१.
मर्यादित प्रमाणात गझलांच्या वृत्तांना जातिरूप देणे
...........................
.
उर्दू-हिंदी गझलेच्या तुलनेने मराठी गझलांची वृत्ते अधिक शुद्ध स्वरूपात आढळतात. सुरुवातीच्या काळातील मराठी गझलरचनेतील शैथिल्य ध्यानात आल्याने अरबी-फारसी वृत्ते शुद्ध स्वरूपात मराठीत आणण्यासाठी 1922 ते 1933 या काळात माधव जूलियनांनी ‘गज्जलांजली’ लिहिली.
‘गज्जलांजली’च्या प्रस्तावनेत माधव जूलियन यांनी व्यक्त केलेले मत मात्र अधिक ग्राह्य वाटते. ते लिहितात - ‘‘या सा-या अरबी वृत्तांना जातिरूप द्यावे की नाही? पूर्णपणे जातिरूप दिल्यास रचना सुकर होईल, पण लगक्रमाच्या वैशिष्ट्यामुळे म्हणण्याला आपोआप जे वळण येते ते नष्ट होईल. ‘रसने न राघवाच्या’ हे मोरोपन्ती पद्य वा क्रमांक 28-33 व 51 या चुटक्यांतील रचनेप्रमाणे वृत्तांस मर्यादित जातिरूपत्व दिले तर ते इष्ट होईल.’’ माधव जूलियन (पटवर्धन) यांनी अरबी-फारसी वृत्ते शुद्ध स्वरूपात मराठीत उपलब्ध करून दिली. हे त्यांचे मराठी गझलला फार मोठे योगदान आहे. इतकेच नव्हे तर छंदशास्त्राच्या अत्यंत सूक्ष्मभेदांसह तपशीलवार मांडणी करणारा त्यांचा ‘छंदोरचना’ हा ग्रंथ मराठीत एकमेवाद्वितीय असा. त्यांच्या वरील विधानाची नोंद गंभीरपणे घेतली पाहिजे. मर्यादित प्रमाणात का होईना गझलांच्या वृत्तांना जातिरूप देण्याची एक सवलत माधव जूलियनांनी वरीलप्रमाणे मान्य केली.
.
२.
आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा
.........................
.
शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा’ असे सुरेश भटांनी आपल्या ‘गझलेच्या बाराखडी’त ‘महत्वाचे’ या शीर्षकाखाली नोंदविले आहे. म्हणजे वृत्तांच्या बाबतीत सुरेश भटांनी माधव जूलियनांच्या पुढे दोन पावलं टाकत गझलेतील शब्दरचनेच्या सहजतेचा विचार पुढे नेला आहे. सुरेश भटांनी स्वत: दहाबारा गझला मात्रावृत्तात लिहिल्या आहेत. म्हणजे मराठीतील गझललेखनाची प्रवृत्ती आशयाच्या सहज अभिव्यक्तीसाठी अक्षरगणवृत्तांकडून मात्रावृत्तांकडे वळत चालल्याचे दिसते. मनातला आशय शब्दांतून अभिव्यक्त होताना तंत्राच्या शुद्धतेने गुदमरून जात असेल तर ती तंत्रशुद्धता काही कामाची नाही हे नव्या गझलकारांच्या लक्षात आले आहे. गझलेतील काव्य वाचविण्याच्या दृष्टीने ही अतिशय चांगली गोष्ट आहे. उर्दू-हिंदी, गुजराती भाषेतील गझला वाचताना शब्दयोजनेची जी सहजता जाणवते त्याचे कारणही हेच आहे.
.
३.
.
शब्दोच्चार आणि उच्चाराचे वजन यामुळे अक्षरगणवृत्तांना मात्रावृत्तांचे स्वरूप येते.
...........................
मराठी गझल : १९२०-१९८५’ या पुस्तकातील पृ. क्र. ९३ वरील प्रा. डॉ. अविनाश कांबळे यांच्या पुढील उद्धरणाने तर त्याला पुष्टीच मिळते. ते लिहितात - ‘अरबी फार्सी वृत्तांमध्ये उर्दू गझल रचताना उर्दू गझलकारांनी त्या वृत्तांमधील लघु-गुरूचा विशिष्ट क्रम व संख्या ह्याकडे काटेकोरपणे लक्ष दिले नाही; तर शब्दोच्चार आणि उच्चाराचे वजन इकडेच फक्त लक्ष दिले. त्यामुळे मुळातील अक्षरगणवृत्तांना मात्रावृत्तांचे स्वरूप प्राप्त झाले. अशाप्रकारे उर्दूतीलच काय, पण हिंदी व गुजरातीतीलही गझल मात्रावृत्तात्मक झालेली आहे.’
.
४.
.
सहज अभिव्यक्तीच्या
तीन पद्धती
........................
.
रचना सहज होण्याच्या दृष्टीने वृत्तांच्या तीन पद्धतीचा अवलंब करता येईल.
१.एका गुरूच्या ऐवजी दोन लघूंचा उपयोग करून मर्यादित प्रमाणात अक्षरगणवृत्तांना जातिरूप करणे.
२.लघू-गुरूंचा विशिष्ट क्रम आणि त्यांची संख्या यांचा विचार न करणा-या मात्रावृत्तांत रचना करणे.
३.अक्षरगणवृत्तांत कविता लिहिणा-या पूर्वीच्या कवींना शब्दातील -हस्व स्वरयुक्त अक्षरे दीर्घ लिहिण्याची आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षरांना -हस्व लिहिण्याची जी मोकळिक होती तिचा अवलंब करणे.
ही मोकळिक कोणत्या स्वरांच्या बाबतीत किती प्रमाणात घेता येईल याचेही तारतम्य अर्थातच आशयसापेक्ष अपरिहार्यतेवर अवलंबून आहे.
.
५.
.
काही उदाहरणे
......................
.
-हस्व स्वरांचे दीर्घ रूपांतर :
'अरुज' म्हणजे उर्दू छंदशास्त्र. 'अरुज' नुसार -हस्व स्वरांचे दीर्घ रूपांतर करण्याची म्हणजे 'इजाफा ' करण्याची सवलत नाही परंतु मराठीत काही उदाहरणे आढळतात.
.
अ_ स्वर
.................
.
‘कळले’ या शब्दाचे ‘कळाले’ असे रूप अनेक गझलांत आढळते.
.
'दर्यात झोपलेल्या लाटांस ना कळाले
केव्हा तुफान झाले? तारू कधी बुडाले?
(माझिया गझला मराठी, खावर पृ. ३८)
.
उ_स्वर
................... ....
.
‘परंतु’ ह्या शब्दाचे रूप ‘परंतू’
.
‘झालो महाग एका थेंबास मी परंतू
माझी चढे रिकाम्या पेल्यास धुंद यंदा’
(एल्गार, प्र. आ. पृ. ५१)
अशात-हेने प्रमाण मराठीच्या शुद्धलेखनानुसार गद्यात -हस्व येणारी अक्षरे कवितेत दीर्घ स्वरूपात स्वीकार्ह समजली जातात.
काही शब्दांची रूपे मराठी भाषेत ऱ्हस्व आणि दीर्घ दोन्ही तऱ्हेने रूढ आहेत. उदा. नाजुक, नाजूक
'कविता ' हा शब्द मराठी गझलेत 'कवीता' असा आढळतो.
मराठी भाषेच्या प्रामाण्यानुसार तो अस्वीकृत ठरवावा की वृत्त सवलतीनुसार मंजूर करावा हा मतभेदाचा मुद्दा होऊ शकतो .
'कवि ' ' कृषि ' ही शब्दरूपे एकेकाळी शुद्ध समजली जायची.
आता 'कवी ' 'कृषी '
ह्या प्रमाणे शुद्ध समजली जातात .
.
दीर्घ स्वराचे -हस्व रूपांतर
..........................
'अरूज ' नुसार ह्या प्रकाराला ' मात्रा गिराना ' असे म्हणतात. दीर्घ स्वरयुक्त शब्द लिहिताना दीर्घ लिहिणे पण उच्चार मात्र ऱ्हस्व करणे. असा हा प्रकार अपवाद, सवलत म्हणता म्हणता उर्दूत नियम झाल्याचे आढळते. मराठीत आ, ई, ऊ या दीर्घ स्वरांनी युक्त शब्दांची -हस्व रूपांतरे रूढ आहेत. ती अशी-
.
आ_स्वर
...........
‘आता’ या शब्दाचे रूप ‘अता’
.
‘माझा अखेरीचा अता घेऊ कसा घोट मी
हातातला पेला पुन्हा खाली पडाया लागला’
(एल्गार, प्र. आ. पृ. ७३)
.
ई_स्वर
............
.
‘उगीच’ या शब्दाचे रूप ‘उगिच’
.
‘उगिच बोलायचे उगिचहासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे’
(एल्गार, प्र. आ. पृ. ७३)
.
ऊ_स्वर
............
.
‘चुकून’ शब्दाचे रूप ‘चुकुन’; ‘धरून’ शब्दाचे रूप ‘धरुन’
.
‘चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुनबांधायचे’
(एल्गार, प्र. आ. पृ. ७६)
काना कमी करून ‘आता’ ह्या शब्दाचे रूप ‘अता’ करता येईल. वेलांटी आणि उकार -हस्व दाखविता येतील. परंतु आ, ई, ऊ, या तीन स्वरांना सोडून उरलेल्या ए, ऐ, ओ, या दीर्घ स्वरांना -हस्व दाखविण्याची सोय देवनागरी लिपीत उपलब्ध नाही. त्याकरिता 'मात्रा गिराना ' ह्या सवलतीचा उपयोग
करण्यात येतो. उदा.
.
ए_स्वर
. ...........
‘ये सारा जिस्म झुककर बोझसे दुहरा हुआ होगा
.
ऐ_स्वर
.............
.
मै सजदे में नही था आपको धोका हुआ होगा’
(साये में धूप - पृ. १५)
हिंदीतील प्रसिद्ध विद्रोही गझलकार दुष्यंतकुमार यांची वरील गझल ‘वियद्गंगा’ या वृत्तात आहे. या वृत्ताचा ‘लघु-गुरू’ क्रम पुढील प्रमाणे -
लगागागा । लगागागा । लगागागा । लगागागा
त्याचे चिन्ह लेखन :
U--- | U--- | U--- | U---
ये सारा जिस् । म झुककर बो । झसे दुहरा । हुआ होगा
U - - - | U - - - | U - - - | U - - -
मै सजदे में । नहीं था आ । पको धोका । हुआ होगा
U - - - | U - - - | U - - - | U - - -
वरील गझलेत ‘ये’ आणि ‘मै’ ही दोन्ही अक्षरे -हस्व स्वराइतक्या एका मात्रेच्या कालावधीत उच्चारावी लागतात. आणि या उच्चारण पद्धतीमुळे ‘ये’ आणि ‘मै’ ही अक्षरे मराठीतील रूढ वृत्तपद्धतीनुसार ‘गुरू’ असली तरी हिंदीतील उच्चाराधिष्ठित वृत्तपद्धतीनुसार ‘लघू’च ठरतात.
.
ओ_स्वर
..............
.
‘कोई पास आया सवेरे सवेरे
मुझे आजमाया सवेरे सवेरे’
प्रसिद्ध गझलगायक जगजितसिंग यांनी गायिलेली सैय्यद राही यांची वरील गझल ‘भुजंगप्रयात’ या वृत्तात आहे. या वृत्ताचा ‘लघु-गुरू’ क्रम पुढीलप्रमाणे-
लगागा । लगागा । लगागा । लगागा.
त्याचे चिन्ह लेखन :
U-- | U-- | U-- | U--
कोई पा । स आया । सवेरे । सवेरे
U - - | U - - | U - -| U - -
मुझे आ । जमाया । सवेरे । सवेरे
U - - | U - - | U - -| U - -
वरील गझलेत ‘को’ हे अक्षर -हस्व स्वराइतक्या एका मात्रेच्या कालावधीत उच्चारावे लागते. आणि या उच्चारण पद्धतीमुळे ‘को’ हे अक्षर मराठीतील रूढ वृत्तपद्धतीनुसार ‘गुरू’ असले तरी हिंदीतील उच्चाराधिष्ठित वृत्तपद्धतीनुसार ‘लघू’च ठरते.
उर्दू आणि गुजराती भाषेचे एकवेळ बाजूला ठेवले तरी हिंदी आणि मराठीची एकच देवनागरी लिपी असल्याने वृत्ताच्या बाबतीतली जी सवलत हिंदीत निर्दोष समजली जाते ती मराठीत तंत्राची अशुद्धता मानली जाऊ नये. कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे छंदशास्त्रातील लघुगुरूचे मूलतत्व प्रत्येक अक्षराचा ‘उच्चारण कालावधी’ हेच आहे आणि उच्चारण कालावधीला जरासे लवचिक ठेऊन एखाद्या शब्दातील एखाद्या अक्षराला आशयसापेक्ष सवलत दिली तर हिंदी भाषेसारखी मराठीतही गझलरचना अधिक सहज होईल. अर्थात त्यातील अपवादात्मकता मराठी शुद्धलेखनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघनही करणार नाही, याचे भान ठेवावे लागेल. याच संदर्भात सुधीर रसाळ यांचे पुढील विधान अधिक बोलके आहे :
‘लघू व गुरू यांच्या उच्चारांचा काळ सापेक्ष असतो. लघू उच्चाराला जो काळ लागतो, त्याच्या दुप्पट काळ गुरू उच्चाराला लागतो, असे मानले जाते. लघुगुरू उच्चारांच्या विशिष्ट प्रकारे होणा-या आवर्तनांनी ही लय निश्चित केली जाते. ही लय शब्दांच्या नैसर्गिक उच्चारांशी निगडित नसते. एकही शब्दोच्चार न करता शार्दूलविक्रीडित, पृथ्वी, नववधू, प्रणयप्रभा, घनाक्षरी, दिंडी हे व असे छंद गुणगुणुन दाखविता येतील म्हणून सर्व छंदांचा कल शब्दोच्चारांच्या नैसर्गिक उच्चारांतून जाणवणा-या लयबद्धतेऐवजी संगीतातील लयबद्धतेकडे झुकलेला आहे.’(कविता आणि प्रतिमा, प्र. आ. पृ. ४५५)
.
६.
.
वृत्तांची विविधता
......................
.
‘गझल लेखनासाठी नेहमी फक्त एकाच वृत्ताचा उपयोग करू नये. वेगवेगळी वृत्ते वापरावीत. त्यामुळे आपली शब्दांवरील पकड अधिक मजबूत होते’. ‘रंग माझा वेगळा’च्या सातव्या आवृत्तीत (जाने.२००२) समाविष्ट असलेल्या ‘गझलेची बाराखडी’मधे ही ‘महत्वाची’ टीप दिली आहे.
गझलसंग्रहात एकाच वृत्तात असलेल्या अनेक गझला लागोपाठ वाचताना किंबहुना मोठ्याने वाचताना वृत्तातल्या उच्चारणसिद्ध लयीचा एकसुरीपणा जाणवतो. नित्य नव्याची आवड असलेल्या चोखंदळ रसिक मनाला तो खटकतोही. त्यासाठी वृत्तांच्या विविधतेची निकड जाणवते. वेगवेगळया वृत्तांची लय शब्दवळणी पडली तर कवीला वेगवेगळया वृत्तात गझल लिहिणे फारसे कठीण नसते; पण अशा वृत्तांच्या विविधतेला कवीसापेक्ष मर्यादा असणारच. कवीने किती प्रकारच्या वृत्तात गझला लिहिल्या? हा प्रश्न महत्वाचा नसून त्याच्या गझलांत प्रतिमांचे नावीन्य किती? हा प्रश्न खरे तर त्या कवीच्या काव्यकर्तृत्वाविषयी अधिक मोलाचा असतो. वृत्तांच्या विविधतेमुळे फार तर उच्चारणसिद्ध लयीचा एकसुरीपणा टाळता येऊ शकेल. परंतु केवळ वृत्तवैविध्यामुळे गझलेतील काव्यात नावीन्य येणार नाही म्हणून वृत्तांची विविधता गझल किंवा इतर कवितांच्या बाबतीत काटेकोर तारतम्याने विचारात घेतली पाहिजे.
अक्षरगणवृत्तात व गझलेच्या ‘देवप्रिया’ आणि ‘व्योमगंगा’ वृत्तांत अधून मधून कविता रचणारे मर्ढेकर नंतर ‘पादाकुलक’ या मात्रावृत्तातच आपल्या जास्तीत जास्त कविता का लिहितात, याचा शोध आपण घेतला तर आपल्या लक्षात येईल की त्यांना आपल्या कवितेतले संगीत हरवू द्यायचे नाही आणि शब्दरचनेची आशयनिष्ठ अकृत्रिमता काव्यकलेच्या पातळीवर न्यायची आहे. उद्याची मराठी गझल कदाचित मर्ढेकरांसारखी मात्रावृत्तात अधिक रमेल अशी चिन्हे आज दिसू लागली आहेत.
.
७.
.
ग़ालिबच्या पूर्वीचे उर्दूतील मात्रावृत्त
........................
'हरिभगिनी ' उर्फ बहर-ए- मीर
.
८ / ८ /८ / ६
ह्या तीस मात्रांच्या मात्रावृत्ताला माधव पटवर्धन 'हरिभगिनी ' संबोधतात तर उर्दू 'अरुज' त्यालाच बहर - ए - मीर म्हणते.
मीर तक़ी 'मीर' (1723 - 1810 ) यांच्या
'पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है '
ह्या मात्रावृत्तातील गझलवरुन ह्या मात्रावृत्ताला बहर - ए - मीर हे नाव पडल्याचे मानले जाते.
अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'एक नजर ' हा चित्रपट १९७२ साली प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटासाठी मीर तक़ी 'मीर' यांच्या ह्याच गझलच्या मतल्याचा मुखडा करून
मजरुह सुलतानपुरी यांनी लिहिलेले युगल गीत लोकप्रिय झाले.
मात्रावृत्तात अधिक प्रमाणात गझला लिहिणारा अलिकडच्या काळातील शायर क़तील शिफ़ाई (1919-2001)होय.
अक्षरगणवृत्तात घेतलेली 'मात्रा गिराना ' ची सवलत मीर,क़तील ह्या शायरांनी मात्रा वृत्तात सुद्धा घेतल्याचे आढळून येते.
.
८.
.
लवचिकता (Flexibility)
......... ...........
.
उर्दू छंदशास्त्रानुसार 'मात्रा गिराना ' ह्या प्रकाराला सुरुवातीला अपवाद, नंतर सवलत म्हणून मान्यता मिळाली. सहज अभिव्यक्तीसाठी उस्ताद शायरांनी ह्या सवलतीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपयोग केला की आज ह्या सवलतीला जवळजवळ नियमाचे
रूप प्राप्त झाले आहे . 'मात्रागिराना ' ह्या संकल्पनेला आपण मराठीत 'मात्रा घटवणे' म्हणू शकतो. पण या दोन्ही नामा पेक्षा तिला
'लवचिकता ' म्हणणे अधिक योग्य वाटते.
कोलंबिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर मीर आणि ग़ालिब यांच्या गझलांच्या सर्वांगीण परामर्शासोबत गझलांच्या वृत्तांसंबंधी एक अत्यंत उपयोगी पुस्तिका दिलेली आहे-
URDU METER :A PRACTICAL HANDBOOK
-F. W. Pritchett & Kh. A. Khaliq
ह्या पुस्तिकेत दुसरे प्रकरण आहे- Flexibility. ज्यात
'मात्रागिराना ' ह्या संकल्पनेला स्पष्ट केले आहे . त्यावरुन ह्या संकल्पनेला 'लवचिकता ' संबोधणे अधिक उचित आहे,असे मला वाटले. दीर्घ स्वरयुक्त शब्दांतील संबंधित अक्षरांच्या पाहिजे तेव्हा दोन मात्रा आणि हवी तेव्हा एक मात्रा मोजण्याची लवचिकता आहे.
.
९.
.
शब्द निवडीचे व्यापक स्वातंत्र्य
.
'आशयास शब्दांची तंग विजार ' परिधान करताना कवीला शब्द निवडीचे स्वातंत्र्य जेवढ्या व्यापक प्रमाणात उपलब्ध होईल तेवढ्या प्रमाणात त्याची अभिव्यक्ती सहज होण्याची शक्यता वाढते.
सहज शब्दरचनेला अक्षरगणवृत्ताच्या तुलनेत मात्रावृत्त अधिक सहाय्यकारी ठरते. त्यात 'मात्रा घटविणे ' ह्या लवचिकतेला सोबत घेतले तर अगदी गद्यप्राय बोलल्यासारखी ओळ सहजपणे शब्दबद्ध होऊ शकेल.
.
१०.
.
स्वर काफिया
.
गझल हा यमकप्रधान काव्यप्रकार आहे. गझलमधील यमक म्हणजे काफिया. व्यंजनाचे काफिये निवडताना शब्द निवडीवर मर्यादा पडतात म्हणून स्वर काफियाचा उपयोग अधिक भाषिक लवचिकता प्रदान करणारा ठरला.
आज उर्दू -हिंदीत साधारणतः चाळीस टक्के गझला स्वर काफियांच्या आढळतात. म्हणजे साठ टक्के गझला ह्या व्यंजन काफियांच्या आहेत. हे प्रमाण थेट ग़ालिबच्या काळापासून आजपावेतो कायम आहे. प्रत्येक भाषेतल्या म्हणींचा अभ्यास केला तर त्यात नैसर्गिक लयीने येणारी व्यजनांची सयमकता आपले लक्ष वेधून घेते. शेराला वारंवार उद्धृत करण्याची, त्याला सुभाषिताचा दर्जा प्राप्त होण्याची, त्या शेराचे भाषेतील उपयोजन वाढण्याची जी क्षमता शब्दरचनेत येते, तिला कारण त्या शेरात उतरलेला अनुभवाचा अर्क आणि स्वर -व्यजनांची सयमकता त्या शेराला श्रृतीसुलभ उठाव देत असते म्हणून.
.
११.
.
शब्दक्रम आणि शब्द सहयोग
.
काव्यप्रकारानुसार शब्दरचनेची प्रत्येक ओळ लहान किंवा मोठी असते.
तो त्या ओळीचा भाषिक अवकाश असतो.
गझलच्या शेरात दोन ओळींचा एक स्वतंत्र, सेंद्रिय घटक असतो. ह्या घटकात पहिली
ओळ आणि दुसरी ओळ मिळून एक अर्थपूर्ण विधान सादर करीत असतात. त्यातील अर्थवहनाचे माध्यम असतात शब्द. आणि त्या शब्दांच्या
मुख्यार्थासह असणाऱ्या काही विशेष अर्थच्छटा, शेराच्या अर्थपूर्ण विधानाची अनेकार्थ सूचनक्षमता वृद्धिंगत करणाऱ्या असतात.
शेरातील ह्या दोन ओळींच्या रचनेत दोन तत्त्वे अत्यंत महत्वाची असतात.
अ ) शब्दक्रम
Order of words
ब ) शब्दसहयोग
Association of words.
ओळीतल्या एकाही शब्दाचा क्रम बदलला तरी अर्थप्रवाह अवरुद्ध होतो. आणि विधान अर्थपूर्ण होण्यात बाधा निर्माण होते.
शब्दक्रम योग्य आहे परंतु मधेच एखादा शब्द अर्थवहनाला सहयोग करीत नसेल तरी विधानाचा अर्थ अपूर्ण राहू शकतो.
प्रत्येक शब्द आपल्या स्थानी आधीच्या आणि नंतरच्या शब्दांना तर सहयोगी असावाच लागतो शिवाय दोन ओळींच्या घटकातील सेंद्रिय म्हणजे
एकजीव संघटनेलाही त्याचा सहयोग कमी पडता कामा नये .
या दृष्टीनेच कवीला उपलब्ध असलेले
शब्दनिवडीचे स्वातंत्र्य लवचिक असणे अपरिहार्य असते.
.
१२.
.
वाचक सापेक्षता
.. .....................
आतापर्यंत ज्या मुद्यांचा उहापोह केला, ते सर्व मुद्दे लेखनाच्या अंगाने म्हणजेच कवीच्या बाजूने आपण
पाहिलेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की कवी लिहितो कोणासाठी ?दुर्देवाने
प्रत्येक काळात कवितेचा वाचक अत्यंत मर्यादित राहिला आहे. बहुतांश वेळा कविता लिहिणारा वर्गच कवितेचा वाचक असतो. आणखी छोटासा का असेना पण एक वर्ग केवळ रसिकांचा असतो. त्याची संख्या वाढणे हे आपल्या सांस्कृतिक प्रगतीचे लक्षण असते . पण तसे होताना दिसत नाही. ह्या छोट्याशा निखळ रसिक समुहाला कवितेच्या तांत्रिक चर्चेत काडीचाही रस नसतो. शेर वाचल्यानंतर शेरातील शब्दरचना त्याच्याशी काही संवाद साधणार असेल तर तो शेर -कविता वाचेल. आम्ही आमच्या पद्धतीने लिहू.ज्याला समजून घ्यायचे असेल त्याने आपले भाषिक कौशल्य, आकलन क्षमता वाढवावी, हीच लिहिणाऱ्यांची अपेक्षा कालही होती.आजही आहे.
आणि मग कविता ही केवळ विद्यापीठातील
मूठभर विद्वानांच्या चर्चेचा आणि आस्थेचा विषय बनून राहिलेली असते.
.
१३.
.
काळाची आणि कलावंतांची कुंडली मांडू नये
...........................
येणारे २०२० ते २०३० हे दशक आणि त्याच्या पुढची सात दशकं म्हणजे एकविसावे शतक संपता संपता मराठी भाषा जिवंत राहील का ?तर त्याचे उत्तर निश्चितपणे 'होय ' असेच आहे. मग मराठी गझलचे काय होईल ?
अ ) मराठी गझल सहज अभिव्यक्त होत कोणत्याही 'लवचिकते ' शिवाय अक्षर गणवृतात लिहिली जाईल?
ब ) की मराठी गझल सहज अभिव्यक्त होत,कोणत्याही 'लवचिकते ' शिवाय मात्रावृतात लिहिली जाईल ?
क) मराठी गझल सहज अभिव्यक्त होत,कोणत्याही 'लवचिकते ' शिवाय मात्रावृतात लिहिली जाईल का ?
ड ) की मराठी गझल सहज अभिव्यक्त होत, 'लवचिकते ' सह अक्षरगणवृत्तात की मात्रावृतात की दोन्हीत लिहिली जाईल ?
ई ) मराठी गझल सहज अभिव्यक्त होत केवळ स्वर काफिया घेऊन लिहिली जाईल?
फ) की मराठी गझल सहज अभिव्यक्त होत व्यंजन काफिया आणि स्वर काफिया दोन्ही घेऊन लिहिली जाईल?
खरं तर अशा प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्यापेक्षा हे सर्व प्रश्न येणाऱ्या काळाच्या हाती देऊन आपण सर्वच जुने -नवे कवी मोकळे होणे केव्हाही चांगले.
अगोदरच्या पिढीने तयार उत्तरे नव्या पिढीच्या हाती देणे जसे योग्य नाही, तसेच काळाची आणि कलावंताची कुंडली मांडणे ही उचित नसते.
................................
अतिशय रोचक आणि उपयुक्त लेख.
उत्तर द्याहटवाअभ्यास पूर्ण आणि माहितीपूर्ण लेख.गझल कविता लिहिणाऱ्यास उपयुक्त ..!शुभेच्छा !
उत्तर द्याहटवाअत्यंत उपयुक्त लेख
उत्तर द्याहटवाखूप सुंदर... अभ्यासपूर्ण....
उत्तर द्याहटवाफार उपयुकत माहिती
उत्तर द्याहटवासर गझलभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त लेख, धन्यवाद!
उत्तर द्याहटवा