मेळघाटच्या कविता : कोरकूंच्या जगण्याशी तादात्म्य पावलेल्या मनाचा कारुण्य पाझर! : अशोक नामदेव पळवेकर

कविवर्य श्रीकृष्ण राऊत हे १९७५ नंतरच्या काळातील एक समकालीन व प्रयोगशील कवी आहेत. अलीकडेच पुण्याच्या संवेदना प्रकाशनाकडून प्रकाशित झालेला त्यांचा 'मेळघाटच्या कविता' हा कवितासंग्रह त्यांनी मला पाठवला. कवितासंग्रह : १. रचना, आणि २. निर्मिती -ह्या दोन्ही अंगांनी दर्जेदार व अप्रतिम आहे.


या कवितेतील सौंदर्यभावना एवढी मोहक आहे, की तिने एका बैठकीत या सर्व कविता वाचून काढल्याशिवाय मला स्वस्थ राहू दिले नाही.  


मेळघाटातील कोरकू आदिवासींच्या जगण्यातील सर्व ताण-तणाव आणि सर्व ताणे-बाणे या कवितेत अगदी सहजीभावाने उतरलेले, प्रकट झालेले आहेत. खरेतर, ही कविता म्हणजे मेळघाट परिसरातील कोरकू आदिवासींच्या जगण्याशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचा कारुण्य पाझरच आहे! म्हणूनच ही कविता नितळ, स्वच्छ व पारदर्शक भावजाणिवेची नितांत सुंदर भावाभिव्यक्ती आहे. 


ही भावाभिव्यक्ती 'जीवनलहरी', 'पादाकुलक', 'परिलीना', 'शुद्धसती', 'शुक्रकला' 'चंद्रभागा', 'लवंगलता' अशा वेगवेगळ्या छंदांमध्ये बद्ध असून काही कवितांच्या रचनेत दोन छंदांचा मिश्र प्रयोगही राऊत साहेबांनी केलेला आहे. तोही वाखाणण्याजोगा आहे. हे सर्व छंद जसे अभिजात आहेत, तसेच ते लोकजीवनातले लोकछंदही आहेत. सोबतच कोरकू या आदिवासी जमातीचे भावविश्व मांडताना मराठी + वऱ्हाडी + कोरकू + हिंदी या भाषांच्या संमिश्र भाषिक रुपाचा केला गेलेला प्रयोगही अत्यंत जबर व मोहक आहे. खरे म्हणजे ही 'लोकधाटी काव्यरचना' आहे! या कवितेतील कारुण्यभाव अस्सल आहे. म्हणूनच तो स्वाभाविक आहे. 

••

डॉ. अशोक नामदेव पळवेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा