□
'मंबाजी ' चे रसग्रहण
□□
□ गझलगंध उपक्रम □
दि.११/११/२२
नमस्कार गझलरसिकहो!
आजच्या गझलगंध उपक्रमात मी रसग्रहणासाठी निवडलेली अतिशय आशयसंपन्न गझल आहे आदरणीय श्री.श्रीकृष्ण राऊत सरांची!खूप गहन असा सामाजिक आशय असलेली ही रचना मला वाचताक्षणीच खूप आवडली.आज ह्या रचनेचं रसग्रहण करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे.
□ आजची गझल □
मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी
खिशाच्या आत घालूनी विठू नेतात मंबाजी
.
तुम्हाला हालता यावे, न साधे बोलता यावे
पवित्रे टाकुनी ऐसे धरी पेचात मंबाजी
.
कुमारी पाहिजे कन्या,तशी चालेल प्रौढाही
असे कंत्राट सौख्याचे सदा घेतात मंबाजी
.
मला भंडावती येथे,तुलाही गांजती तेथे
पसरले दूरवर माझ्या-तुझ्या देशात मंबाजी
.
अहो ज्ञानेश्वरा, टाका जुन्या ओव्या दुरुस्तीला
फुकाचा मारुनी रंधा इथे देतात मंबाजी
.
तुकारामा,अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा
मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी
.
□ श्रीकृष्ण राऊत
.................................
मंबाजी!संत तुकारामांच्या काळात धन आणि बळाच्या जोरावर समाजातल्या दुर्बल घटकांना वेठीस धरणारा एक समाजकंटक,संतवृत्तीच्या माणसांविरुद्ध लोकांना भडकवणारा एक दुरात्मा!त्याचे कारनामे आज चारशे वर्षं लोटली तरी सर्वांनाच माहीत आहेत!काळ बदलला असला तरी असे अनेक धनदांडगे सामान्य माणसांना हातोहात वेठीस धरतात आणि अंगी कर्तृत्वहीनता असूनही उजळ माथ्याने आपल्या अवतीभवती वावरत आहेत ही वस्तुस्थिती आहे.मंबाजी हा या साऱ्यांचा प्रतिनिधी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अशा मंबाजी वृत्तीच्या लोकांच्या काळ्या कृत्त्यांवर शाब्दिक प्रहार करणारी राऊत सरांची ही रचना असून प्रत्येक शेर मनाला भिडणारा आहे!आता आपण यातल्या प्रत्येक शेराच्या मला उलगडलेल्या आशयाकडे वळू.
□ शेर क्र.१ □
मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी
खिशाच्या आत घालूनी विठू नेतात मंबाजी
मतल्याचा हा शेर अत्यन्त प्रभावी असून त्यातला 'पुन्हा ' हा शब्द काळ कोणताही असला तरी मंबाजी वृत्तीचे लोक जगात आजही वावरत आहेत हे दर्शवतो.पंढरीचा विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत.भक्तीच्या पायवाटा तुडवत भोळे भक्तजन मैलोमैल अंतर चालून त्याच्या भेटीला येतात आणि आपल्या दुःखांची गाऱ्हाणी त्याच्यापुढे मांडतात हे खरं असलं तरी पूर्वीसारखं सहज सोप्या पद्धतीने विठ्ठलाचं दर्शन त्यांना होतं का हो?दर्शनासाठी उभ्या असलेल्या लोकांना 'विक्रय चाले देवपणाचा ' हाच अनुभव बव्हंशी येतो हे सत्य आहे.विठोबाचं दर्शन करवून देणारे दलाल तिथे इतस्ततः फिरत असतात.त्यासाठी एखादा मठ स्थापन करतात,आपणच प्रतिविठ्ठल आहोत असंही भासवतात किंवा ठराविक रक्कम लाटून देवाचं दर्शन लोकांना घडवतात हे ढळढळीत वास्तव आहे.पूर्वीचा मंबाजी संतांच्या भोळ्या भक्तीला स्वमहात्म्याने नाडत होता तर आताचे मंबाजी पैसे लाटून विठ्ठलाचा बाजार मांडतात...परिस्थिती बदललेली नाही हेच खरं!
देवलांच्या शारदा नाटकात 'जरि वरुनि धुवट सोवळा।घालिसी गळा।माळा रुद्राक्षांच्या खळा ' अशा रूपातले अनेक नवनवे साधू आणि बुवा समाजात माजलेत हेही या शेरातून सुचवायचं आहे असं मला वाटतं!
□ शेर क्र.२ □
तुम्हाला हालता यावे न साधे बोलता यावे
पवित्रे टाकुनी ऐसें धरी पेचात मंबाजी
संत तुकोबांनी म्हटलंय तसं 'ऐसे कैसे झाले भोंदू।कर्म करुनी म्हणती साधू ' अशा वृत्तीचे अनेकजण आज समाजात उदयास आले आहेत,येत आहेत.ते गोड बोलून सामान्य लोकांची बोलती बंद करण्यात तरबेज असतात.आपल्या गोड गोड बोलण्याच्या जाळ्यात ओढून तुमच्याच पैशाने वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या लढवून तुम्हालाच पेचात टाकण्याची त्यांची वृत्ती दुसऱ्याला देशोधडीला लावण्याचीच असते हेच या शेरात सुचवायचं असावं!
□ शेर क्र.३ □
कुमारी चालते कन्या,तशी चालेल प्रौढाही
असे कंत्राट सौख्याचे सदा घेतात मंबाजी
अहाहा!हा तर समाजातले बुवा आणि महाराज यांच्या कृष्णकृत्यांवर थेट संधान साधणारा शेर आहे! 'राम मुखी बगलेत सुरी ' असाच ज्यांचा ढंग आहे त्या स्त्रीलंपट आणि भोगविलासी लोकांवर हा शेर थेट भाष्य करतो. 'तो मी नव्हेच ' नाटकातला राधेश्याम महाराज आठवला मला हा शेर वाचताना.वरून खूप सात्विक सोज्ज्वळ असल्याचा आव आणून समाजातल्या निष्पाप माता- भगिनींना सुखाने न जगू देणारे पाखंडी लोक अवतीभवती कमी नाहीत!स्वार्थ आणि सुखलोलुपता यासाठी ते कोणत्याही थराला जातात अगदी स्वतःच सौख्याचं कंत्राट घेतात आणि लोकांची दिशाभूल करतात हे वास्तव समोर ठेवणारा हा शेर डोळ्यात अंजन घालणारा आहे असं मला वाटतं.
□ शेर क्र.४ □
मला भंडावती येथे तुलाही गांजती येथे
पसरले दूरवर माझ्या-तुझ्या देशात मंबाजी
हाही खूप परिणामकारी शेर!वैश्विक आणि राष्ट्रीय ऐक्याच्या गप्पा आपण सारेच खूप मारतो पण हे ऐक्य वैश्विक शांतता,सामाजिक ऐक्य, जे लोकांच्या हिताचं आहे त्याबाबतीत अभिप्रेत आहे पण या शब्दांचा नेमका चुकीचा अर्थ घेऊन देशात किंवा जगात कुठेही जा,सामान्य गोरगरीब,अबला यांना नाडणाऱ्या, गांजणाऱ्या लोकांची एक बंडखोर फळी तयार होऊन नको त्या बाबतीत ऐक्यभावना जागवतात ज्याचा उपद्रव सगळ्या समाजमनाला होतो!अशा लोकांचा अगदी जलदगतीने जगभर प्रसार होत असतो.खूपच सुंदर शेर!
□ शेर क्र.५ □
अहो ज्ञानेश्वरा,टाका जुन्या ओव्या दुरुस्तीला
फुकाचा मारुनी रंधा इथे देतात मंबाजी
वाह!किती हृदयस्पर्शी शेर आहे हा!
'जे खळांची व्यंकटी सांडो।
तयां सत्कर्मी रति वाढो।
भूतां परस्परे जडो।
मैत्र जिवांचे। '
असं पसायदान ज्ञानोबा माऊलींनी भगवंताकडे मागितलं.जगातले द्वेष,हेवेदावे नष्ट होऊन इथे विश्वकल्याणाची भावना रुजो, वर्धित होवो अशी प्रार्थना करून वैश्विक मैत्र जोडलं जावं हा व्यापक दृष्टिकोन मांडत जगाचं कल्याण भक्तीच्या माध्यमातून चिंतलं पण त्याचा बरोबर उलट अर्थ लावत आपापल्या परीने संतवाङ्मयाची विघातक आणि परस्परविरुद्ध अर्थ लावून त्या उच्च तत्वांची पायमल्ली करणारे लोक जगात निपजले आहेत ही शोकांतिका आहे. साक्षात ज्ञानेश्वरांनाच या शेरातून गझलकार सांगतायत की तुमच्या त्या दिव्य लेखणीतून साकारलेल्या ओव्यांना या नराधमांच्या लेखी काही अर्थ राहिला नाही!त्या विश्वकल्याणाची प्रार्थना करणाऱ्या ओव्या दुरुस्त करण्याची वेळ या आधुनिक संतांनी(की असंतांनी?) आणली आहे!प्रत्येकाने स्वतःचं वर्तन तपासून पहावं असं वाटण्यासारखा चिंतनीय शेर आहे हा!
□ शेर क्र.६ □
तुकारामा, अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा
मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी
सरांचा हा शेवटचा शेर तर खूपच दमदार आहे!संतमांदियाळीतल्या एका ज्येष्ठ श्रेष्ठ संत तुकारामांना 'जगद्गुरु ' असं आदराने संबोधलं जातं. 'सावळे सुंदर।रूप मनोहर 'असं भक्तवत्सल विठुरायाचं वर्णन अभंगांमधून करणारे तुकोबा समाजातल्या विघातक माणसांच्या बाबतीत
'भले तरी देऊ कासेची लंगोटी। '
'नाठाळाचे काठी हाणू माथा। '
असं छातीठोकपणे सांगू शकले इतकं त्यांच्या लेखणीचं सामर्थ्य. 'शब्दांचीच रत्ने ' प्रसवणारे तुकोबा नाठाळ लोकांना आपल्या शब्दांनी जोडे मारू शकतात इतकं त्यांचं संतत्व श्रेष्ठ होतं म्हणूनच गझलकार त्यांना विनवतात की अशा नाठाळांना शब्दांचे प्रहार करून तुम्ही ताळ्यावर आणा कारण तुमचा वसा चालवतोय असं वरवर दाखवत समाजात विपरीत गोष्टींना महत्त्व देत फिरणाऱ्या तथाकथित संतांचा सुकाळ आला आहे आणि त्यांना वठणीवर आणायचं काम केवळ तुम्हीच करू शकता!फार आवडला हा शेर!
___________
□ ही गझल मला का आवडली □
कवीच्या,गझलकाराच्या शब्दांचं सामर्थ्य काय असू शकतं याचा प्रत्यय शब्दागणिक येतो अशी ही उच्च तत्वांचा पुरस्कार करणारी आणि विघातक गोष्टींवर बोट ठेवणारी आ. श्रीकृष्ण राऊत सरांची ही रचना मुळात सुंदर आहेच पण त्यातून आजूबाजूला घडणाऱ्या अनिष्ट गोष्टींचं सूक्ष्म निरीक्षण करून काही वेगळा विचार दिलाय म्हणून मला ही रचना विशेषत्वाने आवडली.
'सत्तांध लोकांस देई धडे तो स्वये रोखुनी शब्दबाणांसही '
असं कवीच्या लेखणीच्या सामर्थ्याचं वर्णन करणारी माझ्याच कवितेची ओळ मला आठवली.स्वतःच स्वतःच्या वर्तणुकीचं परीक्षण करावं असं कुणी ही रचना वाचली तर वाटू शकतं म्हणूनच वाचताक्षणीच यावर काही लिहावं असं मला वाटलं!
........................
□ या गझलेतली सौंदर्यस्थळं □
श्री.राऊत सरांची ही गझल 'वियद्गंगा ' वृत्तातली असून प्रत्येक शेर सशक्त आहे. 'मंबाजी ' हा रदिफच सद्य सामाजिक स्थिती,विचारप्रवृत्ती आणि अनिष्ट गोष्टींचं वाढलेलं प्रस्थ याचा निदर्शक आहे.बुवाबाजी,ढोंगबाजी,अविचार यांच्या पायावर आधारलेल्या जीवनपद्धतीवर प्रकाश टाकताना मठ,पवित्रे, कंत्राट,रंधा,दुरुस्त्या पैजारा,मुखोटे अशी विविध प्रतीकं या रचनेचं सौंदर्य अधिकाधिक खुलवतात.
'येतात,नेतात,पेचात, घेतात,देतात,वेषात ' हे खरं तर सहज रोजच्या वापरात येणारे क्रियावाचक शब्द पण त्यांचा काफिये म्हणून केलेला चपखल वापर हा आम्हा नवोदितांसाठी अभ्यसनीय आहे आणि यातून खूप शिकण्यासारखं आहे!
सरांच्या काव्य आणि गझलप्रतिभेला मनःपूर्वक नमस्कार!"👏
------------
एक विद्यार्थिनी या भूमिकेतून मी श्री श्रीकृष्ण राऊत सरांना या रचनेचं रसग्रहण करू का असं विचारताच त्यांनी मला त्वरित परवानगी दिली आणि माझ्या कुवतीप्रमाणे मी प्रत्येक शेर अभ्यासून त्यावर मला भावलं ते मांडण्याचा प्रयत्न केलाय.अधिक मार्गदर्शन जाणकार करतीलच.
मला रसग्रहणाची संधी दिल्याबद्दल मी उपक्रम संयोजक,आयोजक,समन्वयक आणि मार्गदर्शक व गझल मंच पदाधिकारी यांना मनापासून धन्यवाद देते!👏
□ © अर्चना देवधर, रत्नागिरी
..................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा