ईश्वर मृतात्म्यास शांती देवो ! : श्रीकृष्ण राऊत

 


किशोरची आणि माझी मैत्री गेल्या सत्तेचाळीस वर्षाची. म्हणजे जवळपास अर्धशतकाची. प्रचंड वेगाने मानवी नात्यागोत्यांचं व्यावसायीकरण होण्याच्या आजच्या काळात दोन जीवांचे असे मैत्र कठीणच नाही तर अशक्य आहे.


मन आणि डोळे आठवणींनी तुडुंब भरलेत.किशोर सोबत जगलेल्या अर्धशतकाचा जीवनपट आठवणीत उलगडू लागला.


१९७६ ला अकोल्याच्या श्री शिवाजी महाविद्यालयात

मी एम्. कॉमला प्रवेश घेतला. तिथल्या वर्गमित्रापैकी किशोर सानप, पुष्कराज चित्ते साहित्याच्या आवडीमुळे जानी दोस्त झाले. वसन्त वाहोकार, मधु जाधव ही मंडळी आम्हाला सिनिअर होती. अरविंद विश्वनाथ, पुरुषोत्तम बोरकर हे सीताबाई कॉलेजचे संगीसाथी होते. 

पुढे प्रत्येक जण आपापल्या वाटेने वेगवेगळ्या दिशांना पांगले. ह्या मंडळीपैकी आधी पुरुषोत्तम गेला. आता किशोर.


किशोर आणि मी थोडसं मागे पुढे एम.कॉम -एम.ए केलं. अमरावतीला किशोरने बी.एड.केलं तिथेही अकोल्याचे के.एन. देशमुख, तेल्हाऱ्याचे खारोडे असे जीवलग मित्र त्याने जोडले. नंतर वर्धा येथे जी. एस. कॉमर्सच्या ज्युनियर कॉलेजमध्ये त्याला नोकरी मिळाली. भालचंद्र नेमाडेंच्या साहित्यावर त्याने संशोधन करून पीएच.डी मिळवली. त्यानंतर कविता -कथा -कादंबरी -समीक्षा असं विपुल लेखन केलं.

अनेक पुरस्कार,मान- सन्मान मिळवले. हा सगळा प्रवास थक्क करणारा आहे.

तो सुरू होतो अकोल्यातल्या दीपक चौकापासून.ह्या चौकातल्या एका वाड्यातल्या कंपाउंड वॉलला लागून असलेल्या एकपाखी आऊट हाउसमध्ये सानप कुटुंब भाड्यानं रहायचं. चहाची हातगाडी हे त्यांच्या उत्पन्नाचं साधन होतं. वडील बाहेरगावी असले की किशोरच ती हातगाडी सांभाळायचा. कॉलेजही करायचा. किशोरसह तीन भाऊ, तीन बहिणी, आई - वडील आणि माझ्यासारखा एखाद्यावेळी मुक्कामी राहिलेला पाहुणा त्या घरात सहज सपादून जायचा. हातावरचं पोट असलं तरी हे कुटुंब मोठ्या मनाचं होतं.

आता वडील नाहीत.आई आहे.कर्ता-सवरता,एवढा मोठा नावलौकिक कमावलेला मुलगा तिच्या डोळ्यासमोर गेला. त्या माय- माउलीच्या मनाचं दुःख तिला ठाऊक की असेल कुठे तर त्या ईश्वराला माहीत.

एका बाजुला अत्यंत हलाखीची आर्थिक स्थिती आणि दुसऱ्या बाजुला उजव्या हाताला असलेला रायटर्स क्रॅम्प अशा दोन्हीवर  प्रचंड आशावादाने मात करीत किशोरने हा प्रवास केला आहे. रायटर्स क्रॅम्प मध्ये तर्जनी- मध्यमा आणि अंगठा ही तिन्ही बोटे करकचून पेनाला घट्ट पकडल्याशिवाय लिहिता येत नाही. लेखनाचा वेग अतिशय मंदावतो.अशा शारीरिक प्रतिकूलतेला जिंकून किशोर मोठा लेखक झाला ही गोष्ट केवळ अभिमानाचीच नाही तर कमालीची  प्रेरणादायी आहे. 

त्याला ज्या वेगानं सुचत होतं त्या वेगानं त्याला लिहिता येत नव्हतं. मग त्यानं गोदरेजचं एक जुनं टाइपरायटर घेतलं. घरच्या घरी चुकत-शिकत त्यानं टाइप रायटिंग सुरू केलं. त्यात चांगली गती मिळवली. तेव्हा कॉम्प्युटर आला नव्हता. पीएच.डीचा अख्खा प्रबंध, एम.फिलचे संपूर्ण डिझर्टेशन, बारावीची कॉमसची पुस्तके त्याने स्वतःच टाइप केली. पुढे कॉम्प्युटर आल्यावर त्याच्या लेखनाने चांगलाच वेग घेतला.

'पांगुळवाडा ' ही एका अर्थानं आत्मकथनात्मक कादंबरी आहे.अकोल्याच्या दीपक चौकातल्या त्या वाड्यात राहणाऱ्या बिऱ्हाडाचं मध्यमवर्गी  जीवन.अवतीभवतीचे  इरसाल नमुने.समाज व्यवस्थेतलं बापाचं स्थान. 'चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ' ही कव्वाली कायम गुणगुणणाऱ्या काकाची हॉटेल.हे सगळं उघड्या डोळ्यांनी टिपणारा नायक पुरुषोत्तम सांगळे हा किशोरच्या तारुण्याच्या उंबरठ्यावरचाच एक अवतार आहे. १९९४ साली आलेली ही कादंबरी बहुचर्चित राहिली. त्या आधी १९८५ ला त्याचा ' ऋतू ' कवितासंग्रह आला होता. पण 'पांगुळवाडा ' कादंबरीने त्याला खऱ्या अर्थानं लेखक म्हणून ठसठशीत ओळख दिली.  

किशोरला पीएच.डी मिळाल्यानंतर

त्या संशोधनाची तीन पुस्तके आली. भालचंद्र  नेमाडे यांची कादंबरी, भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा, भालचंद्र नेमाडे यांची कविता.या पुस्तकांनी

डॉ.किशोर सानप हे नाव मराठी साहित्य जगतात समीक्षक म्हणून प्रतिष्ठित झाले. त्यातल्या दोन पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाल्याने राजमान्यताही  मिळाली. 

'तिसऱ्या दर्जाच्या कवीला भविष्य असते परंतु समीक्षकाला मात्र काही मोजक्याच संधी असतात. '

हे शिष्टसंमत वाङमय तत्व त्यानं कधीच मानलं नाही.

कवितेची त्याच्या इतकी विपुल समीक्षा मराठी साहित्यात दुर्मिळच आहे.

'युगांतराची कविता ' हे पुस्तक त्याची साक्ष आहे.


मधल्या काळात संत तुकाराम महाराजांच्या गाथेने किशोरला झपाटले. मनोज तायडे सोबत त्याने ' तुकाराम :व्यक्तित्व आणि  कवित्व ' हे पुस्तक लिहिले.

हे पुस्तक अमरावती विद्यापीठात अभ्यासक्रमात लागले. २०१० मध्ये त्याची सातवी आवृत्ती प्रकाशित झाली.नंतर किशोरचा संत तुकाराम महाराजांचा विविधांगी वेध घेणारा ग्रंथ ' समग्र तुकाराम दर्शन ' आला. अभ्यासकांनी  त्याची योग्य दखल घेतली. ह्या ग्रंथाच्याही दोन आवृत्या प्रसिद्ध झाल्या. आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून किशोर नावाजला.  तुकोबारायाच्या अभंग गाथेचा समग्र अभ्यास मांडणारे पाच खंड त्याने संकल्पित केले होते. त्याचा संकल्प पूर्णत्वास जाण्याआधीच त्याचे वैकुंठगमन झाले. 

त्याच्या 'भूवैकुंठ ' ह्या कादंबरीची नायिका कौसल्या. कादंबरीची पाठराखण करताना  तिच्या बद्दल मी लिहिले होते -

'पंढरीच्या वारीनं, सावळ्या विठ्ठलानं, संतांच्या अभंगानं, तिला दुभंगू दिलं नाही. सुखाची आवडी असलेल्या मनाला दुःखाचाही स्वीकार सहजभाव करायला शिकवलं. पाय घट्ट रोवून आयुष्यात खंबीरपणे उभं केलं. आणि अखेरीस, संसाराच्या भवतापातून मुक्तही केलं. '

किशोरच्या समरसतेने जगण्याच्या तत्वज्ञानाचे सार याहून वेगळे नाही.


प्रल्हादराव - मुक्ताबाई यांचा ज्येष्ठ पुत्र, नंदा, सुनंदा, श्रद्धा,अरूण, संजय ह्या भावंडांचा थोरला बंधू, कविताबाईचा पती, डॉ. ऋचा -डॉ. ऋजुता  ह्या कन्यांचा पिता, डॉ. सचिन चांगले -हर्षल झुंजारराव यांचा सासरा, चिमुकल्या दिविशाचा आजोबा 

म्हणून किशोरने प्रत्येक भूमिका जबाबदारीने  निभावली.

लेखक म्हणून एकोणतीस प्रकाशित, सतरा प्रकाशनाधीन, सात संकल्पित पुस्तकांची ग्रंथसंपदा आणि विविध प्रतिष्ठित साहित्य संस्थांचे एकतीस पुरस्कार   कमावले.


बहिर्मुखी व्यक्तिमत्त्व असल्याने त्याचा विविध क्षेत्रातला लोकसंग्रहही मोठा होता. सतत जिव्हाळ्याच्या माणसांच्या संपर्कात राहणे, अडीअडचणीत त्यांच्या कामी पडणे आणि प्रत्यक्ष किंवा फोनवर तासन्तास दिलखुलास गप्पा करणे, सकारात्मक उर्जेने त्यांना प्रेरित करणे किशोरचे व्रत होते. त्याचा एक संवाद माझ्या घरी सर्वांना पाठ झाला होता. तो म्हणायचा,

तुला सांगतो श्रीकृष्णा, आपण शेवटच्या श्वासापर्यंत काम करत रहायला पाहिजे !

स्वतःच्या बाबतीत त्यानं ते अगदी खरं करून दाखवलं.


उंचपुरा, धडधाकट, गोरापान,तरुणपणी राजबिंडा दिसणारा किशोरचा देह आयुष्याच्या उत्तरार्धात असाध्य व्याधींनी ग्रासला.डॉ.ऋचा, डॉ. सचिन चांगले यांनी स्वतःच्या 'निरामय ' हॉस्पिटलमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली.पण अखेर किशोर गेला.


किशोर सानपच्या 'पांगुळवाडा ' कादंबरीचा नायक आहे पुरुषोत्तम सांगळे.

किशोर गेल्याची बातमी वाचली अन् सर्वप्रथम आठवली ती  शब्दाशब्दातून मानवी जीवनाचे आर्त वास्तव मांडणारी पुरुषोत्तम सांगळेची प्रार्थना -


“ईश्वर मृतात्म्यास शांती देवो, जगणाऱ्यास दुःख देवो.”

('देशोन्नती ' स्पंदन पुरवणी / दि. २८ मे २०२३)

....................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा