तुको बादशहा : एका मुमुक्षुची गाथा : बाळ पाटील

 

'तुको बादशहा' हा जेष्ठ गझलकार डाँ श्रीकृष्ण राऊत रचित अभंगछंदातील  काव्यसंग्रह अवलोकन केला.संत तुकारामाच्या आचार विचाराने प्रभावित झालेला हा कवी तुकोबास आदर्शस्थानी ठेवून अभंगरुपाने व्यक्त झाला आहे.सुरूवातीलाच तो तुकोबाला मागणे घालतोय की,

तुको बादशहा I देई शब्दधन II

करी धनवान I  लेखणीला II

कवी स्वत: हे जाणून आहे की द्न्यानदेवापासून ते निळोबारायापर्यंतची ही जी संतपरंपरा या मातीत फुलत गेली,त्या मातीचा आपण अंश आहोत. मग तुकोबाराय तर माझ्या मनाला भावलेले संत आहेत,ज्यांनी मला सावरले अशी कवीची भावना आहे.तो म्हणतो,

तूच केले दूर

डोळ्याचे पडळ

अंतरीची कळ 

कळो आली

विठ्ठलाचे वेड लागलेला तुका प्रसंगी संसाराची होळी झाली तरी आपल्या ध्येयापासून च्यूत होत नाही.किंबहुना गाथेच्या ,किर्तनाच्या रुपाने समाजप्रबोधन करतो,या तुकोबाच्या संतत्वाने कवी प्रेरीत झालेला पहावयास मिळते

तुकाराम श्वास

तुकाराम ध्यास

सदा आसपास

तुकाराम

जिवनाच्या क्षणभंगुरतेची कविला तीव्र जाणीव आहे.त्याविखी तो सजग आहे.संसार हा दु:खमय आहे हेही त्याला उमगले आहे.तो म्हणतो...

सरो आले आता

श्वासाचे इंधन

दु:खाचे चुंबन 

घेता घेता

कविची विठ्ठल भक्तिची ओढ पदोपदी जाणवत रहाते.तथापि शारिरिक दुर्बलतेमुळे तो आता पंढरीस जाऊ न शकल्याचा खेद व्क्त करून तोच विठ्ठलाला येण्याचे फर्मान सोडतो, ते याच हक्काने की मी केवळ तुझा आहे व तुझीच भक्ति करतो

चोरलेस देवा

तूच माझे पाय

सांगतोस काय

नाचण्याला

धाव तूच आता

घेण्या माझी भेट

सोड सोड वीट

तातडीने

एकूण शंभर अभंगाच्या द्वारे कवी आपले अंतरंग ऊलगडवून दाविता झाला.संतसंगामुळे भौतिकतेचे वलय निघून जाऊन आंतरिक अनुभूतिकडे  वाटचाल करणारा कवी शब्दाशब्दातून आपला जीवनानुभव मांडताना दिसतो.जिवनाची नश्वरता त्याला क्षणोक्षणी बोचते.त्यातून केव्हा एकदा मुक्त होवू असे त्याला झाले आहे.मुमुक्षत्वा़ची ही भावना व्यक्त करताना तो म्हणतो...

किती काळ राहू

भाड्याच्या घरात

उबगले रात

दिस माझे

पण मग कवीला मोक्ष हवा आहे का?  स्वर्ग हवा आहे का?    तर नाही.मोक्ष फार असाध्य गोष्ट नाही कारण,'मोक्ष आम्हावरी I रुसोनिया गेलाI

आम्ही त्याच्या बा लाI घरिले हाती' असे मोक्षाचे खेळणे बनवणार्या तुकोबारायांचा तो स्वत: चेला आहे,त्यामुळे मोक्षाला तो भाळत नाही. जिवनाचे अंतीम ध्येय म्हणचे मोक्ष नाही हे त्याला पक्के माहीती आहे.आणि म्हणूनच 'तुको बादशहाच्या समारोपाच्या अभंगात त्याने घातलेली मागणी ही या अभंगसंग्रहाचा परिपाक होय,फलप्राप्तव्य होय.मानवी जिवनाची इतिकर्तव्यताच परमेश्वराच्या पायी भजनशीळअसणे,म्हणजेच मुक्तीचा सोहळा 'याची देही याची डोळा' अनुभवून कृतकृत्याची खटाटोप संपवूनही पुन्हा ईश्वराप्रती भजनशीळ असणे , जिवनाचे खरेपूर्णत्व हे अंगी देवत्व येवूनही देवाचा भक्त म्हणून नित्य  भक्तिरत असणे हे होय.असे भक्त देवाला फार आवडतात.मग अशांना देव चरणावर नव्हे तर डोक्यावर धारण करतात.भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात...

याहीवरी पार्था

माझ्या भजनी आस्था

तयाते मी माथा

मुकूट करी

प्रस्तुत कवीही तुकोबांना शेवटी साकडे घालून हीच रास्त ईच्छा प्रकट करतो...

तुका झालासे प्रसन्न 

माग म्हणे वरदान

असे नको काहीबाही

घाल विठ्ठलाचे पायी

.....सारांशाने एकंदर अभंगसंग्रह हा एका मुमुक्षुची गाथा म्हटले तर वावगे न ठरो.

कविने अगदि सहजसोप्या भाषेत अभंगाला साजेश्या भावात आपले मन व्यक्त केले आहे.आलेल्या अनुभवांना ,जाणिवांना संवेदनशिलतेने हाताळले आहे.कसलाही अधिकार नसताना माझ्यासारख्या य:कश्चितास श्री राऊत सरांनी प्रेमाने आपला अभंगसंग्रह पाठवून चार शब्द लिहिण्याची प्रेमळ अपेक्षा व्यक्त केली.लिहीताही झालो याच भावनेतून की सर्वकर्ती ' तूच 'आहेस मी केवळ निमीत्तमात्र लेकरू.इति शम.

चुकभूल द्यावी घ्यावी.

नम्र,

_बाळ पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा