मन करा रे प्रसन्न


''मला त्याचा मनातून अस्सा राग आला'' 
''खरंतर माझ्या मनात वेगळंच होत.'' 
''मनातल्या मनात मी त्याला शिव्या दिल्या.'' 
''तुझ्या मनात आहे तरी काय?'' 
''एकदाचं मन मोकळं करून टाक !'' 
''हे तर माझ्या मनीमानसीही नव्हतं. '' 
असे संवाद आपल्या कानावर वारंवार पडतात़  प्रियकर-प्रेयसी तर परस्परांची मनं काय जिंकतात.एकमेकांना आपली मनं काय देतात.एकमेकांच्या मनात घर काय करतात.  एकमेकांच्या मनात ठसतात काय ! असा सगळा मनोव्यापार प्रेमात चाललेला असतो. 
प्रीती आणि भक्ति या दोन अशा भावना आहेत की आपले प्रेयस आणि आपले श्रेयस आपल्या मनात त्यांचे देव्हारे थाटतात.
कला, साहित्य,शास्त्र इतकंच काय साक्षात परमेश्वर सुद्धा माणसाच्या मनाचीच निर्मिती होय.  तुकाराम महाराज म्हणतातच ना -
'मने प्रतिमा स्थापिली ।
मने त्याची पूजा केली.॥
माणसाच्या मनाने कल्पना केली. आणि त्यातूनच देवाची प्रतिमा साकारली. नंतर मनाने त्या प्रतिमेची स्थापना केली. आणि मनानेच तिची पूजाही केली. त्यातून मनाला एकाग्र करण्याचा उपाय शोधला. 
चंचलता हा मनाचा स्वभाव आहे़  वार्या्पेक्षाही वेगवान आणि पार्यामपेक्षाही धरायला कठीण असलेलं मन आहे तरी कसं ?प्राचीन काळातले सांख्य, पातंजली असे ऋषी आणि अर्वाचीन काळातले फ्राईड, युंग आदिंनी मनाचा अभ्यास केला. त्याचं विज्ञान शोधून काढण्याचा प्रयत्न केला.  त्याला ‘शास्त्र काटयाची कसोटी' लावण्याची कोशीस वेत्र्ली़  पण ते बेटं कसलं हार जातं! 
कला, शास्त्र, विज्ञान या प्रमाणेच योग आणि अध्यात्म ही देखील शेवटी मनाचीच निर्मिती. आणि निर्माता त्याच्या निर्मितीपेक्षा नेहमीच मोठा असतो. म्हणूनच तर आजच्या विज्ञान युगातलं आधुनिक मन दिवसेंदिवस अधिक अस्वस्थ होतं. आणि पुनःपुन्हा अध्यात्माकडे वळतं. 
‘टु बी ऑर नॉट टु बी.  दॅट इज द क्वेश्चन ! करू की नको ! असा दुभंगलेला हॅम्लेट प्रत्येकाच्याच मनात क्षणोक्षणी आपले नाट्य सादर करीत असतो. आपल्याला आपल्याशीच वाद घालायला लावतो.ह्या वादावादीतून कधी मनाशी संवादी सूर जुळतो.  तर कधी विसंवादी.  सूर संवादी लागला तर मनाशी आपली मैत्री होते. आणि विसंवादी लागला तर मनस्ताप होतो. 
हट्टी लहान मुलाला नेमकं तेच हवं असतं जे आपल्या घरात नसतं. मग ते रडून रडून सारं घर डोक्यावर घेतं.  त्याचं लक्ष त्वरित दुसर्‍या खेळण्यात गुंतवावं   लागतं.  तसंच मनाचं असतं.   मनाच्या विरुद्ध जरासं काही झालं तरी आपल्याला राग येतो. तेव्हा आपण काय करावं- तर मनातल्या मनात शंभरपर्यंत अंक मोजावे.   क्रोधाचा पारा हळूहळु उतरू लागेल. ताणलेले रबर सैल झाल्यासारखे आपल्याला जाणवेल. रामनामाचा जप करतांना देखील हेच होतं. 
आपल मनं प्रसन्न  असलं तर तोच असतो स्वर्ग आणि दुःखी मन म्हणजेच साक्षात नर्क.   म्हणूनच तर तुकाराम महाराज म्हणतात-
'मन करारे प्रसन्न  । सर्व सिद्धीचे कारण ॥'
________________________________________________________________
 २५ सप्टे.११ / लोकमत,अकोलाच्या ‘लोकधारा’पुरवणीतील माझ्या ‘दिंडी’ सदरातील लेख

1 टिप्पणी: