मेळघाटच्या कविता - दा.गो.काळे


 कवी,गझलकार श्रीकृष्ण राऊत यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला कविता संग्रह वाचला.ते सुप्रसिद्ध कवी,प्रयोगशील गझलाकार आहेत.त्यांनी चित्रपट माध्यमासाठी गीतं आणि तब्बेतीने मैफली सजविणा-या गझला लिहिल्या आहेत.सुरेश भटांच्या गझलांचा अवकाश विस्तारत असताना,त्या वर्तुळात अनेकांनी आपल्या गझला लिहिल्या,आणि एका प्रतिभाशाली गझलवंताला ख-या अर्थाने अभिवादन केले.याही पलीकडे गझलेला आपल्या सहोदरांचा वारसा तेवढ्याच सन्मानाने पुढे नेऊन ख-या अर्थाने समकालीन करून नवी उमेद निर्माण केली.काही मोजक्या लोकांनी तिला नव्या जाणिवांतून प्रयोगशील केली.त्यात श्रीकृष्ण राऊत यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांनी गझल प्रकाराला नव्या स्वरूपात मैफलीच्या स्वाधीन केले आहे.

                शब्दांना संक्षेपात वापरणारा,त्यात समकालीन जिवंतपणा रूजविणारा शेरांचा एक प्रकार हल्ली खूप काही सांगून जातो.मला गझलेत गती नसली तरी,त्यातील गंभीरता आणि त्यातून निघणारा अर्थाचा झक्कन प्रकाश भावतो.अपेक्षाभंगातून सौंदर्य जाणीव लख्खन पुढे येते.अशा शेरांचा एक प्रकार ही मंडळी रूजवत आहेत.ही प्रयोगशील घटना आहे.

" कधी आसूड पाठीवर l कधी पोटावरी लाथा l कधी या चंद्रमौळीच्या l दिव्यांना झोंबतो वारा l

असे काहीसे तुकडे आजच्या वास्तवाचे चिंतनही करायला भाग पाडतात.ही गझलेमधून प्रस्पृटणारी सामाजिक बांधिलकी म्हणता येते.त्यादृष्टीने हा जपलेला,अर्थपूर्ण जाणिवांनी पुढे होणारा प्रवास या लोकांनी ख-या अर्थाने लोकघाटी केला आहे.गझल ही खरे तर आपल्यात जमा झालेल्या भावनांची सर्जनशील अशी देवाणघेवाण आहे.वास्तवाला साक्षीला ठेऊन केलेला सौंदर्यपूर्ण वार्तालाप आहे.या सगळ्यांना सोबत घेऊन आजची गझल नव्या वाटा शोधत आहे.या पार्श्वभूमीवर त्यांची कविताही अत्यंत महत्वाची म्हणता येईल.

                   आदिवासी जनप्रवाहाशी नाते म्हणजे  उघड्या,पाण्यासारखी निर्मल अशी संस्कृती जपणे होय.ही संस्कृती जपण्यासाठी आपल्या कवितेच्या  माध्यमातून गीतात्म अशा संवेदनांचा स्वर रूजवला आहे.हा कवितेचा स्वर एकटा वाटत नाही.या कवितेतील गीत संकल्पनेला Solo song चे प्रातिनिधीक असे स्वरूप प्राप्त होते.ती कविता एकट्याची राहत नाही.तिचा विस्तार त्यांच्या चालीरीती,परंपरातून एका खुल्या स्वतंत्र संस्कृतीचा निर्देश करतात.त्याला आपोआपच एका समूहाच्या आवाजाचे अस्तर प्राप्त होत जाते.कारण ही कविता त्यांच्या दररोजच्या जीवनातील असण्याची लय पकडतांना दिसते.त्या लयी प्रत्यक्षपणे श्रमजाणीवांमधून श्रमपरिहारापर्यंत आपल्या अनुभव संचितातून सहज प्राप्त झाल्या आहेत.मग त्या नृत्यातून येतात,समारंभ अथवा धार्मिकतेच्या परंपरागत चालीरूढीतून येतात.ही सामूहिक अस्तित्वभानाची उघड लय या कवितेने आपल्या शब्दात पकडण्याचा प्रयत्न या कवितेत केलेला आहे.

l डोंगरदेवाचं उघडं धन l रस्त्याच्या काठानं मोहाचं बन, l मोहाच्या फुलांचा चाकानं चुरा l मोटर हाणतो जांगडी बुरा. l मोहाच्या फुलांची उघडी रास l वा-याला लागला मोहाचा वास. l

                    ही या कवितेतील केवळ सामूहिक संवेदनाच नाहीतर,या कवितेच्या माध्यमातून वर निर्देश केलेल्या त्यांच्या उघड्या संस्कृतीचे सुचनही होते.ही संस्कृती जपावी लागत नाही.कुलूपबंद पहारे नाहीत.संस्कृतीचे रक्षकही तेथे नाहीत.शोषणाचे मूळही कोठे जन्म घेत नाही.वा-याच्या संयोगाने सहजपणे जनमानसात,सामान्यापर्यंत ती पोहचत जाते.तिच्या असण्यात कठोरता नाही.निसर्ग नियमांप्रमाणे ती उगवते,रूजते, विलय हा प्रकृतीचा धर्म असला तरी,वारंवारीता ही तिच्या अस्तित्वाची लय आहे. गाभा आहे.लोकानुकंम्पेच्या आधाराने तिचे असणेही सुकर होत गेलेले आहे.जन्म,विकास आणि विलय हा तिचा नियम असला तरी,ती जीवनदायीनी आहे.त्यामुळेचजगणे अजूनही थांबलेले नाही.असे म्हणता येते.आदिवासी संस्कृती लहान मुलांसारखी निरागस आणि अल्लड आहे.निसर्गातील गंध व ध्वनी ही तिच्या अभिव्यक्तीची प्रारूपे आहेत.तिचा -हास म्हणजे संबंध मानवी जीवनासाठी पर्यावरणाचा नाश होय.त्या संस्कृतीला जपण्याऐवजी  मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांचे स्थलांतर व भिकेला लावण्याचे प्रयत्न होत आहेत.


वाघासाठी घर हवे,l गाव तुझे खाली कर l पोट बांध पाठीवर,l शहराची वाट धर.l चिल्यापिल्यांसाठी खोपा l झाडाखाली कर बापा.l मालकाला एक साथ l तिचे--तुझे वीक हात l


          ह्या शोषणाकडे,गुलामीकडे पुन्हा घेऊन जाणाऱ्या तथाकथित संस्कृतीच्या त्यांच्यातील व्यवस्थेच्या वाटा आहेत.त्या वाटांचा अर्थपूर्ण निर्देश करीत ही कविता पुढे जाते.त्यांच्या सामाजिक उत्थानासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे परिणाम चांगले नाहीत.त्यात असलेली निःसत्त्वता अधिक शोषणाकडे जात आहे.उभारण्यात आलेल्या अंगणवाड्या,पुरविल्या जाणारा पोषण आहार,रोजगार हमीच्या नावाखाली होत असलेला भ्रष्टाचार या कवितांमधून सहजपणे येताना दिसतो.त्यांच्या अज्ञानातून येथील व्यवस्थेला अर्थाजर्नाचा मार्ग गवसतो.

" शाईतून कसा l फेकला फासा; l उठला ठसा, अंगुठा फसा.l

l जिंदगी डोंगर l कमाई उंदीर l पोटातली गार l बुजंना बुजंना l

ही त्यांच्या आजच्या वास्तवाची खरी हकीकत आहे.त्यांच्या दैन्य दुःख दारिद्रयाची होरपळीची ही गाथा आहे.त्यांच्या आजच्या अवस्थेची कवीने काढलेली श्वेतपत्रिका असेही म्हणता येते.त्यांच्यात असलेल्या कलागुणांचा,मोहफुलांच्या सुगंधाने तल्लीन होऊन प्रकृतीची पूजा करणाऱ्या सहोदरांचा -हास आपण उघड्या डोळ्यांनी अनुभवत आहोत.ही खरी आजची शोकांतिका आहे. l पावसाच्या घाती l अस्वलाची नखं; l तसं मुकं दुख.l या अवस्थेतून आदिवासींचा काफीला नव्या जागतिकीनोत्तर एकरेषीय संस्कृतीकडे जात आहे.आपले वनाधिकार,अमर्याद निसर्गाच्या स्वातंत्र्याला पारखे होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.त्यांना कॕशलेश,समूहापासून वंचित करीत त्यांच्या पारंपरिक कलांचे काॕपीराईटस् पळवून त्यांच्या बाजारीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.ही गोष्ट येथे प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे.आदिवासींच्या कला जेवढ्या आनंदभाविनी होत्या,तेवढयाच ताकदीने जीवनाकडे जाणाऱ्या होत्या.त्यात दुहेरी आनंदाच्या च्छटा दिसतात.त्यात आनंदासाठी निर्मिती आहे.कारण आनंद आपोआप येत नाही.आनंद निर्माण करावा लागतो.तो निर्माण करण्यासाठी सर्जनशीलतेची जोड हवी असते.हा सगळा कला व्यवहार आदिवासींनी आपल्या कष्टाशी,श्रमपरिहाराशी अलगदपणे जोडला आहे.म्हणून श्रमातून प्रकटणारे सौंदर्य त्यांच्या अभिव्यक्तीचे अभिन्न असे अंग ठरते.

               यादृष्टीने विचार केल्यास श्रमजाणीवांमधून आलेली अनेक सौंदर्यस्थळं या कवितेत विखुरलेली आहेत.म्हणजे श्रमाचा आणि सौंदर्य जाणीवांचा एक कलात्मक मेळ आदिवासींच्या असण्यात आणि जगण्यात बेमालूमपणे रूजला आहे.ही त्यांच्यात आलेली इनबिल्ट अशी प्रकृतीने निर्माण केलेली गोष्ट आहे.आपल्या हालचालीत,पेहरावात,दागदागीण्यातून उमटणा-या किनकिनाटात सतत सौंदर्यभावनांजवळ रेंगाळणा-या जागा आहेत.त्यांच्या वापरांच्या नेहमीच्या वस्तू त्याच्या रूपातूनही भावना जागृत होताना दिसतात.त्या अनुभवाव्या लागतात.

" लखलखतात हांडे l पिवळेधम्मक, l सावळ्याशा मुखावर l सांडते चमक l


" कांकणाची किणकिण l खिराडीचा नाद, l सात बैनांच्या चोचीत l डुचमळे साद l


" चढणीला पाठ भिजे l ओसंडतो ऊर, l झोपडीत तान्हा बाई l रडतो वं दूर l

                अशा अनेक सौंदर्यपूर्ण घटितांमध्ये आदिवासींच्या जीवनाची ओढ लपलेली आहे.ती शोधन्याचे काम आपल्या कवितेतून श्रीकृष्ण राऊत यांनी आत्मीयतेने केलेले आहे.या सगळ्या भान-अभावातून त्यांची सुखं आणि दुःखाचे दोन्ही पदर आपल्या सौंदर्य जाणीवांमधून कवितेत आणले आहेत.ह्या गोष्टी आपलेपणाने समजून घेण्यासाठी त्यांच्या या संग्रहातील " जंगलाच्या पाखराचं उदासलं मन " ह्या मनोगतातून त्यांच्या असतेपणाची आणि आजच्या व्यवस्थेत त्यांच्या नसतेपणाची काव्यमयता मनन करण्यासारखी आहे.खरे तर या कवितेच्या आत जाण्यासाठीचे आपल्यासाठी दार आहे.त्यातूनच या कवितेचा उगम आहे.

.

■ मेळघाटच्या कविता

■ संवेदना प्रकाशन, पुणे 

■ मूल्य रू.१५०

-------------------------------

■ 'सर्वधारा '

ऑक्टो. -नोव्हे.-डिसें.२०२२

........................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा