खूप दिवसांत इतकं विशुद्ध काव्य अनुभवायला मिळालं आहे. - ऐश्वर्य पाटेकर

 □



दि. १९ फेब्रुवारी २०२३ 

.

तीर्थरूप डॉ. श्रीकृष्ण राऊत  सर 

आपला ‘मेळघाटच्या कविता’ कवितासंग्रह वाचला.

गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे आपल्या कवितेचा यज्ञ अव्याहतपणे सुरु आहे. 

नाविन्याचा ध्यास आपल्या अभिव्यक्तीला लखलखीत ठेवतो आहे.

आपली गझलेने, निखळ कवितेने मराठी काव्यप्रवाहाच्या कक्षा रुंदवल्या आहे. 

आपली असीम नम्रता या सगळ्याच्या तळाशी आहे; अर्थातच याचे श्रेय तुम्ही घेणार नाही.

कुठल्याही वादात न पडता आपली काव्य निर्मितीची साधना आपण कसोशीने जपली  आहे. 

आपल्या निर्मितीचे मला विशेष अप्रुप आहे.

कवितेला आपल्या कह्यात घेऊन तिला रंग रूप लय नाद मुक्तछंद 

इत्यादी हरतऱ्हेचे अंगडे-टोपडे आपण घातले आहे.

मेळघाटच्या कवितेवर मराठीतील प्रख्यात समीक्षक डॉ. किशोर सानप यांनी केलेलं भाष्य 

अतिशय अभ्यासपूर्ण आणि आपल्या कवितेला उचित न्याय देणारं ठरलं आहे.

मेळघाटचा भोवताल, मेळघाटचा निसर्ग, मेळघाटचा माणूस, मेळघाटची भाषा,

मेळघाटच्या माणसाचे  रूढी - संकेत यास आपली अभिव्यक्ती पुरून उरली आहे. 

लयकाव्याचा जो आविष्कार आपण मांडला आहे; त्यास तोड नाही.

कवितेच्या उमेदीच्या काळापासून मी ज्या हरतऱ्हेच्या लयकाव्याचा आस्वाद घेतला आहे 

त्या सगळ्या लयी आपल्या मेळघाटच्या कवितेत एकवटल्या आहेत..

खूप दिवसांत इतकं विशुद्ध काव्य अनुभवायला मिळालं आहे.

लयीच्या नादात जराही कुठे तीळभर आशय हरवला नाही. दर कवितेत लयीबरोबर आशय ठसठशीत झाला आहे.


'पाढे  वाच पाढे 

चार चणे खाय 

लेकी वनवासी 

शाळा शिकून जाय.


कशी येऊ सांग

घरी नाही कोणी;

किती काढू काटे 

पाय अनवाणी.


झोपडीही नाही 

कुठं राहू दादा ?

आडोसाही नाही 

कुठं न्हाऊ दादा ?”


शिपायाच्या घरी 

देतो जागा तुला;

रातभर हाडं 

तिथं टाक फुला.”


कोण खाते बाई 

रोज खिरापत 

वाघुळात ससा 

तशी तुझी गत! '


हे फक्त एक उदाहरण आहे. अशा कितीतरी कविता आपल्या आशयविषयांनी मनोहर उतरल्या आहे. मराठी काव्यप्रवाहात  एखाद्या समाजाचा असा काव्यात्म ऐवज हा पहिल्यांदाच आला आहे. त्यामुळे याचे मोल खूप आहे. निश्चितच आपल्या कवितेने मराठी कविता समृद्ध होणार आहे. असे जाणवल्यावाचून राहत नाही..

खूप दिवसांत इतकी चांगली कविता वाचायला दिली त्यामुळे आपले खूप आभार..


कळावे आपला 

ऐश्वर्य.

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा