॥ 'तुको बादशहा' बद्दल ॥
॥ १ ॥
.
माझा मित्र कविवर्य श्रीकृष्ण राऊत याचा "तुको बादशहा "हा अभंग संग्रह नुकताच प्राप्त झाला. तुकारामानंतर अभंगाचा वारसा चालविणारा हा एकमेव कवी.त्याला शुभेच्छा।
.
देहूच्या गादीचा
धन्य तू वारस
वाढविसी वंश
तुकोबांचा
.
वोविला अभंग
श्वासो श्वासी येणे
केवढे देखणे
आर्त केले
.
काळजाचा टाक
रगताची शाई
"तुको बादशाही "
जन्मे तेव्हा
.
- सुखदेव ढाणके
.
॥ २॥
.
'तुको बादशहा ' : संतोष पद्माकर पवार
.
प्रस्तावना न वाचता आधी फक्त कविता वाचली, अप्रतिम शब्दकळा, अभंग छंदही आपल्या प्रकृतीला साजतो, अभंग लयीला नवी जीवनदृष्टी प्रत्ययास येते... तुकाराम कबीर, रोहिदास, पंढरपूर, यांच्या दर्शनासोबत समाजजीवन, लोकशहाणपण, समंजस आणि आधुनिक दृष्टी देणारे अभंग खूप भावतात, ओघवतेपण हे या लेखनाचे वैशिष्ट्य ! भाषा अगदीच मध्ययुग ते आतापावेतो जोडणारी...
.
कॅरमची गोटी
सिधी पाकिटात
तसा हृदयात
येई देवा
अशा ओळी नास्तिक असूनही भावल्या
.
नावाचेच काय
नारायण तेल
दूर कै करील
वातरोग ?
असल्या ओळी मनात घर करतात, तुकोबांच्या शब्दांशी साधलेली तादात्मता ठायी ठायी प्रत्ययाला येते... वाचून भरून पावलो...
.
वाचूनिया तुझी
ही अभंगवाणी
तृप्त मनीकानी
झालो देवा
तुकोबाशी तुझी
जुळलेली नाळ
त्याचेच आभाळ
मेळविले
वाचुनी गझला
केलेते शहाणे
आता अभंगाने
धन्य झालो
.
श्रीकृष्ण नावाच्या
दाविल्यास लीळा
राऊत साजला
पालखीत
.
मराठीच्या दारी
एक तुझी पाटी
लिहिली स्व हाती
कवितेची
...........................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा