणारी आहे. मुक्या आदिवासींची मुकी वस्ती म्हणून मेळघाटची ओळख आहे. राऊत यांनी बुद्धाच्या करुणेनं त्यांच्या मुक्याव्यथेला बोलकं करण्याचं मौलिक काम केलंय्. कोरकूंचा वंश, त्यांचे सणवार, प्रथा -परंपरा, संस्कृती, चालीरीती, दंतकथा, पुराणेतिहास, श्रद्धा, अंधश्रद्धा आदींचा बारीक सारीक तपशील राऊत यांच्या कवितांमधून ठळकपणानं अधोरेखित होत जातो.


      कोरकू अनेकविध व्यथांनी, समस्यांनी हातबल झालाय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही त्यांची दैन्यावस्था संपलेली नाही, विकासाच्या, प्रकल्पाच्या गोंडस नावाखाली पहिल्यांदा बेघर होतो तो इथला मूळ आदिवासीच. त्यांना ना वार्ड ना कार्ड. आज इथं तर उद्या तिथं असं त्यांचं भटकं जीवन. ना आजचा घास ना उद्याची आस. सगळंच बेभरवशाचं. आला दिवस तो ढकलत असतो. पुनर्वसनही त्यांना नेहमीच वाकुल्या दाखवत राहतो. सरकारकडून निवडणुकी पुरत्या त्यांच्या कल्याणाच्या घोषणा होत असतात. परंतु त्यांच्या विकासाचा गाडा घाटातच रुतून बसलेला असतो. त्यांना ना पोटभर भाकर मिळते ना अंगभर कापड. पोटात भुकेचा वणवा घेऊन ते आपली सांस्कृतिक परंपरा, कलात्मक जीवनजाणिवा जीवापाड जपत असतात. डोंगर घाटातील हिरवळ, झाडं, अवतीभवती विस्तारलेला निसर्ग हेच त्यांचं विश्व. नाच अन् गाणं बजावणं करीत ते रात जागवतात. कुपोषण अन् उपोषण त्यांच्या पाचवीलाच पूजलेलं. त्यांची पावलागणिक होणारी जीवघेणी हेळसांड पाहून राऊत यांचं संवेदनशील मन पार हेलावून जातं.


     पावसाची तऱ्हा सर्वत्रच सारखी असते. त्याला मेळघाटही अपवाद नाही. इथं पाऊस आदिवासींच्या जीवावर उठतो. पाऊस त्यांचा दिवस वाहून नेतो. झोपड्यांवर भुकेचे ढग रेंगाळत असतात. गाईच्या पोटाला हिरवा चारा मिळावा. चिमण्या ओठांना दुधाच्या धारा लाभाव्यात उपाशी पोटाला भाकर मिळावी. यासाठी कवी वरूणराजाला प्रार्थना करतो.


'वरूणा! वरूणा!!

तुझ्या डोळ्यातून

झरु दे करूणा! '


     कुपोषित बालकं ही इथली अक्राळविक्राळ समस्या आहे. अशा बालकांसाठी आईचा जीव तीळतीळ तुटत असतो. तिच्या अंत:करणातून फुटलेला मायेचा उमाळा अधिक गहिरा, दर्दभरा असतो. यावर कवीनं लोकछंदात पाळणा रचलाय.


'जो जो रेऽ बाळाऽऽ जो

उपाशी बाप रानात जायऽ

पोटाला पालू बांधून मायऽ

पोटात तुझ्या घालू मी कायऽ

जो जो रेऽ बाळाऽऽ जो '


स्त्रीभ्रूणहत्येच्या पार्श्वभूमीवर कोरकू स्त्री जन्माचा धिक्कार नाही करत. त्यांच्या संस्कृतीत मुलीचा जन्म शुभशकुन समजण्यात येतो. मुलींच्या बाबतीत ते मायाळू असतात. मुलींनी खूप शिकलं पाहिजे, असं त्यांना मनापासून वाटत असतं. ही षष्टाक्षरी रचना स्त्री पूजक संस्कृतीचं निदर्शक आहे.


'पाढे वाच पाढे

चार चणे खाय

लेकी वनवासी

शाळा शिकून जाय'


     कोरकू संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळी म्हणजे त्यांची जणू दिवाळी असते. ऋण काढून ते हा सण साजरा करतात. होळीच्या उत्सवात ते महिनाभर नाचगाणं करतात. दुःखाला दूर सारून ते होळीच्या आनंदात गुंग असतात. त्यांच्यासाठी ही नवलाई असते.


'सालाबाद आली

चैताची पुनीव

नाचू लागे जीव '


     सिपना ही मेळघाटाच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणारी नदी. ही नदी कोरकूंची सर्वमान्य देवता. त्यांची मायमाउली. कोरकू तिची मनोभावे पूजाअर्चा करतात. संकटाच्या काळात साकडं घालतात. नवस बोलतात. सिपना माय नवसाला पावते अशी त्यांची श्रद्धा.


'सिपना वो माय

लेक तुझ्या मागं हिंडे

कराड भरून

देई सोन्याचे खेकडे '


     कोरकू काडीकाडी जमवून आपला संसार उभा करतात. आखूड दाराची, खिडकी नसलेली झोपडी, त्यात मातीची भांडी एवढाच काय तो त्यांचा काडीमुडीचा संसार. सुखापेक्षा इथं दुःखाचाच कायम निवास. अल्पाक्षरी कवितेतून राऊतांनी त्यांच्या मोडक्या तोडक्या संसाराचं शब्दचित्र रेखाटलंय.


'काडी काडी जमा कर

काडीमुडीचा संसार

तीन दगडांची चूल

चार दिसांचा संसार '


     नदीच्या काठानं मोहाचा बन बहरतं. कोरकूंना मोहाच्या दारूचं मोठं आकर्षण. मोहाची दारू (शिडू) म्हटलं की कोरकू फतकल मारून बसलेच समजा. हा त्यांच्या विरंगुळ्याचा, आनंदाचा क्षण. मोहाच्या फुलांचं कूट हे खाद्यान्न. डोंगर देवाचं हे उघडं धन. मोहाच्या फुलांनी वातावरण पार झिंगून जातं. याचं मोहक चित्र कवीनं मोठ्या ताकदीनं चितारलय.


'मोहाच्या फुलांची रानात दाटी

वेचता वेचता भरली पाटी

मोहाच्या फुलांची वेचली रास

पाटीला लागला मोहाचा वास! '


   नव्या कोऱ्या आगळ्यावेगळ्या प्रतिमासृष्टीतून कवीनं कोरकूच्या वास्तवदर्शी जीवनजाणिवा अविष्कृत केल्यात. यासाठी विविध छंदाचं, वृत्ताचं, घाटांचं प्रभावी योजन केलंय. त्यामुळं प्रत्येक कवितेचं सौंदर्य फुलून आलंय. या कवितांना करूण्याचा आंतरिक स्पर्श आहे. कोरकूच्या सनातन दुःखाचं कवीनं भरजरी लोकगाणं केलंय. जे चिरंतन टिकणार आहे. विषयाच्या अनुषंगानं शब्दांच्या अन् प्रयोगाच्या दृष्टीनं ही कविता लाखमोलाची आहे. त्यांच्या श्रेष्ठ काव्य सृजनाचं मूल्यमापन एका वृत्तपत्रीय परीक्षण सर्वांगानं करता येणे शक्य नाही. इतका त्याचा आवाका दांडगा आहे.


मेळघाटच्या कविता: (कविता संग्रह)

कवी: श्रीकृष्ण राऊत

प्रकाशक; संवेदना प्रकाशन

पृष्ठे: १०४ मूल्य: १५०

( दे. सामना / मुंबई / दि. १६ ऑक्टो.२०२२ )




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा